23 October 2018

News Flash

‘कागदोपत्री जगणारी माणसं’

‘‘मी लग्नासाठी स्वत:ला १७ ठिकाणी दाखवून घेणार नाही

‘‘मी लग्नासाठी स्वत:ला १७ ठिकाणी दाखवून घेणार नाही आणि मी नोकरी करून साठवलेल्या माझ्या पैशांमध्येच लग्न करणार’’, ५० वर्षांपूर्वी सुलभा आजगावकरने वडिलांसमोर लग्नासाठी या अटी ठेवल्या तेव्हा ती औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजमध्ये लायब्ररियन म्हणून नोकरी करत होती. नोकरीची ४-५ वर्ष झाली होती, वय पंचविशीला पोहोचलं होतं, म्हणजे तेव्हाच्या दृष्टीने थोडं जास्तच. सुलभाचे वडील पोलीस निरीक्षक होते. ‘‘माझे वडील ब्रिटिशकालीन पोलीस दलामध्ये होते. ते स्वत: शिकलेले होतेच, त्याशिवाय मुलींच्या शिक्षणालाही महत्त्व देणारे होते. माझे चारही मोठे भाऊ चांगले शिकलेले होते. मीही लायब्ररियनचा पदव्युत्तर डिप्लोमा केला होता. स्वत: नोकरी करत असल्यामुळे स्वतंत्र विचारांची होते. जात हाही घटक महत्त्वाचा नव्हता. प्रेमविवाहालाही घरातून विरोध नव्हता. ‘तू काही ठरवलं आहेस की मी बघू’ असं वडिलांनी विचारलंही. मी काहीच ठरवलं नव्हतं. मग वडिलांच्या मित्रांच्या ओळखीतून चंद्रकांत गवाणकर यांचं स्थळ आलं. आम्ही साधारण सप्टेंबरच्या अखेरीस भेटलो. दोघांनीही एकमेकांना पसंत केलं, घरातल्या घरातच साखरपुडा झाला आणि १४ नोव्हेंबर १९६८ रोजी आमचं लग्न झालं.’’

