21 October 2018

News Flash

जोडीदारांची सर्वाथाने ओळख

अनुभवांना उजाळा देण्याचा, त्याच वाटेवरून पुन्हा एकदा जाण्याचा हा प्रयत्न आहे.

‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते’ हे अतिशय घासून गुळगुळीत झालेलं वाक्य, इतक्यांदा कानावर पडलं आहे आणि डोळ्यांखालून गेलं आहे की खोटं वाटायला लागलं आहे. हे वाक्य उलट करून आणि त्यामध्ये थोडा बदल करून ‘स्त्रीच्या पाठीशी पुरुष असला की यश मिळवणं बरंच सोपं जातं’, गेले वर्षभर या बदललेल्या उक्तीचा बराच अनुभव आला. ‘सर्वार्थाने जोडीदार’ या सदराचा समारोप करताना त्यातल्या काही अनुभवांना उजाळा देण्याचा, त्याच वाटेवरून पुन्हा एकदा जाण्याचा हा प्रयत्न आहे.

या सदरासाठी निरनिराळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या जोडप्यांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची, त्यांची विचार करायची पद्धत समजून घेण्याची संधी मिळाली. उद्योग, नाटक, लेखन, प्रशासन, समाजसेवा, पर्यावरण, हॉटेलिंग, संशोधन, वन्यजीवन, क्रीडा, वैद्यकीय अशा निरनिराळ्या क्षेत्रांत आवड, जिद्द, परिश्रम, हिंमत यांच्या बळावर वाटचाल करणाऱ्या या स्त्रिया आणि त्यांना तितकीच भक्कम साथ देणारे त्यांचे जोडीदार. काही फक्त पत्नीच्या कामाला मानसिक बळ देणारे, काही त्यामध्ये सहभागी होणारे तर काही सुरुवात करून देणारे. पोलीस सेवेत सातत्याने यशस्वी मार्गक्रमण करणाऱ्या डॉ. रश्मी करंदीकर यांनी पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्या सोबतीनेच प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न पाहिलं. पुढे पुरुषोत्तम यांनी मार्ग बदलला, पण त्यांच्या साथीमध्ये रश्मी यांना कारकीर्दीची वाट सापडली होती. मराठी जनतेला एकापाठोपाठ एक सुपरहिट नाटकांची मेजवानी देणारे मंगेश कदम आणि लीना भागवत यांच्याबाबतीतही काहीसं असं म्हणता येईल. मंगेश यांची साथ आणि प्रोत्साहन मिळालं नसतं तर कदाचित अभ्यासाच्या ओझ्यामध्ये लीना नाटक हरवून बसली असती. मराठी रंगभूमीवर कलेसोबत प्रखर बुद्धीचं वरदान लाभलेल्या मनस्विनी लता रवींद्र आणि अमृता सुभाष या दोघीही आपापले कलागुण तासण्याचं आणि फुलवण्याचं मुख्य श्रेय आपापल्या जोडीदाराला देतात. नृत्य आणि अभिनय क्षेत्रामध्ये स्वत:ची सुरेख छाप टाकणाऱ्या शर्वरीला पती निखिलची साथ तितकीच महत्त्वाची आणि मोलाची वाटते.

पत्नीला तिचं अवकाश मिळण्यासाठी मदत करताना आपणही त्या अवकाशाचा भाग होऊन जावं, असा अनुभवही काही जोडीदारांनी सांगितला. राजन धुळेकर यांना वाचनाची आवड होती, पण लग्नानंतर कवयित्री पत्नी नीरजा यांच्या साथीने त्या वाचनालाही एक दिशा मिळाली. लग्नापूर्वी लोकप्रिय वाचनामध्ये रमणाऱ्या राजन यांना गहन, सकस वाचनाची सवय लागली आणि आता तर त्यांचे विचारही बदलले आहेत. समाजातील व्यसनाधीन स्त्री-पुरुषांना पुन्हा एकदा जगण्याची संधी देण्यासाठी धडपडणाऱ्या ‘मुक्तांगण’च्या मुक्ता पुणतांबेकर यांचे पती आशीष यांचंही आयुष्य लग्नानंतर बदललं. सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरात वाढलेले आशीष आता मुक्ताला तिच्या कामात मदत करत आहेत. वेश्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वेचणारे प्रीती पाटकर आणि प्रवीण पाटकर हे दोघे एकाच वाटेवरचे प्रवासी होते, त्यामुळे दोघांनी एकत्र मिळून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. ध्येयाने पछाडलेल्या दोन व्यक्ती एकत्र आल्या तर कितीजणांचं आयुष्य बदलून टाकू शकतात याचं हे उदाहरण होतं. अशाच प्रकारे एका वाटेवरून एकत्र प्रवास करणाऱ्या तीस्ता सेटलवाड आणि जावेद आनंद या जोडप्याशी बोलणं हाही एक वेगळा अनुभव होता. सामाजिक सलोख्यासाठी झटणारे, त्यासाठी लढा देणारे, कोर्टकचेरी करणारे, बदनामी सहन करणारे आणि प्रसंगी जिवावर उदार होणारे तीस्ता आणि जावेद हे सामाजिक परिवर्तनाच्या खडतर चळवळींमध्ये काम करणाऱ्यांसाठी आशेचा किरण आहेत.

