23 July 2019

News Flash

अनुभवाचे शरीरशास्त्र

अनुभव घेणं हे काम पंचेंद्रियं करतच असतात.

आपण ‘दृश्यकलेचे' अवलोकन करताना जर चव, स्पर्श, वास आणि आवाजाचा अनुभव घेतला तर आपली कलाजाणीव बदलेल का? या विचारातून ‘टेट सेन्सोरियम’च्या ‘इमर्सव्हि डिस्प्ले’ची संकल्पना २०१५ मध्ये उदयाला आली. त्यापैकी जॉन लॅथमच्या ‘फुलस्टॉप’ या चित्रासमोरील हा हॅप्टिक डिव्हाइस अल्ट्रासाऊंडचा वापर करतो ज्यामुळे पाऊस वरच्या दिशेने हातावर पडतो, पावसाची भावना तयार होते.  ( छायाचित्र सौजन्य : सुकी धांडा, ‘ऑब्झव्‍‌र्हर’)

|| नितीन अरुण कुलकर्णी

अनुभव घेणं हे काम पंचेंद्रियं करतच असतात. पण वाचताना पाहण्याचा, पाहताना ऐकण्याचा अनुभव का येऊ शकतो? मग अनुभव महत्त्वाचा की स्मृती?

‘‘संध्याकाळच्या त्या संधिप्रकाशात, अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा प्रकाश पाण्यावर पडला होता, आणि झाडांचे करडे छायाकार सूर्यास्ताच्या आकाशाच्या पाश्र्वभूमीवर उठून दिसत होते. एक बस चालली होती, लोकांनी भरलेली, मागोमाग एक मोठी गाडी होती, त्यात बसलेले लोक चुणचुणीत वाटत होते. एक मुलगा चक्री चालवायचा खेळ करत झपकन गेला. डोक्यावर भारा वाहून नेणारी एक स्त्री थांबली, तिने डोक्यावरचा भारा सारखा केला व कष्टकारक मार्ग चालू ठेवला. सायकलवरून घराकडे परतणाऱ्या एका मुलाने कुणाला तरी सलाम ठोकला. बऱ्याच बायका रस्त्यावरून चालत येत होत्या, त्यांच्या बरोबरीनेच चालणारा एक माणूस थांबला. त्याने आपली सिगारेट शिलगावली व विझलेली काडेपेटीची काडी पाण्यात भिरकावून भिरभिरत्या नजरेने तो चालता झाला. यादरम्यान कोणाचीही नजर पाण्यातल्या प्रतिबिंबात दिसणाऱ्या प्रकाशाच्या रंगावर आणि त्या करडय़ा झाडांच्या आकृत्यांवर गेली नव्हती. लहान मूल कडेवर घेऊन एक मुलगी त्या लहानग्याला विस्मय वाटावा म्हणून म्हणा किंवा त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी म्हणा, गडद होत जाणाऱ्या पाण्यावर चेष्टेवजा बोल व कटाक्ष टाकत गेली. घराघरांत दिवेलागण होत होती व आकाशात नक्षत्रांचा स्वर्गप्रवास चालू झाला होता.’’

हा परिच्छेद होता जिद्दू कृष्णमूर्ती या जगप्रसिद्ध तत्त्ववेत्त्यांचा, ‘टाइम कन्टिन्युइटी’ या शीर्षकानिशी इंग्रजीत लिहिलेला. भाषांतरित करण्याआधी मी पहिल्यांदा जेव्हा पाहिला (वाचला) तेव्हा माझ्या मन:पटलासमोर हा पूर्ण दृश्यानुभव उभा राहिला! कसा काय? मी जणू काही लेखकाच्या डोळ्यांमधून पाहतोय व यांतील साध्या साध्या घटनांची जोडणी होत जातेय. हा वाचतानाचा अनुभव कदाचित प्रत्यक्षापेक्षा जास्त प्रभावी असावा. कारण जे दिसतंय ते (काल्पनिक दृश्य) व जे समजतंय ते या दोन मुख्य घटकांमध्ये शब्द हे माध्यम असल्यामुळे अंतर कमी झालं व अर्थ लावायचं काम सोपं झालं; बरं दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी कृष्णमूर्ती वाचतोय हे डोक्यात होतंच, त्याचाही प्रभाव अर्थनात होताच हे वेगळं सांगायला नको. ते बऱ्याचदा अशा प्रकारचं निसर्गाचं वर्णन करतात व मूळ विषयाकडे येतात, असं वाटू शकतं की विषय व या वर्णनाचा काही संबंध नाही पण तसं नसतं; हा पुसटसा संबंध आपल्या मनात उजळत जातो.

