|| नितीन अरुण कुलकर्णी

पाण्याचा वापर आपण नित्यच करत असतो. पाण्याचं दृश्यदेखील आपण सौंदर्यासाठी वापरतोच की. पाण्याचे सुंदर फोटो आपल्या लॅपटॉप, मोबाइलचे स्क्रीन सेव्हर्स असतात (अर्थात, त्यांना प्रत्यक्ष पाण्याचं मात्र वावडं असतं!). पाण्याचं तत्त्व- त्याचं प्रवाहीपण व निराकारपणा यांची, म्हणजे ‘अस्तित्वा’ची होणारी जाणीव मात्र आपण दुय्यम मानलेली असते. काही लेखक, कलाकार, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ मात्र पाणीतत्त्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत असतात; त्याच्या आकारलीला बघता बघता, दाखवत असतात. आज आपण ‘पाणी’ – ‘रोजच्या उपयोगातील साधन’ याच्या पुढे जाऊन एक ‘संकल्पना’ म्हणून पाहू या..

मी नळ सोडला. माझे दोन्ही हात पाण्याच्या धारेखाली धरले. पाण्याचा थंडपणा अनुभवला. हात एकमेकांत घेऊन घासले, मग हाताची ओंजळ केली, त्यात पाणी भरून वाहू लागले. आता ते ओंजळभर पाणी तोंडावर मारले, हात फिरवून चापपले. पूर्ण चेहऱ्यावरून हात घासून फिरवले. पाण्याचा स्पर्श परत परत अनुभवला. याचा ‘आल्हाद’ मनाला झाला, पण त्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. आता तोंडावरून बऱ्याच वेळा हात फिरवून पाण्याचे थेंब काढून टाकण्याचा प्रयत्न केला. आता हात झटकले, साडीच्या पदराला वा लुंगीला किंवा टॉवेलचा खरखरीतपणा अनुभवताना हाता-तोंडावरचे पाणी पुसले.

पाण्याच्या वापराचे असे अनेक हवे-नकोसे अनुभव आपण रोजच घेत असतो. हे अनुभव पाण्याचा साठा कसा आहे व त्याचा वापर कसा कसोशीने करायचा (किंवा त्याकडे दुर्लक्ष करायचं), यावरच केंद्रित होतात. यातले सूक्ष्म अनुभवजन्य भाग; जसे- पाणी शिंपडलं, उडवलं, पसरवलं, ओघळवलं, थापवलं, पुसलं वा काही तरी बुडवलं या क्रियांवर अवलंबून असतात आणि या क्रिया आपण अभावितपणे करत असतो. कारण प्रत्येक क्रियेत आपण पाण्याला स्पर्श करण्याऐवजी पाणीच आपल्याला स्पर्श करीत असते. पाणी स्वत:चे गुण कधी सोडत नाही. पाणी प्रवाही असते. आपल्याला भारित करून घेणे व आपल्यात सामावून घेण्याची शक्ती पाण्यात असते (म्हणजे गावी स्वच्छ तळ्याकाठी गेलो की आपल्याला त्यात खेळावेसे वाटणे, यात पाण्याचाच वाटा मोठा!). आणि याची अनामिक भीतीही आपल्या मनात असते.

आपल्या असं लक्षात येईल, की इथे वर्णन केलेला अनुभव आपला सगळ्यांचाच असला, तरी अभावानेच आपण त्याचे असे पुनरावलोकन केलेले असते. आपल्याला केवळ काम उरकण्याची घाई असते. दिवसातून आपण किती वेळा हात-तोंड धुतले? पाणी प्यायले? किती वेळा लॅपटॉपवरील पाण्याचा स्क्रीन सेव्हर बघितला? या सर्वावरून आपला रोजचा पाण्याशी असलेला संबंध लक्षात येईल.

