30 October 2020

News Flash

तेरी दुनिया में जीने से..

मृत्यूला टाळत टाळत आपण जगत राहतो.

|| नितीन अरुण कुलकर्णी

मृत्यूला टाळत टाळत आपण जगत राहतो. त्यावर बोलून सामोरे जाणे आपल्याला पटत नाही. ‘गंभीरतेचा लवलेश’ आपल्याला जगण्यात नको असतो, पण मृत्यूबद्दल एक गूढ आकर्षण असते. कला व संस्कृती हेच हेरते व मृत्यूची प्रतीकं, देव, मरणपूर्व जीवन, भुतंखेतं वगरेंमध्ये पुरेपूर मरण भरून ठेवते..

‘‘आपल्याला जशी समज यायला लागते तशी मृत्यूबद्दल जिज्ञासा तयार व्हायला लागते. जवळच्या लोकांच्या मृत्यूमुळे झालेला विरह अनुभवून ‘मरण’ या पूर्णविरामाबद्दल भीती तयार झालेली असते; यांचं आपण व सर्जनशील माणसं काय करतात?’’ हे बघणं हाही एक रंजक प्रवास असू शकतो.

उन्हाळ्यातले दिवस आहेत व संध्याकाळी उष्ण हवेबरोबरच थोडा थंडावा तयार होऊ लागलेला आहे. गर्मीतल्या अशा दिवसांतलं आपलं चिडचिडेपण कमी व्हायला लागलं आहे. गरम झळांबरोबर मध्येच थंड हवेच्या लहरी वाहू लागल्या आहेत. या दोन्ही विरोधी भावनांचं मीलन आपण मनात अनुभवत असतानाच दूर रेडिओवर लागलेल्या गाण्याचे हे सूर आपल्याला ऐकायला येतात. गाण्याची चाल आपण लगेचच ओळखलेली असते. त्या गाण्याचे बोल असतात-

‘तेरी दुनिया में जीने से तो बेहतर है कि मर जाएं। वोही आँसू, वोही आहें, वोही ़ग़म हैं जिधर जाएं। तेरी दुनिया में जीने से तो बेहतर है की मर जाएं..’ – साहीर लुधियानवी

हाऊस नं. ४४ (१९५५) सिनेमातले हे गाणे. या गाण्यातल्या दर्दभऱ्या भावाचं गहिरेपण ‘मर जाएं’ या शब्दांमुळे तर अधिकच खोल होतं. गायक हेमंतकुमार व देव आनंद या जोडीच्या तोंडी असलेलं हे गाणे मरणाचा आपल्याशी असलेला रोमँटिक संबंध दाखवून देते. माधव इमारतेंच्या (चित्रकार व संगीताचे अभ्यासक) मते ‘‘प्रामुख्याने बिहाग या रागाच्या आसपास वावरणारे हे गाणे. रागाची वेळ रात्रीचा दुसरा प्रहर. रागाच्या मूडपेक्षा गाण्यातील काव्यरचना, शब्द, भाव, चित्रपटातील वेळ, गायकाच्या आवाजाचे वैशिष्टय़, संगीत रचना, वाद्यांची साथ आणि अर्थातच कॅमेरा, इत्यादी गोष्टी आशय गडद करण्यास मदत करतात. रागातील सुरावटींचा चपखल उपयोगही महत्त्वाचा ठरतो.’’ नंतर जेव्हा यूटय़ूबवर हे गाणे तुम्ही बघाल व गीत वाचाल तर असे लक्षात येईल की गाण्याचे शब्द निराशाजनक आहेत. पण गाण्याचा एकंदरीत भाव हा थोडा कमी निराश म्हणजे उदासीन आहे. पण महत्त्वाचे म्हणजे यात आशेचा एक किरण आहे. असा मिश्र भाव मरण या विषयाबाबत आपला असतो की नाही?

