वेणूताईंना मूल होण्याची शक्यता नाही, ही गोष्ट घरातील वडीलधाऱ्यांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी ‘तू दुसरे लग्न कर. तुला उभे आयुष्य घालवायचे आहे,’ असा ससेमिरा यशवंतरावांमागे सुरू झाला. हा ससेमिरा एकदा कायमचा संपवावा म्हणून यशवंतरावांनी घरातल्या सर्वाना एकत्र बोलावून, ‘मी वेणूबरोबरच आयुष्य काढणार आहे. या घरात पुन्हा माझ्या दुसऱ्या लग्नाचा विषय नको,’ असे त्यांना ठासून सांगितले. तरुण वयाच्या यशवंतरावांचे किती उदात्त विचार आहेत हे! वरकरणी जरी हा निर्णय दिसायला छोटा वाटत असला तरी त्यात यशवंतरावांच्या प्रगल्भ विचारांचे पैलू दिसून येतात. आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यातील विलक्षण माणुसकी! ज्या व्यक्तीने अपत्यासाठी छळ सोसला तिला असे वाऱ्यावर सोडणे म्हणजे तिच्यावर आणखीन अन्याय करण्यासारखेच आहे, हे यशवंतरावांनी घरच्यांना समजावून सांगितले.

विस्तारपूर्वक या घटना सांगण्याचा मुख्य उद्देश हा की, देशात बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य फक्त तरुणांतच असते. हे लिहीत असताना व्हॉट्स अ‍ॅपवर एक संदेश हिंदीत वाचनात आला. त्याचा मराठीत सारांश असा : भगतसिंग, सुखदेव, चाफेकर बंधूंसारख्या असंख्य तरुणांना फाशी झाली, किंवा लाठय़ा खाव्या लागल्या. परंतु बोटावर मोजता येतील अशा चार-पाच नेत्यांनी कोणती कवचकुंडले घातली होती, की त्यांना एकही लाठी इंग्रजांकडून खावी लागली नाही. हे नेते म्हणतात, चरख्यामुळे स्वातंत्र्य मिळाले. मग स्वातंत्र्यसंग्रामातील हजारो अज्ञात तरुणांच्या, व्यक्तींच्या बलिदानाचे काय? शेळीला बांधावयाची दोरी म्युझियममध्ये ठेवली गेली; मग भगतसिंग, तात्या टोपे आदी स्वातंत्र्यसैनिकांना दिलेल्या फाशीची दोरी कुठे आहे? इथे थोडेसे विषयांतर करून आजच्या तरुणांना सुचवावेसे वाटते की, आज स्वतंत्र भारतासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. आणि ते दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालले आहेत. हल्ली प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपण सरकारवर टाकतो. ती कोणत्याही सरकारला पेलणे अवघडच आहे. आपल्याकडे बहुतेक शाळा-कॉलेजांमध्ये विचार मंच आहेत. एकत्र बसून विचारांची देवाणघेवाण करावी असे तरुणांना का वाटत नाही? तुमच्या सहकार्याची, हातभार लावण्याची देशाला गरज आहे.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Shash Mahapurush Rajyog
३० वर्षांनी ‘शश राजयोग’ बनल्याने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा
Ram Navami 2024 Shubh Yog
२०२४ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग जुळून आल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? ‘या’ रूपात दिसू शकते श्रीरामकृपा
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

