‘‘एक अभिनेत्री म्हणून मला कधीकधी नायकाबरोबर काही जवळकीचे प्रसंग साकारायला लागतात. एका चित्रपटाच्या वेळी असा प्रसंग आला. त्यावेळी मला जरा भीती वाटत होती. मी संदेशला फोन केला. तर त्याने मलाच समजावलं, ‘एक अभिनेत्री म्हणून कर. लाजून करू नकोस, मोकळेपणाने कर. मग पडद्यावर चांगलं दिसू शकेल.’ त्याचा हा जो पाठिंबा असतो तो एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी खूप आवश्यक असतो.’’ संदेश कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांच्या मधला हाच मोकळेपणा त्यांच्या नात्याला जिवंत ठेवतो आहे.

‘‘सोनालीचा (कुलकर्णी) वाढदिवस ३ नोव्हेंबरचा. तिच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी त्या दिवशी मी तिच्या घरी गेले होते. तिथं सर्वात आधी मला तिचा भाऊ, संदेश दिसला. आजही मला तो तस्साच्या तसा आठवतोय, त्यानं कुर्ता घातला होता, त्याच्या बाह्य दुमडल्या होत्या आणि तो कुठेतरी निघाला होता.. त्याला तसा पाहिल्यानंतर माझा आतला आवाज मला स्पष्ट ऐकू आला. ‘हाच माझा नवरा’. खरं तर कोणाशी लग्न करावं हे ठरवण्याचं माझं वयच नव्हतं, मी फक्त सतरा वर्षांची होते. या अडनिडय़ा वयात घेतलेले निर्णय चुकण्याचीच दाट शक्यता असते. पण मी पाहता क्षणीच त्याच्या प्रेमात पडले होते. आणि माझा माझ्या आतल्या आवाजावर ठाम विश्वास आहे. संदेश अजूनही मला त्यावरून चिडवतो.’’, मराठी रंगमंच आणि चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलेल्या अमृता सुभाषने नवऱ्याबरोबरच्या, लेखक, अभिनेता, दिग्दर्शक संदेश कुलकर्णी बरोबरच्या पहिल्या भेटीच्या आठवणींना उजाळा देताना हा किस्सा सांगितला.

drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप

त्या दिवसांबद्दल संदेश सांगतो की, ‘‘माझी आणि अमृताची मैत्री होण्याआधी, सोनाली आणि अमृता चांगल्या मैत्रिणी होत्या. ती घरी सुद्धा यायची. पण आम्हा दोघांची खऱ्या अर्थाने भेट झाली ती सत्यदेव दुबेंच्या कार्यशाळेत. त्याच सुमाराला आम्ही कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम करत होतो. त्या निमित्ताने मग रोजच भेटायला लागलो. मला अभिनयाची आवड होती, लिहायचोही आणि त्याच वेळेला मी पुण्यातच कमिन्स इंजिनीयिरग कॉलेजमध्ये शिकवतही होतो. आमचा ‘समन्वय’ नावाचा ग्रुप होता. तेंडुलकरांच्या लिखाणावर आधारित नाटकं, कार्यक्रम करत होतो. त्यानंतर एसपी कॉलेजमध्ये शिकत असताना अमृताने मला तिच्यासाठी एकांकिका लिहायला सांगितली. तेव्हा मी ‘पार्टनर’ ही एकांकिका लिहिली. अमृताने ती दिग्दर्शित केली होती आणि त्यामध्ये कामही केलं होतं. त्यावर्षी ‘पुरुषोत्तम करंडक’, ‘मुंबईत सवाई’ अशा सर्व स्पर्धामध्ये ती खूप गाजली होती. ती एकांकिका आमच्या नात्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरली. ‘पार्टनर’ने आम्हाला ‘लाइफ पार्टनर’ मिळवून दिला असं आम्ही नेहमी म्हणत असतो.’’

