X

सांस्कृतिक ऐक्य व राजकीय दास्य

सांस्कृतिक देवाण-घेवाण होऊन एक भारतीय संस्कृती निर्माण झाली.

वैदिक वाङ्मयात आर्य-अनार्याच्या शेकडो जनसमूहांची नावे आली आहेत. आर्य, अनार्य वा द्रविड अशी विरोधात्मक वा भेदात्मक विभागणी करण्याची पद्धत ब्रिटिशांचे राज्य आल्यानंतर सुरू झाली. आक्रमण करताना कोणी परकीय असले, तरी येथे कायमचे स्थायिक झाल्यावर ते भारतीय संस्कृतीचे होऊन जात; ब्रिटिशांचे राज्य स्थापन झाल्यावर परकीयांचे ‘राजकीय दास्य’ ही कल्पना हिंदूंना माहीत झाली..

प्राचीनतम संस्कृतींपैकी ग्रीक, रोम, पर्शिया, इजिप्त, मेसोपोटेमिया आदी जगातील प्रगत संस्कृती काळाच्या प्रवाहात लयाला गेल्या. परंतु, चीनचा अपवादवगळता, भारतीय संस्कृती अद्यापही आधुनिक राष्ट्ररूप धारण करून ताठ मानेने उभी आहे. विविध वंश, धर्म, पंथ, भाषा, स्वभाव असणारे जनसमूह शेकडो वर्षे भारतात येत राहिले व त्यांच्या समन्वयातून ही संस्कृती निर्माण झाली. आर्यापूर्वी द्रविड, त्यांच्यापूर्वी आदिद्रविड, त्यांच्याहीपूर्वी इतिहासाला ज्ञात नसणारे काही जनसमूह भारतात राहतच होते. आर्य व तत्पूर्वीचे अनार्य असे स्थूल रूपाने याचे वर्गीकरण केले जाते. वैदिक वाङ्मयात आर्य-अनार्याच्या शेकडो जनसमूहांची नावे आली आहेत. नंतर बाहेरून आलेल्या लोकांचा येथील पूर्वी स्थायिक झालेल्या लोकांशी विरोध व संघर्ष होणे स्वाभाविक होते. आर्य हे अनार्याना शत्रू मानत. परंतु, अशा संघर्षांत जे विजयी झाले व या देशातच कायमचे राहिले, त्या सर्वाना या देशाने आपले मानले व त्यांनीही हाच देश आपला मानला.

एवढेच नाही, तर त्यांच्यात सांस्कृतिक देवाण-घेवाण होऊन एक भारतीय संस्कृती निर्माण झाली. त्यांनी परस्परांच्या धर्मप्रथा, सामाजिक चालीरीती, सण-उत्सव, परंपरा, देवदेवता स्वीकारल्या. असे करताना त्या लोकसमूहांनी स्वत:चे वैशिष्टय़ जपणाऱ्या काही श्रद्धा, परंपरा, चालीरीती तशाच चालू ठेवल्या. त्यातून अशी एक संस्कृती निर्माण झाली, की ज्यात ‘सर्वाचे मिळून काही समान व प्रत्येकाचे काही स्वतंत्र’ अशी संस्कृतिवैशिष्टय़े दिसू लागली. हे सारे त्यांच्या एकत्र राहण्याच्या इच्छेतून घडले. यासाठी सर्वसंग्राहकतेचे धोरण ठेवण्यात आले. हा संमिश्र संस्कृतीचा, म्हणजेच सांस्कृतिक ऐक्य करण्याचा, अनेक शतके चाललेला प्रयोग इतका यशस्वी झाला, की ती आर्य-संस्कृती वा अनार्य-संस्कृती राहिली नाही तर आर्य-अनार्य संस्कृती बनली. आज आपण पाहतो त्या विविध धर्मविधी, सामाजिक प्रथा वा सांस्कृतिक उपक्रम मुळात कोणत्या लोकसमूहाचे होते हे सामान्य माणसाला कळतही नाही. यासाठी इतिहाससंशोधन करावे लागते. साधारणत: इसवी सनाच्या सातव्या-आठव्या शतकापर्यंत ही सांस्कृतिक ऐक्याची प्रक्रिया घडून गेली होती. आर्य, अनार्य वा द्रविड अशी विरोधात्मक वा भेदात्मक विभागणी करण्याची पद्धत ब्रिटिशांचे राज्य आल्यानंतर सुरू झाली. शिवाजी महाराजांच्या काळात समाजात वा सैन्यात हा आर्य, तो अनार्य अशी विभागणी होती काय? आणि संशोधकांच्या दृष्टिकोनातून आर्य व अनार्य असा वेगळा विचार करायचा म्हटले, तर भारतीय संस्कृतीवर नंतरच्या आर्याच्या नव्हे तर पूर्वीच्या अनार्याच्या संस्कृतीचा प्रभाव अधिक असल्याचे सिद्ध होईल. वेद व यज्ञ हे आर्याच्या संस्कृतीचे मूलाधार. पण आपण ज्याला भारतीय संस्कृती म्हणतो ती ऐतिहासिक दृष्टीने व बाह्य़ांगाने वैदिक असली तरी अंतरंगाने बहुतांशी अवैदिक आहे.

