14 December 2017

News Flash

खडतर लढय़ातली भक्कम साथ

‘‘इतरांचं प्रथमदर्शनी प्रेम असतं, तसं आमचं प्रथमलिखाणी प्रेम होतं.

निमा पाटील | Updated: June 17, 2017 4:32 AM

‘‘इतरांचं प्रथमदर्शनी प्रेम असतं, तसं आमचं प्रथमलिखाणी प्रेम होतं. कामाच्या निमित्तानं आमच्या भेटीगाठी वाढल्या आणि आपली विचार करण्याची पद्धत एकच आहे असं आम्हाला लक्षात आलं, आम्ही जास्त जवळ आलो.’’ तीस्ता सेटलवाड-जावेद आनंद यांच्या सहजीवनाची सुरुवात अशी होती. मात्र पुढे देशातल्या विविध, विशेषत: गुजरातदंगलीच्या काळात या नात्याची खरी कसोटी लागली. तीस्ता यांच्या या खडतर लढय़ात सोबतीला होता  तितकाच भक्कम साथीदार ..

गुजरात दंगलींच्या काळात आणि नंतरही त्याविरोधात प्रखर भूमिका घेणाऱ्यांमध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे तीस्ता सेटलवाड. आणखी ओळख सांगायची म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले अ‍ॅटर्नी जनरल मोतीलाल चिमणलाल सेटलवाड यांची त्या नात आणि मुंबईतले प्रख्यात वकील अतुल सेटलवाड यांच्या कन्या. त्यांचे पणजोबा सर चिमणलाल हिरालाल सेटलवाड हे स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची घटना मानल्या जाणाऱ्या जालियानवाला बाग हत्याकांड प्रकरणाची चौकशी करणाऱ्या हंटर आयोगाचे सदस्य होते. उच्चविद्याविभूषित आणि संपन्न घरामध्ये जन्म, बालपणापासूनच मिळालेले कायदा आणि राज्यघटनेचे संस्कार आणि उदारमतवादी मूल्यांचा वारसा या सर्व गोष्टी तीस्ता यांच्या वाटय़ाला आल्या. जितकं उत्तम बालपण मिळालं, तितकाच समाजासाठी खडतर लढाही त्यांना पुढील आयुष्यात द्यावा लागला, अजूनही द्यावा लागत आहे. असंही म्हणता येईल की या लढय़ाच्या प्रेरणेची मुळं त्यांच्या घरातच सापडतात.

‘‘तीस्ता आणि माझी भेट १९८३ मध्ये ‘द डेली’मध्ये झाली. रुसी करंजिया संपादक होते. मी विशेष प्रतिनिधी होतो आणि तीस्ता बी.ए.चा (फिलॉसॉफी) शेवटचा पेपर देऊन आमच्याकडे शिकाऊ  पत्रकार म्हणून रुजू झाली तेव्हा तिचा परीक्षेचा निकाल लागायचा होता. इतरांचं प्रथमदर्शनी प्रेम असतं, तसं आमचं प्रथमलिखाणी प्रेम होतं. कामाच्या निमित्तानं आमच्या भेटीगाठी वाढल्या आणि आपली विचार करण्याची पद्धत एकच आहे, असं आम्हाला लक्षात आलं, आम्ही जास्त जवळ आलो. नंतर तिने राजीनामा दिला आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये कामाला सुरुवात केली. आम्ही लग्नापूर्वीच एकत्र राहायला सुरुवात केली होती. आमच्या वयामध्ये १३ वर्षांचं अंतर आहे. ती गुजराती हिंदू, मी अलाहाबादच्या कर्मठ घरातला मुस्लीम. तीस्ताच्या घरच्यांना आमच्या वेगळ्या धर्माबद्दल आक्षेप नव्हता, तर आम्ही लग्न न करता एकत्र राहत होतो हे काही त्यांना पटत नव्हतं, पण त्यांना ते स्वीकारावं लागलं होतं. तीस्ताला मुलांची अतिशय आवड आहे. तिला मुलं हवी होती. आम्ही आधीच रूढीविरुद्ध वागत होतो. आता मुलांना त्यामध्ये ओढायला नको, म्हणून आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि १९८६ मध्ये आम्ही विवाहबद्ध झालो. १९९० मध्ये आम्हाला मुलगी झाली आणि १९९५मध्ये मुलाचा जन्म झाला. आम्हाला पहिली मुलगी झाली तेव्हा तीस्ताने वर्षभर रजा घेतली होती.’’ तीस्ता सेटलवाड यांचे जीवनसाथी, सामाजिक कार्यकर्ते आणि ‘कम्युनालिझम कॉम्बॅट’ मासिकाचे सहसंपादक जावेद आनंद यांनी त्यांच्या सहजीवनाचा गेल्या ३४ वर्षांचा लेखोजोखा थोडक्यात मांडायला सुरुवात केली..

