News Flash

सामाजिक दायित्व

‘‘मुक्ता आणि मी एकमेकांना लहानपणापासून ओळखत होतो

‘मुक्तांगण’ची जबाबदारी स्वीकारलेल्या मुक्ताचे पती आशीष पुणतांबेकर एका नावाजलेल्या अमेरिकी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये संचालक आहेत. दोघेही वेगवेगळे विचार असलेल्या घरांतून आलेले असले तरी दोघांच्याही घरात काही विशिष्ट मूल्यांना महत्त्व होतं. त्यामुळे फारसं अपरिचित न वाटता त्यांचं मैत्र फुललं आणि तितक्याच मुक्त वातावरणात संसारही आणि त्यातूनच सामाजिक दायित्वाचं दालन बहरत गेलं..

‘‘मुक्ता आणि मी एकमेकांना लहानपणापासून ओळखत होतो, त्याहीपेक्षा आमचे आईवडील एकमेकांचे चांगले मित्र होते. माझे मामा माधव काळे आणि अनिल अवचट हे महाविद्यालयांमधील एकमेकांचे खास मित्र, तर माझी आई चित्रा काळे आणि अनिल अवचट हे पहिलीपासून एकत्र होते. दोन्ही कुटुंबांचे इतके चांगले संबंध असल्यामुळे आमची ओळख होतीच. माझं शालेय शिक्षण मुंबईत झालं. पुढे इंजिनीअिरग करण्यासाठी मी पुण्याला आलो तेव्हा मुक्ताशी मैत्री वाढली. आम्ही वेगवेगळ्या वातावरणात वाढलो होतो. म्हणजे मी साध्यासुध्या घरातला. बारावीनंतर इंजिनीअिरग करायचं, चांगली नोकरी बघायची आणि सेटल व्हायचं असं साधारण आयुष्य ठरवून घेतलं होतं. त्याउलट मुक्ताचं विश्वच वेगळं होतं. ती धाडसी होती. मित्र-मैत्रिणींबरोबर ट्रेकिंगला जायची, साप पकडायला जायची. तिच्या वाढदिवसाला ४० मित्र-मैत्रिणी असायचे, जणू काही जत्राच भरायची. या सगळ्यात मी आपला बुजलेला असायचो. मात्र माझे आई-वडील सुशिक्षित होते, घरातलं वातावरणही उदारमतवादी होतं, आम्हा दोघांच्याही घरात काही विशिष्ट मूल्यांना महत्त्व होतं. त्यामुळे मुक्ताच्या घरात मला फार अपरिचित वाटायचं नाही,’’ ‘मुक्तांगण’ची जबाबदारी स्वीकारलेल्या मुक्ताचे पती आशीष पुणतांबेकर एका नावाजलेल्या अमेरिकी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये संचालक आहेत, ते सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगत होते.

दोघांची मैत्री वाढत होती, ‘‘तेव्हा मुक्ता क्लिनिकल सायकॉलॉजी शिकत होती. ती खूप हुशार होती. अनेकदा तिला अभ्यासासाठी निरनिराळ्या टेस्ट्स करायच्या असत. म्हणजे ईक्यू शोधा, अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट करा. त्या वेळी ती हे प्रयोग माझ्यावर करायची. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी अंधेरीला ‘सीप्झ’मध्ये नोकरीसाठी गेलो. मुक्ताला मुंबईला यायचं नव्हतं आणि आम्ही आता पुढील आयुष्य एकत्रच काढणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मग मीच पुण्याला शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. ही नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीची गोष्ट आहे. तेव्हा आयटी जोरात होतं. मला चांगल्या नोकऱ्या मिळत होत्या. परदेशातही भरपूर जायला लागायचं. हळूहळू आम्ही सेटल होत गेलो.’’ आशीष सांगतो. मुक्ता आणि आशीष यांचा विवाह १९९४च्या फेब्रुवारी महिन्यात झाला. ‘‘मी ९३ मध्ये क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये एमए पूर्ण केलं. त्यामध्ये सुवर्णपदक मिळालं होतं. लग्नाच्या वेळी माझं वय २३ र्वष होतं, तर आशीष २५ वर्षांचा होता. लग्नानंतरचे दोन महिने स्वत:साठी ठेवल्यानंतर मी मे ९४ पासून ‘मुक्तांगण’चं काम सुरू केलं. त्यापूर्वी फग्र्युसन कॉलेजमध्ये काही महिने शिकवण्याचं काम केलं होतं. खरं तर त्या वेळी पीएच.डी. करून संशोधन क्षेत्रामध्ये जायचं, प्राध्यापकी करायची अशा एका ठरावीक वाटेचा मी विचार करत होते. अभ्यासाचा एक भाग म्हणून मी नियमितपणे ‘मुक्तांगण’मध्ये जायला लागले. तिथे काम करताना त्यामध्येच जास्त रस वाटायला लागला. मग काम करता करता पुढील शिक्षणाचा विचार मागे पडला. पीएच.डी. पूर्ण केलंच नाही,’’ मुक्ता सांगते.

