02 July 2020

News Flash

धार्मिक कल्पनांतून सांस्कृतिक ऐक्य

पूर्वीपासून हिमालय पर्वत भारताचा अविभाज्य भाग म्हणून शिरोभागी राहिलेला आहे.

देवप्रयागचा अलकनंदा-गंगा संगम. 

ज्या काळात राष्ट्र, (भौगोलिक/ सांस्कृतिक) राष्ट्रवाद या कल्पना माहीत नव्हत्या आणि पाप-पुण्याच्या कल्पना, पुण्यप्राप्तीसाठी पुण्यक्षेत्रांचे दर्शन एवढय़ापुरतेच वैचारिक विश्व मर्यादित होते; तेव्हाही नद्या/पर्वतांना पवित्र, वंदनीय मानणे आणि पुढे शंकराचार्यानी पीठे अथवा शैवपंथीयांनी बारा ज्योतिर्लिगे स्थापन करणे येथपर्यंत सांस्कृतिक ऐक्याचे उपक्रम राबविले गेले..

भारतभूमीवरील प्रेम दृढ व चिरस्थायी करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी या भूमीच्या प्रत्येक भागाला व अंशाला प्रेम व पावित्र्य प्रदान करण्याची संकल्पना अमलात आणली. त्या प्रत्येक घटकांवर मातृभूमी वा पुण्यभूमी म्हणून प्रेम करायला लावण्याची ही खास भारतीय पद्धत होती. ज्यांच्या दृष्टिक्षेपात वा आकलनात या खंडप्राय व विशाल भारतवर्षांवर एकदम प्रेम करणे येऊ शकत नव्हते, त्यांच्यासाठी ही अनेक घटकांतून एकत्वावर प्रेम करण्याची पद्धत अतिशय उपकारक ठरणार होती. खरोखर एकत्वाची ही योजना इतकी यशस्वी ठरली की, भारतावर अनेक परकीय आक्रमणे व राजवटी येऊनसुद्धा प्राचीन काळातील सांस्कृतिक ऐक्य आजही बहुतांश टिकून आहे. अनेक धर्म, पंथ, जाती, जमाती, भाषा, प्रदेश यांमुळे आपल्यात कितीही विवाद व विसंवाद असला, तरी भारतीय म्हणून अंतर्यामी एकत्वाची भावना आहे व त्याचे एक मुख्य कारण ही एकत्वाची योजना होय. देशातील विविध भूमी-घटकांना पावित्र्य प्रदान करण्याची व नवीन पुण्यस्थळे निर्माण करण्याची ही एकत्वाची योजना भारतीय सांस्कृतिक ऐक्याचे तिसरे सूत्र होय.

पूर्वीपासून हिमालय पर्वत भारताचा अविभाज्य भाग म्हणून शिरोभागी राहिलेला आहे. त्याला देवतात्मा बनविण्यात आले. कालिदासाने त्याला ‘देवतात्मा हिमालया नाम नगाधिराज:’- असे म्हटले आहे. हिमालय हा देवभूमी प्रदेश बनविण्यात आला. ती देवभूमी बनण्याचे कारण तेथे शिव व विष्णू यांनी तपश्चर्या केली होती. तेथील कैलासमध्येच शिवाने दीर्घकाळ तपश्चर्या करीत अखंड समाधी लावली होती. अशा प्रकारे महान देवांना तपश्चर्या करायला लावून हिमालयाला पावित्र्य प्राप्त करून देण्यात आले. देशाच्या सर्व भागांतून लोक दर्शनासाठी हिमालयाकडे जाण्याची परंपरा पडली. केदारनाथ, बदरीनाथ, धवलगिरी, नन्दादेवी, गौरीशंकर आदी १८-२० हजार फुटांपेक्षाही उंचावर व बर्फाच्छादित असणारी तेथील शिखरेही पवित्र स्थळे बनविण्यात आली. अशा प्रकारे शिरोभागी असला तरी हिमालय हा सर्व भारतीयांच्या हृदयस्थानी राहत आला आहे.

केवळ हिमालयच नव्हे तर भारताच्या अंतर्गत भागातील सात पर्वतांना कुलपर्वत म्हणून महाभारतात व पुराणात गौरविले आहे- महेंद्र (ओरिसा), मलय (पश्चिम घाटाचा दक्षिण भाग), सह्य़ाद्री, विंध्य, शुक्तिमान, ऋक्ष व पारियात्र (शेवटचे तीन विंध्यचे भाग), ध्यानधारणा, चिंतन व शांती यासाठी त्यांना सुयोग्य म्हणून निवडण्यात आले.