यानंतर दिल्लीतल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश मिळणं हा अमृतासाठी, तिच्या करियरसाठी खूप महत्त्वाचा टप्पा होता. ‘‘तेव्हा माझा संदेशवर अगदी जीव जडला होता. ३ वर्ष त्याला सोडून जायची माझी तयारीच होत नव्हती. एनएसडी माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे हे जाणवत असूनही माझा पाय निघत नव्हता. तेव्हा संदेशनं मला व्यवस्थित समजावलं. म्हणाला, ‘आपल्या नात्याबद्दल विचार करायला पुष्कळ वेळ आहे. आता घाई करू नकोस, तू अजून लहान आहेस. हे फक्त आकर्षण असू शकतं. तू आपल्या नात्याला जोखून बघ. तीन वर्षांनंतरही भावना कायम आहेत का ते आपण तपासून बघू. आता तू एनएसडीला जा. तिथं कोणी तुला आवडलं तरी त्याकडे मोकळेपणानं बघ. आताच माझ्या बाबतीत सगळं ठरवू नकोस.’ तेव्हा त्याचं हे सांगणं किती मोठेपणाचं होतं हे मला नंतर जाणवलं. मी तिथे गेले तेव्हा माझ्यावर कसलंच दडपण नव्हतं. आपली इतर कोणाशीही मैत्री होऊ  शकते हे माहिती असूनही त्याने घेतलेल्या भूमिकेमुळे माझा निश्चय आणखी पक्का झाला होता.’’ त्या काळात मोबाइल फोन नव्हते. पत्र आणि लँड लाइन फोन ही संपर्काची साधनं होती. ‘‘तेव्हा आम्ही एकमेकांना भरपूर पत्रं लिहिली. दोघांनाही लिहायला आवडायचं. त्यामुळे भरपूर पत्रं लिहिली. ती अजूनही जपून ठेवली आहेत.’’ अमृता आणि संदेश सांगतात.

‘‘अमृता एनएसडीहून परत आल्यानंतर आम्ही ‘साठेचं काय करायचं’ हे नाटक केलं. ते राजीव नाईकनं लिहिलं होतं, मी दिग्दर्शन केलं. अमृता आणि निखिल रत्नपारखी हे दोघं नवरा-बायकोचं काम करत होते. ते काम आम्ही प्रायोगिक स्तरावर केलं होतं. जवळपास वर्षभर त्याचे प्रयोग केले. त्या नाटकाचंही भरपूर कौतुक झालं. त्यानंतर अमृताला व्यावसायिक कामांच्या ऑफर्स मिळायला लागल्या आणि ती मुंबईला राहायला गेली. आमचं पुन्हा ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशीप’ सुरू झालं. मात्र हे दिल्लीपेक्षा सोयीचं होतं. दिल्लीला असताना ती माझ्या फोनची वाट बघायची, आणि गंमत म्हणजे अनेकदा ती फोनजवळ वाट बघत बसलेली असतानाच मी फोन करायचो. त्या मानानं मुंबईला जाणं सोपं होतं. ती मुंबईला गेल्यानंतर मी पुण्यात शिकवतच होतो. त्यावेळी मी तिला भेटायला जायचो. सुरुवातीला पुणे-मुंबई झाल्यानंतर मीही मुंबईला शिफ्ट झालो.’’ संदेश सांगतो. तो मुंबईला गेल्यानंतर साधारण दोन वर्षांनी दोघांनी लग्न केलं. त्याबद्दल अमृता सांगते की, ‘‘आम्ही बराच काळ एकत्रच राहत होतो. एकत्र वावरत होतो. मग निदान सह्य करण्याची औपचारिकता तरी कशाला बाकी ठेवता? लग्न करून टाका, असं दोघांच्याही घरच्यांचं म्हणणं होतं. आम्ही २७ जूनला लग्न केलं. वर्ष आम्हा दोघांनाही आठवत नाही. आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचीही गंमत आहे. माझ्या आईने संदेशला आणि संदेशच्या आईने मला फोन केला. ‘मग, आजचे काय प्लॅन्स? आज काय विशेष?’ असं दोघींनी विचारलं. आम्हाला काही कळलंच नाही. कशाबद्दल बोलताहेत? मग त्यांनी सांगितल्यावर लक्षात आलं, अरे हां. आज लग्नाचा वाढदिवस. पण खरं तर माझ्यासाठी २ जानेवारी हा दिवस जास्त महत्त्वाचा आहे. कारण त्या दिवशी त्यानं मला होकार दिला होता, कारण सुरुवातीला त्याने मला नकार दिला होता.’’

अमृता मुंबईला आल्यानंतर ‘ती फुलराणी’ नाटक मिळालं, ईटीव्हीवरची प्रतिमा कुलकर्णीची ‘झोका’ ही मालिकाही खूप गाजली. ‘‘तेव्हा मी पुण्यालाच होतो. आमचं फोनचं बिल खूप व्हायचं. आमच्या प्रेमाचा फायदा टेलिफोन कंपन्यांनाही झाला’’, संदेश गमतीनं म्हणतो. ‘‘अमृतानं ‘फुलराणी’ खूप लहान वयात केलं आणि ते मला खूप छान वाटत होतं. तिनं केलंही छान. मुख्य म्हणजे ती चांगली गाऊ  शकते. तिनं गाणं वाढवलं पाहिजे, असा माझा आग्रह असतो. आता तिनं पुन्हा रियाझावर लक्ष दिलंय. खरं तर तिला एकूणच संगीत चांगलं कळतं. ती चांगलं संगीत देऊ  शकते, असं मला वाटतं. त्यासाठी मी तिच्या मागे लागत असतो. पण अजून तरी तिनं त्याकडे गंभीरपणे लक्ष दिलेलं नाही. अभिनयासाठी तुम्हाला बाहेरून येणाऱ्या आमंत्रणाची वाट बघावी लागते. लेखन, दिग्दर्शन, संगीत यांचं तसं नाही. ते तुम्ही स्वत:हून करायचं असतं. ते तिनं केलं पाहिजे, आणि पुढे-मागे कधीतरी करेल असा मला विश्वास वाटतो.’’

