News Flash

प्रेम, आदर आणि खूप काही

घरच्यांनी जास्त ताणून न धरता लग्नाला परवानगी दिली.

 

पती-पत्नी एकमेकांना पूरक असावेच लागतात. कधी तो पुढे तर कधी ती पुढे, पण नातं मात्र घट्ट जमिनीत रुजलेलं असावं लागतं तरच ती वाट सहज होऊन जाते. पूर्वीच्या तुलनेत आजच्या पती-पत्नीचं नातं हे वेगळं, कसोटी बघणारं आणि म्हणूनच अधिक समजुतीची अपेक्षा धरणारं असतं. एकमेकांबद्दलचा आदर त्यांच्यात प्रेमाची रुजवात करत असतो. तरच ते नातं बहरतं, फुलतं आणि खूप काही घडवतं. हेच सांगणारं हे सदर दर पंधरवडय़ाने. नामवंत पती-पत्नी सांगताहेत ते सर्वार्थाने जोडीदार कसे आहेत त्याविषयी.. आजचा पहिला लेख ‘वीणा वर्ल्ड’च्या संस्थापक वीणा पाटील आणि त्यांना सर्वार्थाने साथ देणारे त्यांचे पती सुधीर पाटील यांच्या नात्याविषयी.

राज्यातल्या पर्यटन व्यवसायाचा विचार करायचा झाला तर तो वीणा पाटील या नावाशिवाय पूर्ण होत नाही. आधी ‘केसरी’ आणि आता ‘वीणा वर्ल्ड’, या कंपन्यांमधून त्यांचा चेहरा परिचयाचा झाला आहे. त्यांच्या या परिचयामागे त्यांचे जोडीदार असणारे सुधीर पाटील यांचाही तितकाच वाटा आहे. अर्थात वीणा पाटील याही तो पाठिंबा मनापासून मान्य करतात.

१९८९ मध्ये वीणा आणि सुधीर विवाहबद्ध झाले तेव्हा वीणा आधीपासून ‘केसरी टूर्स’ या घरच्या कंपनीत वडिलांसोबत काम करत होत्या. ‘‘नातेवाईकांच्या मध्यस्थीने आम्ही भेटलो, पण आमचं अरेंज्ड मॅरेज नाही. मला वीणाच्या कामाबद्दल लग्नाआधीपासून कल्पना होती. तिला घरासाठी पुरेसा वेळ देता येणार नाही, अनेक दिवस बाहेर राहावं लागणार हे मला माहीत होतं, त्याला माझा आक्षेपही नव्हता. पण घरच्यांना मात्र थोडी शंका होती, अशा तऱ्हेनं संसार कसा होणार, असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यामुळे माझ्याकडून लगेचच लग्नासाठी होकार गेला नव्हता. माझ्याकडून होकार का येत नाही याबद्दल वीणाने पिच्छा पुरवला. त्या निमित्तानं बोलणं, भेटणं होत राहिलं. मग आम्ही प्रेमात पडलो आणि लग्नाचा निर्णय घेतला.’’ सुधीर आपल्या लग्नाची गोष्ट सांगतात.