‘‘तीस्ताच्या घरातील सहा पिढय़ा वकिलांच्या होत्या. तिने आणि तिच्या बहिणीनं ही परंपरा मोडली. तीस्तानं पत्रकारिता आणि समाजकार्याचा मार्ग स्वीकारला. तर बहीण कलावंत आहे,’’ जावेद आनंद सांगतात, ‘‘मी अलाहाबादमधल्या एका कर्मठ मुस्लीम घरातला. मुलांमध्ये सर्वात थोरला. मी मार्क्‍सवादाकडे वळालो. मी धर्म वगैरे काही मानत नाही. माझ्या घरातले मानतात आणि पालनही करतात. मला त्यांनी ‘बिघडलेला’ असं म्हणून सोडून दिलं म्हटलं तरी चालेल. १९६६ मध्ये मी शिक्षणासाठी मुंबईला आलो. आयआयटीमधून इंजिनीअर झालो आणि लवकरच पत्रकारिता सुरू केली. तीस्ता एका आधुनिक, उदारमतवादी गुजराती कुटुंबातील मुलगी. तिचे मामा अनेक वर्षे गुजरातचे अ‍ॅडव्होकेट जनरल होते. त्यामुळेच गुजरातमध्ये बदललेल्या वातावरणाचा तिला जास्त त्रास होऊ लागला. उदारमतवादी गुजराती समाज बदलत असल्याचं तिच्या लक्षात आलं होतं. २००२च्या दंगली एका रात्रीत झाल्या नाहीत. १९८८पासून तिथलं वातावरण बिघडत चाललं होतं. ‘कम्युनालिझम कॉम्बॅट’ सुरू केल्यानंतर त्यावर आम्ही किमान पाच कव्हर स्टोरी केल्या होत्या.’’

गुजरात दंगली आणि त्यानंतर कायद्याची लढाई हा सगळा अलीकडचा इतिहास आहे. पण तीस्ता आणि जावेद यांच्या कामाला सुरुवात बरीच आधी झाली होती. ‘‘तीस्ताने पत्रकारितेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच बातमीदारी करताना दंगली अनुभवल्या. १९८४ची शीखविरोधी दंगल आणि भिवंडीमधली दंगल या साऱ्या वातावरणाचा तिच्यावर खूप खोलवर परिणाम झाला. त्याच वेळी आपल्या देशात दंगलग्रस्तांना न्याय मिळत नाही, हे आम्हाला दिसत होतं. १९९२-९३च्या दंगली मुंबईभर पसरल्या होत्या. असं प्रथमच घडत होतं. त्या वेळी आम्ही दंगलग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून धरणं, आंदोलन आदी चळवळींद्वारे काम करतच होतो. तेव्हा अनेकांचा पाठिंबा मिळत होता, तशी टीकाही होत होती. फोनवरून धमक्या येत होत्या. पण या धमक्यांचा आमच्यावर परिणाम झाला नाही. त्याच वेळी जातीय दंगली आणि त्यांचं वास्तव मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये सखोलपणे मांडण्यास मर्यादा आहेत हेही आमच्या लक्षात आलं. तेव्हा तीस्ता ‘बिझनेस इंडिया’मध्ये वरिष्ठ प्रतिनिधी तर मी ‘संडे ऑब्झव्‍‌र्हर’मध्ये सहयोगी संपादक होतो. १९९३ मध्ये दोघांना मिळून २० हजार रुपये मिळत होते. पण सर्व सोडून आम्ही ‘कॉम्बॅट कम्युनालिझम’ हे मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मित्रांनी आम्हाला वेडय़ात काढलं. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो. दंगलग्रस्तांचा मुद्दा लावून धरण्याबरोबरच जातीय-धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी प्रयत्न करणे हा आमचा मुख्य हेतू होता. आम्ही आमची चळवळ सुरूठेवली आणि ‘कॉम्बॅट कम्युनालिझम’च्या माध्यमातून पत्रकारितेचं कौशल्य वापरून अनेक मुद्दे समाजासमोर मांडत राहिलो.’’