१९४६ साली झालेल्या मुंबई विधिमंडळाच्या निवडणुकीत यशवंतराव कराड मतदारसंघातून निवडून आले. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे कार्य आणि नेतृत्व वाखाणण्यासारखेच होते. त्याची दखल श्रेष्ठींनाही घ्यावी लागली आणि त्यांना गृह खात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरीपद देण्यात आले. यामुळे सुखात भर पडण्याऐवजी यशवंतरावांच्या काळजीत भरच पडली. कारण या पदाच्या विहित कामामुळे यशवंतरावांना मुंबईत, तर दोन्ही वडीलभावांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांची मुले सांभाळण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी वेणूताईंना कराडला राहणे भाग होते. सगळे तारुण्य स्वातंत्र्यसंग्रामात खर्ची पडल्यामुळे यशवंतरावांपाशी उपजीविकेचे काहीच साधन नव्हते. त्यामुळे आर्थिक विवंचना इतकी होत होती, की यशवंतरावांना स्वतंत्र बिऱ्हाड न करता मुंबईत मित्राच्या घरी राहावे लागत होते. अधूनमधून वेणूताईंना पत्र लिहून गरज पडल्यास अमुक व्यक्तीकडून तात्पुरते पैसे आणण्यास ते सांगत असत. १९५२ साली मात्र ते कॅबिनेट मंत्री झाल्यावर बंगला घेऊन स्वतंत्र बिऱ्हाड करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हते. त्यामुळे वेणूताईंना सगळ्यांना घेऊन मुंबईला यावे लागले. त्यावेळी मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते. अधूनमधून घ्याव्या लागणाऱ्या दिल्लीभेटीमुळे तसेच कॉंग्रेस श्रेष्ठींच्या मुंबईभेटीमुळे पक्ष आणि शासन या दोन्ही क्षेत्रांतील यशवंतरावांच्या कुशल, धडाडीच्या कार्याची नोंद दिल्लीदरबारी होत गेली. त्यांची योग्यता लक्षात घेऊन द्विभाषिक राज्याच्या निर्मितीनंतर मुख्यमंत्रिपदाची धुरा यशवंतरावांच्या खांद्यावर देण्याशिवाय श्रेष्ठींना दुसरा उपाय नव्हता.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशात एक नवीन संस्कृती जन्माला आली. ती म्हणजे मुख्यमंत्रिपद असो वा पंतप्रधानपद; या पदांच्या योग्यतेच्या अन्य व्यक्तीही त्याकरता इच्छुक असतात. पद मिळाले नाही की त्यांची नाराजी सुरू होते आणि मग या पदांवरील व्यक्तीच्या कामांमध्ये अडथळे कसे निर्माण होतील याचीच काळजी (?) अशा व्यक्ती घेत राहतात. मोरारजी देसाई यांच्या कारकीर्दीत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ दडपण्यासाठी अनेकदा लाठीमार आणि गोळीबार करण्यात आला होता. त्यांत १०५ जणांचे नाहक बळी गेले. परंतु त्यामुळे ही चळवळ तर दडपली गेली नाहीच; उलट तिने उग्र रूप धारण केले. एवढेच नव्हे तर त्यामुळे मोरारजी देसाईंना दिल्लीत जावे लागले. द्विभाषिक राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी यशवंतरावांची निवड करण्यात आली. परंतु या पदासाठी योग्य आणि इच्छुकही असलेले भाऊसाहेब हिरे यांनी आपल्याला मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने यशवंतरावांबाबत घृणास्पद प्रचार केला. यशवंतरावांचा मोठेपणा इथेही दिसून आला. त्यांनी भाऊसाहेबांना भेटून त्यांचा राग दूर करण्याचा खूप प्रयत्न केला. तसेच त्यांना कधीही आपला शत्रू न मानता मित्रत्वाच्या नात्यानेच त्यांनी वागविले. मात्र, खेदाची गोष्ट अशी की, भाऊसाहेबांच्या मनातील यशवंतरावांबद्दलचा राग कधीच गेला नाही. एक मात्र खरे की, त्यांनी त्यानंतर यशवंतरावांच्या कामामध्ये कधी अडथळे निर्माण केल्याचेही दिसले नाही.

१ नोव्हेंबर १९५६ रोजी यशवंतरावांनी द्विभाषिक मुंबई राज्याची सूत्रे हाती घेतली. १५ मंत्री आणि आठ उपमंत्र्यांसह नवी राजवट सुरू केली. आपली वाटचाल अवघड आहे याची यशवंतरावांना पूर्ण कल्पना होती. प्रत्यक्षात वरकरणी जरी ती चित्तवेधक वाटत असली तरी कितीतरी गुंतागुंतीची, तातडीने सोडवावे लागणारे अनेक प्रश्न असलेली, दोन्ही राज्यांत अनेक विचारसरणींची, संस्कृतीची माणसे असणारी होती. यशवंतरावांना तोवर केवळ पश्चिम महाराष्ट्रच माहीत होता. परंतु आता नवीन राज्यात समाविष्ट झालेला मराठवाडय़ातील काही भाग, विदर्भ, कच्छ हे प्रदेश सर्वच दृष्टीने अपरिचित होते. थोडक्यात सांगायचे तर यशवंतरावांची अवस्था लग्न होऊन नवीन घरात आलेल्या वधूसारखी झाली होती. या सगळ्या गोष्टींची पुरेपूर कल्पना दिल्लीतील श्रेष्ठींनाही असल्याने त्यांनी यशवंतरावांची निवड केली होती. सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत आजवर वास्तव्य राहिलेल्या यशवंतरावांना हिमालयाइतकी मोठी जबाबदारी पार पाडायची होती.

यशवंतरावांचे विचार आदर्शवादी होते. म्हणूनच इतिहास आणि परंपरा यांच्या संयोगातून मुंबई-महाराष्ट्र हे एक महान आणि समृद्ध असे राज्य जन्माला यावे असे त्यांना वाटत होते. सामाजिक, सांस्कृतिक सोयीसुविधा, तसेच राष्ट्रीय विकासाच्या कामांच्या बाबतीत मुंबई राज्य नेहमीच अग्रेसर राहिले होते. ते तसेच राहावे यासाठी झटणे क्रमप्राप्त होते. परिस्थितीच्या चक्रव्यूहात शिरायचे ते त्याचा भेद करण्यासाठीच- असा त्यांचा खंबीर मन:पिंड बनला होता. स्वातंत्र्यसंग्रामातही त्यांची हीच भूमिका राहिली होती. या त्यांच्या कणखरपणाचा अनुभव मला अनेकदा दिल्लीत आला. नव्या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी ते नेहमीच सज्ज असत.

त्यांना महत्त्वाच्या दोन गोष्टी पार पाडायच्या होत्या. विदर्भ, मराठवाडा, गुजरात येथून आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची खात्यामध्ये व्यवस्था लावायची होती. १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत तेव्हा नवीनच जन्माला आलेल्या गुजरात व महाराष्ट्रातील जनता, संयुक्त महाराष्ट्र समिती व महागुजरात परिषद या भरभक्कमपणे आणि ठामपणे उभ्या राहिलेल्या शक्तींचा त्यांना पाडाव करायचा होता.

राम खांडेकर

ram.k.khandekar@gmail.com