घरच्यांनी जास्त ताणून न धरता लग्नाला परवानगी दिली तरी त्यांना वीणा यांच्या कामाची सवय व्हायला वेळ लागलाच. लग्नानंतर मुलींनी जास्तीत जास्त वेळ नवऱ्याला आणि सासरच्या मंडळींना दिला पाहिजे अशी अपेक्षा असण्याचा तो काळ. मात्र, पर्यटनाचं क्षेत्रच असं होतं की, त्यामध्ये घरासाठी फार वेळ देणं शक्य नसायचं. या गोष्टी लक्षात आल्यानंतर घरातून चांगला पाठिंबा मिळाला. विशेषत: मुलांचा जन्म झाल्यानंतर दोन्हीकडच्या आजी-आजोबांची भक्कम सपोर्ट सिस्टीम तयार झाली. सुरुवातीच्या काळाबद्दल सुधीर म्हणाले, ‘‘वीणाने लहान वयातच कामाला सुरुवात केली. त्यामुळे सुरुवातीला मोठं दिसण्यासाठी ती साडी नेसायची. एरवी शर्टपँटमध्येच असायची. लग्नानंतरची पहिली चार र्वष वीणानं वसईला राहूनच काम केलं. मात्र कामानिमित्त तिला सतत फिरावंच लागायचं, त्याची घरच्यांना काळजी वाटायची. हळूहळू त्यांच्याही ते अंगवळणी पडलं आणि सगळं निवळलं. मी आधी प्लास्टिक सेल्स अ‍ॅण्ड मार्केटिंगमध्ये होतो. त्यासाठी मला बरंच फिरायला लागायचं. लग्नानंतर माझा जॉब सुरूच होता. तो संपल्यानंतर मी ‘केसरी’च्या ऑफिसमध्ये थांबायचो. प्रत्येक टूरवर कुटुंबातील कोणी तरी एक जण आवश्यक असायचा, हा तिथला अलिखित नियम होता. टूर्सपण तशाच लावल्या जायच्या. त्यामुळे अनेकदा घरातले काम करणारे सर्व जण फिरतीवर असायचे, त्यामुळे मग मी ऑफिसचं काम सांभाळायचो. नंतर मी नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. दोन वर्षे ते काम केलं, मग थांबवलं आणि १९९५ पासून पूर्णवेळ ‘केसरी’बरोबर काम करायला लागलो.’’

पर्यटनासारख्या क्षेत्रात काम करताना आणि त्यामध्ये सतत पुढे जाण्याचा विचार करताना भरपूर फिरायला लागणं हा कामाचाच एक भाग बनून गेला. पण वीणा आणि सुधीर या दोघांनाही फारसं एकत्र फिरायला मिळालं नाही. ‘‘कामाच्या स्वरूपामुळे आम्ही दोघेही खूप फिरलो आहोत, पण वेगवेगळे. आम्हाला एकत्र फिरता आलंच नाही. वर्षांतले १०० ते १५० दिवस आम्ही एकमेकांपासून वेगळे, घराबाहेर फिरत असायचो. सुरुवातीच्या काळात तर आम्हाला एकत्र घरात राहायला मिळणं हीच आमची सहल असायची. घरचं अन्न आमच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. आम्हाला फॅमिली हॉलिडेज फार कमी मिळाले आहेत. मुलांच्या सुट्टय़ा आणि पर्यटनाचा हंगाम एकत्रच यायचे. पण इच्छा असूनही मुलांना घेऊन बाहेर जायला फारसे जमले नाही. अशा वेळी मुले कधी तरी आजोबा, केसरी पाटील यांच्याबरोबर टूरला जायची. आम्ही कधी तरी ऑफ सीझनला एकत्र बाहेर जायचो.’’ सुधीर यांच्या बोलण्यात किंचितशी खंत असली तरी काहीसं समाधानही होतं.

अनके वर्षे ‘केसरी टूर्स’ म्हणजे वीणा पाटील असं चित्र पर्यटकांमध्ये निर्माण झालं होतं. मात्र साधारण अडीच-तीन वर्षांपूर्वी वीणा पाटील ‘केसरी’मधून बाहेर पडणार अशा बातम्या यायला लागल्या. त्याची खूप चर्चाही झाली. त्याबद्दल सुधीर म्हणाले, ‘‘चर्चा होणं स्वाभाविकच होतं. ‘केसरी’पासून वेगळं होण्याचा निर्णय अतिशय कठीण होता. पण आमची मानसिकता झाली होती. निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीचे तीन दिवस आमच्यासाठी भावनिकदृष्टय़ा कठीण होते. त्यानंतर आम्ही रिलॅक्स झालो. अडीच वर्षांपूर्वी ‘वीणा वर्ल्ड’ सुरू केले तेव्हा आम्हाला अनेक बहुराष्ट्रीय पर्यटक कंपन्यांबरोबर स्पर्धा करावी लागणार होती. पण आपण हे करू शकू याबद्दल पुरेपूर आत्मविश्वास होता. आम्ही एक गोष्ट अगदी ठरवलीच होती की अजिबात नकारात्मक विचार करायचा नाही, की नकारात्मक कामही करायचं नाही. ही पक्की खूणगाठ बांधल्यामुळे आम्ही शांतपणे झोपू शकलो. दुसऱ्याचं कधीच वाईट चिंतायचं नाही हा आमचा प्लस पॉइंट आहे. त्या वेळी वीणा अतिशय संतुलित पद्धतीने विचार करत होती आणि तिचा फोकसही कधी हटला नाही. आता आणखी मोठी झेप घेण्याची स्वप्नं आहेत. त्यासाठी मोठय़ा योजना आहेत आणि ती नक्की पार पाडेल याचा मला विश्वास आहे.’’

