News Flash

 नवरेपणाचा मुखवटा नकोच

बायको अगदी खूश झाली होती, कारण आजपर्यंत तिने कधीच कोण्या नवऱ्याने असे सगळे केलेले बघितलेच नव्हते.

(वाचक प्रतिसाद)

‘‘नवरा घरात मदत करतो हे अर्थातच काही फार मोठे काम नाही, असे जरी सगळ्यांना वाटत असले तरी माझ्या पत्नीला मात्र माझ्याविषयी खूप कौतुक आहे. ऑफिसमध्ये गेल्यावर मेसेज करून ती मी केलेल्या कामाची मनापासून दाद देते. बरेच वेळा ती भावुक होऊन सांगते की, ‘मुलांना सांभाळण्याकरिता आई व सासू नसल्याची जाणीव तुझ्यामुळे मला कधीच झाली नाही.’ सर्वार्थाने जोडीदार या सदरासाठी वाचकांकडून आलेल्या प्रचंड प्रतिसादातील निवडक अनुभव दर पंधरा दिवसांनी.

‘‘आमच्या यांना काडीच्या कामाची सवय नाही किंवा यांना चहाचा कपसुद्धा हातात आणून द्यावा लागतो,’’ अशी कोणतीही तक्रार माझी पत्नी स्वप्नजा करत नाही, कारण तशी संधीच मी तिला कधी दिलेली नाही. लग्नाच्या आधीपासून मी घरातील जवळपास सगळी कामे करतो आहे आणि आता लग्नानंतरही बायकोला मदत होईल असं पहातो.

आम्ही तीन भाऊ  व एक बहीण पण आईने सर्वाना एकाच पद्धतीने वाढवले. एकत्र कुटुंबात राहत असल्यामुळे, लहानपणापासून पाणी भरणे, भाजी, किराणा सामान आणणे ही सर्व कामे मी अगदी आनंदाने करत असे. लग्नाआधीपासून मला चहा करायला फार आवडतो, भरपूर आलं घालून एक उकळी आल्यावर चहाचा जो सुगंध पसरतो.. वा! त्यावरून स्वप्नजा अजूनही ऑफिसमध्ये, मैत्रिणींमध्ये अभिमानाने सांगते की, चहा मी फक्त नवऱ्याच्याच हातचा पिते.

माझ्या जुळ्या मुलांच्या जन्माआधीच माझी आई वारली, त्यामुळे पहिल्यांदा घरी बाळ आणताना करावयाची सर्व तयारी मी स्वत: केली, अगदी स्वप्नजाला हॉस्पिटलमध्ये साजूक तुपातील शिरा घेऊन जाण्यापर्यंत. तिलाही खूप आनंद झाला होता. दोघा बाळांकरिता वेगळे पाळणे, डायपर, औषधे, गुटी, मऊ  पंचे अशा अनेक वस्तू मी लक्षात ठेवून आणल्या. बायको अगदी खूश झाली होती, कारण आजपर्यंत तिने कधीच कोण्या नवऱ्याने असे सगळे केलेले बघितलेच नव्हते. दोघा मुलांना एकाच वेळी बघणे तिला शक्य नसायचे तेव्हा मुलांचे डायपर बदलण्यापासून वेळच्या वेळी त्यांना भरवणे, औषधे, गुटी देण्यापर्यंत सर्व कामे मी करायचो. आताही सकाळी मुलांच्या शाळेच्या तयारीकरिता मी तिला सर्व प्रकारे मदत करतो. पत्नीच्या नोकरीमुळे मुलांना मैदानी खेळांना घेऊन जाणे तसेच मुलांच्या शालेय प्रगतीवरही विशेष लक्ष ठेवावे लागते. अजूनही माझ्या पत्नीला घरातील कुठलीही बिलं, सिलेंडर नोंदवणे, भाजी अथवा किराणा बघावा लागत नाही, अर्थात कधी तिने हौसेने केलं तर गोष्ट वेगळी, तसेही मी कुठल्याही कामात भेदभाव करत नाही, अगदी कामवाली बाई नसेल तर भांडी घासूनपुसून ओटा साफ करून ठेवणार.

