20 October 2020

News Flash

भावनांचे मानस-विश्व

‘संकल्पना’ म्हणजे काही तरी भारी आणि ‘भावना’ मात्र व्यक्तिगत, किरकोळ..

|| नितीन अरुण कुलकर्णी

‘संकल्पना’ म्हणजे काही तरी भारी आणि ‘भावना’ मात्र व्यक्तिगत, किरकोळ.. असं वाटत असेल, तर जरा थांबा! भावनांमधूनच संकल्पना कशा उमलत जातात, याचा विचार आज करू या..

माणूस इतर जीवांपेक्षा वेगळा आहे तो त्याच्याकडे विचार करण्याच्या क्षमतेबरोबर, भावनांचा अनुभव आहे म्हणून. असा भावनाप्रधान अनुभव त्याला घेता येतो याची जाणीवही त्याला आहे. अशा सजगतेतून आलेला अनुभव जगण्यात रस आणतो. आपल्या प्रत्येक क्रियेत भावना जणू एखाद्या संप्रेरकासारखं काम करतात. म्हणूनच मग, एखादी कृती करताना ती किती भावते हे जास्त महत्त्वाचे ठरते. कामाच्या परिणामाआधी त्या कामाची कृती व त्या कृतीचा अनुभव किती भावनाप्रधान वा चित्तवेधक आहे हे जास्त महत्त्वाचे असते.

मानवी जीवन भावनेने व्यापून गेलेले आहे. नसर्गिकपणे निर्माण झालेली भावना अत्यंत गरजेची आहे. म्हणजे समजा, बऱ्याच वर्षांनंतर आपला जिवलग मित्र अचानक रस्त्यात भेटतो तेव्हाचा उचंबळून येणारा आपला आनंद; उभ्या असलेल्या बसच्या बाजूने जाताना कुणी तरी खिडकीतून पानाची पिचकारी मारतो व आपण थोडक्यात वाचतो, तेव्हाची आपली चीड व घृणा; रात्री आडवाटेवरून चालताना येणारी भीतीची शिरशिरी, या सर्वच भावना आपले जीवन समृद्ध करत असतात. अनुभव म्हणजे दुसरे काय? प्रसंगांचे बोधन (कॉग्निशन) व त्यावरचे भावनांचे सहज आरोपण.

मानवाच्या जगण्यात यंत्रांचा समावेश जसा झाला तसे त्याचे आयुष्य कमी कष्टांचे व ऐहिकदृष्टय़ा सुकर झाले. परंतु निसर्गापासून तुटल्यामुळे जीवनातला विरंगुळा जो आधी संस्कृतीतल्या चालीरीतींवर (ज्यात संगीत, नृत्य व विविध कला होत्या) अवलंबून होता त्यासाठी आता नवीन साधनांची आवश्यकता भासू लागली.. उदाहरणार्थ आधुनिक कला, तंत्रज्ञान, खेळ, रंजन आणि जीवनावश्यक वस्तू तसेच नवीन जीवनशैली. या बदलांमुळे साहजिकच अनुभवातले भावनेचे नसर्गिक स्थान ढळून कृत्रिम व प्रसंगी अनाठायी भावनारोपण सुरू झाले.

आपण आपला दुचाकी किंवा चारचाकी चालवण्याचा अनुभव पाहिलात तर हे लक्षात येईल. कुठलेही वाहन कशासाठी लागते? तर दळणवळणासाठी! पण आज वाहन खरेदी करताना आपण काय अधिक डोळ्यासमोर ठेवतो? त्या गाडीचा ब्रॅण्ड, आकार, रंग आणि वेग. टेस्ट ड्राइव्ह घेताना आपल्याला गाडी चालवण्याचा अनुभव कसा वाटतो? महत्त्वाचे म्हणजे किती दिमाखात आपण आपल्यापेक्षा वेगवान गाडीला ओव्हरटेक केले याचा ‘फील’ही महत्त्वाचा असतो.

‘‘माझ्या बायकोने मला सांगितले, फ्रान्समध्ये दर ५० मिनिटांत रस्त्यावर एक माणूस मरतो. पाहा या सर्वाकडे! सगळे कसे आततायी होऊन आपल्याभोवती फिरत आहेत. हे तेच लोक आहेत जे रस्त्यावर एखाद्या वृद्ध महिलेला त्यांच्यासमोर लुटले जात असताना स्वत:ला सावधगिरीने सांभाळून निघून जातात. परंतु ते जेव्हा ‘चक्रधारी’ बनतात तेव्हा त्यांना कशाचीच भीती कशी वाटत नाही?’’ – मिलान कुंदेरा यांच्या ‘स्लोनेस’ या कादंबरीतून.