पती-पत्नी एकाच क्षेत्रात काम करत असताना, पत्नी जास्त यशस्वी झाल्यानंतर पतीचा पुरुषी अहंकार दुखावण्याची भीती कायम असते. यामुळे एक तर व्यावसायिक संबंध कडवट होऊ  शकतात किंवा नात्यामध्ये दुरावा येऊ  शकतो. या सर्व काळात वीणा पाटील हेच नाव पुढे राहिले याची खंत वाटते का, या प्रश्नावर सुधीर पाटील यांनी ठामपणे नकार दिला. त्यामागे त्यांचं साधं तर्कशास्त्र आहे. ‘‘केसरी टूर्समध्ये आधी केसरीभाऊंचं नाव होतं, मग १९८४ पासून वीणाचं नाव झालं. आमच्या कामाचा पायाही तिनेच रचलाय. ग्राहकांना तिचाच चेहरा ओळखीचा आहे. आताही ‘वीणा वर्ल्ड’चा चेहरा तीच आहे आणि आम्हाला तिचा अभिमान आहे. आमच्यामध्ये खूप चांगली सिनर्जी, समन्वय आहे, त्यामुळे अहंकाराचा प्रश्न येत नाहीत. आम्ही एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करीत नाही. एकमेकांच्या कामात नाक खुपसलं की प्रश्न निर्माण होतात, ते आम्ही टाळतो. आता आमचा मुलगा नील हादेखील या व्यवसायात उतरला आहे. तो आयटी आणि सोशल मीडिया हाताळतो.’’

‘‘वीणाने स्वत:ला संपूर्णपणे पर्यटन व्यवसायात झोकून दिलं आहे. तिला मोठे धोके पत्करायची सवय आहे, तसेच तिची निर्णयक्षमताही खूप चांगली आहे. तिच्या कामाचं स्वरूप पहिल्यापासून फार कठीण होतं. ती पटकन हायपरही होते, पण माझा स्वभाव शांत, रिलॅक्स्ड आहे. त्यामुळे कधी मतभेद झाले तरी ठिणग्या उडत नाहीत. अनेकदा तिचा पारा चढल्यानंतर मलाच बफर म्हणून काम करावं लागतं. कठीण प्रसंगामध्ये ती कधीच मागे हटत नाही. ती नेहमीच सर्वात पुढे राहून आल्या प्रसंगाला तोंड देत असते. तिचं यामागचं गणित अगदी साधं सोपं आहे- आपण कधी कोणाचं वाईट करत नाही, वाईट चिंतत नाही, मग आपण कशाला घाबरायचं? वीणाच्या या स्वभावामुळेच मी आणखी शांत झालोय. ती खूप पद्धतशीरपणे काम करते. व्यवसायातील सर्व मोठे निर्णय ती घेते, मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी ती हाताळते. त्याची आम्ही अंमलबजावणी करतो. आता आमच्याकडे मनुष्यबळ चांगले आहे, त्यामुळे आम्ही सात-साडेसातपर्यंत घरी जाऊ  शकतो. यापूर्वी आम्हाला घरी जाता जाता दहा-अकरा वाजून जायचे. आता मात्र आम्ही स्वत:साठी थोडा वेळ काढतो. सिनेमांना जातो, डिनरला जातो. याबरोबर व्यवसायाशी निगडित वाचन सुरूच असतं. आम्ही सकाळी पाच वाजताच उठतो. मी बॅडमिंटन खेळायला जातो, ती दोन तास लिखाण करते. त्यात तिचे स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, आर्टिकलचे काम सुरू असते. अशा वेळेला आम्हाला अनेक कल्पना सुचल्या आहेत. एकदा आम्हाला पैशांची अडचण होती, त्या वेळी सकाळी सव्वापाच वाजता आम्हाला समस्येतून बाहेर काढणारी कल्पना सुचली होती.’’

