News Flash

टोळी संस्कृतीकडून मानवी संस्कृतीकडे

अन्नपाण्याच्या शोधात या टोळ्या एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर करीत असत.

उन्नत मानवी संस्कृतीची सुरुवात टोळ्यांतूनच आहे.  

इस्लामचे प्रेषित मुहम्मद पैगंबर हे एकाच वेळी धर्मप्रमुख, राज्यप्रमुख, सेनापती, न्यायाधीश होते. ख्रिश्चनांचाही बराचसा इतिहास असाच आहे. परिणामत: सर्व टोळ्यांना एकसंध करण्यासाठी धर्मामुळे आध्यात्मिक व राज्यामुळे भौतिक शक्तिकेंद्र निर्माण झाले. तसा इतिहास नसताना, विघटनकारी जातिव्यवस्था पोटात घेऊन स्वतंत्र भारत हे एक राष्ट्र म्हणून जगासमोर उभे ठाकले आहे.

आरंभाला मानवसमूह हे टोळीस्वरूप होते. अन्नपाण्याच्या शोधात या टोळ्या एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर करीत असत. पूर्वी स्थिरावलेल्या दुर्बल टोळ्यांना तेथून हुसकावून लावून वा जिंकून नंतरच्या सबल टोळ्या त्या भूमीवर आपले अधिकार स्थापित करीत असत. असे निश्चित स्थैर्य प्राप्त झाल्यावर भटक्या संस्कृतीतून त्या भूमीवर उच्चतर मानवी संस्कृतीचा विकास झाला.

टोळीस्वरूपातील मानवसमूहांना संस्कृतिविकास तर शक्य नव्हताच, पण आपल्या समूहाचे अस्तित्व टिकविणेही शक्य नव्हते. त्यामुळे जीवनकलहात टिकून राहण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेनुसार लहान टोळ्यांच्या मोठय़ा टोळ्या, मोठय़ा टोळ्यांचा लहान संघ, संघांचे महासंघ, धर्मसंघ, राज्यसंघ, राष्ट्र-राज्य असे घडत आजची उन्नत मानवी संस्कृती विकसित झाली आहे. आजचे राष्ट्र म्हणजे पूर्वीच्या टोळीचे उन्नत रूप होय. पूर्वीच्या टोळीप्रेमाचेच रूपांतर आजच्या उदात्त राष्ट्रप्रेमात झाले आहे.

मूळ टोळी समाजाचे एक अनन्य लक्षण म्हणजे एका टोळीतील सदस्याचे विवाह त्याच टोळीतील सदस्याशी होत असत. म्हणजे आंतरटोळीय विवाह होत नसत आणि हे स्वाभाविक होते. अन्यथा दुसऱ्या भटक्या टोळीत जाणाऱ्या विवाहित सदस्याची मूळ कुटुंबापासून कायमची ताटातूट होणार होती. नंतर स्थिर अवस्थेत जसजशा विविध टोळ्या परस्परसहकार्याने एकत्रित राहू लागल्या व त्यांच्यात सामाजिक संपर्क वाढला तसे त्यांच्यात विवाहसंबंध घडू लागले. त्यातून मग मूळ टोळ्यांचे एकत्रीकरण होण्याची किंवा असे विवाह पसंत न पडल्याने त्या विवाहितांची नवी टोळी तयार होण्याची प्रक्रिया घडू लागली. अशा प्रकारे मूळ टोळ्यांचे एकत्रीकरण वा विघटनीकरण होत अनेक टोळ्यांचा मिळून स्थिर अवस्थेतील समाज निर्माण झाला. मात्र त्यांच्यातील टोळीतच विवाह करण्याची मूळ टोळीप्रवृत्ती नष्ट झाली नाही. आज हिंदू समाजात ज्यास आपण जातिव्यवस्था म्हणतो तिचे विवाहसंबंधात जे मुख्य लक्षण तेच जगभर प्राचीन काळातील टोळीव्यवस्थेचे होते. समाजशास्त्रज्ञ गो. स. घुर्ये यांनी ‘कास्ट अ‍ॅण्ड रेस इन इंडिया’ या ग्रंथात ‘एलिमेंट्स ऑफ कास्ट आऊटसाइड इंडिया’ या नावाच्या प्रकरणात हे दाखवून दिले आहे. विवाह, व्यवसाय, सामाजिक दर्जा हेसुद्धा जन्मावर आधारित असत. तिकडेही समाजात वर्ग तयार करण्यात आले होते व त्यांच्यातील आंतरविवाहांना प्रतिबंध केला जात असे. त्यांचा निष्कर्ष असा की, या संबंधात हिंदू समाजाचे वेगळेपण एवढेच की, या समाजात जन्माधारित ‘अस्पृश्य’ हा एक स्वतंत्र वर्ग करण्यात आला की, जो अन्यत्र आढळत नाही.