डॉक्टरी क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यात सतत कार्यरत असणाऱ्या सुनंदा अवचट आणि अनिल अवचट या जोडप्याची वेगळी ओळख करून द्यायची गरजच नाही. व्यसनाच्या आहारी जाऊन स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबाला देशोधडीला लावणाऱ्यांना पुन्हा माणसात आणण्यासाठी त्यांनी १९८६ मध्ये ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र’ सुरू केलं, त्या वेळी भारतामधला तो अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग होता. ‘मुक्तांगण’चं काम मुख्यत: सुनंदा अवचट सांभाळायच्या. मात्र काहीच वर्षांनी म्हणजे १९९३ मध्ये त्यांना कर्करोगाचं निदान झालं. तरीही पुढची चार र्वष त्या तितक्याच उत्साहाने आणि आपुलकीने ‘मुक्तांगण’मध्ये काम करत होत्या. अशा वातावरणातल्या मुक्तालाही सामाजिक जाण विकसित करण्यासाठी फारसे कष्ट करावे लागले नाहीत. मुक्ता सांगते की, ‘‘मी सुरुवात केली ती प्रामुख्याने प्रशासकीय कामापासून. आईला प्रशासकीय कामाचा कंटाळा यायचा. तिला रुग्णांना बरं करण्यातच रस असायचा. मी फ्रेश होते आणि सवयही होती, त्यामुळे मग मी पत्रव्यवहार, कागदपत्रं, नोंदी, अहवाल यांची जबाबदारी घेतली. हे काम मला आवडायचं. हळूहळू मग मी रुग्णांबरोबर काम सुरू केलं.’’

‘मुक्तांगण’चं काम जितकं प्रेरणादायी आणि महत्त्वाचं आहे, तितकंच ते कठीणही आहे. एखाद्या कामाची माहिती असणं आणि ते काम स्वत: किंवा जोडीदाराने करणं यात नक्कीच फरक असतो. त्या वेळी त्याची तयारी कशी केली, या प्रश्नाचं उत्तर देताना आशीष सांगतो की, ‘‘मुक्ताने पूर्ण वेळ ‘मुक्तांगण’बरोबर काम सुरू केलं तेव्हा तिला मोठय़ा प्रमाणात पुरुषांबरोबर काम करावं लागणार होतं. पण मला त्याची फारशी चिंता नव्हती. कारण मी आधी सुनंदाआईला काम करताना जवळून पाहिलं होतं. ती ज्या पद्धतीने रुग्णांना सांभाळायची ते पाहून मला कधीही त्या रुग्णांची भीती वाटली नाही. रुग्ण कितीही व्यसनी असले, एखादा कोणी हिंसक होत असेल तरी परिस्थिती हाताबाहेर जायची नाही. आता तिथे सध्या १५० खाटांचं पुरुषांचं रुग्णालय आहे आणि १५ खाटांचं स्त्रियांचं रुग्णालय आहे. गेल्या सात-आठ वर्षांमध्ये मुक्तानं ६० जणांची चांगली टीम उभी केली आहे. त्यामुळे ती प्रत्यक्ष तिथे नसली तरी तिच्यावाचून काम अडत नाही. ती अनेक ठिकाणी व्याख्यानांसाठी जाते. त्यामुळे तिच्या गैरहजेरीतही ‘मुक्तांगण’चं काम व्यवस्थित सुरू राहातं.’’