पत्नीच्या कामाचं मोकळेपणानं कौतुक असणं, त्याचा अभिमान वाटणं या बाबी वाटतात तितक्या सोप्या नाहीत. मनाचा हा उमदेपणा अंगभूत असला तरी त्याला पूरक वातावरणही असावं लागतं. त्याबाबत सुधीर सांगतात, ‘‘आमच्या घरी पहिल्यापासून मोकळं वातावरण होतं. वडील शिक्षक होते. आम्ही आदिवासी भागात शिकलो. १९६८ ते १९७३ या कालावधीमध्ये आमच्याकडे संयुक्त राष्ट्रांच्या युनिसेफ एक्सचेंज प्रोग्रामअंतर्गत अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया इथले विद्यार्थी राहायला असायचे. त्यामुळे आपोआपच एका खुल्या संस्कृतीची सवय झाली. आमच्यावर कोणावरही कुठलीच गोष्ट लादली जायची नाही, कसलीही बंधनं नव्हती. शिवाय अशा विद्यार्थ्यांना जवळून पाहिल्यामुळे आम्हाला मुळातच कधी पाश्चिमात्यांचं आकर्षण वाटलं नाही. त्याचा परिणाम कुठे तरी आमच्या कामातही झालाच.’’

वीणा पाटील या बाजूकडे काहीशा वेगळ्या पद्धतीने पाहतात. ‘‘सुधीरमुळे मी आयुष्यात बिनधास्त असते. त्याच्याकडून मला कायम भावनिक, मानसिक आधार मिळत असतो. सुधीर आहे तसा नसता तर मानसिक क्लेश झाला असता. मग माझ्यासमोर व्यवसाय मोडून संसार किंवा संसार मोडून व्यवसाय यापैकी एक पर्याय राहिला असता, पण त्याचा पुरुषी अहंकार कधी आडवा आला नाही, त्यामुळे माझ्यावर अशी वेळ आली नाही. माझ्यासाठी सुधीर म्हणजे एक निवांत होण्याची जागा आहे. मी कितीही कंपनीचा चेहरा असले तरी मी त्याच्या मागे मागे फिरत असते. माझ्या माणसांशिवाय मी शून्य आहे. सुधीर नसता तर आयुष्य प्रतिकूल झालं असतं. सुधीरचं नाव वीणापेक्षा कमी झालं, खरं तर ते जास्त व्हायला हवं होतं. पण त्याला प्रसिद्धीची हाव नाही. मागे राहून काम करायला त्याला आवडतं. जगभरातल्या सप्लायर्सशी सुधीरचे खूप चांगले संबंध आहेत. त्याचा ‘वीणा वर्ल्ड’साठी खूप फायदा झाला आहे. नात्यांमध्ये स्त्री पुरुष एकत्र पुढे जातात. त्यापैकी एक जण पुढे जातोय, दुसरा मागे राहतोय असा विचार कधी केलाच नाही. असा प्रश्न पडला असता तर आम्ही पुढे जाऊ  शकलो नसतो. आम्हाला एकमेकांसाठी फार वेळ देता येत नाही हे तर आहेच, त्यामुळे ऑफिसला एकत्र जातो-येतो हेही पुरेसं भाग्याचं वाटतं. एकत्र राहता न येणं हे दोघंही एका ध्येयानं प्रेरित असल्यामुळे. त्यामुळे नुसतं भेटलं, बोललं तरी पुरे असतं.’’

लग्नाआधीपासूनच आपला वैवाहिक प्रवास, नेमका कसा आहे, कसं असणार आहे, हे स्वच्छ, स्पष्ट असलं की आयुष्य सहज एकमेकांच्या विश्वासावर पुढे जात राहातं. वीणा आणि सुधीर पाटील यांनी तेच तर सिद्ध केलंय.

निमा पाटील

nima_patil@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 1:06 am

Web Title: article on husband wife relationship
Next Stories
1 उद्योजिका घडताना..
2 खाद्यग्रंथांतील संस्कृती
3 चाकोरीपलीकडे
Just Now!
X