परंतु समजा आपण प्रत्यक्षात एखाद्या स्थळावर, अशा प्रत्यक्ष अनुभवाच्या प्रक्रियेत आहोत, तर काय होईल? आपल्या त्यावेळच्या मनाच्या शांततेवर व स्मृतीच्या पोतावर बरंच काही अवलंबून असेल, तसेच आपल्या भावना काय आहेत यावरही. तपशील टिपण्याच्या आपल्या कौशल्यावरही बरंच काही अवलंबून असेल. अर्थनाची प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नसावी अशीच शक्यता दिसते.

‘आपण जे पाहतो ते अनुभवतो, व जे अनुभवतो ते पाहतो’.

या वरील वाक्याकडे पाहताना जरा शाब्दिक खेळ केल्याचा भास होईल; परंतु काळजीपूर्वक बघितलं तर असं लक्षात येईल की, अनुभवाची घडण ही मन (भावना) व बुद्धीच्या समन्वयाने होत असते. आपल्या मनात जे असतं ते, आपण जे बघत असतो त्याच्याशी, स्मृतीच्या मदतीने जोडले जाते व अर्थाची शक्यता तयार होते. व त्या शक्यतेला आपण अनुकूल प्रतिसाद देतो व अर्थन पूर्ण होतं. उदाहरणार्थ, पोपटाच्या बोलण्याच्या अनुभवात सुरुवातीला आपण काही आवाज ऐकत आहोत असं वाटेल, नंतर संवादकर्त्यांच्या प्रश्नार्थक वाक्यांनुरूप आपण काही शब्दांची पेरणी त्या आवाजांवर करू व आपल्याला त्या पोपटाचं बोलणं समजू लागेल. हे घडतं ते म्हणजे शॉर्ट-टर्म मेमरीमुळे, काही सेकंदांत. गंमत म्हणजे हा अनुभव रंजक वाटण्यामागे तो बोलल्यासारखा आवाज आहे याची आपल्याला जाणीव होते, म्हणजे पोपट केवळ नक्कल करतोय, विचार नाही- हा संकल्पनेचा भाग महत्त्वाचा ठरतो. आता जर आपण या पोपटाच्या नकलेची नक्कल करायचं ठरवलं तर काय होईल? म्हणजे हेच समजून घ्यायचं की शब्दांचा योग्य आवाज वेगळ्या पोतातून काढायचा, आणि तो हाच शब्द होता का? असा संभ्रम ऐकणाऱ्याच्या मनात निर्माण करायचा. ‘विसंगतीची संगती व संगतीची विसंगती’ असं काही तरी. (हा बघा तयार होतोय संकल्पनेचा विचारपुंज.) याच अनुषंगाने पुढे जायचं तर नाटक व सिनेमातला अभिनय हेच करू बघतो. गॉडफादरमधला मार्लन ब्रँडो ‘डॉन काíलओनी’ या व्यक्तिरेखेसारखा तोंडातल्या तोंडात घोळणारा आवाज काढतो व त्यासाठी गालांखाली गोळ्या ठेवतो- अशासारखं.

हाच धागा दुसऱ्या माध्यमात (दृश्य) पुढे नेला तर कॅरिकेचरचं उदाहरण घेता येईल. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे कॅरिकेचर व फोटो जर एकमेकांशेजारी ठेवले तर लक्षात येतं की दृश्याच्या अंकनात किती फरक आहे. परंतु आपल्याला त्या व्यक्तिमत्त्वाची ओळख मात्र पटलेली असते ती चेहरेपट्टीच्या विशिष्ट धाटणीमुळे, डोळे, नाक, ओठ यांच्या संबंधांमुळे. ठरवलं तर अशा संकल्पनेसारखे अनेक दाखले देता येतील. रेने मॅग्रे या चित्रकाराचं अतिवास्तववादी शैलीतलं एक चित्र आहे त्यात उभा असलेला स्वत: चित्रकार, बाजूला उभ्या असलेल्या मॉडेलला चित्रातच रंगवत आहे, आणि हे चित्र अर्धवटच पूर्ण झालं आहे. मॉडेलचा डावा हात रंगवायचा राहिला आहे. या चित्राचं नाव ‘पेन्टिंग द इम्पॉसिबल’ असं आहे.

