एषुत्तेच्छन गुरुपदी शोभणारा संत आहे. एषुत्तेच्छन या नावाचा अर्थच मुळी ज्ञानदाता गुरू असा आहे. हरि-हर ऐक्याचा पुरस्कार करणाऱ्या या संताची भक्तिपर रचना वेदान्त विचारानं परिपूर्ण आहे. त्यांचा ‘किलिलपाट्टू’ हा ग्रंथ मल्याळी साहित्याचं भूषण मानला जातो.

मनुष्यरूपी कमळांना विकसित करणारा सूर्य किंवा सर्वाना जागृत करणारा आनंदरूप पारिजातक असं ज्याचं वर्णन केलं गेलं आहे तो केरळमधला एक श्रेष्ठ संत म्हणजे एषुत्तेच्छन. याचा काळ पंधराव्या शतकाच्या अखेरीचा आणि सोळाव्या शतकाच्या प्रारंभीचा. पण पाच शतकांपूर्वीच्या या संताची कीर्ती केरळच्या भूमीवर दीर्घजीवी ठरली आहे. ‘किलिलपाट्टू’ हा याचा ग्रंथ मल्याळी साहित्याचं भूषण मानला जातो. रामायण, महाभारत आणि भागवतावर आधारलेल्या याच्या रचनाही प्रसिद्ध आहेत, जनप्रियही आहेत.

एषुत्तेच्छनची कीर्ती केवळ त्याच्या ग्रंथसंपदेमुळेच टिकून आहे असे नाही. लोकजीवनात आजही त्याच्याविषयीच्या प्रेमादराच्या जागत्या खुणा दिसतात. त्याचं गाव मलबारच्या दक्षिणेचं अगदी लहानसं गाव होतं. त्रिकंडीयूर शिवमंदिराजवळचं तुंचन परंपु नावाचं गाव. पण एषुत्तेच्छनमुळे त्या गावाची धूळमातीसुद्धा कस्तुरीच्या मोलाची झाली. मुलांच्या शिक्षणाची सुरुवात करताना तिथली ती माती लोक आवर्जून घेऊन जातात. ज्यांना शक्य असतं ते मुलांना तिथेच घेऊन जातात आणि त्यांच्या श्री गिरवण्याची सुरुवात तिथेच करतात. त्या पालकांसाठी तुंचन परंपु गाव म्हणजे महाविद्वान आणि थोर भक्त एषुत्तेच्छनसारख्याची जन्मभूमी. ती पवित्र असणारच. एषुत्तेच्छन या नावाचा अर्थच मुळी ज्ञानदाता गुरू असा आहे.

एषुत्तेच्छन खरोखरीच गुरुपदी शोभणारा संत आहे. तो कोणत्या जातीजमातीचा होता हे निश्चित माहीत नाही. त्याविषयी नाना प्रकारचे तर्क विद्वानांनी केले आहेत. बहुतेक सगळ्या भारतीय संतांप्रमाणे त्याचा जन्म, त्याचे आई-वडील (आणि त्याचं नाव) यासंबंधानं खात्रीची माहिती उपलब्ध नाही. कुणी असं म्हणतं, की याचं मूळ नाव रामानुजन असं असावं आणि हा बहुधा नायर लोकांच्या उपजातीतला असावा. कोण जाणे एषुत्तेच्छन कसा वाढला, कसा मोठा झाला! तो बहुधा कुमार वयातच पुष्कळ हिंडला असावा. त्याच्या लेखनात त्याच्या अनुभवसमृद्धीची खूण पटते. तो नाना प्रकारची शास्त्रे शिकला आणि मिळालेली विद्या त्याने मुक्तहस्ताने इतरांना दिलीही. त्याच्या काळातल्या विद्वानांशी त्याचे उत्तम संबंध होते. लग्न करून त्यानं गृहस्थाश्रम स्वीकारला खरा, पण तो संसारात रमला नाही. तो केरळमध्ये आणि केरळबाहेरच्या प्रांतामधूनही फिरत राहिला. तमीळ आणि तेलुगुसारख्या अन्य दक्षिणी भाषाही त्यानं उत्तम आत्मसात केल्या.

