28 February 2021

News Flash

बृहस्पती

नरसिंह रावांच्या जीवनाचे पैलू समजावून सांगणे वा ते अवगत करून घेणे फार अवघड आहे

नरसिंह राव

राम खांडेकर

कराड येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील भाषणात नरसिंह राव म्हणाले होते : ‘माझा आणि मराठीचा संबंध जन्मापासून नसला तरी कौमार्योत्तर वयापासून जवळचा राहिला आहे. शिक्षणासाठी जेव्हा मी पुण्याला आलो तेव्हा दोन महायुद्धे जोरात चालली होती. एक तर विश्व महायुद्ध सगळीकडे माजले होते आणि दुसरे म्हणजे अत्रे-फडके यांचे साहित्यिक महायुद्ध ‘नवयुग’ व ‘झंकार’ या अस्त्रांमार्फत महाराष्ट्रात तितक्याच जोरात सुरू होते!’

नरसिंह रावांनी ‘स्किल मॅनेजमेंट’चे बाळकडू लहानपणीच घेतले होते. त्याचा प्रभाव विद्यार्थिदशेपासूनच दिसून येऊ लागला होता. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ‘स्किल मॅनेजमेंट’ म्हणजे काय?

स्किल मॅनेजमेंट म्हणजे- ‘मनुष्याचा सर्वात अमूल्य ठेवा आहे.. वेळ- जो अतिशय मर्यादित असतो. एकदा तो गेला की कधीच परत येत नाही. मनुष्याची जीवनशैली, त्याच्या जीवनाचा स्तर या अमूल्य संसाधनाचा तो कसा उपयोग करू शकतो यावर अवलंबून असतो. वेळेची बचत करणे शक्य नसते. पण प्रत्येक तासाचाच नाही, तर प्रत्येक मिनिटाचा तो प्रभावशाली रीतीने उपयोग करू शकतो. याचा परिणाम प्रत्येक क्षणी दिसून येतो. उज्ज्वल भविष्यासाठी, प्रगतीसाठी या वेळेचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची गरज असते. मनुष्याची असो वा देशाची; खरी संपत्ती तर वेळच असते. योग्य रीतीने खर्च वा निवेश केलेल्या वेळेचा निश्चित फायदा मिळू शकतो. कमी महत्त्वाच्या व अनावश्यक गोष्टींवर वेळ खर्च न करता हा वेळ योग्य व महत्त्वाच्या कामासाठीच खर्च करीन असा दृढनिश्चय माणसाने केला पाहिजे.

हे समजून सांगण्याचा उद्देश- नरसिंह राव पंतप्रधान झाल्यावर त्यांनी रक्तात भिनलेल्या या स्किल मॅनेजमेंटचा पुरेपूर उपयोग करून अल्पावधीत देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले होते. खेदाची गोष्ट ही, की याची जनसामान्यांना फारशी कल्पना नाही. याचं कारण त्यांच्या कारकीर्दीत वर्तमानपत्रांत याच्या पान-पानभर जाहिराती प्रकाशित झाल्या नव्हत्या, की आकाशवाणी वा दूरदर्शनचा रावांनी त्याकरता उपयोग केला नव्हता! आपण विद्यार्थिदशेतच काळ-काम-वेगाची गणिते सोडवत असतो. परंतु प्रत्यक्ष जीवनात त्याचा आपल्याला विसर पडतो. खेदाची गोष्ट ही, की आमच्या राज्यकर्त्यांनाच वेळेचे महत्त्व कधी पटले नाही किंवा समजले नसावे. कारण ते एक वर्षांचा उल्लेख असा करतात, की जणू काही ते एक दिवसाचाच उल्लेख करताहेत.