प्राचीन काळात जगात ही जी टोळीस्वरूप समाजाची व जन्माधारित भेदभावाची स्थिती होती, तशीच भारतातही होती. परंतु नंतरच्या काळात जन्माधारित भेदभावावर आधारलेली जातिव्यवस्था फक्त भारतापुरती शिल्लकउरली व उर्वरित जगातून ती बहुतांशी नाहीशी झाली. जातिव्यवस्था हे हिंदू समाजाचे अनन्य वैशिष्टय़ बनले. ही जातिव्यवस्था कशी निर्माण झाली व नष्ट का होत नाही हा अनेक समाजशास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा विषय बनला. ही जातिव्यवस्था राष्ट्रीय एकात्मकतेला मारक आहे; तिच्यामुळे भारत हे कधी एक राष्ट्र म्हणून उभा राहू शकणार नाही असे कठोर निदान व ठाम भविष्य अनेकांनी केले होते. ते खरे वाटण्यासारखेच होते. तरी पण आश्चर्य हे की, ही सारी विघटनकारी जातिव्यवस्था पोटात घेऊन स्वतंत्र भारत हे एक राष्ट्र म्हणून जगासमोर उभे ठाकले आहे. जातिव्यवस्था निर्माण कशी झाली यापेक्षा अशी ही जातिव्यवस्था असूनही भारत हे एक राष्ट्र कसे बनू शकले व अधिकाधिक प्रबळ बनण्याच्या दिशेने त्याची वाटचाल कशी चालू आहे, हाच जगासमोरचा आश्चर्याचा व अभ्यासाचा विषय होऊन बसला आहे. हिंदू समाज खरोखर एक अजब चीज आहे, असे जगाला वाटू व पटू लागले आहे. तो परकीयांच्या आक्रमणाला वारंवार बळी बनला, गुलाम झाला, संपला, मेला, असे म्हणत असतानाच पुन्हा उठून उभा ठाकतो, स्वातंत्र्य मिळवितो, सेक्युलर लोकशाही उभी करतो, राष्ट्रगर्जना करीत महासत्तांच्या स्पर्धेत उतरतो. जात्याभिमानामुळे परस्परांना पाण्यात पाहणाऱ्या या समाजाच्या ठिकाणी एवढे एकसंधतेचे सामथ्र्य आले तरी कोठून, हा जागतिक अभ्यासकांपुढील प्रश्न आहे.

प्राचीन काळात जगात सर्वत्र टोळीस्वरूप समाज व त्यांच्यातही जातिसदृश जन्माधारित भेदभाव असताना तेथे नंतर भारताप्रमाणे जातिव्यवस्था का निर्माण झाली नाही? आपले मूळ टोळीगुण विसरून ते समूह त्यापेक्षा मोठय़ा मानव संघात विलीन कसे झाले? जन्माधारित उच्चनीचता, व्यवसाय, जातिअंतर्गत विवाह इत्यादी टोळीप्रथांना व नीतिनियमांना तिलांजली देऊन ते बाहेरील समाज व्यापक प्रथा-परंपरा व उच्चतर नीतिनियम पाळण्यास कसे शिकले? हे भारतात घडले नाही ते तिकडे कसे घडले?

याचे प्रमुख कारण तिकडे असे महान धर्म उदयास आले की, त्यांनी तेथील समाजाचे टोळीस्वरूप संपवून टाकले. ते धर्म म्हणजे ख्रिश्चन व इस्लाम होत. आज जगातील बहुसंख्य प्रजा याच दोन धर्माची अनुयायी आहे. या धर्मानी आपल्या अनुयायांना एक देव, एक धर्मग्रंथ, एक प्रार्थना, एक विशिष्ट व निश्चित विचारसरणी, नीतिनियम, जीवनपद्धती दिली. सर्वासाठी एक ध्येय, समानता, परस्परबंधुत्व, धर्मासाठी त्याग करण्याची व बलिदानाची प्रेरणा दिली. इस्लामने तर ही शिकवण अतिशय स्पष्टपणे व ठाशीवपणे मांडली व बहुतांशी अमलात आणून दाखवली. जुने (म्हणजे इ.स. ६१० पूर्वीचे) सर्व अज्ञानकाळातील ठरवून रद्दबातल केले. अरबस्तानातही टोळ्या होत्या. त्या टोळ्यांचा नवा धर्माधारित इस्लामी समाज निर्माण केला गेला. त्या टोळ्यांचे ३६० टोळीदेव व त्यांच्या मूर्ती विसर्जित करून सर्वासाठी एकमात्र देव म्हणून अल्लाहची संकल्पना दिली. रक्ताचे नाते अज्ञानकाळातील ठरवून धर्माचे नाते सर्वश्रेष्ठ ठरविले. सर्व मुसलमान परस्परांचे बंधू आहेत अशी धर्मघोषणा करण्यात आली. धर्मासाठी जगणे व मरणे हे सर्वश्रेष्ठ ध्येय व कर्तव्य ठरविण्यात आले. अशा प्रकारे टोळीव्यवस्थेचे रूपांतर जातिव्यवस्थेत न होता जातिमुक्त समताप्रधान धार्मिक समाजात झाले. ही धर्माने घोषित केलेली आदर्श व्यवस्था व्यवहारात पूर्णपणे पाळता आली नसली तरी टोळीव्यवस्था नष्ट करण्यात इस्लामला व ख्रिस्ती धर्माला मिळालेले यश उल्लेखनीय होते.