आई-बाबांपेक्षा मुक्ताची कामाची पद्धत थोडी निराळी आहे. ‘‘आई-बाबांच्या मूल्यांना मी धक्का बसू दिला नाही, पण आर्थिक स्थैर्याकडे दुर्लक्षही केले नाही. आईच्या तत्त्वज्ञानाला बाधा न आणता व्यावसायिक दृष्टिकोन वापरून मी काम करते. अजूनही ‘मुक्तांगण’चा पाया गांधीजींच्या तत्त्वज्ञानावरच उभा आहे. पण आता त्याला आयएसओ सर्टिफिकेट मिळालं आहे. आधीच्या पिढीने पैशांचा विचार केला नाही. पण कागदपत्रं, संशोधन या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुमचं काम लोकांसमोर आणलं पाहिजे. त्याचा कामासाठी फायदाच होतो. मदत मिळते, निधी मिळतो, जागरूकता वाढते. हा नवीन दृष्टिकोन फक्त माझाच आहे असं नाही तर सामाजिक क्षेत्रातील दुसऱ्या पिढीचाही असा दृष्टिकोन आहे.’’ बदलत्या जगात संस्थेची, स्वत:ची आर्थिक बाजू सावरण्यात काहीही चूक नाही याबद्दल मुक्ता स्वत:चा दृष्टिकोन स्पष्ट करते. कामाविषयी सांगताना मुक्तानं ‘सहचरी’ प्रकल्पाची माहिती दिली. ‘‘याची सुरुवात आई असतानाच सुरू झाली होती. व्यसनी पुरुषांवर उपचार करताना आईने घरातल्यांसाठी उपचार सुरू केले. त्या वेळी या रुग्णांच्या घरातील स्त्रिया केंद्रामध्ये यायच्या, पण सर्वासमोर बोलायच्या नाहीत. कार्यक्रम संपल्यानंतर त्या आईला वेगळं भेटून स्वत:च्या समस्या सांगायच्या. पुरुषांच्या व्यसनाचा सर्वाधिक त्रास घरातल्या स्त्रियांनाच होतो. त्यांना त्यासाठी जबाबदारही ठरवलं जातं. त्यामुळे स्त्रियांसाठी वेगळा ग्रुप हवा ही कल्पना पुढे आली होती. आई १० फेब्रुवारीला गेली. त्यानंतर एका महिन्याने म्हणजे १० मार्च १९९७ रोजी ‘सहचरी ग्रुप’ची स्थापना झाली. यामध्ये आम्ही स्त्रियांना प्रशिक्षण देतो. या ग्रुपने पुढे अनेक प्रकल्पांसाठी प्रेरणा दिली.’’

आशीषचा या सर्वामध्ये कसा सहभाग असतो? यावर आशीषने सांगितले, ‘‘मी प्रत्यक्ष सहभागी नसतो. मी मुख्य कार्यक्रमांना जातो. आमच्या कंपनीच्या सीएसआरतर्फे काही मदत करता येईल का ते पाहतो. म्हणजे कंपनीतर्फे अनेकदा पार्टी दिली जाते. त्यामध्ये दारू ठेवू नका, अशी मी विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली. अशीच विनंती आम्ही इतर अनेक ऑफिसेसना केली आणि बऱ्याच जणांनी मान्यही केली.’’ आशीषचं बोलणं पुढे नेताना मुक्ता सांगते की, ‘‘सध्याच्या काळात दारू आणि इतर व्यसनांना प्रचंड प्रतिष्ठा आली आहे, या गोष्टीचा मला सर्वाधिक त्रास होतो. स्त्रियांमध्येही दारू पिण्याचं प्रमाण वाढलं आहे. ही काही जणांना प्रगती वाटते. पण ही प्रगती नाही. व्यसनामध्ये काहीही चांगलं नाही. आशीष संपूर्ण निव्र्यसनी आहे. त्यामुळेही मला बळ मिळतं. कारण तो अगदी अधूनमधूनही दारू पीत असता तरी मला इतक्या ठामपणे व्यसनमुक्तीचं काम करता आलं असतं का, हा प्रश्नच आहे. २६ जून हा आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन आहे. त्या काळात आम्ही पुण्यात महिनाभर निरनिराळे कार्यक्रम घेतो. त्या सर्वामध्ये आशीषची मला खूप मदत होते. याशिवाय आशीष माझी सपोर्ट सिस्टीम आहे. मुलं लहान असताना आशीषच त्यांना सांभाळायचा. घरी आल्यावर माझं काम संपलं असं होत नाही. २४ तास काम सुरू असतं. त्यामुळे आशीषचा हा सहभाग माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो.’’