चंद्रकांत गवाणकर सुलभाला भेटायला आले तेव्हा त्यांच्याही अपेक्षा काहीशा सुलभासारख्याच होत्या. ‘‘मला सुशिक्षित मुलगीच हवी होती. बुद्धीनं विचार करणारी, माझ्याशी चार विषयांवर बोलू शकणारी मुलगी पत्नी म्हणून मिळावी अशी माझी अपेक्षा होती. दागिन्यात रमणारी, पारंपरिक वळणाने घर राखणारी, संसार करणारी मुलगी मला नको होती. सुदैवानं मला भेटलेली पहिलीच मुलगी माझ्या अपेक्षेत बसली. माझ्या घरी आई-वडील, माझा भाऊ आणि मी असे चौघे होतो. माझ्या चुलत्यांचं घरही शेजारीच होतं, तिथेच माझी आजी होती. एक प्रकारे संयुक्त कुटुंबच होतं आमचं. मी स्वत: आर्किटेक्ट आणि चार्टर्ड व्हॅल्युअर म्हणून खासगी प्रॅक्टिस करत होतो. मी वसईतला पहिला आर्किटेक्ट होतो. मी आणि सुलभा (आताची वीणा) भेटलो तेव्हा पहिल्या भेटीत आम्ही माधव आचवल यांच्या ‘किमया’ पुस्तकाबद्दल बोललो. ‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकाविषयीही बोललो. आम्हाला पत्रिका-कुंडली यामध्ये काहीही रस नव्हता. आम्ही एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करत होतो त्यामुळे लग्नाचा निर्णय घेतला. १९६८ मध्ये तसंही लग्नामधील जेवणावळींवर बंदी होती. आम्ही साध्या पद्धतीने पण वैदिक विवाह केला.’’ लग्न झाल्यानंतर वीणाला स्वाभाविकच औरंगाबादमधली नोकरी सोडावी लागली. ‘‘खरंतर त्या नोकरीमुळे मला खूप काही मिळालं. मी खूप पुस्तकं वाचली. तिथे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमधली विविध साहित्य प्रकारातली पुस्तकं होती. काही दर्जेदार कादंबऱ्या, कथा, कविता मी तेव्हा वाचल्या. पण माझा खरा ओढा हा चरित्रात्मक पुस्तकांकडेच होता. मला प्रवासवर्णनंही वाचायला आवडायची. मात्र, खरं प्रेम चरित्र वाचनावरच. वसईला आल्यानंतर मला मुंबईमधल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये नोकरी मिळू शकली असती. पण अंतर जास्त होतं आणि आर्थिकदृष्टय़ा नोकरीची गरज नव्हती. त्यामुळे मी नोकरी न करता चंद्रकांतना त्यांच्या कामात मला जमेल तशी मदत करायला लागले. मी जवळपास १९६८-७६ हा काळ निव्वळ गृहिणीच होते. या काळातच मुलं झाली. पण मला वाचनाची नितांत आवड असल्यामुळे मी सकाळची कामं आटोपली की वाचत बसायचे. मुलं शाळेत गेल्यानंतर हळूहळू थोडं लिखाण सुरू केलं. माझ्या सासऱ्यांना त्याचं कौतुक होतं. १९७५-७६च्या सुमाराला मी ‘काव्‍‌र्हर’वर काम सुरू केलं. आधी आवर्जून लिहायचा विचार नव्हता. मी त्याच्याविषयी वाचत गेले आणि त्याच्या नोट्स काढत गेले. पण ते सर्व हस्तलिखित खूप विस्कळीत स्वरूपाचं होतं. अखेर इतकी टिपणं काढून झाली होती की मी ते व्यवस्थित लिहून काढायचं ठरवलं. ते हस्तलिखित तयार झालं तेव्हा आपण इतकं लिहिलं आहे यावर माझा विश्वास बसेना. साधारण तीनएक वर्ष हे काम सुरू होतं. मग ते ‘माणूस’च्या दिवाळी अंकात छापलं. त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की मग त्याचं पुस्तक करण्याचा निर्णय झाला आणि १९८० मध्ये ‘एक होता काव्‍‌र्हर’ वाचकांच्या भेटीला आलं. तेव्हा माझे सासरे असते तर त्यांना माझं खूप कौतुक वाटलं असतं.’’

वाचन आणि नंतर लेखन करण्यासाठी सासरी वीणाला पुष्कळ वेळ मिळत होता. ज्या काळात अधिकतर स्त्रिया गृहिणी म्हणून जगत होत्या तेव्हा ही वेगळी वाट कशी चोखाळली? त्याबद्दल थोडंसं चंद्रकांत सांगतात की, ‘‘बऱ्याचशा गृहिणींना स्वयंपाकघरामध्ये खूप काम असतं. स्वयंपाकाच्या नाना तऱ्हा, त्याच्या रेसिपी, देवधर्म, कुळाचार यांमध्ये स्त्रियांचा बराचसा वेळ जातो. आमच्या घरात यापैकी बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या. माणसाला भूक लागते म्हणून खायला लागतं. त्याप्रमाणे आपण स्वयंपाक केला पाहिजे, इतकाच विचार आमच्या घरात असायचा. आम्ही कोणते देवधर्म, कुळाचार वगैरे काही पाळत नाही. स्वयंपाकाच्या बाबतीतही अमुक एक पदार्थ कसा करायचा, त्यामध्ये आधी हिंग घालयचं की जिरं याबद्दलच्या गप्पांमध्ये वीणाला काहीच आणि कधीच रस नव्हता. त्यामुळे तिचा पुष्कळ वेळ वाचायचा. वेळेचं व्यवस्थित नियोजन केल्यामुळे वाचन-लेखनाला वेळ मिळाला. दुसरं म्हणजे मुलांनी-मोठी मुलगी शीतल आणि मुलगा अनुप यांनी लहानपणापासूनच आईला वाचताना आणि लिहिताना पाहिलं होतं. त्यांच्या अनेक मित्रांच्या आया गृहिणी असायच्या, त्या घरामधील निरनिराळ्या कामांमध्ये व्यग्र असायच्या. काही मित्रांच्या आया नोकरी करायच्या, तशी आपली आई वाचते-लिहिते. लिखाण-वाचन हेच आईचं काम आहे असंच त्यांना वाटत होतं. त्यामुळे मुलांनाही त्याचीच सवय होत गेली होती, त्यामुळे ती तिच्या वाचन-लेखनात असेल तर मुलं तिच्या कामात व्यत्यय आणायचे नाहीत. एकंदर घरालाच तसं वळण पडलं होतं. शिवाय मलाही वाचनाची खूप आवड होती. मुलांना घरामध्ये सतत पुस्तकं दिसायची, बाबा आणि काकाही वाचायचे. त्यामुळे मग मुलांनाही वाचनाची आवड लागली. त्यातच ‘काव्‍‌र्हर..’ वाचून अनेक वाचकपत्रं यायला लागली. हे सगळं बघतच मुलं मोठी होत गेली.’’

