19 October 2019

News Flash

मातृभूमीवर प्रेम हे दुसरे सूत्र

भूमीवरील प्रेम हा संस्कृतीवरील प्रेमाचा व राष्ट्रप्रेमाचा आविष्कार आहे.

वेदकाळात तर भारताला माताही न मानणारा कुणी सापडणारच नव्हता! पुढे मध्ययुगात संतांच्या कृतींमध्ये दिसते, तेसुद्धा देवतेला मातेचे रूप देऊन पुन्हा या दोन्ही रूपांचे एकत्रीकरण करण्याच्या संस्कृत वाङ्मयापासूनच्या परंपरेचे पालनच!! अरविंद, स्वा. सावरकर, रवींद्रनाथ टागोर यांनीही भारताला मातृदेवतेच्या रूपात पाहिले आणि नरहर कुरुंदकरांनी तर वंदे मातरम्हे राष्ट्रगीत ठरल्याची पावतीही दिली आहे!!!

सांस्कृतिक ऐक्य असो की राष्ट्र, भूमी हा आवश्यक घटक असतो. भूमीवरील प्रेम हा संस्कृतीवरील प्रेमाचा व राष्ट्रप्रेमाचा आविष्कार आहे. ‘भारत’ नाव राज्यघटना निर्माण झाल्यापासून नव्हे तर प्राचीन काळापासून चालत आले आहे. महाभारत काळापासून या देशाला ‘भारतवर्ष’ म्हटले जाऊ लागले. भरत नावाच्या पराक्रमी व चक्रवर्ती राजाच्या नावावरून हे नाव पडलेले आहे. तेव्हा सीमा व क्षेत्रफळ बदलले असले, तरी ‘भारत’ हे देशाचे पाळण्यातील नाव आहे.

भारत हा महाकाय देश. वेदकालीन पूर्वजांना सिंधूपासून गंगा नदीपर्यंतचा उत्तर भारताचा भाग तेवढा ज्ञात होता. पण नंतरच्या महाभारत व पुराण काळात हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंतची सर्व भारतभूमी ज्ञात झालेली होती. शेकडो जनसमूह (गण वा स्थित टोळ्या) देशाच्या वेगवेगळ्या भागांत राहत होते व आपापल्या भूप्रदेशावर प्रेम करीत होते. आपले भरणपोषण करणारी जीवनदायी भूमी म्हणून तीवर त्यांनी प्राणापलीकडे प्रेम करणे स्वाभाविक होते. तो प्रदेशच त्यांच्यासाठी स्थानिक जन्मभूमी होता, परंतु आपल्या पूर्वजांनी त्यांना आपापल्या जन्मभूमीसोबतच सर्व भारतवर्षांवरही सर्वाची एक मातृभूमी म्हणून प्रेम करायला शिकविले. आपल्या जनसमूहातील लोकांप्रमाणेच सर्व भारतीय लोकांनाही आपले देशबांधव मानण्यास शिकविले. मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे जसे स्वत:चे टोळीदेव व त्यासोबतच सर्वाचा मिळून एक ईश्वर, तसेच हे!

मानवासाठी या विश्वात सर्वश्रेष्ठ उपकारकर्ता कोण? अर्थात, एक म्हणजे देव व दुसरी माता. आपल्या पूर्वजांनी (काही जण त्यांना ऋषीमुनी म्हणतात) भारतभूमीला देवता व माता या दोन्हीही रूपात लोकांच्या हृदयात स्थानापन्न केले. भारताला पुण्यभूमी व मातृभूमी मानण्याच्या दोन्हीही संकल्पना प्रस्थापित केल्या. वेदकालापासूनच सर्व संस्कृत वाङ्मय भारतभूमीच्या देवतारूपाचे व मातृरूपाचे स्तवन करीत तिच्या चरणी लीन झाले आहे. देवता न मानणाऱ्या नास्तिकालाही पुण्यभूमी न मानता मातृरूपात भारतभूमीवर प्रेम करण्याचा पर्याय ठेवून त्यांनी सर्वसमावेशकता साध्य केली  होती. भारताला माताही न मानणारा कुणी सापडणारच नव्हता.

