News Flash

जोडीदार मित्र

लग्नानंतरचा काळ अंजलीच्या आयुष्यात अगदी झंझावाती होता असंच म्हणावं लागेल.

 

‘‘अंजली तिच्या क्षेत्रात प्रवीण होती. तिचं तिच्या खेळाकडे दुर्लक्ष झालं असतं तर देशाचं पदक कमी होणार होतं. त्यामुळे अंजलीचं करिअर माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. मला माझ्या कामाकडे लक्ष देता आलं नाही, तर वडील माझा व्यवसाय सांभाळायचे,’’ असं सांगत प्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत हिचा जोडीदार मंदार भागवतने तिचं करिअर उत्तमपणे सांभाळलं. पती-पत्नी खऱ्या अर्थाने एकमेकांचे मित्र झाले की वैवाहिक आयुष्य सोपं होतंच, पण व्यक्तिमत्त्वाचा विकासही उत्तम होऊ  शकतो याचे हे उत्तम उदाहरण.

क्रिकेट सोडून इतरही काही खेळ या जगात खेळले जातात याची १९९०च्या दशकामध्ये सर्वसामान्य भारतीयांना जाणीव व्हायला लागली. नेमबाजी हा त्यापैकीच एक खेळ. ९०च्या उत्तरार्धात भारतीय नेमबाजीला एक चेहरा मिळाला होता- अंजली वेदपाठक-भागवतचा. अंजलीची नेमबाजीमधली कारकीर्द जितकी उत्तम आहे, तितक्याच भक्कमपणे तिच्या बरोबर उभा राहिला तिच्या जीवनातला जोडीदार मंदार भागवत.

जानेवारी २००० मध्ये अंजली आणि मंदार पारंपरिक पद्धतीने एकमेकांना भेटले आणि त्याच वर्षी डिसेंबरमध्ये दोघं विवाहबद्ध झाले. ‘‘ते वर्ष होतं १९९९, डिसेंबरचा महिना होता,’’ अंजली सांगते. ‘‘एका आठवडय़ाच्या अंतराने आम्ही तीन वेळा भेटलो, तिसऱ्या भेटीमध्ये लग्नाला होकार कळवला. त्या दिवशी मी मंदारच्या आई-वडिलांना भेटायला गेले होते. तिथूनच मी थेट एअरपोर्टला गेले. पुढचा दीड महिना मी युरोपच्या टूरवर असणार होते. त्या टूरवरून परत आले तेव्हा गंमत झाली. मधल्या काळात मी मंदारचा चेहरा जवळपास विसरले होते. माझ्याकडे त्याचा फोटोही नव्हता. त्यामुळे परत आल्यानंतर भेटल्यावर ओळखायचं कसं हा अडचणीचा प्रश्न होता. मग मी माझ्या आईला सांगितलं, तू त्याच्या शेजारी उजव्या बाजूला उभी राहा, म्हणजे मी त्याला बरोबर ओळखेन.’’

लग्नानंतरचा काळ अंजलीच्या आयुष्यात अगदी झंझावाती होता असंच म्हणावं लागेल. ‘‘खूप स्पर्धा, वाढता मीडिया संपर्क, भरपूर कष्ट आणि प्रयत्न, असे ते दिवस होते. खूप ‘डिमांडिंग’ काळ होता.’’ मंदारनं तेव्हाचा काळ डोळ्यासमोर उभा केला. ‘‘तेव्हा कठीण प्रसंग येणं आणि त्यांचा सामना करत पुढे जाणं हे नित्यनियमाचं झालं होतं. लग्नाच्या आधीच तसे प्रसंग घडले होते. आमचं लग्न सिडनी ऑलिम्पिकनंतर झालं. ती स्पर्धा ऑगस्ट २००० मध्ये झाली होती. त्या वेळी अंजलीचा पासपोर्ट पाठवायला उशीर झाला होता. त्या स्पर्धेसाठी लागणाऱ्या बंदुकीच्या गोळ्या खर्चीक होत्याच, पण अंजलीला त्या बरोबर नेण्याची परवानगीदेखील मिळाली नव्हती. त्यामुळे अंजली त्यांच्याशिवायच स्पर्धेला गेली होती.’’