नैसर्गिकपणे ‘पाणी’ आपल्या शरीराच्या आत, बाहेर व मनात वसत असते आणि त्याचे काम करत असते. आपण स्वत:हून ठरवून पाण्याकडे किती वेळा गेलो? (केवळ शरीरधर्म किंवा सौंदर्याची आस वा आल्हाद म्हणून नव्हे) त्याला स्पर्श करून त्याचा सर्वज्ञपणा किती ओळखला? एका कोरडय़ा हाताची कोनात्मक ओंजळ करून चमचाभर पाणी त्यात घेऊन; हाताच्या मांसाला होणारा त्याचा स्पर्श अनुभवत त्या मोठय़ा ओघळातून परावर्तित होणारी प्रकाशकिरणं डोळ्यांत घेऊन व नंतर मिटून; ओठांच्या चंबूने ते पाणी जेव्हा तोंड व घसा ओले करते, तेव्हा आपण ‘स्वत:हून’ त्या प्रवाहीतत्त्वाला अंगीकारलेले असते, त्यांवर कृतज्ञता व्यक्त केलेली असते. रवींद्रनाथ टागोरांची एक कविता येथे सयुक्तिक ठरेल :

‘बरीच र्वष सायास करून, अनेक परदेशगमनं केली,

उंच उंच पर्वत-शिखरं पाहिली,

अनेक महासागर पाहिले..

पण मी बघितला नव्हता, चमचमणारा तो दवबिंदू

माझ्या स्वत:च्याच दारापाशी असलेला

मक्याच्या पात्याच्या कडेवरून ओघळणारा.’

इथे दवबिंदू (बाष्पाचे सांद्रीभवन होऊन तयार झालेला पाण्याचा थेंब) म्हणजे जणू काही माझ्या जवळच असलेलं जग, थेंबात परावर्तित झालेली जगाची प्रतिमा म्हणून समोर येते. आणि सूक्ष्म गोष्टींमध्ये लपून असलेले व आपण दुर्लक्षिलेले सामथ्र्य म्हणूनही समोर येते. पाण्याचा एक थेंब काय करू शकतो, याचेच हे एक तरल उदाहरण!

पाणी स्वत:त एक तत्त्व असते, संपूर्ण. पाण्याचा जेव्हा इतर तत्त्वांशी संपर्क होतो तेव्हा त्याचे रूप पालटते. धरेवरती ओघळल्यावर ते वाहते. वाहणारा जलाशय बनतो. तो होतो नदी. महाकाय साचलेला तो सागर. गुरुत्वाने बनतात लाटा व त्यांची आवर्तनं; त्यांचे आवाज होतात व अवकाशातून वाहतात. हवेत उडलेल्या पाण्याचे होतात छोटे छोटे पंजे व थेंब, बिंदू, शीतल फवारे. अग्नी व प्रखर सूर्यामुळे होते वाफ, आकाशतत्त्वाने होतो ढग व पावसाचा वर्षांव. कमीत कमी उष्मेने होते पाणी कठीण.. बर्फमय.

या सर्व पाण्याच्या रूपांकडे बघताना त्यांचा असलेला परस्परसंबंध विसरला जातो. जसे की, एक प्रचंड मोठा जलाशय हा प्रवाहांचादेखील असतो व त्यात अनेक छोटे थेंबही असतात, बुडबुडेसुद्धा असतात. काही संकल्पनांमध्ये मात्र असे परस्परांचे साहचर्य दिसून येते. होकूसाय (१७६०-१८४९) या जपानी कलाकाराच्या जगप्रसिद्ध मुद्रण तंत्रानं (वूडकट) केलेल्या चित्राकडे (‘द ग्रेट वेव्ह’) पाहताना मन अचंबित होतं. बहुआयामी असलेल्या या चित्रात कथनाचे तीन भाग येतात : लाटेमध्ये अडकलेल्या मच्छीमारांच्या बोटी, यातून तयार होणारे भीतीचे वातावरण आणि माऊंट फुजीचे लाटेखालचे होणारे दर्शन (या डोंगरावरील चित्रशृंखलेमधल्या ३६ चित्रांपैकी हे एक चित्र आहे)! सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या महाकाय लाटेच्या अनेक पंजांसारख्या छोटय़ा फेसाळणाऱ्या लाटा, थेंब, फेस व या लाटेने पकडलेला महाकाय अवकाश आपल्याला ‘आ’ वासायला लावतो.