मरणाचा आपला अनुभव काय व कसा असू शकतो? क्लेश घेणे-देणे, आजारपण, थकलेपण, उदात्त निराशा; देवाला विनवणं की मला उचलून घे! आपण आपल्या आतापर्यंतच्या जगण्यात किती वेळा स्वत:च्या वा इतरांच्या मरणाचा विचार केला असेल? मोजण्याचा असा विचारही आपल्या मनात कधी आला नसेल, कारण मरणाचे विचार आपण हातावर पाल आल्यागत झटकतो. कुणी असे बोलले तर आपण लगेच म्हणतो, ‘‘असं बोलू नये!’’ खरी भावना जरी आली नसली तरी निश्चितच चिडून बोलण्यात आपण असे मरणाच्या विचाराबद्दल बोललो असू ‘‘मी मरून गेलो तर बरं होईल!’’

या सगळ्यात आपल्या एक लक्षात आलेय का, की आपण मरणाच्या कल्पना वापरत आहोत? प्रत्यक्ष मरणाचा अनुभव आपण नोंदूच शकणार नाही. इतर, आप्तस्वकीयांच्या मरणाचा वियोग, त्याबद्दलची माहिती व कथाजन्य कृतींतून (कथा, सिनेमा) घेतलेला अनुभव हे सगळे आपल्या गाठीशी असते. याच्या आधारे आपण आपल्या वा नातेवाईकाच्या मरणाची कल्पना करतो आणि कल्पनेने मनाच्या ‘भीतीच्या खोलीत’ जातो, पण लगेचच दरुगधीयुक्त धूर हाताने दूर सारल्यासारखे करतो व झटकन या जगात परत येतो. मृत्यूला टाळत टाळत जगत राहतो, त्यावर बोलून सामोरे जाणे आपल्याला पटत नाही. ‘गंभीरतेचा लवलेश’ आपल्याला जगण्यात नको असतो. पण मृत्यूबद्दल एक गूढ आकर्षण असते. कला व संस्कृती हेच हेरते व मृत्यूची प्रतीकं, देव, मरणपूर्व जीवन, भुतंखेतं वगरेंमध्ये पुरेपूर मरण भरून ठेवते. कारण मृत्युरंजन आपल्याला चालते. हिंदी सिनेमांच्या किती तरी गाण्यांत मरणाची संकल्पना वापरलेली असते. मरणाची संकल्पना कशी तयार होते व याची कुठली छटा वापरली जाते?

गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी जतन करून ठेवणे हे एक कलेचे मोठे उद्दिष्ट मानले गेले. पोट्र्रेट पेंटिंग अथवा छायाचित्र हे त्याचे आजचे रूप होय. व्यक्तिचित्राचे आद्य रूप ‘डेथ मास्क’. यात मेलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा हुबेहूब साचा काढला जाई व हा प्रेताच्या चेहऱ्याची हुबेहूब प्रतिकृती असे जेथे मिटलेले डोळे मृत्यूचे द्योतक असे. कालांतराने काही वेळेस या साच्याबरहुकूम वेगळी त्रिमित पोट्र्रेट्स बनवली जात व याचे डोळे उघडे जिवंत माणसांसारखे दाखवले जात. अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे असे साचे बनवलेले असतात. खऱ्या डेथ मास्कमध्ये मृत्यूचे सावट दिसून येते. आपलेदेखील एक दिवस असेच होणार, असा विचार मनात तरळून जातोच.

पुढे मरणोपरांत चित्रकलेतून पोस्टमॉर्टेम चित्रण विकसित झाले. हे पेंटिंगचे एक साधन आहे ज्यात श्रीमंत युरोपियन, नंतर अमेरिकन लोकांनी मृत कुटुंबातील सदस्यांना मृत्यूच्या संबंधित रंग, हावभाव असंख्य चिन्हांच्या साहाय्याने दर्शविले. सामान्यत: लहान मुलांच्या प्रतिमा चांगल्या प्रकारे रंगवलेल्या दिसतात.