खेळांसाठी सरकारी पातळीवरची उदासीनता, बेफिकिरी, अज्ञान या गोष्टी अंजलीसाठी नवीन नव्हत्या. ‘‘या मुलीला परदेशी खेळायला जायचंय तर बंदुकीच्या गोळ्या कशाला हव्यात, असा प्रश्न त्या सरकारी कर्मचाऱ्यांना पडला होता,’’ अंजली सांगते. वास्तविक ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली अंजली ही पहिलीच भारतीय नेमबाज होती; पण त्याचं महत्त्व ना त्या सरकारी बाबूच्या लक्षात आलं ना त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या.

सोयीसुविधांच्या बाबतीत भारतीय नेमबाजी आंतरराष्ट्रीय दर्जापेक्षा खूप मागे होती. ऑलिम्पिक स्पर्धेत अंजली फायनलपर्यंत पोहोचली होती, पण पदक बरंच दूर राहात होतं. त्यानंतरही अंजली अनेक स्पर्धामध्ये खेळत तर होती; पण हवं तसं यश मिळत नव्हतं. अगदी अंतिम स्पर्धेशेवटपर्यंत पोहोचल्यानंतर ती मागे पडत होती. याबद्दल मंदार सांगतो, ‘‘मला खेळातलं काही कळत नव्हतं, पण मी माझी इंजिनीअिरगची बुद्धी वापरली. काटेकोरपणे अंजलीच्या खेळाचं विश्लेषण करायला सुरुवात केली. काय चुकत असेल, याचा अंदाज घेतला. तिच्या खेळाचे फोटो, व्हिडीओ मी काढून ठेवायचो. त्यामुळे तिच्या काय चुका होत आहेत, शैली थोडी बदलली पाहिजे का, रायफल धरण्यात काही चूक होते आहे, त्याचे अँगल्स बदलता येतील का, अशा प्रकारचं विश्लेषण सुरू झालं. मी कधीकधी तिच्याबरोबर स्पर्धाना जायचो, त्या वेळी परदेशी स्पर्धकांचं निरीक्षण, त्यांचा सराव, त्यांना मिळणारी सपोर्ट सिस्टम, त्यांचा आहार, या सगळ्या गोष्टी बघायचो. निरनिराळ्या लोकांशी सतत चर्चा सुरू असायची. त्यामुळे खेळ संपूर्ण कळला नाही तरी त्यातलं लॉजिक कळायला लागलं.’’ अंजलीचे फोन, पत्रव्यवहार या गोष्टीही नंतर मंदारच बघू लागला. अंजलीनं फक्त तिच्या खेळावर लक्ष केंद्रित करावं हा त्यामागचा हेतू होता. हळूहळू मंदार तिची प्रॅक्टिस रेंज तयार ठेवायलाही शिकला.

मंदारचं सोबत असणं किती महत्त्वाचं होतं, हे सांगताना अंजलीनं एका नेमबाजाच्या दैनंदिन आयुष्यावर आणखी प्रकाश टाकला. ‘‘आमचा स्पर्धेसाठी लागणारा जामानिमा वजनी असतो आणि खर्चीकदेखील. जॅकेट्स, ग्लोव्हज यापैकी काहीही भारतामध्ये तयार होत नव्हतं. ते परदेशातून मागवायला लागायचं. ते कस्टमच्या तावडीतून सोडवण्यासाठी धावपळ करावी लागायची, कारण कस्टमच्या अधिकाऱ्यांनाही हे काय आहे ते माहीत नसायचं. ते त्यांना समजावून सांगण्यात बराच वेळ खर्ची पडायचा. इतर पुढारलेल्या देशांमध्ये अशी परिस्थिती नव्हती. त्यांच्या खेळाडूंसाठी खूप सोयीसुविधा असतात. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये एकेका खेळाडूबरोबर एक कोच, एक मॅनेजर, एक डाएटिशियन अशी फौज असायची. ते पाहून आम्ही तोंडात बोटं घालायचो. माझ्यासाठी मंदारच सगळीकडे धावपळ करायचा. त्यामुळे एक मात्र झालं, मला खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करता यायचं.’’