जपानी कलेत पाणी व लाटा काढण्याची अनेक शतकांची मोठी परंपरा दिसते. बरोबर १२५ र्वष आधी काढलेलं ‘खवळलेल्या लाटांचे’ आणखी एक ओगाटा कोरीन (१६५८-१७१६) या चित्रकाराने काढलेलं ‘रफ वेव्ह्स’ हे चित्र त्याच्या गहिरेपणामुळे आपल्याला मोहून घेतं. अशा चित्रांचा उद्देश सुशोभीकरणासाठी होत असे, पण अशा काही उदाहरणांत एक प्रकारची आध्यात्मिकताही दिसून येते. निसर्गचित्रात निसर्गाच्या तत्त्वाला चित्रित करणे हा भाग गूढ भासतो. अशी चित्रे जणू काही पाणी या तत्त्वाला देवत्व बहाल करतात.

याव्यतिरिक्त पाण्यात तरंगण्याच्या रूपकाचा वापर ‘ऊकियो-ई’ (तरंगणारे जग) या १७-१९व्या शतकांदरम्यान प्रभावी असलेल्या, रंजनाला महत्त्व देणाऱ्या विचारसरणीत केलेला दिसतो. असी रोयीच्या ‘टेल्स ऑइ द फ्लोटिंग वर्ल्ड’ (१६६१) या कादंबरीतील हे अवतरण पाहा :

‘केवळ या क्षणासाठीच आपण जगत आहोत. या क्षणीच चंद्र, हिमवर्षांव, चेरीचे फूल आणि मेपल पानांचा आनंद घेताना गाणी गाणे, मद्यपान करणे आणि स्वत:ला वेगाने झुंझवणे; स्वत:च्या गरिबीच्या चिंतेविना उत्साहपूर्ण, असंबद्ध अशाच क्षणी जगणे.. नदीचे प्रवाह जसे स्वत:सोबत सर्व तरंगणाऱ्याला वाहून नेतात. यालाच आम्ही ‘ऊकियो-ई’ म्हणतो.’

द. ग. गोडसे हे आपले महत्त्वाचे सौंदर्यमीमांसक. त्यांच्या सौंदर्य प्रणालीला ते ‘सौष्ठव विचार’ म्हणतात. त्यांच्या मनात ‘नदी’ ही एक संकल्पना म्हणून रुजली. त्यांच्या मते, हा विचार म्हणजे ‘वाऽक’ विचार आणि हा केवळ भौगोलिक न राहता, मानवाचा- बौद्धिक, शारीरिक व मानसिकही होतो. त्यांचा वाकवळणांचा हा वैचारिक प्रवास मूलगामी व दुर्लक्षिलेला असा आहे.

अँडी गोल्ड्सवर्दी या ‘भूमीकला’ या प्रकारातल्या कलाकाराचे काम लक्षवेधक आहे. त्याची नश्वर कला तो निसर्गातल्या घटकांची रचना करून करतो, जी नंतर नष्ट होते. आपल्याला मात्र बघता येते ती ‘रिव्हर्स अ‍ॅण्ड टाइड्स’ या फिल्ममध्ये. यातले त्याचे एक काम नैसर्गिकपणे तयार झालेल्या बर्फाच्या सळ्या हाताच्या उष्णतेने जोडून तो नदीसारखे वाकवळण बनवतो. हे काम सूर्य उगवण्याबरोबर हळूहळू बर्फाचे पाणी होऊन मातीत विलीन होते. हे असे ‘विलीन होणे’ हा पाणीतत्त्वाचा एक महत्त्वाचा गुणविशेष. त्यामुळेच या कलाकृतीचा तो दृश्याकडून अदृश्याकडे जाणारा आशय ठरतो!

लेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.

nitindrak@gmail.com