नात्यामध्ये मैत्री असली की दोघांनाही आपापलं व्यक्तिमत्त्व स्वतंत्र राखत उत्तम सहजीवन जगता येतं, हे राज्याच्या अबकारी विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशी आणि त्यांचे उद्योजक पती आशुतोष पंडित यांच्या सहजीवनावरून लक्षात येतं. अश्विनी आशुतोषकडून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या, तर अश्विनीच्या अनेक गुणांचे आशुतोषना कौतुक आहे..

ठाण्याच्या जिल्हाधिकारी असताना भिवंडीमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई करत अनेक बांधकामे जमीनदोस्त, ठाण्यातल्या वाळूमाफियांविरोधात धडक कारवाई, कंट्रोलर रेशनिंग ऑफिसर असताना ठिकठिकाणी कारवाई करून तब्बल ७५० कोटींचा बेकायदेशीर साठा जप्त, २००६ मध्ये आयएएस सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर ११ वर्षांच्या कालावधीत ११ वेळा बदली.. ‘‘अश्विनीच्या कामामध्ये आतापर्यंत अनेकदा आव्हानात्मक परिस्थिती उद्भवली. खरं सांगायचं तर ती स्वत: खूप कणखर आहे. मी फक्त काहीही झालं तरी मी तुझ्याबरोबर आहे, असा विश्वास तिला देत असतो. बाकी मी तिच्या कामापासून अलिप्त असतो.’’ सध्या राज्याच्या अबकारी विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ. अश्विनी जोशी यांचे पती आशुतोष पंडित यांनी त्यांच्या सहजीवनाचं सूत्र थोडक्यात सांगितलं.

Jupiter transits in Taurus sign
वृषभ राशीत गुरुचा प्रवेश होताच निर्माण होईल कुबेर योग! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळेल अमाप पैसा!
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

अश्विनी जोशी २००६ बॅचच्या आयएएस ऑफिसर, तर आशुतोष पंडित यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. अश्विनी मूळच्या चिपळूणच्या, तर आशुतोष सिंधुदुर्गचे. दोन्ही कुटुंबे कोकणातली. अश्विनी यांचे आईवडील दोघेही डॉक्टर, तर आशुतोष यांचे वडील डॉक्टर होते. दोन्ही कुटुंबे एकमेकांच्या परिचयाची. त्यातूनच भेटी वाढत गेल्या आणि प्रेमात पडून दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. २०१० मध्ये लग्न झालं तेव्हा आशुतोष स्वत:च्या व्यवसायात स्थिरावत होते. त्यांची भोर, वेंगुर्ला या ठिकाणी रिसॉर्ट्स आहेत. सीएसआरअंतर्गत आतापर्यंत ६५० शाळांमध्ये त्यांनी लहान विज्ञान केंद्रं उभारून दिली आहेत.

अश्विनी यांची कारकीर्द कशी असणार आहे याची चुणूक आशुतोष यांना या नात्याच्या सुरुवातीलाच आली. साखरपुडा झाला तेव्हा अश्विनी मुंबई उपनगर जिल्ह्य़ाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी होत्या. साखरपुडा झाल्यानंतर २० दिवसांमध्येच त्यांची बदली झाली आणि अकोल्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर त्या रुजू झाल्या. ‘‘त्या वेळी आशुतोष यांचं पुणे जिल्ह्य़ातल्या भोर इथं रिसॉर्टचं काम सुरू होतं. त्यामुळे आशुतोष पुण्याला राहायचा आणि मी अकोल्याला. राज्याच्या दोन टोकाला आम्ही दोघे होतो. त्यानंतर माझी बदली सिंधुदुर्गला झाली; पण सुरुवातीची दीड-दोन वर्षे ‘लाँग डिस्टन्स मॅरेज’चीच होती. सुरुवातीला थोडं कठीण गेलं, सासरच्यांनाही सवय व्हायला वेळ लागला, पण त्यांनी सांभाळून घेतलं. पोस्टिंगच्या ठिकाणी मी एकटीच राहिले.’’ नात्यांमध्ये भावनिक गुंतागुंत न वाढवता शक्यतो व्यावहारिक दृष्टिकोन ठेवण्याच्या सवयीतून अश्विनी यांनी तो निर्णय घेतला.