कुंदेरा यांनी मंदतेचा संबंध, लक्षात ठेवण्याच्या क्रियेशी जोडला आहे, तर याउलट वेगाची कृती विसरण्याच्या प्रक्रियेशी. जेव्हा एखादा क्षण आस्वाद घेण्याचा, लक्षात ठेवण्यासारखा असतो तेव्हा नसर्गिकपणे आपली त्यात दीर्घ काळ राहण्याची इच्छा असते, तेव्हा आपसूकच आपण एखादी कृती हळूहळू करतो. दुसरीकडे जेव्हा आपल्याला भूतकाळातील अनुभव विसरायचा असतो तेव्हा आपण वेग अंगीकारतो व नकोश्या भावनेपासून दूर जातो.

या कथनात आधुनिक जीवनाची गती ही मुख्य संकल्पना आहे. या पुस्तकात अनेक घटना वेगाशी अथवा मंदतेशी निगडित आहेत (उदा.- वेगवान गाडीतून रपेट किंवा बागेतून निवांत फेरफटका). आपले वर्तन, भावना व स्मृती यांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांवर ही कादंबरी भाष्य करते.

‘स्मृती व भावना यांचा संबंध दृढ आहे. एखादा जुना प्रसंग आपल्याला जसाचा तसा आठवतो तो त्यातल्या भावनेच्या कोंदणामुळे.’

भावनांचे व्यक्त होणे हे न टाळता येण्यासारखे आहे. आपल्या चेहऱ्याचे हावभाव, शारीरिक हालचाली व शब्दातून व्यक्त होणारी भावना, नेमका अनुभव सांगण्याचा प्रयत्न करते.

चार्ल्स डार्विनच्या मते भावना म्हणजे माणसाच्या कृतीच्या पुसट होत जाणाऱ्या खुणा असतात. त्याच्या ‘ऑन द एक्स्प्रेशन ऑफ द इमोशन्स इन मॅन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल्स’ या सन १८७२ मधील पुस्तकात त्याने याचा सिद्धांत मांडला आहे. त्याने असा युक्तिवाद केला की, सर्व मानव आणि इतर प्राणीसुद्धा वर्तनाद्वारे भावना दर्शवतात. डार्विनने भावनांचा एक उत्क्रांतीवादी इतिहास तपासला, जो त्याला संस्कृतीत आणि प्रजातींमध्ये आढळून आला. त्या वेळी दुर्लक्षित राहिलेला असा हा विचार आज अनेक मानसशास्त्रज्ञांनी उचलून धरला आहे. तो असा की, काही भावना सर्व मानवी प्रजातींमध्ये समान आहेत. जसे राग, भय, आश्चर्य, घृणा, आनंद आणि दु:ख. भावना नेहमीच आपल्या आत हालचाल तयार करते व बाह्य़ हालचालीस कारणीभूत ठरते.

कलाकार तर नेहमीच भावनेचा नेमकेपणा आपल्या माध्यमातून टिपण्याचा प्रयत्न करत असतात. मानवी अनुभवाची कल्पना साकारू शकतात. तर साहस, आनंद, भीती, आशा, ईर्षां अशा अनेक भावनांच्या आधारे, सिरॅमिक-कलावंत मित्सी स्लेउर्सने मात्रोष्का या रशियन बाहुलीने प्रेरित होऊन ९९ भावनांच्या वेगवेगळ्या छटा छोटय़ा छोटय़ा शिल्पांमध्ये बद्ध केल्या. डिझायनर आणि कलाकार एप्रिल सोतार्मन २०१६ पासून, अमेरिकेतील सिएटलच्या आसपास रस्त्याच्या आजूबाजूस चिन्ह व अक्षरांचे फलक तयार करून लावते. या फलकांचा अभावितपणा लक्ष वेधून घेतो आणि अर्थातच साधारणपणे न व्यक्त केलेल्या भावनांचे असे सार्वत्रिक प्रदर्शन विस्मय आणते.