नद्या म्हणजे भूमीच्या रक्तवाहिन्याच. महाभारतात तर नद्यांना सर्वाची माता म्हटले आहे. भूमीवरील सर्व जाती-जमातींना समानतेने नद्यांचे पाणी पिता येते हा समतेचा संदेशही दिला आहे. ऋग्वेदामध्ये नद्यांना पवित्र ठरविणारे नदी-सूक्त आहे. त्यात पुढील सात नद्यांचा समावेश आहे. गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती, सतलज, रावी, चिनाब, वितस्ता (झेलम), बियास व मरुद्धृता (चिनाब व झेलम नद्यांची संयुक्त नदी). यात दक्षिण भारतातील नद्यांचा समावेश नाही. कारण त्या काळात या सूक्तकर्त्यांचा दक्षिण भारतात प्रवेश झाला नव्हता. जेव्हा तो झाला, तेव्हा या नदी-सूक्तात बदल करून दक्षिणेतील नद्यांचाही समावेश करण्यात आला. हे काम पुराणकाळात झाले. नव्या श्लोकात पुढील नद्यांचा समावेश झाला- गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू व कावेरी. यात पूर्वीच्या सहा नद्या जाऊन नवीन तीन आल्या. भूमीच्या विस्तारित भागातील नद्यांना व त्या भागांना पवित्र करून घेण्यासाठी केलेला हा बदल होता. सात पर्वतांप्रमाणे नद्यांची संख्याही सात ठेवण्यात आली. पूर्वीच्या सूक्ताऐवजी आता हा नदी-श्लोक एक धार्मिक कृत्य म्हणून सर्वतोमुखी झाला. स्नान व पूजा करताना हा श्लोक म्हटला जाऊ लागला. ‘हे पवित्र नद्यांनो, माझ्या ओंजळीतील जलात समाविष्ट व्हा,’ अशी प्रार्थना केली जाऊ लागली. ती म्हणताना सर्व भारतभूमीची प्रतिमा प्रत्येकाच्या मनात उभी राहणार होती. भारतावर प्रेम करण्याचाच तो एक मार्ग होता.

या नद्यांत गंगा ही सर्वाधिक पवित्र मानली गेली. तिचा उगम देवभूमी हिमालयातून झाला आहे. तिला हिमालयाची कन्या असेही मानले गेले. तिच्या प्रवाहात स्नान केल्याने सात जन्माची पापे धुऊन निघतात, अशी धर्मश्रद्धा निर्माण झाली. केवळ गंगाच नव्हे तर हिमालयातील पुढील ज्या चार मूळ नद्यांपासून ती बनली आहे, त्या सर्व नद्यांनाही पवित्र मानलेले आहे. अलकनंदा, भागीरथी, नन्दाकिनी व जान्हवी. या उपनद्या परस्परांना किंवा गंगेला ज्या ठिकाणी मिळतात, ती पुढील संगमस्थळेही पुण्यस्थळे बनविण्यात आली. विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग व गंगाद्वार. नदी वेडेवाकडे वळणे घेत शेकडो मैलांचे अंतर पार करीत विविध प्रदेशांतून वाहत जाताना त्या भागातील लोक समूहांत समान श्रद्धास्थान निर्माण करते. लोकांच्या मनांना जोडण्याचे काम करते. तेव्हा आपल्या पूर्वजांनी नद्यांप्रति लोकांमध्ये निर्माण करून ठेवलेल्या पवित्र भावनेने सांस्कृतिक ऐक्य साधण्याचे मोठे कार्य केले आहे.

या देशाच्या तिन्ही दिशांना सागर आहे. पूर्वेकडील सागराला (बंगालचा उपसागर) महोदधी तर पश्चिमेकडील सागराला (अरबी सागर) रत्नाकर म्हटले जाई. या दोन्ही सागरांनी भारताला सुमारे पाच हजार कि.मी.चा सागरकिनारा दिला आहे. या सागरांची पूजा केवळ किनाऱ्यावरीलच नव्हे तर अंतर्गत भागातील लोकही करीत आले आहेत. गंगा ज्या ठिकाणी सागराला मिळते, त्या संगमाला गंगासागर म्हणतात. ते तर अत्यंत पवित्र स्थळ मानण्यात आले.

याचप्रमाणे देशांच्या या चार दिशांना असलेली चार सरोवरे पवित्र बनविण्यात आली. दक्षिणेकडील पम्पासागर, पूर्वेकडील विन्दुसर, पश्चिमेकडील नारायणसर व उत्तरेकडील मानससरोवर ही ती पवित्र सरोवरे होत. त्या प्रत्येकाला पावित्र्य देण्यासाठी दंतकथा निर्माण करण्यात आल्या. उदाहरणार्थ- ओरिसातील विन्दुसरासंबंधी सांगितले गेले, की दुर्गेला तहान लागली तेव्हा तिच्यासाठी शिवाने आपल्या त्रिशुळाने ते सरोवर उत्पन्न केले.