दोन कलाकार एका नात्याने बांधले गेल्यानंतर त्यांच्यामध्ये सामान्य माणूस या पातळीवरचं नातं कसं उलगडत जातं? या प्रश्नाला उत्तर देताना अमृताने सांगितलं की, ‘‘आम्ही सतत बोलत असतो. खूप चर्चा होतात. क्रिएटिव्ह चर्चा असतात. त्यामध्ये मग भांडणंही होतात. आम्ही एकमेकांना भरपूर भांडण्याचा आणि नंतर मला एकटं सोड म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे. यातूनच आमचा स्वतंत्रपणे विकासही होतो. आम्ही दोघं आज कितीतरी वर्ष एकमेकांना ओळखतोय. मी तर म्हणेन की संदेशनं मला मोठं होताना पाहिलंय. त्याच्यासमोरच मी घडलेय. माझ्या आयुष्यातले सर्व महत्त्वाचे टप्पे त्याने पाहिलेत. आणि या संपूर्ण काळात तो माझा मित्रच राहिलाय. ‘साठेचं काय करायचं’ या नाटकामध्ये मला नायक निखिल रत्नपारखीला मिठी मारायची होती. त्यावेळी दिग्दर्शक संदेशच होता. आणि तेव्हा मला अजिबात अवघडलेपणा वाटायचा नाही. एकदा नाटक संपल्यानंतर एक आजोबा मला येऊन म्हणाले, ‘नाटक छान आहे. पण तुम्ही त्या नायकाला अशी मिठी मारत जाऊ  नका. तुमच्या नवऱ्याला काय वाटेल?’ मी त्यांना सांगितलं, ‘माझ्या नवऱ्यानेच सांगितलंय मिठी मारायला.’ आजोबा हिरमुसले पण आम्ही खूप हसलो त्यादिवशी. पण एक अभिनेत्री म्हणून मला कधीकधी नायकाबरोबर जवळकीचे प्रसंग साकारायला लागतात. एका चित्रपटाच्या वेळी असा प्रसंग आला. त्यावेळी मला जरा भीती वाटत होती. मग मी संदेशला फोन केला. तर त्याने मलाच समजावलं, ‘त्यात घाबरण्यासारखं काय आहे? एक अभिनेत्री म्हणून कर. लाजून करू नकोस, मोकळेपणाने कर. मग पडद्यावर चांगलं दिसू शकेल’. त्याचा हा जो पाठिंबा असतो तो एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी खूप आवश्यक असतो. माझं कोणतंही काम त्याला कसं वाटतं हे माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. कारण अनेकदा सगळ्यांनी कौतुक केलं तरी माझं काम चांगलं झालं नाही हे तो मला सांगू शकतो. आणि त्यामागची कारणंही सांगतो. आणि हे फक्त माझ्या बाबतीतच नाही, तर कोणाच्या कामाविषयी तो नेहमी खरीच प्रतिक्रिया देतो. अजिबात दुटप्पी वागत नाही. हे क्षेत्र खूप चढउतारांनी भरलेलं आहे. खूप असुरक्षितता असते. अनेक मुली नैराश्यापोटी व्यसनाच्या मार्गाने गेलेल्या मी पाहिल्या आहेत. मी स्वत:देखील फार संतुलित नसते, पण संदेश पूर्णपणे संतुलित आहे. तो खंबीरपणे माझ्या बरोबर असतो. त्यामुळेच असेल पण संदेश माझ्या आयुष्यात नसता तर काय ही कल्पनाही मी करू शकत नाही.’’

संदेश आणि अमृताने बऱ्याच वेळा एकत्र काम केलेलं आहे. ‘‘मी संदेशबरोबर सर्वोत्तम काम करते, असं मला लोक सांगतात. आम्ही केलेलं ‘पुनश्च हनिमून’ माझ्यासाठी फार खास आहे. त्या वेळी, ‘तुम्हाला पाहून तुम्ही खरोखरचे नवरा-बायको आहात हे बाहेरच्या व्यक्तीला कळणारही नाही’ अशी पावती मीरा वेलणकरने दिली होती. ती मला खूप महत्त्वाची वाटते.’’