मुंबईबाहेर देशभरात घराघरांमध्ये तीस्ता सेटलवाड यांचं नाव जाण्यास कारणीभूत ठरली ती त्यांनी गुजरात दंगलींच्या काळामध्ये घेतलेली भूमिका. ‘‘दंगलींच्या दिवसांमध्ये जेव्हा गुजरातमधले लोकप्रतिनिधी, मंत्रीदेखील तिथे जात नव्हते, तेव्हा तीस्ता तिथे गेली. दंगलग्रस्तांना भेटली. त्यांच्या व्यथा मांडल्या. दंगलग्रस्तांना न्याय मिळवून देणं हाच तिचा लढा होऊन गेला. दंगलींदरम्यान तीस्तावर हल्लेही झाले. अनेकदा रिक्षावाले भीतीपोटी तिला अध्र्या रस्त्यात सोडून निघून जात असत. पण तिनं तिचं काम सुरूच ठेवलं. मुंबईमध्ये झालेल्या दंगलींच्या वेळी दंगलग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी आम्ही आंदोलनांचा मार्ग स्वीकारला होता. गुजरातमध्ये आम्ही प्रथमच न्यायालयाची पायरी चढलो. त्यासाठी ‘सिटिझन्स फॉर पीस अँड जस्टिस’ची स्थापना करण्यात आली.

विजय तेंडुलकर त्याचे संस्थापक अध्यक्ष होते. अलेक पदमसी, जावेद अख्तर, अनिल धारकर, नंदन मलुष्टे असे अनेक जण त्याचे ट्रस्टी होते.’’ तीस्ता यांच्या या लढय़ाचे तीव्र राजकीय प्रतिसाद उमटणारच होते. साक्षीदारांना फूस लावल्याच्या आरोपापासून, दंगलग्रस्तांना मिळालेल्या निधीमध्ये गैरव्यवहार केल्यापर्यंतचे अनेक आरोप त्यांच्यावर झालेत. त्यावर बोलताना जावेद आनंद म्हणतात की, ‘‘आमचा आपल्या देशातील कायदा आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. बेस्ट बेकरी प्रकरणात झाहीरा शेखने तीस्तावर साक्षीदारांना पढवल्याचा आरोप केला होता. त्याची न्यायालयात चौकशी झाली आणि खोटे बोलून न्यायालयाची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून झाहीरा शेखला एक वर्षांची शिक्षाही झाली. तीस्ता त्यामध्ये निर्दोष सिद्ध झाली आहे. त्याउलट एका स्टिंग ऑपरेशन मध्ये, मधू श्रीवास्तव या गुजरातमधील भाजप नेत्याने झाहीरा शेखलाच बरेच पैसे दिल्याचे दिसले होते. आताही ज्या गुलबर्ग सोसायटीमध्ये काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह ६९ जणांना जाळण्यात आलं होतं, त्या गुलबर्ग सोसायटीमधल्या काही रहिवाशांच्या नातेवाईकांनी तीस्ताविरोधात पैशांची अफरातफर केल्याचा आरोप केला आहे. तो खटलासुद्धा न्यायालयात सुरू आहे आणि आम्हाला न्याय मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. या आरोपांनंतर अहमदाबाद पोलिसांनी आमचे वैयक्तिक, आमच्या ‘सबरंग कम्युनिकेशन’ आणि ‘सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस’ची (सीजेपी) खाती गोठवली. या खात्यांद्वारे सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. आम्हाला घरातून भक्कम आर्थिक पाठिंबा असल्यामुळे आम्ही तग धरूशकलो, अन्यथा आमची प्रचंड आर्थिक अडचण झाली असती.’’