अनुभवांचा गोठलेला भाग म्हणजे अनुभव-स्मृती, व त्याला विरघळवण्याची सुरुवात इंद्रियांनी दिलेल्या संवेदनांनी होते, मेंदूची प्रक्रिया जेव्हा संवेदनेचं अर्थन सुरू करते तेव्हा अर्थनाच्या अनेक शक्यता तयार होतात, आपली सजगावस्था ठरवते की कुठला अर्थ निवडायचा, आणि किती वेळ संदिग्धावस्थेत राहायचं. अगाढ सर्जनशीलता असलेले लोक अशा संदिग्धतेत जास्त काळ राहणं पसंत करतात, म्हणजे त्यांना तसं करणं जमतं आणि त्यांच्या निर्मितीक्षमतेचं बळही यातच असतं. अशी अर्थनाची प्रक्रिया म्हणजेच ‘अनुभव’, ज्यातून संकल्पना जन्मतात.

एखाद्या अनुभवाची समग्र समज ही आपल्या दर्शवण्याच्या (रिप्रेझेंटेशन) योग्यतेवर अवलंबून असते आणि असं दर्शवणं आपले विचार व भावना यांवर अवलंबून असतं. कार्ल युंग या ख्यातप्राप्त मानसशास्त्रज्ञाने ‘आर्कटाइप्स’चा सिद्धांत मांडला. त्याच्या मते आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीमध्ये आपले अनुभव, संस्कार याबरोबरीनेच कलेक्टिव्ह अनकॉन्शसचा देखील सहभाग असतो. त्याच्या मते ‘सायकी’ ही तीन भागांची बनलेली असते : कॉन्शसनेस (जाणीव), पर्सनल अनकॉन्शस (व्यक्तिगत अज्ञात) व कलेक्टिव्ह अनकॉन्शस (सामूहिक अज्ञात).

युंगच्या मते अशा काही अज्ञात कल्पना तुमच्या मनात असू शकतात की ज्या सार्वत्रिक असतात, ज्यांचा प्रवास तुमच्यापर्यंत अनेक पिढय़ांद्वारे झालेला असू शकतो. त्यामुळे हे उघड आहे की, आपल्याला आलेल्या अनुभवाचा अर्थ वैयक्तिकतेबरोबरच, तितकाच सार्वत्रिक असू शकतो. अशा आर्कटाइप्सना (प्रतीकांना) तो शारीरिक अवयवांची उपमा देतो. जसं आपलं शरीर त्यातल्या वेगवेगळ्या अवयवांमुळे चालतं तसेच आपली मानसिकता या वेगवेगळ्या प्रतीकांद्वारे चालते.

डॅनिअल कानिमान या नोबेल पुरस्कारप्राप्त मानसशास्त्रज्ञ व बिहेविअरल इकॉनॉमिस्टचा सिद्धांत ‘अनुभव विरुद्ध स्मृती’ अशा अंगाने जातो. ‘थिंकिंग फास्ट अँड थिंकिंग स्लो’ या पुस्तकात त्याने याचा विस्तार केला आहे. आपला ‘अनुभवजन्य मी’ प्रेरणेने व अंतज्र्ञानाने भरलेला असतो व जलदगतीने काम करतो त्याविरुद्ध ‘स्मृतीजन्य मी’ हा जास्त तर्कशुद्ध व संथ असतो. बऱ्याचदा याचाच विजय होतो. कारण आपण जगण्यात स्मृतींचा पगडा अनुभवांपेक्षा जास्त मानतो.

पाब्लो पिकासो म्हणतो, ‘‘ज्या ज्या म्हणून कशाची तुम्ही कल्पना करू शकता ते ते खरं असतं’’- म्हणजे जे जे तुम्ही खरं आहे असं मानता, ते ते कल्पनाही असू शकतं. कल्पना आपण आपल्या स्मृतींच्या आधारे करत असतो. संवेदना, अनुभव, कल्पना, स्मृती व वास्तव या सर्वामध्ये एक अनन्य संबंध आहे, आणि हे गूढ मानवाला नेहमीच आकर्षति करत राहील.

लेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.

nitindrak@gmail.com

First Published on February 16, 2019 12:06 am

Web Title: what is the experience