ही भारतातल्या एकविसाव्या शतकाची सुरुवात होती. आतासारखा मोबाइलचा सुळसुळाट झाला नव्हता. मंदार सांगतो, ‘‘तेव्हा आमच्याकडे मोबाइल फोन नव्हता. दिवसभर सतत फोन सुरू असायचे. अनेकदा असं व्हायचं की, स्पर्धा किंवा सरावाच्या अक्षरश: ४-५ दिवस आधी फेडरेशन / असोसिएशनचे फोन यायचे. एकदा सकाळी सकाळीच फोन आला, होंडा इंडियाच्या अध्यक्षांचा. त्यांनी एका वृत्तपत्रामध्ये अंजलीची एक मुलाखत वाचली होती, अंजलीला घरून प्रॅक्टिससाठी जाताना प्रवासाचा किती त्रास होतो त्याचा उल्लेख तिने त्यामध्ये केला होता. ती मुलाखत वाचून होंडा इंडियाच्या अध्यक्षांनी आम्हाला फोन केला. ते एकाच दिवसासाठी मुंबईत होते, पण त्यांनी आमची भेट घेतली आणि तिला एक होंडा कार भेट दिली. हा एक सुखद धक्काच होता.’’

कधी कधी मंदार अंजलीबरोबर तिच्या स्पर्धेला जायचा. मात्र, त्यामुळे शिस्त बिघडू नये याकडे कटाक्ष असायचा. मॅचनंतर काही वेळ मिळायचा, तो एकत्र घालवायचा. सरावाचं वेळापत्रक मात्र काटेकोरपणे पाळायचं. त्यामध्ये काही अडथळे येऊ नयेत याला प्रथम प्राधान्य. अंजलीला मदत करताना मंदार तिच्या स्पर्धक-सहकाऱ्यांसाठीसुद्धा मदतीचा हात पुढे करायचा. हीच सवय इतर स्पर्धकांच्या पतींनाही होती. मंदार सांगतो, ‘‘अनेकदा आम्ही एकमेकांना फोन करून या स्पर्धेच्या वेळी कोण जाणार आहे ते ठरवून घ्यायचो, कारण या नेमबाजांना मदतीची गरज असतेच. त्यांचं किट खूप जड असायचं. सगळं मिळून जवळपास ३० किलोच्या आसपास वजन असतं. ते उचलणं, स्पर्धेच्या पुढच्या ठिकाणची तयारी करणं, रेंज तयार करून ठेवणं याकडे मी लक्ष द्ययचो.’’ नेमबाजीसारख्या एका केसाच्या अंतरानं गुण ठरवणाऱ्या खेळात खेळाडूसाठी चित्त एकाग्र करणं किती महत्त्वाचं असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्यामुळेच मंदार सोबत असणं अंजलीसाठी अतिशय महत्त्वाचं असायचं.