आपण ज्यास हिंदुधर्म म्हणतो तो व्यवहारात: वैदिक धर्म नसून पौराणिक धर्म आहे. वेद-स्मृतींचा धर्म हा त्रवर्णिकांसाठी होता; पौराणिक धर्म सर्व समाजासाठी होता. यासंबंधात तर्कतीर्थ जोशी यांचा निष्कर्ष असा आहे- ‘‘त्रवर्णिकांच्या संकुचित वृत्तीला इतिहासपुराणे उल्लंघून गेली आहेत. आजचा व गेल्या दोन हजार वर्षांचा हिंदुधर्म इतिहास-पुराणांच्या वर आधारलेला आहे.. विद्यमान हिंदुधर्माचे धार्मिक अधिष्ठान इतिहासपुराणे होत.. पौराण संस्कृती ही वैदिक संस्कृतीचे वेदसमकालीन अन्य संस्कृतींच्या साहचर्याने निर्माण झालेले विकसित रूप आहे.. वैदिक व अवैदिक अशा दोन्ही प्रकारच्या धार्मिक परंपरांचा संगम पौराणिक संस्कृतीत झाला आहे.. वैदिकांनी अवैदिकांच्या परंपरांचे अनुकरण करून वैदिक धर्माचे पौराणिक धर्मात रूपांतर घडवून आणले आहे. दोन्ही परंपरांना संमती देऊन सांस्कृतिक झगडा न करता संस्कृतींचे संमेलन करविले.. पौराणिक संस्कृती व वैदिक संस्कृती यांच्यात विरोध आहे.. पौराणिक धर्म अवैदिकांच्या वेदपूर्वकालापासून चालत आलेल्या धर्माचीच वैदिकांनी समन्वयपूर्वक केलेली नवी व्यवस्था आहे.’’

एवढेच नाही तर या दोन संस्कृतींच्या संघर्षांतून व समन्वयातून सर्व तत्त्वज्ञानांना, धर्माना, विचारांना मान्यता देणारी उपनिषदे व दर्शने निर्माण झाली. सर्व धर्माना मान्यता हा येथील संस्कृतीचा मूलमंत्र बनला.

जरी अनार्य-आर्याचा प्राचीनकाळ सोडून दिला, तरी व ग्रीक सिकंदराच्या आक्रमणापासूनचा (इ.स.पू.३२७) सुमारे नऊ शतकांचा इतिहास पाहिला, तरी आक्रमण करून आलेले भिन्न संस्कृतीचे लोक भारतात कायमचे स्थायिक झाल्यावर येथील संस्कृतीत विलीन होऊन गेल्याचे दिसून येईल. या काळात ग्रीक, शक, कुशाण, हूण यांनी क्रमाने भारतावर आक्रमणे केली होती. त्यांनी मगध, अयोध्येपर्यंत धडक मारली होती. शक हे नर्मदा ओलांडून दक्षिणेतही आले होते. काही काळ त्यांनी राज्येही स्थापन केली होती. पण आज ते कोठे आहेत? सर्व नावानिशी भारतीय संस्कृतीत ते विलीन होऊन गेले. आज भारतात त्यांचा वारसा सांगणारा कोणी ग्रीक, शक, कुशाण, हूण सापडणार नाही. हे कशामुळे घडू शकले? भारतीय संस्कृतीच्या सर्वसमावेशकतेमुळे हे घडू शकले.

या काळात भारतात एकछत्री साम्राज्य नव्हते. अनेक छोटी-मोठी गणराज्ये स्वतंत्रपणे राज्य करीत होती. १९४७ला स्वातंत्र्याच्या वेळेस भारतात असलेली ५६५ संस्थाने म्हणजे या गणराज्यांची आधुनिक रूपे होती. ही गणराज्ये ‘जगा व जगू द्या’ या तत्त्वानुसार परस्परशेजारी राहत होती. परकीयांनी आक्रमण केल्यास प्रत्येक गणराज्याला त्याच्याशी स्वतंत्रपणे लढावे लागे. त्यामुळे त्याचा पराभव करणे आक्रमकाला सोपे जाई. काही वेळा काही गणराज्ये एकत्र येऊन लढा देत, पण त्याची खात्री नव्हती. चंद्रगुप्त मौर्याने स्वकर्तृत्वावर अनेक गणराज्यांना एकत्र करून साम्राज्य उभे केले होते. पण मौर्य साम्राज्यानंतर ती गणराज्ये पुन्हा स्वतंत्र झाली. सतत परकीय आक्रमणे होत असताही सर्व भारताचे, निदान आक्रमणप्रवण उत्तर भारताचे तरी, एकछत्री राज्य उभे करावे अशी भारतीयांना इच्छा झाली नाही. तिकडे ग्रीसमध्येही अशीच गणराज्ये होती. पण त्याचे एकसंधी राज्य बनवून ग्रीक लोक पर्शियन साम्राज्य पादाक्रांत करून जग जिंकण्यासाठी म्हणून भारतावर चालून येतात आणि आम्ही निदान संरक्षणासाठीही एकराज्य स्थापन करीत नाही. याचे एक मुख्य कारण हे, की आक्रमण करणे ही आमची संस्कृती नाही. दुसरे कारण हे, की परकीय आक्रमक विजयी होऊन भारतात कायमचा राहिला तरी त्याला आम्ही सांस्कृतिदृष्टय़ा आमचे करून टाकू, हा आमचा संरक्षणविषयक दृष्टिकोन होता. सांस्कृतिक विजय महत्त्वाचा असतो, रणांगणावरील वा राजकीय विजय ही तात्पुरती गोष्ट असते, ही भारतीयांची भूमिका होती. आपले काही त्यांना देऊ व त्यांचे काही आपण घेऊ व एक नवी भारतीय संस्कृती निर्माण करू हे त्यांचे धोरण होते. यापूर्वीच्या आक्रमकांवर त्यांनी असाच विजय मिळविला होता व पुढेही मिळवीत राहू यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यामुळे सर्वाचे राजकीय ऐक्य करून एकछत्री राज्य उभे करण्याच्या मार्गाने ते गेले नाहीत.