ख्रिश्चन व इस्लाम धर्म एवढेच करून थांबले नाहीत. त्यांनी आपल्या धर्मावर राज्याची उभारणी केली. धर्म व राज्य एकरूप करण्यात आले. राज्याचा प्रमुख हाच धर्माचा प्रमुख बनला. धर्माची शिकवण हाच राज्याचा कायदा बनला. स्वत: मुहम्मद पैगंबर हे एकाच वेळी धर्मप्रमुख (प्रेषित), राज्यप्रमुख, सेनापती, न्यायाधीश होते. ख्रिश्चनांचाही बराचसा इतिहास असाच आहे.

परिणामत: सर्व टोळ्यांना एकसंध करण्यासाठी धर्मामुळे आध्यात्मिक व राज्यामुळे भौतिक शक्तिकेंद्र निर्माण झाले. हे दोन्हीही धर्म मिशनरी म्हणजे जगप्रसारी असल्यामुळे जगाच्या बहुतेक भागांवर त्यांनी प्रभुत्व मिळविले. त्यांनी धर्माच्या आधारावर व राज्याच्या मदतीने समाजाची संघटना केल्यामुळे टोळीव्यवस्थेला व जातिव्यवस्थेला ते मोडीत काढू शकले. आधुनिक काळात ख्रिश्चनांनी आपला धर्म पारलौकिकापुरता मर्यादित ठेवून आधुनिक मूल्यांचा स्वीकार केला. धर्माऐवजी राष्ट्र हे संघटनतत्त्व बनविले. इस्लामने मात्र धर्माची घट्ट पकड सोडली नाही. मुसलमान समाज जातिव्यवस्थेपासून वाचला, पण धार्मिक कडवेपणाच्या संकटात सापडला. अर्थात हा स्वतंत्र विषय आहे.

भारतात मात्र असे घडले नाही. येथे ‘धर्म’ हे संघटनतत्त्व बनविले गेले नाही. मुख्य म्हणजे भारतात कोणता विशिष्ट असा एक धर्म निर्माणच झाला नाही. ‘हिंदू धर्म’ हा काही सर्व भारतीयांचा धर्म नव्हता. प्राचीन भारतात तर ‘हिंदू धर्म’ हे नावच कोणाला माहीत नव्हते. मुसलमानांच्या आक्रमणानंतर व त्यांच्यामुळे ‘हिंदू’ हे नाव प्रचारात आले. नंतर ‘हिंदू’ नाव पडलेल्या लोकांचे प्राचीन काळात अनेक धर्म होते. एक ग्रंथ, एक प्रेषित, एक प्रार्थना, एक तत्त्वज्ञान, एक जीवनपद्धती- असा एक धर्म भारतात कधीही नव्हता. अनेक टोळ्यांनी बनलेला हा मानवसमूह होता. त्या प्रत्येक टोळीचा स्वतंत्र देव होता, धर्म होता, जीवनपद्धती होती, नीतिनियम होते, एक प्रकारे तो त्याचा स्वतंत्र टोळीधर्म होता. म्हणजे भारतात जेवढय़ा टोळ्या तेवढे त्यांचे ‘धर्म’ होते. नंतर या सर्व टोळ्यांना सांस्कृतिक दृष्टीने एक करून त्यांचा एक समाज घडविण्याचे महान कार्य आपल्या पूर्वजांना करावे लागले. यासाठी त्यांनी स्वत:ची खास पद्धती शोधून काढली व त्यातून आजचा भारतीय समाज व महान संस्कृती निर्माण झाली. कोणती होती ती खास पद्धती?

लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 5:30 am

Web Title: gang culture to human culture
Next Stories
1 काश्मीरचा अपवाद का झाला?
2 संस्थानांचे भारतात एकात्मीकरण
3 संस्थाने भारतात विलीन कशी झाली?
Just Now!
X