मंदारचा स्वत:चा व्यवसाय असल्याने प्रत्येक वेळी अंजलीबरोबर जाणं त्याला शक्य नव्हतं; पण असेही प्रसंग घडले की, या क्षणी मंदार आपल्यासोबत का नाही, असं अंजलीला तीव्रपणे वाटलं. २००२ मध्ये म्युनिचमध्ये प्रतिष्ठेची वर्ल्ड कप फायनल स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये वर्ल्ड कपमधील विजेते सहभागी होतात. त्यामध्ये भाग घेण्यासाठी अंजली गेली होती. त्या वेळी पहिल्यांदाच तिचे पहिले कोच संजय चक्रवर्ती तिच्यासोबत होते. त्यांचा तो पहिलाच परदेश दौरा होता. सर्व मिळून ४-५ दिवसांचा दौरा होता. फ्रँकफर्ट मार्गाने हा प्रवास होता. मात्र, नको ते घडलं आणि विमान प्रवासादरम्यान अंजलीचा पासपोर्ट चोरीला गेला. गुरुवारी अंजली तिथे पोहोचली आणि शनिवारी स्पर्धा होती. शुक्रवारचा दिवस सरावासाठी होता. विमानतळावर इमिग्रेशनच्या आधी पासपोर्ट चोरीला गेल्याचं लक्षात आल्यानंतर अंजलीला ब्रह्मांड आठवलं. तिने मंदारला फोन केला, रडत रडतच त्याला घटना सांगितली. मग मंदारची दूतावासामार्फत धावपळ सुरू झाली. इकडे दुसऱ्या दिवशी अंजलीनं पोलीस स्टेशन गाठलं. त्या जर्मन अधिकाऱ्याला अंजली इंग्रजीमधून काय म्हणतेय ते समजत नव्हतं; पण एक गोष्ट चांगली होती. त्या अधिकाऱ्याचा सासरा भारतामध्ये होता. अधिकाऱ्याने स्वत:च्या सासऱ्याला फोन केला. अंजलीनं त्यांना सर्व प्रसंग सांगितला, त्यांनी मग जावयाला म्हणजे त्या पोलीस अधिकाऱ्याला काय घडलं ते सांगितलं. त्या अधिकाऱ्यानं मग अंजलीला तात्पुरतं प्रमाणपत्रं दिलं. पुढची वारी होती भारतीय दूतावासाची. अंजली तिथे पोहोचली तेव्हा योगायोगानं तिथला अधिकारी वृत्तपत्रामध्ये छापून आलेली अंजलीची बातमीच वाचत होता. त्याला अंजलीनं सर्व घडलेला प्रकार सांगितला. सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्या अधिकाऱ्यानं दुसऱ्या दिवशी शनिवार असूनही खास अंजलीसाठी दूतावास उघडला आणि तिला तात्पुरता पासपोर्ट दिला. विशेष म्हणजे त्या स्पर्धेत अंजलीनं रौप्य पदक जिंकलं. त्याशिवाय याच स्पर्धेनंतर लगेचच झालेल्या ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन’ स्पर्धेतही विजेतेपद पटकावलं. तिकडे अंजली या सर्व भावनिक चढउतारांतून जात असताना इकडे मंदारचं लक्ष तिच्या स्पर्धेकडंच लागलं होतं. ‘‘तेव्हा मी एका कार्यक्रमासाठी षण्मुखानंद हॉलमध्ये होतो आणि माझ्या शेजारी भीष्मराज बाम होते. माझ्याकडे मोबाइल नव्हता, पण बाम सरांकडे होता. स्पर्धेत काय होणार याची उत्सुकता आम्हा दोघांनाही होती. विशेषत: गेल्या दोन दिवसांत जे काही घडलं होतं, त्यामुळे मला जास्तच. अखेर वर्ल्ड कप फायनलमध्ये रौप्यपदक जिंकल्याचा मेसेज अंजलीने बाम सरांच्या मोबाइलवर पाठवला आणि ४० मिनिटांनी ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन’ झाल्याचाही मेसेज पाठवला.’’

करिअरदरम्यान अंजलीला नातेवाईक, कुटुंब यांच्यासाठी पुरेसा वेळ काढता आला नाही हे ओघानं आलंच. अंजलीचं कुटुंब मोठं होतं. आत्या, काका, मामा, मावश्या असा भरपूर मोठा गोतावळा. गणपतीच्या दिवसांत आमच्या घरी ५० माणसं असायची. कौटुंबिक सण-समारंभांना अनेकदा हजर राहता येत नाही; पण शक्य असेल तेव्हा अंजली जायची. मंदार मात्र न चुकता सर्व कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावतो.