भारतभूमीच्या देवतास्वरूपाविषयी विष्णुपुराणात म्हटले आहे: ‘देवलोक स्वर्गात भारतवर्षांच्या गौरवाचे गान गातात, की ते लोक धन्य आहेत की जे भारतभूमीत जन्माला आले आहेत. ही भूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण येथे स्वर्गप्राप्तीशिवाय मोक्षप्राप्तीचीही साधना केली जाऊ शकते..’ स्वर्गातील देवताही तेथील देवत्वाचा उपभोग घेऊन मोक्ष प्राप्त करण्यासाठी पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतात. वैदिक वाङ्मयात भारतभूमीला स्वर्ग व मोक्ष मिळविण्याचे साधन म्हटले आहे. कालिदासाने म्हटले आहे, की या भूमीवरील समृद्ध लोक हाच खरा स्वर्ग होय. महाभारतात म्हटले आहे, की ‘भारत हा देवराज इंद्राची प्रिय भूमी होय.’ आजच्या वायव्येकडील भारताला पूर्वी ‘ब्रह्मावर्त’ असे नाव होते व त्यास ‘देवनिर्मित देश’ म्हटले जाई. श्रीमद्भागवतात म्हटले आहे, की ‘ज्यांनी श्रीहरीची कृपा संपादन केली आहे, त्यांच्या कृती किती गौरवास्पद आहेत. श्रीहरीच्या कृपेनेच त्यांना भारतीय लोकांमध्ये जन्म मिळाला आहे.’ रामायणात लक्ष्मणाला राम म्हणतो, की ‘मला सुवर्णमयी लंकेचा मोह नाही. मी जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ मानतो.’

देवतेला मातेच्या रूपात पाहण्याची या देशाची परंपरा आहे. संतवाङ्मयात तर ही परंपरा अधिकच स्पष्टपणे दिसते. मराठी संतांनी पांडुरंगालाच विठाई माऊलीच्या रूपात पाहिले. एकनाथाला जगदंबा ही माताच वाटली. शिवाजी महाराज जगदंबेचे उपासक होते. त्यांना पारलौकिक लाभासाठी नव्हे, तर स्वराज्य स्थापनेसाठी तुळजापूरची भवानीमाता प्रेरक  वाटली. ‘मातृ देवो भव’ हा येथील संस्कृतीचा मंत्र राहिलेला आहे.

महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गेला महिषासुरमर्दिनी म्हटले जाते. महाराष्ट्रात तिला अष्टभुजा म्हटले जाते. कालिमाता हे दुर्गेचेच रूप आहे. देशशत्रूविरोधात या देवीची उपासना केली जाते. या देवीचा आशीर्वाद घेऊन कित्येक देशभक्त ब्रिटिशांविरोधात सशस्त्र क्रांतिकारक बनले. श्री अरविंदांनी ‘भवानी भारती’ दीर्घकाव्य व ‘भवानी मंदिर’ लेख लिहून दुर्गेचे हेच स्वातंत्र्यदेवीचे रूप मांडले. भवानी मंदिर बांधून तिची उपासना करण्याची त्यांनी योजना मांडली होती. हिलाच त्यांनी ‘प्रेमळ राधा’, ‘कराल काली’, ‘घोर चंडिका’, ‘असुरमर्दिनी भारतमाता’ असेही म्हटले आहे. सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्याला भगवतीच्या रूपात पाहिले. मोक्ष, मुक्ती, वेदान्तातले परब्रह्म ही त्या ‘स्वतंत्रते भगवती’ची रूपे आहेत, अशी कल्पना मांडली.

भारतभूमीला माता मानण्याची परंपरा वेदकालापासूनची आहे. वेदांत भूमीसाठी ‘पृथ्विवी’ अशी संज्ञा आली आहे. ऋग्वेदात पृथ्वीला ‘माता’ म्हटले आहे. त्यात ‘मातर भूमी’ असाही उल्लेख आला आहे. ‘पृथ्वी मातोपवास पृथ्वी माता’ असंही म्हटलं आहे. यजुर्वेदात ‘नमो मातर पृथ्विवी’ अशी ऋचा आली आहे. वेदपूर्वकालीन सिंधू संस्कृती मातृप्रधान होती व उत्खननात तेथे ‘मातृकामूर्ती’ सापडल्या आहेत. मातृपूजनाची कल्पना पाच हजार वर्षांपासूनची आहे. अथर्ववेदातील ‘पृथिवी सूक्त’ म्हणजे भूमीचे स्तवनच होय. ‘भूमी माता आहे. मी तिचा पुत्र आहे’ अशी त्यातील भावना आहे. अनेक ऋचांत मातृभूमीचे विलोभनीय वर्णन करून तिला वंदन करण्यात आले आहे. आम्हाला ऐश्वर्य, तेज, बल, विपुल अन्न, दूध, फळे, आरोग्य, धन, सद्गुण, शौर्य, विजय प्रदान कर, अशी प्रार्थना करण्यात आली आहे. त्यात पर्जन्याला ‘पिता’ व भूमीला ‘पर्जन्यपत्नी’ म्हटलेले आहे. ‘ही भूमी अनेक भाषा बोलणाऱ्या व अनेक धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना एका कुटुंबाप्रमाणे धारण करते,’ असाही सर्वसमावेशकतेचा मंत्र त्यात आला आहे. ‘भूमी ही पुत्रांना स्तनपान करणारी माता आहे,’ अशी मातृत्वभावना त्यात आली आहे. महाभारतात भीष्माचार्य धर्मराजाला सांगतात : ‘भूमीवर माणसे जन्माला येतात आणि भूमीतच विलीन होतात. ही भूमी जगताची माता-पिता आहे. हिच्यासारखे दुसरे कोणीही नाही.’