आपली पत्नी यशस्वी उद्योजिका होण्याच्या मार्गावर जात आहे, याची जाणीव लग्नापूर्वीच असताना त्याचा न्यूनगंड येऊ  न देता तिला भक्कम साथ देणारे आणि नंतर स्वत:ही त्या वाटचालीत सहभागी होणारे सुधीर पाटील यांचा वीणा पाटील यांच्या यशात किती मोलाचा सहभाग आहे हे मांडणं आनंददायी होतं. ‘सर्वार्थाने जोडीदार’ या सदरामधला हा पहिला लेख होता. वाचकांना तो कसा वाटेल अशी धाकधूक होती. पण, ‘मला वीणा पाटील आवडतात, त्यांच्याविषयी मी मिळेल ते वाचलं आहे. या लेखातून दिसलेलं चित्र नवीन आणि आशादायी होतं’ असा मेसेज फेसबुकवर आला तेव्हा आपण योग्य दिशेला जात आहोत अशी थोडी खात्री पटली. या सदरासाठी निरनिराळ्या वयोगटांतल्या जोडप्यांच्या मुलाखती घेण्याचा योग आला. एकमेकांच्या संगतीमध्ये जवळपास अर्धशतक पूर्ण केलेले उमा कुलकर्णी व विरुपाक्ष कुलकर्णी, वीणा गवाणकर व चंद्रकांत गवाणकर या दोन्ही दाम्पत्यांकडे सुंदर जगण्याच्या अनेक युक्त्या आहेत. ‘भांडण करताना एकाच मुद्दय़ावरून दुसऱ्यांदा भांडण करायचं नाही’ हा कानमंत्र उमाताई आणि विरुपाक्ष यांच्याकडून मिळाला. तो त्यांनी स्वत:साठी योजला आहे, पण आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येक नात्याच्या सुदृढपणासाठी उपयोगी आहे. चंद्रकांत गवाणकर यांनी स्वत:पुरतं आखून घेतलेल्या ‘बायको मत मागते तेव्हाच द्यायचं,’ या साध्या नियमाचं पालन करणं हे सुखी संसारासाठी फायद्याचं आहेच, पण इतरही नात्यांना लागू होऊ  शकतो. सदरामधला हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर ‘वीणा गवाणकर यांना मी आधीपासून ओळखतो, पण तुमच्या लेखनातून मला माहिती नसलेल्या बाजूदेखील समोर आल्या,’ ही प्रतिक्रिया अर्थातच सुखावणारी होती.

ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन अशा वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आभा लांबा आणि त्यांचे पती हर्ष यांच्याशी बोलण्यातून मुंबईचा एक वेगळा सांस्कृतिक पट उलगडत गेला. ही मुंबई तुम्हा-आम्हा सर्वाना रोज दिसणारी, पण आपल्या जाणिवांच्या पलीकडे गेलेली होती. फक्त मुंबईच नव्हे तर भारताला अशा ऐतिहासिक वास्तूंची उज्ज्वल परंपरा मिळाली आहे. त्याचा अभिमान वाटणं जितकं सोपं आहे तितकंच अवघड त्याचं जतन आणि संवर्धन करणं आहे. हे काम अगदी आवडीनं करणाऱ्या आभा आणि हर्ष यांच्याविषयी लिहिल्यानंतर त्यांच्या कामाची चौकशी करणारे, आणि आमचाही जुना वाडा, जुनी इमारत, जुनी शाळा दुरुस्त करतील का अशी विचारणा करणारे अनेक ईमेल मिळाले. वाचकांचा असाच भरपूर प्रतिसाद मिळाला तो डॉ. नंदिता आणि प्रदीप पालशेतकर यांच्याविषयीच्या ‘प्रेमाची साथ’ या लेखानंतर. लेख आवडला किंवा नाही याऐवजी डॉ. नंदिता यांना कसे भेटता येईल, त्यांचा संपर्क क्रमांक काय, इत्यादी चौकशी करणारेच सर्व ईमेल आणि मेसेज होते. त्या वेळी समाजातील वंध्यत्वाची समस्या किती गंभीर झाली आहे त्याची पुन्हा एकदा जाणीव झाली.