नातेवाईक सांभाळायला मंदारनं नेहमीच महत्त्व दिलं. अनेकदा परदेशात असताना सणांचे दिवस असले तर अंजली आवर्जून उपास, पूजा करायची. माहेरी या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे अंजलीला त्या गोष्टी करायला आवडायचं. मात्र अंजलीनं उपास करू नयेत, आपलं डाएट सांभाळावं, असा मंदारचा आग्रह असायचा. माहेरी नातेवाईकांचा प्रचंड गोतावळा असताना अंजलीच्या सासरी मात्र लहानसं कुटुंब. मंदार, सासू-सासरे, दीर. मंदार सांगतो, ‘‘माझे आईवडील आधुनिक विचारांचे. १९६६ मध्ये त्यांचा प्रेमविवाह झाला होता. माझा धाकटा भाऊ  आर्मीमध्ये होता, मी इंजिनीअिरगनंतर स्वत:चा व्यवसाय करत होतो. अशा वेळी अंजलीचं स्थळ आलं तेव्हा सूनदेखील काही तरी वेगळं करणारी आहे याचा आनंद घरच्यांना होता. मलाही ९ ते ५ नोकरी करणारी बायको नको होती. नेमबाज म्हणून अंजलीचं करिअर उत्तम आहे म्हटल्यावर घरात सगळेच खूष होते.’’ मंदारबरोबरच अंजलीला सासू-सासरे, दीर, जाऊ  यांचाही खूप चांगला पाठिंबा मिळाला. ‘‘घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय मला काहीही करणं शक्य नव्हतं. दोन्ही घरचे लोक पाठीशी उभे राहिल्यामुळेच मी भक्कमपणे पुढची वाटचाल करू शकले.’’ अंजलीनं दोन्हीकडच्या कुटुंबीयांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

पण मंदारला मात्र यात आपण विशेष काही केलं असं वाटतच नाही. ‘‘माझ्यासाठी अंजलीचं करिअर म्हणजे स्वत:च्या व्यवसायातून ‘पॉझिटिव्ह डायव्हर्जन’ होतं. माझं व्यावसायिक आयुष्य फारच एकसुरी होतं. शिवाय मी काही टाटा-बिर्ला होऊ  शकणार नव्हतो. माझं व्यवसायाकडं दुर्लक्ष झालं असतं तरी चाललं असतं; पण अंजली तिच्या क्षेत्रात प्रवीण होती. तिचं तिच्या खेळाकडे दुर्लक्ष झालं असतं तर देशाचं पदक कमी होणार होतं. त्यामुळे अंजलीचं करिअर माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. शिवाय घरातूनही पाठिंबा होता. मला माझ्या कामाकडे लक्ष देता आलं नाही तर वडील माझा व्यवसाय सांभाळायचे. पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनातले नेहमीचे चढउतार आमच्या आयुष्यात आले नाहीत. त्यासाठी वेळच नव्हता. आपण तिला पाठिंबा देतोय किंवा काही खास करतोय किंवा तिच्यासाठी काही करतोय असा विचार कधी केला नाही, किंबहुना त्या पद्धतीनं कधी तिकडे पाहिलंच नाही. रोजचा दिवस नवा, रोजची आव्हानं नवी. हा सर्व प्रवास आम्ही खऱ्या अर्थाने आनंदानं केला. तो काळ इतका मस्त होता की, बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक होत्या. त्या क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष दिलं नाही.’’

पती-पत्नी खऱ्या अर्थाने एकमेकांचे चांगले मित्र झाले की वैवाहिक आयुष्य सोपं होतंच, पण व्यक्तिमत्त्वाचा विकासही किती उत्तम होऊ  शकतो हे नेमक्या शब्दांमध्ये मंदारच्या बोलण्यातून समोर येतं. म्हणूनच या चांगल्या मित्रांचे साहचर्य अंजलीसारख्या खेळाडूंसाठी आणि त्यांच्या पतींसाठी एक आदर्श आहे.

निमा पाटील – nima_patil@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2017 2:11 am

Web Title: indian shooter anjali bhagwat and husband mandar bhagwat
Next Stories
1  नवरेपणाचा मुखवटा नकोच
2 सर्जनशील सोबत
3 सामंजस्य जगण्यातलं
Just Now!
X