हाच धागा पकडून वीणाताई सांगतात की, ‘‘आईचं वाचन म्हणजे वेळ घालवण्यासाठी काहीतरी वाचलं असं नाही, हे मुलांना समजू लागलं होतं. वाचनाला घरात किंमत होती, आदर होता. त्यापूर्वीही सासू-सासरे असताना त्यांनीही माझ्याकडून फार गृहकृत्यदक्षतेची किंवा इतर कोणत्या अपेक्षा ठेवल्या नाहीत. माझं चुलत सासर शेजारीच होतं. पण त्यांनीही कधी ढवळाढवळ केली नाही. ‘काव्‍‌र्हर’नंतर दुसरं आणि मग तिसरं पुस्तक आलं. आणि मग मुलांना माझ्या कामाबद्दल नीट कळायला लागलं. सुदैवानं आमच्या घरात कामाचं वाटप करताना लिंगभेद व्हायचा नाही. हे काम बाईचं आणि हे पुरुषाचं असा भेदभाव आम्ही कधी करत नव्हतो, मुलांनाही ती सवय लागली. ती लहान होती तेव्हा, म्हणजे चौथीला जाईपर्यंत मी रोज सकाळी सहा ते सात-साडेसात असा त्यांचा अभ्यास घ्यायचे. एकदा त्यांना अभ्यासाची सवय लागल्यानंतर पुढे त्यांची ती अभ्यासाला बसायला लागली. मला त्यासाठी वेगळं काही करावं लागलं नाही. सुदैवानं मुलं चांगली शिकली, आपापल्या क्षेत्रात चांगलं काम करत आहेत. अजूनही दोघांचीही मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधील गंभीर पुस्तकं वाचायची सवय कायम आहे. मी पुस्तकं लिहीत असताना माझ्या पहिल्या, दुसऱ्या ड्राफ्टचं वाचन करताना मुलांशी चर्चा व्हायची. त्यांच्याशी बोलण्यातूनही मला अनेक विषय, संकल्पना कळत गेल्या, अजूनही कळतात.’’

‘‘वीणाला तिच्या वाचन-लेखनाचा काही फायदा झाला आणि काही तोटाही झाला. खास बायकांचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विषयांमध्ये वीणा गप्पा मारायची नाही, तिचा तो पिंड नव्हताच. आमच्या परिसरात ती ‘वाचणारी बाई’ म्हणून प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे तिला मंदिरात, भिशी पाटर्य़ाना किंवा उगाच गप्पा मारायला या म्हणून कोणी बोलवायचं नाही. ती इतरांपासून वेगळी पडत गेली. त्याचा थोडासा तोटा असतो, पण त्यामुळे तिला तिच्या कामासाठी खूप वेळही मिळाला हा महत्त्वाचा फायदा होता. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे असता तेव्हा तुम्हाला तुमच्या कामावर जास्त लक्ष केंद्रित करता येतं, वीणाचंही तसंच झालं. काही वाचलं की आम्ही एकमेकांशी चर्चा करायचो, पण तिच्या लेखनामध्ये माझा फारसा वाटा नसायचा. तिने मराठी विषय घेऊन बीए केलं होतं. माझी विज्ञान शाखा होती. त्यामुळे तिला कधीतरी तिच्या लेखनात काही माहिती हवी असते, एखादं अशास्त्रीय विधान आपल्याकडून केलं जाऊ नये यासाठी ती काळजी घेत असते, तेवढय़ापुरताच माझा तिला उपयोग होतो. तिनं एरवी काही मत विचारलं तर मी सांगतो. पण माझा तो प्रांत नाही. एरवी मला ड्राफ्ट वाचण्यात फारसा रस नसतो. अनेकदा मी अंतिम हस्तलिखितही पाहिलेलं नसायचं. थेट पुस्तकच बघायचो. मी अनेकदा आम्हा दोघांना ‘कागदोपत्री जगणारी माणसं’ म्हणतो. माझे सर्व आराखडे कागदावर असायचे आणि वीणाचं लिखाणही कागदावरच असायचं.’’