नरसिंह रावांच्या जीवनाचे पैलू समजावून सांगणे वा ते अवगत करून घेणे फार अवघड आहे. कारण ते अगणित आहेत. त्यांच्यातील उणिवा शोधून सापडण्याची शक्यता कमीच. नरसिंह रावांना १४ भाषा येत असत. त्यात दक्षिणेतील सर्व, तर चार परकीय भाषांचा समावेश होता. पंतप्रधान असताना एकदा ते परदेश दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांची तेथील पंतप्रधानांबरोबर ‘वन टू वन’- म्हणजे फक्त दोघांचीच बोलणी होती. त्यांचा दुभाषा आला होता, परंतु काही कारणाने तो बैठकस्थळी पोहोचू शकला नव्हता. दुभाषाची खुर्ची रिकामी पाहून त्या देशाचे पंतप्रधान थांबले आहेत, हे ध्यानी येताच नरसिंह राव म्हणाले, ‘‘एक्सलन्सी, प्लीज कॅरी ऑन. आय डोन्ट नीड इंटरप्रीटर. आय कॅन फॉलो अ‍ॅण्ड स्पीक युवर लँग्वेज व्हेरी वेल.’’ खरोखरच नरसिंह रावांनी कधी इंग्रजीत, तर कधी त्यांच्याच भाषेत बोलणी केली होती. दुभाषा उशिरा पोहोचल्याने त्याला बाहेरच थांबावे लागले. नरसिंह रावांना ती भाषा चांगली अवगत होती व चर्चाही यशस्वीरीत्या पार पडल्याचे त्याला कळले तेव्हा तो म्हणाला,  ‘माझ्या पोटावर पाय आणू नका!’ उशिरा पोचण्याचे त्याचे कारण रास्त होते, हे मात्र खरे.

भारतीय संगीताचा नरसिंह रावांचा दांडगा अभ्यास होता. हैदराबादला असताना ते शास्त्रीय संगीत गात. ‘मालकंस’ हा त्यांचा आवडता राग होता आणि ते त्यात पारंगत होते. पंतप्रधानपद गेल्यानंतर त्यांनी संगीताचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यावरील पुस्तके गोळा करण्यास सुरुवातही केली होती. मात्र, न्यायालयीन खटल्यांमुळे ते त्यावर विशेष लक्ष केंद्रित करू शकले नव्हते. संस्कृत भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते. चारही वेदांचा अभ्यास त्यांनी केला होता. राजकारणातच नाही, तर माणसाच्या जीवनात वेदांना महत्त्वाचे स्थान आहे आणि ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत यादृष्टीने त्यांनी त्यांचे भाषांतर करण्याचे ठरवून नागपुरातील एका संस्कृत विद्वानावर हे काम सोपवले होते. त्यांनी ते सुरूही केले होते. हे काम सोपे नव्हते. ते दीर्घकाळ चालणारे होते. पंतप्रधानपद गेल्यानंतर म्हणावे तसे व तितके लक्ष ते त्यावर केंद्रित करू शकले नाहीत. तसेच त्या व्यक्तीलाही काही अडचणी येऊ लागल्या होत्या. त्यामुळे ते काम रेंगाळत चालले होते. पुढे त्याचे काय झाले, हे मात्र कळले नाही.

सर्व विषयांचे सखोल ज्ञान असलेली अशी व्यक्ती भारतीय राजकारणात सत्तेच्या पदावर राहू शकते, यावर कुणाचा विश्वास बसेल का? पण ते सत्य होते. नरसिंह रावांबरोबर काम करत असताना त्यांच्यातील अनेक गुणांची ओळख होऊ लागली. साहजिकच यशवंतरावांप्रमाणेच त्यांच्याही पूर्वायुष्यात डोकावून पाहण्याचा मोह मला आवरता आला नाही. मी ज्या- ज्या वेळी हैदराबादला गेलो, त्या- त्या वेळी त्यांच्या नातेवाईकांकडून वा मित्रांकडून त्यांची माहिती घेत असे. तो जणू माझा छंदच झाला होता. त्यावेळी मला आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक गोष्टी कळल्या. त्यातली एक म्हणजे- सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह सर्वच जण नरसिंह रावांची अनेक विषयांतील विद्वत्ता पाहून त्यांना ‘बृहस्पती’ म्हणून संबोधित असत. राजकारणात वा सत्तेवर असणाऱ्या कोणाला ही वा अशी उपाधी मिळाल्याचे मला तरी आठवत नाही.