मानसशास्त्राच्या क्षेत्रात न्यूरॉलॉजीच्या प्रवेशामुळे बदल घडत आहेत. असाच एक सिद्धांत, ‘सिम्युलेशन्स’चा (‘हाऊ इमोशन्स आर मेड’ या लिसा फेलमॅन बॅरेट यांच्या पुस्तकातून). त्यांच्या मांडणीप्रमाणे सिम्युलेशन्स म्हणजे जगात काय घडत आहे याबद्दलचे आपल्या मेंदूचे अंदाज (अनुभवाशी, पूर्वज्ञानाशी साधम्र्यीकरण) आहेत. प्रत्येक जागृत क्षणी, आपल्याला डोळे, कान, नाक आणि इतर इंद्रिय संवेदनांद्वारे मिळालेल्या अस्पष्ट व गोंधळाच्या माहितीचा सामना करावा लागतो. तुमचा मेंदू तुमच्या भूतकाळातील अनुभवांच्या आधारे एक पूर्वकल्प तयार करतो हे म्हणजे सिम्युलेशन ज्याची तुलना तुमच्या इंद्रियातून उद्भवलेल्या अस्पष्ट ज्ञानाशी करते. अशा रीतीने सिम्युलेशनमुळे आपल्या मेंदूला कुठला अर्थ निवडायचा व कुठला दुर्लक्षित करायचा हे पक्के होते. १९९०च्या उत्तरार्धात सिम्युलेशन्ससारख्या सिद्धांतांमुळे मनोविज्ञान आणि चेताविज्ञान या क्षेत्रात नवीन युगाची सुरुवात झाली.

आपल्या मेंदूच्या बाहेर सिम्युलेशनमुळे आपल्या शरीरात मूर्त बदल होऊ शकतात. या पुस्तकात मधमाशीचे सर्जनशील उदाहरण घेतले आहे ते बघू. तुमच्या मनाच्या डोळ्यात, मधमाश्या पांढऱ्या सुगंधी फुलाच्या पाकळीवर हलकेच उडताना पाहा.. ती कशी परागकण शोधत फिरत आहे..

जर आपणास मधमाशी आवडत असेल तर मग काल्पनिक कीटकाचे पंखांची गुणगुण आता इतर न्यूरॉन्सला जागृत करेल. याने आपले हृदय जलद होईल, आपल्या घर्मग्रंथी भरायला लागतील आणि आपला रक्तदाब कमी होईल आणि याउलट जर भूतकाळात आपल्याला मधमाशीने कडाडून चावा घेतला असेल तर आपला मेंदू तुमच्या शरीराची तेथून पळून जाण्याची तयार करू लागेल.

तुमचे मधमाशीशी संबंधित सिम्युलेशन तुमच्या ‘मधमाशी म्हणजे काय’ याच्या मानसिक संकल्पनेशी निगडित आहे. या संकल्पनेत मधमाश्यांविषयीची फक्त माहितीच नसते, तर रूप, ध्वनी यांसारख्या संवेदना व मधमाश्यांशी संबंधित इतर संकल्पनांमध्ये समाविष्ट असलेली माहितीदेखील (फुलांचा वाफा, सुगंधी फुलं, मध, मधमाशीचा चावा व वेदना इत्यादी) असते. ही सर्व माहिती आपल्या मूळ संकल्पनेबरोबर संकलित केली जाते आणि याद्वारे आपण ‘मधमाशी’ला अन्य संदर्भ कसे जोडू, हे ठरत जाते.

याचा अर्थ असा की, ‘मधमाशी’सारखी संकल्पना प्रत्यक्षात आपल्या मेंदूतील ‘न्यूरल पॅटर्नचा जोडसंग्रह’ आहे, जो आपल्याला आपली कृती समजण्यास आणि सहजपणे वागण्यास मार्गदर्शन करतो. भावनांच्या वहनाखेरीज व दुव्यांखेरीज हे अशक्य आहे.

आपल्या या ‘संकल्पनांच्या संस्कृती’ या सदराचे प्रयोजन विविध क्षेत्रांतील संकल्पनांचे न्यूरॉन्स एकत्र जोडून बघणे हेच आहे. यातून आपल्या प्रत्येकालाच विचारांची नवी दिशा मिळो!

nitindrak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2019 2:06 am

Web Title: what is concept
Next Stories
1 हास्याच्या नाना छटा :)
2 ‘एकांता’चे हितगुज..
3 तेरी दुनिया में जीने से..
Just Now!
X