फक्त आर्थिक पाठिंबाच नाही तर तीस्ता आणि जावेद यांना घरातून वेळोवेळी भावनिक आणि मानसिक आधारही मिळाला आहे. गेल्या १५ वर्षांपासून तीस्ता यांना सातत्याने घराबाहेर राहावं लागत आहे. या काळामध्ये मावशीनेच आईच्या मायेनं त्यांच्या मुलांची काळजी घेतली. या काळात जावेद आनंद हेही मुंबईबाहेर फार गेले नाहीत. मुलांबरोबर दोघांपैकी एकानं तरी असलं पाहिजे, अशी साधी भूमिका त्यामागे होती. ‘‘जावेद माझा दीर्घकाळापासून साथीदार आहे. आधी पत्रकारिता आणि नंतर न्यायासाठी चळवळ यासाठी त्याने मला पुरेपूर साथ दिली,’’ तीस्ता सेटलवाड आपल्या जोडीदाराने दिलेल्या मौल्यवान साथीबद्दल सांगतात. ‘‘आम्ही मुंबईमधल्या शाळांमधील मुलांसाठी ‘खोज’ हा उपक्रम राबवतो. मुलांमध्ये जातीय-धार्मिक तेढ असू नये, त्यांनी स्वत:ला, एकमेकांना ओळखावं, स्वत:च्या समस्या मांडायला शिकावं यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. या कार्यक्रमासाठी जावेदचा सहभाग फार मोलाचा असतो. मी जितकी धडपडी आहे, तितक्या शांतपणे जावेद सर्व गोष्टी सांभाळतो. मुस्लीम समाजामध्ये लोकशाही अधिक रुजावी यासाठीदेखील त्याचं काम सुरूआहे.’’

जावेद आनंद सांगतात की, ‘‘गुजरात दंगलीच्या लढय़ाने आमचं व्यक्तिगत आयुष्य संपूर्ण बदलून गेलं. एकेकाळी आमच्या घरी होळी, दिवाळी, नाताळ, ईद हे सण मोठय़ा उत्साहानं साजरे केले जायचे. आता अजिबात वेळ मिळत नाही. तीस्ताला मुलं, बागकाम आणि स्वयंपाक या गोष्टींची प्रचंड आवड आहे. गेल्या २-३ वर्षांत तिनं कधी बागकाम केल्याचं मला आठवत नाही. मुलांसाठी तिला शक्य असेल तेव्हा ती स्वयंपाक मात्र आवर्जून करते. या गोष्टीतून तिला आनंद मिळतो. तिला मुलांबरोबर फार कमी वेळ मिळतो. मात्र, जितका वेळ एकत्र असू तितक्या वेळात तिचे भरपूर प्लॅन्स ठरलेले असतात. मुलांना क्वालिटी टाइम देण्यावर तिचा भर असतो.’’

‘‘जावेद आणि मला एकत्र वेळ मिळतो तेव्हा वाचन, संगीत यामध्ये आम्ही वेळ घालवतो आणि अनेकदा फक्त गप्पाच मारत बसतो. चित्रपट बघायचे असतात, पण तितका वेळ मिळत नाही. जावेद एक व्यक्ती म्हणून शांत आहे, पण त्याच्या आवडीच्या विषयामध्ये झपाटय़ाने काम करतो. तो माझ्या आयुष्यात नसता तर काय, हा विचार करणंही अवघड आहे माझ्यासाठी. मी खूप गृहीत धरते त्याला. तो माझा मित्र आहे, प्रियकर आहे आणि साथीदार आहे. भरपूर रोमान्स आणि मनमोकळं हसणं हे त्याचे खास गुण आहेत. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो, एकत्र हसतो, रडतो, आणि कधी कधी मोठमोठय़ाने भांडतोसुद्धा,’’ तीस्ता अभिमानाने नवऱ्याचं वर्णन करतात.

एका प्रसिद्ध स्त्रीचा पती म्हणून काय वाटतं, असा प्रश्न जावेद आनंद यांना अनेकदा विचारला जातो, ‘‘ती माझ्यापेक्षाच नाही, तर इतर अनेक पुरुषांपेक्षा खूप भारी आहे आणि मला ते माहिती आहे. त्यामध्ये वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे?’’ तीस्ता म्हणतात त्याप्रमाणे अगदी शांतपणे जावेद आनंद हा प्रश्न सहजपणे निकालात काढतात. खडतर लढय़ामध्ये तितकाच भक्कम साथीदार असणं फार महत्त्वाचं असतं. तीस्ता त्या बाबतीत अगदी निर्धास्त आहेत, असं आपण म्हणू शकतो.

निमा पाटील

nima_patil@hotmail.com

First Published on June 17, 2017 4:32 am

Web Title: teestasetalvad and javedanand love story