१८व्या शतकात आणि १९व्या शतकाच्या सुरुवातीस लोकप्रिय असलेल्या या प्रकारच्या प्रतिमा, प्रियजनांचे प्रेमळ स्मरणचित्र म्हणून लोप पावल्या. नंतर याची जागा छायाचित्रांनी घेतली. पण प्रत्यक्ष मरणाशी असलेले नाते हळूहळू तुटत गेले. आता तर व्यक्ती गेल्यावर जरासा कमी वयातला फोटो लावण्याची पद्धत आहे, जेणेकरून मरणाचे विचार दूर सारता येतील.

आपल्या सगळ्यांना माहीत असते की एक दिवस आपल्याला मृत्यू येणार. तरीही नेटाने हा विचार आपण पुढे ढकलत असतो, बाजूला सारत असतो. आपल्याला मरण कसंही येऊ शकतं व कधीही येऊ शकतं, पण आपण त्यासाठी मानसिक व जवळच्या इतरांच्या जीवन व्यवस्थापनाच्या दृष्टीने तयार असतो का? जर आपलं वय झालं नसेल अथवा दुर्धर आजार झालेला नसेल तर आपलं उत्तर नाही असंच असेल.

जे. कृष्णमूर्ती म्हणतात, आपण एखाद्याला मृत्यूमुळे गमावल्यास काय होते? तात्काळ प्रतिक्रिया ही पक्षाघाताची भावना होय आणि जेव्हा आपण त्या धक्क्याच्या स्थितीतून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला अतीव दु:ख झाल्याची जाणीव होते. आता त्या दु:खांचा अर्थ काय आहे? मत्री, सुखद बोलण्याची आठवण, बरोबर चालणे, आपण केलेल्या अनेक आनंददायी गोष्टी आणि एकत्र काम करण्याची आशा; हे सर्व एका सेकंदात काढून घेतले जाते आणि आपण रिक्त, एकाकी व हतबल होऊन जातो! आपल्या सर्व दु:खांचे मूळ आहे अतीव आसक्तीत, म्हणजेच स्व हेच मूळ. ‘मी’, ‘मी’, ‘मी’. आपल्या जीवनातली आसक्तीच जर मेली तर मरणाची भीतीच नाहीशी होईल व आपण मरणाला हसत सामोरे जाऊ. पण त्यासाठी आपल्याला जगत असतानाच ‘मानसिक मरण’ यायला हवं!!

अमेरिकन छायाचित्रकार टॉम फिलिप्सच्या कामामागे आहे सर्जनाची शक्ती. मरण विचाराची, ‘डेड फोटोज’ नावाची ही दीर्घ छायाचित्र शृंखला आपल्याला दिङ्मूढ व्हायला लावेल. २००६ पासून पुढे वेगवेगळ्या ठिकाणी याने प्रवास केला व अनेक स्थलांवर (अमेरिका, ब्रिटन, इटली, सुदान व इजिप्तसह २० देशांमध्ये) ६८ फोटो निवडले.

खरं तर, टॉम हे एक गूढ पात्र आहे. हे पात्र स्वत: छायाचित्रकार स्वत:चाच विषय आहे आणि नाहीही. हे विनोदीही आहे आणि प्रबोधन करणारे आहे, हे दृश्य पाहून हा खरा मेलेला नाही, या भावनेने आपला दिवस उजळल्याखेरीज राहणार नाही. ती छायाचित्रे मानवी जीवनाची नश्वरतादेखील दर्शवितात. कमीत कमी सांगण्यासारखा विचार भव्य करून सांगतात. जणू काही आपण रोज एकदा तरी मरत असतो आणि ही मरण्याची प्रॅक्टिस माझे शेवटचे खरे मरण सुकर करेल.

लेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.

nitindrak@gmail.com

(((अमेरिकन छायाचित्रकार टॉम फिलिप्सच्या  ‘डेड फोटोज’ नावाच्या छायाचित्र शृंखलेतील एक छायाचित्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 2:46 am

Web Title: what is culture
Next Stories
1 विरोधांची एकात्मता
2 पाणीतत्त्वाचे आकार
3 प्रतिबिंबाची प्रतिमा
Just Now!
X