कर्तृत्वाची उत्तुंग भरारी घेणाची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांमध्ये प्रशासकीय सेवेची ओढ नेहमी दिसून येते. मनीषा आणि मिलिंद म्हैसकर, अश्विनी आणि सतीश भिडे, आणि अश्विनी जोशी आणि आशुतोष पंडित यांच्याशी बोलताना प्रशासकीय सेवेतील आव्हानं, ताण-तणाव आणि जनतेच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यावर मिळणारं समाधान यांच्याविषयी ऐकायला मिळालं. यापैकी आशुतोष पंडित यांनी कधीच प्रशासकीय सेवेत काम केलेलं नाही. या सर्वाशी बोलून त्यांचे अनुभव वाचकांपर्यंत नेणं हे समाधानकारक होतं.

वनक्षेत्रात दमदार कामगिरी बजावणाऱ्या आणि अनेक मुलींसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या डॉ. विनया जंगले, न्युरोसायन्सच्या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीची कामगिरी बजावणाऱ्या विदिता वैद्य, नद्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी झटणारी परिणिता दांडेकर, आणि चंद्रपूरमधल्या शोषितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या पारोमिता गोस्वामी या सर्वजणींची क्षेत्रं वेगवेगळी, पण त्यासाठी लागणारा ‘वेडेपणा’ मात्र सगळ्यांमध्ये समान. पत्नी संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये रेस्क्यू ऑपरेशनसाठी गेल्यावर आवडीने त्यांच्यासोबत जाणारे त्यांचे पती रुधील असोत की, पारोमिताच्या कामामुळे भारावून जाऊन दिल्लीतलं प्रतिष्ठित करिअर सोडून चंद्रपुरात अन्यायाविरोधातील लढय़ात सहभागी होणारे डॉ. कल्याण कुमार यांचे अनुभव तितकेच थरारक आहेत. हॉटेलिंग आणि जिम या आधुनिक भारताच्या प्रमुख ओळखी झाल्या आहेत. मुंबईकरांच्या जिव्हेला निरनिराळ्या संस्कृतींचं फ्यूजन फूड खाऊ  घालण्याची इच्छा असलेली आदिती आणि तिचा पती विशाल कामत हे एकमेकांच्या आवडी ओळखणारं, जोपासणारं आणि एकाच क्षेत्रात असल्यामुळे एकमेकांच्या प्रगतीसाठी झटणारं तरुण जोडपं यानिमित्तानं भेटलं. व्यायाम आणि उत्तम आरोग्य यांची आवड असलेले लीना मोगरे आणि निखिल मोगरे यांनी आपल्या छंदाचं रूपांतर व्यवसायात केलंय. एकमेकांच्या साथीने यामध्ये प्रगती करताना वेळेचं नियोजन आणि शिस्त यांचा कसा उपयोग झाला हे त्यांच्याकडून ऐकायला मिळालं.

या यशस्वी स्त्रियांशी संवाद साधताना सर्व जोडीदारांमध्ये एक समान धागा आढळला. या सर्वानी आपल्या पत्नीमधलं वेगळेपण ओळखलं आहे आणि ती आपल्यापेक्षा सरस असू शकते हे मान्य केलं आहे. प्रसंगी तिच्यातल्या कमतरता दूर करण्यासाठी स्वत: कष्ट केले आहेत, पूरक वातावरण निर्माण करून दिलं आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांनी घडवलेल्या या महाराष्ट्रामध्ये त्यांनी घालून दिलेल्या सहजीवनाच्या वाटेवरून जाणारी ही काही नावं, त्यांच्याशी परिचय करून देताना माझ्याही वाटय़ाला अनेक सोनेरी क्षण आले. त्याबद्दल मीही कृतज्ञ आहे!

निमा पाटील

nima_patil@hotmail.com

(सदर समाप्त)

 

 

First Published on December 30, 2017 12:09 am

Web Title: nima patil 2017 last marathi articles in chaturang