यानं स्वत:चा शिष्यवर्ग निर्माण केला आणि मठस्थापनाही केली. चित्तूर नावाचं एक निसर्गसुंदर गाव त्यानं मठस्थापनेसाठी निवडलं. तिथे त्यानं एक राममंदिर उभारलं आणि जोडीला शिवमंदिरही उभारलं. हरि-हर ऐक्याचा पुरस्कार करणारा तो संत होता. मध्ययुगीन दक्षिण भारतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या काळात शैव-वैष्णवांचे जे झगडे झाले ते प्रसंगी अत्यंत कडवट, अत्यंत उग्र आणि कधी कधी तर रक्तलांच्छितही झाले. हरि-हर ऐक्याचा प्रवाह या पाश्र्वभूमीवर उद्भुत झाला आणि समन्वयवादी अनेक पंडितांनी, आचार्यानी आणि संतांनी, भक्तांनी तो ओघ विस्तारला, निरंतर प्रवाहितही ठेवला.
एषुत्तेच्छन हा मूलत: राम-कृष्णांचा भक्त. पण त्यानं हरिहरैक्याची पुष्टी करणारं कृतिशील तत्त्वज्ञान आचरलं. त्याच्या शिष्यमंडळानंही केरळच्या भक्तिसाहित्यात त्याच तत्त्वविचारानं भरलेल्या-भारलेल्या विविध रचनांची भर घातली.

एषुत्तेच्छननं देह ठेवला तो चित्तूरलाच. तिथेच त्याची समाधी  आहे आणि केरळमधल्या ईश्वरभक्तांचं ते एक प्रेरणास्थान आहे.
एषुत्तेच्छनची भक्तिपर रचना केवळ भावाकूल नाही. ती वेदान्त विचारानं परिपूर्ण आहे. एका बाजूने ती ज्ञानवंतांना सुखावते, साहित्यकारांना मोहविते आणि दुसऱ्या बाजूने ती सर्वसामान्यांना आश्वस्त करते, भक्तभाविकांना नित्य स्मरणीय वाटते. एषुत्तेच्छन समाजातल्या विषमतेवर, अन्यायावर कोरडे ओढत नाही. मानवी वर्तनामधल्या विसंगतीवर, विपरितावर बोट ठेवत नाही, चारित्र्य आणि शील यांचं विवरण करीत नाही, की तो नीतीचे धडे देत नाही.

एषुत्तेच्छनची रचना हृदयविकास घडवते. भक्तीची वाट सर्वसामान्यांसाठी प्रशस्त करते. भारतीय सत्त्वसंचिताचं सार त्याच्या रचनेत सामावलं आहे. राम आणि कृष्ण ही त्याची प्रिय दैवतं. त्याच्या रचना विशेषत्वानं या दैवतांसंबंधीच्याच आहेत. त्यानं अध्यात्मरामायण रचलं आहे आणि ते केरळवासीयांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. ती त्याची प्रथम रचना. रामायणाच्या जोडीनं त्यानं महाभारत, भागवत, देवीभागवत, हरिनामकीर्तन अशाही रचना केल्या आहेत.

चंद्र मस्तकी ज्याच्या तो शिववंदन करतो ज्याला सुधाकराची शोभा आहे त्याच्या मुखकमलाला इंद्र आणि देवता आदरे प्रणाम करिती ज्याला नंदतनय जो अनघ आणखी राधापति जो त्याला शीतल ज्याचे हास्य विधूसम, नारायण जो त्याला  वंदन करतो सानंदे त्या दामोदर देवाला हरिनाम कीर्तनातल्या याच्या रचना केरळातल्या घरांमधून अनेक र्वष भक्तिभावानं गायल्या जातात. एषुत्तेच्छनच्या रचना विविध प्रकारच्या आहेत. विविध छंदांमधल्या आहेत. पण सर्वत्र आहे ते एकच भक्तीचं सूत्र; राम-कृष्णांविषयीच्या अनन्य भक्तीचं सूत्र. एषुत्तेच्छन राम-कृष्णांच्या सगुण-साकार रूपांची परोपरीनं वर्णनं करतो. त्यांच्या डोळ्यांची, केसांची, मुकुटांची, आयुधांची, वस्त्रांची आणि आभूषणांची वर्णनं करतो आणि तरीही त्या रूपांना डोळे भरून हृदयात साठवताना तो हृदयाच्या अंतर्हृदयात त्या ईश्वरी अवतारांच्या निर्गुण निराकार अशा मूळ रूपाची जाणीवही कायम ठेवतो. अद्वैताचं विवरण असाधारण कौशल्यानं करणारा हा केरळचा सर्वश्रेष्ठ संतकवी आहे, म्हणून त्याची कीर्ती आहे. असं म्हटलं जातं, की हिन्दी प्रदेशात जे स्थान तुलसीदासाचं तेच मलयालम भाषक प्रदेशात एषुत्तेच्छनचं! aruna.dhere@gmail.com