जेवण बनवायला मला आवडते, फक्त पोळ्या मी करू शकत नाही. भरपूर भाज्या घालून मसालेभात किंवा टोमॅटो-बटाटा-कांदा रस्साभाजी आणि तांदळाच्या पिठाचे घावन ही आवडती डिश. सोपी आणि पोटभर. फार काही पदार्थ मी बनवू शकत नसलो तरी पण बायको घरात नाही म्हणून उपाशी राहावे लागत नाही हे नक्की. त्यातून नोकरी करणारी पत्नी असेल तर आजकालच्या सर्वच नवरेमंडळींना संसाराला हातभार लावणे गरजेचे आहे.

मुलांबरोबर माझेही लाड

दोन मुले आणि मी एक तिसरी असे आम्हा तिघांचे फार लाड होतात घरी. कधी ऑफिसमधून दमून आले की, चेहरा बघूनच मला प्रेमळपणे नवरा सांगतो, ‘जाऊ  दे आज स्वयंपाक नको करू, मागवू बाहेरचे काही किंवा मी मस्त फोडणीचा भात करतो.’ किती बरं वाटतं सांगू! मुलांना समाजसेवेबद्दल लहानपणापासून जागरूक करण्यासाठी भूषणने त्यांना एका मतिमंद मुलांच्या संस्थेत नेले, मुलांनीही मग आपल्या पॉकेटमनीमधून काही पैसे संस्थेला दान केले. अशा अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टी तो विचारपूर्वक करतो म्हणून फार कौतुक वाटते. मजेचा भाग सोडला तर खरंच आम्ही दोघेही खूप सुखी आहोत. एकमेकांच्या गरजा ओळखून मदत करत असल्यामुळे, भांडणतंटा अजिबात होत नाही, आमच्या संसाराला आणखी काय हवं?

– स्वप्नजा पंडित

नवरा घरात मदत करतो हे अर्थातच फार काही फार मोठे काम नाही, असे जरी सगळ्यांना वाटत असले तरी माझ्या पत्नीला मात्र माझ्याविषयी खूप कौतुक वाटते. तोंडावर फार कौतुक करत नसली तरी ऑफिसमध्ये गेल्यावर मेसेज करून ती केलेल्या कामाची मनापासून दाद देते (अर्थात ही ‘व्हॉट्सअ‍ॅप’ची मेहेरबानी). त्यातूनही मी केलेली खमंग फोडणीची भाजी मैत्रिणींनी चाटूनपुसून खाल्ली की, तिला माझा कोण अभिमान वाटतो. घरी कोणी आले की मी मदत केलेल्या कामाचे ती अगदी मनापासून कौतुक करते, कधी कधी तिच्या मैत्रिणींना पण मनातून वाईट वाटत असावे आपल्यालाच असा नवरा का नाही? तसेच बरेच वेळा ती भावूक होऊन सांगते की, ‘मुलांना सांभाळण्याकरिता आई व सासू नसल्याची जाणीव तुझ्यामुळे मला कधीच झाली नाही.’

आम्ही दोघेही दिवसभर कामात असलो तरी संध्याकाळी एकत्र जेवताना एकमेकांच्या दिवसभराच्या प्रत्येक गोष्टी शेअर करतो, तसेच काही आवश्यक निर्णय घ्यायचे असतील तर सल्लामसलतही करतो. आता मुलांना पण ती सवय लागली आहे. शेवटी मी एवढेच सांगेन की आपल्या पत्नीबरोबर  आनंदाने संसार करायचा असेल तर नवरेपणाचा मुखवटा बाजूला ठेवून मैत्रीच्या नात्याने संसारात सर्वतोपरी मदत करावी.

(भूषण पंडित, स्वत:चा व्यवसाय, घर सांभाळून, ठाण्यातील येऊरला आदिवासी मुलांची शाळा गेली २० वर्षे चालवतात.)

भूषण पंडित – bhushanpandit686@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2017 1:50 am

Web Title: mutual understanding between husband and wife
Next Stories
1 सर्जनशील सोबत
2 सामंजस्य जगण्यातलं
3 प्रेम, आदर आणि खूप काही
Just Now!
X