कुसुमाग्रजांच्या कविता कवी गुलजार यांनी हिंदीमध्ये अनुवादित केल्या, त्यामध्ये अमृताने त्यांना मदत केली. ‘‘गुलजार यांनी प्रेमचंद यांच्या निर्मलावर एक मालिका केली होती. त्यामध्ये अमृताने निर्मलाची भूमिका केली होती. कुसुमाग्रजांच्या कविता समजून घेताना त्यांनी अमृताला बोलावून घेतलं. तिला कवितांचं भान आहे, जगण्याचं भान आहे, शब्दसंपदा उत्तम आहे. तिला जिथे हिंदी शब्द अडत तिथे ती हावभाव करून दाखवत असे. त्याच्यातून त्यांना अर्थ सापडत जाई आणि कवितांचं रूपांतर पुढे जाई.’’ संदेश सांगत होता.

अमृताने दिग्दर्शनही करावं अशी संदेशची अपेक्षा आहे. ‘‘सखाराम बाईंडर’ची डीव्हीडी केली, त्यावेळी मी संदेशला असिस्ट केलं होतं. नंतर, ‘आज्जी’ या शॉर्ट फिल्मसाठी संदेशने मला असिस्ट केलं होतं. खरंतर तो स्वत: दिग्दर्शक असताना त्याने मला असिस्ट करणं ही मोठी गोष्ट होती. पण मी काय करतेय हे त्याला बघायचं होतं, त्यानंतर मी दिग्दर्शन करावं असा त्याचा आग्रह आहे. पण सध्या तरी मी अभिनयाचं क्षेत्र निवडलं आहे, त्याचंच खूप काम आहे. पण पुढे काय करेन ते आतातरी माहिती नाही. संदेश मला त्याच्या अपेक्षा बोलून दाखवत असला तरी त्या माझ्यावर लादत नाही. त्यामुळे मला त्याचं दडपण नसतं. अगदी मी काही लिहिलं तरी त्याला आधी दाखवते. त्यानं काही सूचना केल्या की त्या लेखाची उंची कुठेच्या कुठे जाते.’’

त्यांच्यातल्या या नात्याचं श्रेय देताना अमृता दोघांची निवड करते. ‘‘एक म्हणजे माझ्या सासूबाई. त्यांनी संदेशला खूप चांगले संस्कार दिले आहेत. त्या खूप वेगळ्या धार्मिक वातावरणातून आल्या आहेत. त्यांना स्वत:ला सणांची खूप आवड आहे. मला या सणांच्या वेळा पाळायला जमतातच असं नाही. पण त्या माझ्यासाठी सणासाठी खास केलेला खाऊ  मात्र राखून ठेवतात. दुसरं म्हणजे आम्ही दोघेही मानसोपचार घेतो. माझ्या बाबांना अल्झायमर झाला तेव्हा मी खूप अस्वस्थ असायची. त्यावेळेला मी मानसोपचार घेतले. मला त्याचा फायदा झाल्याचं पाहून संदेशनेही घेतले. त्याचा आमच्या नात्यासाठी खूप फायदा झाला. आपण कितीही कोणाबरोबर तरी जोडलेले गेलो असलो तरी आपलं दु:ख हे आपल्यालाच वागवायचं असतं, दुसरा त्यामध्ये साथ देऊ  शकतो, पण ते दु:ख घेऊ  शकत नाही. हे यातून कळलं. त्यामुळे व्यावसायिक अपयश आलं तर त्यासाठी दुसऱ्याला जबाबदार ठरवायचं हा प्रकार आम्ही करत नाही. खरं तर आपल्याकडे मानसोपचाराविषयी खूप गैरसमज आहेत. पण शरीराला जखमा झाल्यावर आपण उपचार करतोच ना. त्याप्रमाणेच मनालाही उपचारांची गरज असते. त्याकडे चुकीच्या दृष्टीने पाहणं गैर आहे. आम्हाला हे जाणवलं आहेच. आता संदेशही त्यासाठी खूप काम करत आहे.’’ अमृताच्या बोलण्यातला इतका मोकळेपणा हा दोघांच्या नात्यामधून आला आहे असं म्हणता येईल.

प्रामाणिक नातं सर्वाधिक सुंदर असतं याची प्रचीती देणारं संदेश आणि अमृता या नवराबायकोचं घट्ट मैत्रीचं नातं आहे. प्रगल्भ आणि मनोहारी..

निमा पाटील nima_patil@hotmail.com