तेव्हा, सर्वश्रेष्ठ व सर्वप्रिय गोष्टीला देवता वा माता मानणे व ती दोन्हीही रूपे पुन्हा एकरूप करणे ही भारतीय संस्कृतीची मूळ प्रवृत्ती आहे. म्हणून मध्ययुगीन काळातील नामदेव सहजपणे म्हणतात : ‘तू माझी माउली मी वो तुम्हा तान्हा।’ तर जनाबाई म्हणतात : ‘ये गं ये गं विठाबाई। माझे पंढरीचे आई।’,  तुकारामाने तर ‘पांडुरंग माझे माते।’ असे महाराष्ट्रालाच म्हणायला लावले.

ही माता नंतर भारतमाता बनायला वेळ लागणार नव्हता. ब्रिटिश राज्य आल्यावर ‘भारत माता’ हा शब्द प्रचारात आला. बंगाली भाषेत १८७० साली ‘भारतमाता’ शीर्षकाची कविता प्रकाशित झाली. त्यानंतर तीन वर्षांनी ‘भारतमाता’ नावाचे नाटक रंगभूमीवर आले. नंतर रवींद्रनाथ टागोर या शब्दाचा वापर करू लागले व ही संकल्पना बंगालमध्ये रूढ झाली. रवींद्रनाथांचे थोरले बंधू सत्येंद्रनाथ यांनी ‘गाऊ जय भारत’ नावाची कविता लिहिली होती. ‘मिळून सारे भारतपुत्र, एक शूर मनप्राण, गाऊ या भारत यशगान,’ असे तिचे पहिले कडवे होते. त्यांनीच लिहिलेल्या दुसऱ्या गीतात म्हटले होते : ‘चल चलरे भारत पुत्रा। मातृभूमी करी आवाहन।.. पुत्राविना मातृदैन्य कोण करी दूर!’ ज्ञान, दीक्षा, ध्येय, मोक्ष एक। एक सुरे गाऊ सारे मातृस्तवन।’ रवींद्रनाथांनी लिहिलेल्या ‘जनगणमन’ या (राष्ट्र) गीताच्या मूळ रूपातील चौथ्या व पाचव्या कडव्यात भारत भाग्य विधात्याला (याचा अर्थ जगन्नियंता असा आहे) भारताची ‘माता’ व ‘ठेवी तव पदिमाथा’ असे म्हटले आहे. तेव्हा याही गीतात ‘भारतमाता’ व तिचे ‘जगन्नियंत्याच्या चरणी वंदन’ ही भावना आलीच आहे.

या साऱ्या बुद्धीला अगम्य वाटणाऱ्या कल्पना व रूपके असली, तरी त्यांनी भारतीयांची मने जोडली, भारतीयत्व निर्माण केले, भारत एक राष्ट्र होऊ  शकले, राष्ट्राकरिता हौतात्म्य पत्करण्याची प्रेरणा मिळाली हेही डोळसपणे समजून घेतले पाहिजे. तेव्हा भारतभूमीला देवता वा माता मानणे, तिच्या पुत्रांना तिची भक्ती वा तिच्यावर प्रेम करायला लावून त्यांच्यात एकत्व व बंधुत्व प्रस्थापित करणे ही या देशाची जन्मापासूनची परंपरा आहे. असे मातृभूमीवरील प्रेम हे भारतीय राष्ट्रवादाचे व सांस्कृतिक ऐक्याचे दुसरे सूत्र होय.

या प्रेमाचाच आविष्कार असणाऱ्या ‘वंदे मातरम्’विषयी समाजवादी व  नास्तिक नरहर कुरुंदकर यांनी पुढील सूक्त गायिले आहे : ‘‘आमच्या स्वातंत्र्यलढय़ात कोटी कोटी कंठांनी निनाद केलेले व रक्ताच्या वर्षांवाने पुनीत केलेले, असे हे जनतेने स्थापित केलेले राष्ट्रगीत आहे..’ या राष्ट्राच्या स्वातंत्र्यावर प्रेम करणाऱ्या सर्वाचे हे गीत आहे. या गीतासाठी किती जणांनी प्राण फुलासारखे उधळले याची तर गणतीच नाही.. एका गीतावर तीन पिढय़ा हुतात्म्यांच्या रक्ताचा अभिषेक करून हे पूज्य राष्ट्रगीत बनवले आहे.. ‘वंदे मातरम्’ हे आमच्या रक्तातून वाहणारे राष्ट्रगीत झाले आहे!’’

लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.

First Published on April 13, 2016 5:57 am

Web Title: vande mataram national anthem issue raised by political party
टॅग Vande Mataram