त्याचप्रमाणे देशाच्या विविध ठिकाणी पुढील चार तीर्थक्षेत्रे निर्माण करण्यात आली. वराहक्षेत्र, हरिहरक्षेत्र, कुरुक्षेत्र व मुक्तिक्षेत्र. वराहक्षेत्र हे काश्मीर खोऱ्यात वराहमुल्ला येथे आहे. या शहराला आता बारामुल्ला असे म्हणतात. येथे विष्णूने वराह अवतार घेतला होता, अशी कथा गुंफली गेली. हरिहरक्षेत्र हे गंगा व गंडकी यांच्या संगमावरील क्षेत्र होय. तेथे कार्तिकी पौर्णिमेला उत्तर भारतातील मोठी यात्रा भरते. मुक्तिक्षेत्र हे नेपाळच्या सीमेलगत आहे.

तसेच चार दिशांना चार पवित्र तीर्थ स्थापण्यात आली. पूर्वेस- श्वेतगंगा, दक्षिणेस- (समुद्रकिनारी) धनुष्तीर्थ, पश्चिमेस- (द्वारका) गोमतीकुंड व उत्तरेस (बदरीनाथ) तप्तकुंड. त्याचप्रमाणे देशाच्या उत्तर व दक्षिण भागातील पुढील सप्तमहापुरी पुण्यक्षेत्रे बनविण्यात आली. अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, कांचीपुरी, अवन्तिका (उज्जैन) व द्वारका यांना मोक्षतीर्थ म्हटले जाते. त्याचप्रमाणे देशाच्या चार दिशांना पुढील चार धामे स्थापन करण्यात आली- उत्तरेस बदरीकेदार, पूर्वेस जगन्नाथपुरी, दक्षिणेस सेतुबंध रामेश्वर व पश्चिमेस द्वारका. त्यानंतरच्या काळात आद्य शंकराचार्यानी याच चार दिशांना पुढील चार मठांची व पीठांची स्थापना केली. उत्तरेस- बदरीकेदार येथे ज्योतिर्मठ, पूर्वेस पुरी येथे गोवर्धन मठ, दक्षिणेस – शृंगेरी मठ व पश्चिमेस- द्वारका येथे शारदा मठ. अशाच सांस्कृतिक ऐक्याच्या उद्देशाने देशाच्या अंतर्गत विविध भागांत बारा ज्योर्तिलिंगांची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेथे शिवाची प्रतिमा म्हणून लिंगाची पूजा केली जाते. त्यापैकी काही स्थळे अशी- वाराणसी (उ. प्रदेश), श्रीशैल्यम (आंध्र प्रदेश), रामेश्वरम (तामिळनाडू), सोमनाथ (गुजरात), अमरेश्वर (मध्य प्रदेश), त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र), केदारनाथ (उत्तराखंड). या प्रत्येक ठिकाणी शिवाची वेगवेगळी नावे दिली गेली.

भारताचा प्रत्येक भाग सर्व भारतीयांना आपला वाटावा, त्याविषयी पुण्यभाव व प्रेम वाटावे यासाठी जाणीवपूर्वक वेळोवेळी वरीलप्रमाणे योजना तयार करण्यात आल्या. त्या काळात राष्ट्र वा राष्ट्रवाद ही संकल्पना नव्हती. सांस्कृतिक राष्ट्रवाद नव्हता किंवा भौगोलिक राष्ट्रवादही नव्हता. धर्म, धर्माशी संबंधित भूमी, पाप-पुण्याच्या कल्पना, पुण्यप्राप्तीसाठी पुण्यक्षेत्रांचे दर्शन एवढय़ापुरतेच त्यांचे वैचारिक विश्व मर्यादित होते. या साऱ्याचा परिणाम सांस्कृतिक ऐक्य निर्माण होण्यात झाला, एवढेच आपल्याला समजून घ्यायचे आहे. हे समजून घेताना स्वत: धार्मिक असण्याची, कोणा देव-देवतावर, स्वर्ग-नरकावर वा पाप-पुण्यावर श्रद्धा असण्याची गरज नाही. देशातील काही कोटी लोकांची तशी श्रद्धा होती व आहे हे वास्तव समजून घेतले तरी पुरेसे आहे. हे वास्तव समजून घेणे हा बुद्धिवादाचाच एक भाग आहे.

लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2016 5:12 am

Web Title: cultural unity from religious ideas
Next Stories
1 मातृभूमीवर प्रेम हे दुसरे सूत्र
2 भारतीय सांस्कृतिक ऐक्याचे पहिले सूत्र
3 टोळी संस्कृतीकडून मानवी संस्कृतीकडे
Just Now!
X