त्यानंतर आठव्या शतकात मुसलमानांच्या स्वाऱ्या सुरू झाल्या. त्यांनी सिंध प्रांत जिंकून घेतला. तो परत घेण्यासाठी भारतीय गणराज्ये कधीही एकत्र आली नाहीत. तेव्हापासून सिंध त्यांच्याकडे जो गेला तो कायमचाच. इ.स. १००० नंतर महंमद गझनीच्या स्वाऱ्या सुरू झाल्या. त्याने पंजाब घेतला. पहिल्या २४ वर्षांत त्याने भारतावर १७ स्वाऱ्या केल्या, पण एकदाही पराभूत झाला नाही. क्रमाने दोन शतकांच्या आत सारा भारत मुसलमानी अमलाखाली गेला. त्यानंतर पाच-सहा शतके त्यांनी भारतावर राज्य केले. त्यांच्याशी राजपुतांनी अनेक वर्षे लढा दिला, परंतु त्यासाठी सर्व राजपूत राज्येही एकत्र आली नाहीत. मराठय़ांनी तर मोगल बादशाहला अंकित बनविले होते. पण त्यांनाही सर्व हिंदू गटांचा पठिंबा नव्हता. त्यांचे राज्य ‘मराठय़ांचे राज्य’ म्हणून ओळखले गेले. पानिपतवर अफगाणिस्तानच्या अब्दालीशी लढतानाही उत्तरेकडील हिंदूंनी त्यांना मदत केली नाही. पहिले बाजीराव विजय मिळवीत दिल्ली परिसरात गेले तरी बादशाहच्या भावना दुखावतील म्हणून दिल्ली शहरात गेले नाहीत.

खरी गोष्ट ही आहे, की ते मुसलमानांचे राज्य परकीयांचे आहे असे हिंदूंना वाटतच नव्हते. आक्रमण करताना कोणी परकीय असले, तरी येथे कायमचे स्थायिक झाल्यावर ते भारतीय संस्कृतीचे होऊन जातात एवढेच त्यांना माहीत होते. भारतात ब्रिटिशांचे राज्य स्थापन झाल्यावर परकीयांचे ‘राजकीय दास्य’ ही कल्पना हिंदूंना माहीत झाली. आपण परकीयांचे दास झालो आहोत हे त्यांना पहिल्यांदा कळाले. आलेल्या आक्रमकांशी सांस्कृतिक ऐक्य करू, सांस्कृतिक दृष्टीने त्यांना पचवून टाकू यावर त्यांचा दृढ विश्वास असल्यामुळे सर्व भारतीयांचे एकसंध राज्य उभे करण्याची गरज त्यांना वाटली नव्हती. त्यांच्या दृष्टीने सांस्कृतिक ऐक्य व संस्कृतिविजय मुख्य असल्यामुळे राजकीय दास्य ही कल्पना ब्रिटिशांचे राज्य येईपर्यंत त्यांच्या लक्षातही आली नाही. तेव्हा भारतीय संस्कृतीचा मूलभूत पिंड सर्वसंग्राहकतेचा व स्वायत्ततेसह सांस्कृतिक ऐक्याचा विचार करणारा आहे; राजकीय दास्याचा व त्यासाठी राजकीय ऐक्य करण्याचा विचार करणारा नाही. राजकीय ऐक्याचाच पण सामाजिक समतेवर आधारलेल्या सामाजिक ऐक्याचा व संघटनेचा विचार करणेही हिंदू मानसिकतेत बसत नाही. म्हणून सर्व भारतीयांचे एकछत्री राज्य उभे करण्याची गरज व इच्छा ब्रिटिशांचे राज्य स्थापन होईपर्यंत हिंदूंना झाली नाही. तेव्हा सांस्कृतिक ऐक्य, राजकीय दास्य व राजकीय ऐक्य यांचा परस्परसंबंध हा असा आहे.

लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.