नरसिंह रावांचा जन्म आंध्र प्रदेशातील वारंगळ या खेडेगावात झाला होता. त्यांच्या कुटुंबाचा पसारा फार मोठा होता. बहुतेक प्रत्येकाची कमी-जास्त प्रमाणात शेती होती. नरसिंह रावांच्या वडिलांची बरीच शेती होती. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर नरसिंह रावांना जिल्ह्य़ाचे मुख्य ठिकाण असलेल्या गुलशनपूरला पुढील शिक्षणासाठी जावे लागले. नव्या शाळेत जाण्याचा आनंद आता सर्वाना सोडून जावे लागणार, या दु:खामुळे कमी झाला होता खरा; मात्र या शाळेत नरसिंह रावांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळाली. शाळेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात नरसिंह रावांना दरवर्षी वार्षिक परीक्षेत प्रथम, जनरल मेरिट प्राइज, इंग्रजी विषयाचे प्राचार्याचे विशेष पारितोषिक, गणित व विज्ञान तसेच अभिजात भाषेतील पारितोषिके मिळालेली पाहून प्रमुख पाहुणेही प्रभावित होत आणि अनेकदा विनोदाने म्हणत, ‘एवढी बक्षिसे नेण्यासाठी टांगा आणला आहेस का?’

विद्यार्थीजीवनात नरसिंह रावांचा बहुतेक सर्व वेळ शाळा व शाळेतील ग्रंथालय यांतच जात असे. ग्रंथालयात नरसिंह राव विज्ञान व गणित विषयांवरील पुस्तके वाचायची सोडून कोपऱ्यात ठेवलेली राजकीय विषयांवरील पुस्तके वाचण्यात बराच वेळ घालवीत असत. ही बाब ग्रंथपालांच्या लक्षात आली आणि त्यांनी ती प्राचार्याच्या नजरेस आणून दिली. परंतु प्राचार्यानी त्याकडे काणाडोळा केला. या पुस्तकांच्या वाचनामुळे एका क्रांतिकारकाचा जन्म झाला होता. निजाम संस्थानात उर्दू भाषेमुळे शेरोशायरी, कव्वालीचे अनेक कार्यक्रम होत. नरसिंह राव या कार्यक्रमांना आवर्जून जात आणि त्यांचा आनंद घेत. त्यावेळी बहुतेक विद्यार्थ्यांच्या तोंडी ‘कभी वो दिन भी आयेगा, की जब आजाद हम होंगे, यह अपनी जमीन होगी, यह अपना आसमान होगा..’ ही कविता असायची. संस्थानची राजधानी सोडून इतर ठिकाणी कार्यक्रमांत ही कविता म्हटली जात असे. असेच आणखी एक गीत म्हणजे-

‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है

वक्त आने दो बता देंगे तुझे ये आस्मान,

हम अभी से क्या बताएँ क्या हमारे दिल में है’

नरसिंह राव या कवितांमुळे इतके भारावून गेले होते, की देशासाठी प्राणही देण्याची त्यांची तयारी झाली होती. म्हणूनच त्यांनी विद्यार्थिदशेत प्रत्येक क्षणाचा पुरेपूर उपयोग केला. वेळ वाया गेलेला त्यांना अजिबात सहन होत नसे. त्यातून त्यांनी स्किल मॅनेजमेंटच्या वापरास सुरुवात केली.

नेत्यांच्या आत्मचरित्रांतून नरसिंह राव जे शिकले, त्यापैकी ‘जिद्द’ हा गुण त्यांनी अंगी बाणवला होता. एकदा ट्रॅक्टरने शेती नांगरत असताना ट्रॅक्टर बंद पडला. शहरातून मेकॅनिक येऊन तो दुरुस्त करण्यात कमीत कमी चार-पाच दिवस तरी जाण्याची शक्यता होती. शेतकऱ्याला प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. त्यामुळे नरसिंह रावांनी दुरुस्तीचे साहित्य, दोन पेट्रोमॅक्स, खाण्याचे साहित्य व एका मित्राला सोबत घेतले आणि स्वत:च ट्रॅक्टर दुरुस्तीला सुरुवात केली. दोन दिवस अहोरात्र झटून त्यांनी ट्रॅक्टर पूर्ववत सुरू केला. वेळेचे महत्त्व ते जाणून होते. राज्यकारभारातही त्यांचा हा गुण दिसून येत असे.

वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे केम्ब्रिज वा तत्सम विद्यापीठात जाऊन संशोधन करण्याचे राव यांचे स्वप्न अपुरे राहिले. कुटुंबाच्या भरपूर शेतीमुळे उद्भवणारी कोर्टकचेऱ्यांतील प्रकरणे निपटवण्यासाठी त्यांना वकील होण्याच्या दृष्टीने विचार करणे भाग पडले. १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनाचा हैदराबाद संस्थानशी तसा काही संबंध नव्हता; पण नरसिंह रावांसारख्या विद्यार्थ्यांसाठी संस्थानापेक्षा देश महत्त्वाचा होता. म्हणून त्यांनी संस्थानाच्या बाहेर पडून या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. याचा त्यांना असा फायदा झाला की त्यामुळे अनेक पुढाऱ्यांशी त्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटी झाल्या. त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. हे आंदोलन संपल्यानंतर ते संस्थानात परतले. पुढे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्ती आंदोलन सुरू झाले. नरसिंह रावांच्या अंगात ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वेळी सळसळणारे रक्त अजूनही ताजे होते. त्यांनी या आंदोलनात स्वत:ला झोकून दिले. स्वामींजीबरोबर तेही या लढय़ात उतरले. आयुष्याच्या शेवटपर्यंत स्वामी रामानंद तीर्थ यांच्याबद्दलचा आदर त्यांच्या मनात कायम होता. देश स्वतंत्र झाला त्यावेळी नरसिंह राव जंगलात भूमिगत राहून योजना आखत होते. मात्र या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे नरसिंह रावांना संस्थानात महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. इथे त्यांनी संगीत व साहित्याचा आस्वाद घेत महाविद्यालयीन अध्ययन सुरू केले. नरसिंह राव कराड येथे भरलेल्या ७६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील आपल्या भाषणात म्हणाले होते : ‘माझा आणि मराठीचा संबंध जन्मापासून नसला तरी कौमार्योत्तर वयापासून जवळचा राहिला आहे. शिक्षणासाठी जेव्हा मी पुण्याला आलो तेव्हा दोन महायुद्धे जोरात चालली होती. एक तर विश्व महायुद्ध सगळीकडे माजले होते आणि दुसरे म्हणजे अत्रे-फडके यांचे साहित्यिक महायुद्ध ‘नवयुग’ व ‘झंकार’ या अस्त्रांमार्फत महाराष्ट्रात तितक्याच जोरात सुरू होते! पहिले युद्ध न पाहण्यास मिळाल्याची उणीव दुसऱ्या युद्धाच्या जवळच्या अभ्यासाने मी भरून काढली. अनेक ग्रंथ वाचले असते तरी टीकाटिप्पणीच्या कौशल्याबद्दल एवढी माहिती मला लाभली नसती. तेव्हापासूनच माझे मराठीचे शिक्षण सुरू झाले होते. काही अडचणी सोडल्या तर मराठी भाषा कठीण नाही हे लक्षात आले. त्यावेळी माझे मत असे झाले होते की, ‘मराठी इज द मोस्ट अँग्लिसाइज्ड लँग्वेज इन इंडिया.’ आश्चर्य वाटेल ना! इंग्रजीतून मक्खी की मक्खी असा अनुवाद करून जितके शब्द मराठीत आले तितके इतर भाषेत आलेले दिसत नाहीत. ‘मधुचंद्र’, ‘उच्चभ्रू’ यांसारखे शब्द तर गळ्यातच अडकतात.’

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना इतरही विषयांचे ज्ञान प्राप्त करणारे विद्यार्थी क्वचितच आढळतात. मराठीबरोबरच नरसिंह रावांनी पर्शियन आदी भाषांचाही अभ्यास केला. आश्चर्य वाटेल, पण हरि नारायण आपटे यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो!’ या कादंबरीचे तेलुगू व मल्याळी भाषेत त्यांनी भाषांतर केले होते. याच वयात त्यांनी अनेक साहित्यिक व संगीतज्ञांच्या भेटींतून एक नवीन ऊर्जा स्वत:त भिनवली होती. पुढे वकिलीच्या शिक्षणासाठी त्यांना नाइलाजाने नागपूरला जावे लागले तरी त्यांना पुण्याचा मोह शेवटपर्यंत सुटला नव्हता, हे खरे!

ram.k.khandekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 1:01 am

Web Title: author ram khandekar article on narasimha rao
Next Stories
1 सत्तेच्या पडछायेत.. : नागपूरच्या विकासाचे प्रणेते
2 सत्तापालटानंतर..
3 अखेरचे पर्व
Just Now!
X