ठाणे, भिवंडीमध्ये वाळूमाफिया, अतिक्रमणा विरोधात केलेल्या कारवाया यांच्यामुळे अश्विनी जोशी यांचं नाव लोकांना माहिती झालं आहे. ‘‘पण अकोल्यातले दिवसही आव्हानात्मक होते. तिथे तिच्यावर १५६(३) अंतर्गत गुन्हा दाखल झाला, त्याविरोधात तिने नागपूर उच्च न्यायालयात लढा दिला, त्यानंतर तिच्यावरचा हा गुन्हा रद्द झाला. अकोल्यामधल्या या घडामोडींमुळे तो काळ थोडा तणावातच गेला; पण अश्विनीची काही चूक नव्हती हे माहिती असल्यामुळे आम्ही लढायचं ठरवलं.’’ आशुतोष सांगतात, ‘‘अश्विनीची कामामधली निष्ठा मला माहिती आहे. दिलेली लक्ष्ये  पूर्ण करणं, लोकांकडून काम करवून घेणं हे तिला जमतं. तिला महत्त्वाच्या वाटणाऱ्या मुद्दय़ावर तिला भूमिका घेता येते आणि ती त्यावर ठाम असते. मला तिचं खरंच कौतुक वाटतं आणि तिच्याकडून काही गोष्टी मी शिकलो आहे. उदाहरणार्थ, टीमचं व्यवस्थापन कसं करावं.’’ नात्यामध्ये मैत्री असली की दोघांनाही आपापलं व्यक्तिमत्त्व स्वतंत्र राखत उत्तम सहजीवन जगता येतं. अश्विनीदेखील आशुतोषकडून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या. ‘‘उदाहरणार्थ ‘मनी रोलिंग’. आहे तो पैसा टप्प्याटप्प्याने कसा वापरायचा, कसा वाढवत न्यायचा हे मी त्याच्याकडून शिकले आणि त्याचा वापर माझ्या कामात केला. सरकारी निधीचा पैसा जपून वापरताना शिकलेल्या या कौशल्याचा फायदा झाला. त्याचा दुसरा मला आवडणारा गुण म्हणजे तो कोणालाच नाही म्हणून शकत नाही. सगळ्यांना हो म्हणतो. मला हेवा वाटतो या गुणाचा, पण मी नाही तो अमलात आणू शकत. मी कोणालाही तोंडावर नाही म्हणू शकते.’’

दोन वर्षांनी म्हणजे २०१२ मध्ये अश्विनी यांची मुंबईला बदली झाल्यानंतर खऱ्या अर्थानं सहजीवन सुरू झालं. त्यांच्यावर कंट्रोलर रेशनिंग ऑफिसची जबाबदारी सोपवण्यात आली. २०१३ मध्ये मुलगा अक्षजचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतरही व्यक्तिगत भावनांचा कामावर परिणाम होणार नाही याकडे अश्विनी यांनी लक्ष दिलं. ‘‘अक्षजच्या जन्माच्या वेळी मी सहा महिन्यांची रजा घेतली होती. त्यानंतर कामाला पुन्हा सुरुवात करताना त्याला सांभाळायला घरचंच कुणी तरी हवं असा आग्रह धरला नाही. आपल्याबरोबर काम करणाऱ्या माणसांवर विश्वास टाकायला पाहिजे, असं मला वाटतं. माझे आई-वडील डॉक्टर होते. आई स्त्रीरोगतज्ज्ञ होती. तिला कधीही रुग्णालयात जावं लागायचं. ती घरात आपली आई असली तरी बाहेर खूप महत्त्वाची कामं करत असते, हे तेव्हापासूनच अंगात भिनलं होतं. त्यामुळे मी स्वत: खूप लवकर स्वतंत्र, स्वावलंबी  झाले. त्यामुळे अक्षजच्या बाबतीत मी बाऊ  केला नाही. तो आता साडेतीन वर्षांचा आहे आणि स्वावलंबी आहे. खरा मुद्दा असतो तो आपलं मूल  कोणाला तरी सांभाळायला देण्याचा. त्याला सांभाळणाऱ्यांवर माझा विश्वास असतो. कंट्रोलर रेशनिंग ऑफिसमधून माझी ठाण्याला जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली, तेव्हा तो ९ महिन्यांचा होता. त्या वेळी माझा कार्यालयात बराच वेळ जायचा. त्यामुळे त्याला सांभाळणारे रात्री त्याला घेऊन ऑफिसमध्ये यायचे. त्यामुळे तसा तो माझ्याबरोबर असायचा.’’

याच काळात अश्विनी यांनी धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोठय़ा प्रमाणात कारवाई केली. जवळपास ७५० कोटींचा मुद्देमाल जप्त केला. दीडशेहून अधिक एफआयआर दाखल झाले होते. त्या प्रत्येक छाप्याच्या वेळी त्या सोबत जायच्या. कधी कधी त्यासाठी बाहेरगावीही जायला लागायचं. ‘‘अश्विनीच्या अशा कारवायांबद्दल ऐकलं की मला फार अभिमान वाटतो. ठाण्याची जिल्हाधिकारी म्हणून काम करताना तिने वाळूमाफियांविरोधात कारवाया केल्या. भिवंडीमध्ये मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणं जमीनदोस्त केली. त्या वेळी अनेक जण राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते; पण ती कारवाईला घाबरत नाही. त्यापेक्षा राजीनामा दिलेला बरा असं तिचं मत आहे आणि हा कोणालाही न भिण्याचा स्वभाव आहे, तो ती बदलू शकत नाही. अश्विनी तिच्या हुद्दय़ाला न्याय देते, असं मला वाटतं. आपण योग्य काम केले नाही तर तुम्ही समाजाचं काहीच देणं लागत नाही असा त्याचा अर्थ होतो. समाजाचं काही भलं करायचं असेल तर कोणी तरी हे काम करायलाच हवं. अश्विनी ते करते. आम्हाला कधीकधी तिची काळजी वाटते, पण तो तिच्या कामाचाच भाग आहे.’’ आशुतोष सांगतात.