या कागदोपत्री जगणाऱ्या माणसांना एकत्र बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे तर्क, असं वीणा मानतात. ‘‘चंद्रकांत तर आर्किटेक्ट आहेत. त्याशिवाय बांधकामाचं मूल्यांकन करतात. त्यांच्या कामासाठी तर्क आवश्यक असतो. मी बहुतांशी चरित्रलेखन केलं आहे. त्यामध्ये कल्पनाविस्ताराला वाव नसतो. आहे ती तथ्यं समजून घ्यायची, काही ठिकाणी तथ्य उपलब्ध नसली तरी तर्काने निष्कर्ष काढायचा, असं माझं लिखाण असतं. तिथे भाबडेपणा नसतो. हे तर्क जर आपल्या आयुष्यात असेल तर ते बरचसं सोपं होतं. आपल्या खाण्यापिण्यात, उठण्या-बसण्यात प्रत्येक ठिकाणी तर्क असतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा तर्कशुद्ध शेवट आपण करू शकतो. त्यामुळे जगण्यामध्ये सहनशक्ती हवी की दुसऱ्याला समजून घेण्याची ताकद हवी हा मुद्दाही तर्कावर सोडवता येतो. सहनशक्ती कधी ना कधी संपतेच, उलट दुसऱ्याला समजून घेण्याची सवय लागली की ती अधिकाधिक समृद्ध होत जाते. त्याला अखेर नसते. माझे आणि चंद्रकांतचे स्वभाव दोन टोकाचे आहेत. तिथे आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे गोष्टी सोप्या झाल्या.’’ तर्काचाच हा मुद्दा पुढे नेत चंद्रकांत गवाणकर त्यांच्या मुलाच्या लहानपणचा एक किस्सा सांगतात. ‘‘अनुपला दिवाळीमध्ये फटाके हवे होते. फटाक्यांमुळे उगाच आवाज होतो, प्रदूषण होतं हे त्याला सांगूनही पटलं नसतं. अखेर मी त्याला माझ्या पद्धतीने समजावून सांगितलं. त्याला मी एक ५०ची नोट दिली आणि सांगितलं की ‘शेजाऱ्यांनी फटाके वाजवले की त्याचा आवाज येईल तो तू ऐक, आणि ही ५०ची नोट पणतीवर धरून जाळून टाक.’ त्याला ते पटलं नाही, तेव्हा मी त्याला सांगितलं, ‘तसंही फटाक्यांनी फक्त आवाज आणि धूरच येणार आहे. ते फटाके तू पैसे खर्च करून आणणार आहेस. थोडक्यात त्या पैशांचा तू धूर आणि आवाज करणार आहेस. त्याऐवजी पैसे थेट जाळून टाक आणि फटाके आणूच नकोस.’ त्याला माझा मुद्दा लक्षात आला, पण पैसे पेटवणं पटलं नाही तेव्हा मी त्याला ते पैसे बँकेत ठेवायला सांगितले. तेव्हापासून त्याला पैशांच्या बचतीची सवय लागली.’’ तर्काने जगणाऱ्या या जोडप्याच्या घरी येणाऱ्या-जाणाऱ्यांचं स्वागत दारावरील ‘या..’ पाटीने होतं. येणाऱ्या-जाणाऱ्याला बौद्धिक आनंदाची मेजवानी मिळेल याची हमी घेतली जातेच जाते.

निमा पाटील

nima_patil@hotmail.com

 

First Published on December 16, 2017 5:07 am

Web Title: the love story of veena and chandrakant gavankar