मुक्ता आणि आशीषना दोन मुलं आहेत. इशान बारावी कॉमर्सला आहे तर मुलगी कावेरी आठवीला आहे. ‘‘लहानपणापासून मुलं आशीषच्याच अंगावर वाढली आहेत. त्यामुळे ते त्याला त्यांच्यातलाच समजतात. त्या तिघांची टीम असते. रागावण्याचं काम माझ्याकडे असतं. आशीष आणि मी आधी चांगले मित्र असल्यामुळे आमचा टिपिकल असा संसार नाही. आशीष आणि माझ्या बऱ्याच सवयी वेगवेगळ्या आहेत. मला वाचायला आवडतं, त्याला टीव्ही-सिनेमा आवडतो. पण निदान एकाच खोलीत बसून मी वाचायचं आणि त्यानं टीव्ही बघायचा असं आम्ही करतो. पण आरोग्याची आवड आम्हा दोघांनाही आहे. मुलांनाही आमच्याबरोबर यायला आवडतं. आम्ही एकत्र ट्रेकिंगला जाणं, पहाटे उठून फिरायला जाणं, पळायला जाणं असे एकत्र कार्यक्रम करत असतो. दरवर्षी आम्ही मॅरॅथॉनमध्ये भाग घेतो. आशीष तर संपूर्ण ४२ कि.मी. पूर्ण करतो. वर्षांतून मे महिन्यात मोठी ट्रिप काढतो. दिवाळीत लहान सहलींना जातो. सुरळीत सहजीवनासाठी काही नियम घालून घेतले आहेत. जसं की, मुलांसमोर भांडायचं नाही, भांडणाचा विषय बदलायचा नाही, कामाच्या वेळेत भांडायचं नाही, एकमेकांसाठी जेवायला थांबलंच पाहिजे, असा आग्रह धरायचा नाही. मुलांनाही आम्ही काही नियम घालून दिले आहेत. ते त्यांनी पाळायचेच. उदाहरणार्थ, इशानला मोटारसायकल हवी असेल तर त्याबरोबर हेल्मेटही घातलं पाहिजे, असा आमचा नियम आहे आणि त्याने तो पाळलाच पाहिजे असा आमचा आग्रह असतो. तोही ऐकतो. आमच्या श्रद्धाही वेगवेगळ्या आहेत. त्याचा आम्ही आदर करतो. मी देव मानत नाही, तो मानतो. त्यावरून आम्ही वाद घालत नाही.’’

मुक्ता आणि आशीषच्या लग्नाला २४ वर्षे झालीत. तितकाच काळ मुक्ताच्या व्यसनमुक्तीच्या कामालाही झालाय. या कालावधीत ‘मुक्तांगण’ मधून अक्षरश: हजारो रुग्ण बरे होऊन बाहेर पडलेत. हे रुग्ण परत व्यसनांच्या जाळ्यात सापडण्याचं प्रमाण ३० टक्के आहे, म्हणजेच पूर्णपणे बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ७० टक्के आहे. इतर देशांपेक्षा हे प्रमाण खूप चांगलं आहे. यातलेच अनेक जण ‘मुक्तांगण’मध्ये कर्मचारी म्हणून काम करतात. त्यामुळे त्यांना इतर रुग्णांना हाताळणं जास्त सोपं जातं. समाजोपयोगी काम करताना निर्णयप्रक्रिया खूप महत्त्वाची असते. चुकीच्या निर्णयाचा फटका संपूर्ण संस्थेला बसू शकतो. त्यामुळे त्यासाठी शांतपणे, विचारपूर्वक निर्णय घेणं अतिशय आवश्यक असतं. आशीषसारखा जोडीदार लाभल्यामुळे मुक्तासाठी हे आव्हान काहीसं सोपं झालंय.

निमा पाटील

nima_patil@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2017 12:52 am

Web Title: marathi articles on mukta and ashish puntambekar
Next Stories
1 प्रगल्भता नात्याची
2 कलेची साधना
3 प्रवाही नातं
Just Now!
X