हा संघर्ष आणि त्याचे राजकीय परिणाम याबद्दल बोलताना अश्विनी सांगतात की, ‘‘सतत संघर्ष केल्यामुळे बदलीही खूप वेळा झाली, पण मला जे योग्य वाटतं ते मी करते, परिणामांची पर्वा करत नाही, मला तडजोड करून जगायला आवडत नाही. तुम्ही तुमच्या कामात चोख असला की तुम्हाला कोणी त्रास देऊ  शकत नाही.’’ अश्विनी यांच्या डॉक्टर वडिलांना राजकीय-सामाजिक पाश्र्वभूमीदेखील आहे. हा लढाऊ  स्वभाव काही प्रमाणात त्यांच्याकडूनच आला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

‘‘महत्त्वाचे निर्णय घेताना राजकीय दबावाचा विचार केला नाही की संघर्ष अटळ असतो. आतापर्यंत त्यांच्या ११ वेळा बदल्या झाल्या आहेत. सतत बदल्या होत असल्यामुळे काही कामं मनासारखी पूर्ण करता येत नाहीत. या गोष्टींचा तात्पुरता त्रास होतो, पण ती त्यात अडकून पडत नाही. मी संवेदनक्षम असलो तरी ती व्यवहारी आहे. नवीन ठिकाणी तिचं काम लगेच सुरू होतं. मागची ओझी वागवत बसत नाही. आपण कायदा, नैतिकता या कसोटय़ांवर बरोबर आहोत ना इतकं ती पाहते. घरामध्ये आमच्या दोघांमध्ये तिच्या कामाबद्दल चर्चा होते, पण ती कामाचे ताणतणाव घरी घेऊन येत नाही. घरामध्ये एक पत्नी, आई म्हणून ती वेगळी असते.’’ आशुतोष सांगतात. अश्विनी सांगतात की, ‘‘आता या सगळ्याची सवय झाली आहे. आपण ‘सिस्टीम’च्या बाहेर असतो, तेव्हा आपल्याला काही माहिती नसते. आतमध्ये आल्यानंतरच त्याचे कच्चे आणि पक्के दुवे समजतात. लोकांसाठी काम करायचं असेल तर संघर्ष आलाच. एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की, तुम्ही लोकांसाठी काम करत असलात तरी, संघर्षांच्या काळात त्यांच्यापैकी प्रत्येक जण तुमच्या बाजूने उभा राहणार नाही किंवा भांडणार नाही. त्यामुळे आपण ठाम राहणं महत्त्वाचं असतं.’’

‘‘अश्विनीची मला आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे तिचा सर्जनशीलतेवर भर असतो. तिनं ठाणे आणि मुंबईचं अंतरंग उलगडून दाखवणारं कॉफी टेबल बुक तयार केलं. तिला अनेक निरनिराळ्या कल्पना सुचतात. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सीईओ असताना तिने तिथल्या स्थानिक ग्राम पंचायतींना ‘वॉटर स्पोर्ट्स’साठी लागणारी उपकरणे उपलब्ध करून दिली. ठाण्यात टाऊन हॉलच्या नूतनीकरणाचं काम ३ महिन्यांमध्ये पूर्ण केलं. सामाजिक काम करणाऱ्या लहानमोठय़ा संस्थांना त्याचा खूप चांगला फायदा झाला. एरवी बाहेर २५ हजार रुपये भाडं देऊन कार्यक्रम करावे लागायचे, इथं फक्त अडीच हजार रुपये द्यावे लागतात.’’

‘‘वैयक्तिक जीवनामध्ये सांगायचं तर दोघांचाही देवावर विश्वास आहे. घरात रोज पूजा होते. गणपतीचे पाचही दिवस आम्ही सावंतवाडीला असतो. मला खरेदीची आवड आहे. ऑफिस इंटीरियरसाठी मीच खरेदी करते. दोघांनाही, वाचनाची आवड आहे, आशुतोषला फोटोग्राफी आवडते. निवांत वेळामध्ये शास्त्रीय संगीत ऐकायला आवडतं. वीकएन्डला बाहेर जातो. जुने मित्रमैत्रिणी अजूनही संपर्कात आहेत. त्यांच्याबरोबर असताना मी आयएएस वगैरे काही नसते, ते मला मूळ रूपात ओळखतात. माझ्यासाठी ते महत्त्वाचं असतं.’’ गुंतागुंतीच्या आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा कुठून मिळते त्याची थोडक्यात माहिती देताना अश्विनी आयुष्यात मैत्रीचं मोलही सांगतात.

निमा पाटील

nima_patil@hotmail.com