राम खांडेकर

भारतात जादूच्या कांडीप्रमाणे झालेली सर्वागीण प्रगती पाहून बहुतेक देशांतील प्रमुखांना आश्चर्य वाटले. नरसिंह रावांचे नाव ते आदराने घेऊ लागले. विकसनशील देशांचे पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष नरसिंह राव जेव्हा त्यांच्या देशात जात तेव्हा प्रोटोकॉल बाजूस सारून विमानतळापासून त्यांच्या सोबत असत.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
eid al fitr 2024 chand raat ramadan eid 2024 know the date and timings of eid al fitr moon sighting
१० की ११ एप्रिल, भारतात कधी दिसणार ‘ईद’चा चंद्र? भारतासह परदेशात कशाप्रकारे ठरवली जाते ‘ईद’ साजरी करण्याची तारीख?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

काही दिवसांनंतर सुरू झाला सरकारी यंत्रणेचा त्रास. माझे पंतप्रधानांशी असलेले जवळचे संबंध लक्षात घेऊन माझ्या व माझ्या पत्नीच्या सुरक्षेच्या दृष्टीने इंटेलिजन्स ब्युरोची डोकेदुखी सुरू झाली होती. त्यांच्या डायरेक्टरांनी पंतप्रधानांशी चर्चा करून मला व माझ्या पत्नीला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. यासोबतच सरकारी क्वॉर्टरचे अलॉटमेंट ज्या नागरी विकास मंत्र्यांकडे होते त्यांना जेव्हा कळले, की मी १९६३ पासून वन बीएचकेमध्ये बाबू कॉलनीत राहतो, तेव्हा त्यांनी सर्व दृष्टीने योग्य असे माझ्या अर्हतेप्रमाणे तीन-चार क्वॉर्टर्स शोधून मला त्यातून एक निवडण्याची विनंती केली, जेणेकरून त्या जागेची योग्य ती दुरुस्ती करून मला राहायला जाता येईल. दोन्ही विभागांचा माझ्यामागे लागलेला ससेमिरा पाहून मी पत्नीला याबाबत विचारले. तिने चिडून मला सांगितले की, ‘यापुढे माणूसच काय, सरकारची एक पिनही माझ्या घरात नको. जशी आहे तशी मी इथेच, यातच सुखी आहे. तुमच्या नोकरीत मी ढवळाढवळ करत नाही, तशीच तुम्ही माझ्या संसारात करू नका.’ त्यानंतर तिने एकही सरकारी गोष्ट नियमाप्रमाणे मिळत असूनही घरात येऊ दिली नाही. ती स्टाफ कारमध्येही कधीच बसली नाही. रविवारी मी घरी असे. त्या दिवशी संध्याकाळी कोणाकडे जायचे असेल तर आम्ही बसने किंवा रिक्षाने जात असू.

वर्ष- दीड वर्षांत माझ्या पंतप्रधानांशी असलेल्या निकटच्या संबंधांची चर्चा व पंतप्रधान माझे ऐकतात, हा भ्रम सर्वत्र पसरला होता. याचा फायदा दिल्लीतील समाजकंटकांनी उचलला. चक्क ‘पीएमओमधून (प्राइम मिनिस्टर ऑफिस) खांडेकर बोलतो आहे,’ असे सांगून  हे लोक सरकारी कामे करून घेऊ लागले. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून पेशंटला व्हीआयपी ट्रीटमेंट घेऊ लागले. काही वेळा पेशंट बरा झाला की डॉक्टर मला फोन करत. मी त्यांना सांगत असे की, तुम्हाला फोन आला तेव्हाच तुम्ही माझ्याकडे फोन करून खात्री करून घ्यायला हवी होती. कारण मी तुम्हाला फोन केला नव्हता. पंतप्रधान कार्यालयाचे नाव घेताच दिल्लीतील सरकारी कर्मचारी घाबरत. एका व्यक्तीने खासगी सचिव रामू दामोदरन यांचे नाव संयुक्त सचिवांना सांगून आपले काम करून घेतले होते. त्यांची खात्री पटावी म्हणून दामोदरन यांचा फोन नंबर दिला होता. फोन हा चार आकडी क्रमांक असलेला फोन असतो. तो केंद्रीय मंत्री, सचिव आणि अगदी आवश्यकता असणाऱ्या मोजक्याच अधिकाऱ्यांकडे असतो. तो माझ्याकडे व खासगी सचिवांकडे ऑफिसमध्ये व घरीही होता. या फोनवरचे संभाषण दुसरा कोणी ऐकू शकत नाही. हा नंबर कोणालाच माहीत नसतो. त्यामुळे खांडेकर व दामोदरन या इतक्या मोठय़ा व्यक्ती आहेत, की त्यांना भेटणे फार अवघड असे लोकांना वाटू लागले.

एवढय़ावरच हे समाजकंटक थांबले नाहीत तर काही जण ‘खांडेकरांकडून तुमचे काम करून देतो, त्यांची माझी चांगली ओळख आहे,’ असे सांगून पैसे घेत. काही खासदारांनी ही बाब माझ्या व पंतप्रधानांच्या नजरेस आणून दिली. पण यावर इलाज काय? एकदा मी दौऱ्यावर असताना केरळच्या राज्यपालांनी दिवसभरात पाच-सहा फोन केले. माझ्या पत्नीने मी साहेबांसोबत दौऱ्यावर असल्याचे सांगितले. रात्री साडेबारा वाजता दिल्लीत परत आल्यावर घरी गेलो तेव्हा पत्नीने ही गोष्ट मला सांगितली. तेवढय़ात केरळच्या राज्यपालांचा फोन आलाच. त्यांचे सचिव फोनवर होते. त्यांनी विचारले, ‘तुम्ही राज्यपालांना फोन केला होता का?’ मी त्यांना म्हणालो, ‘मी दिवसभर दौऱ्यावर आहे.’ ते म्हणाले, ‘मी राज्यपालांना खात्रीपूर्वक सांगितले, की खांडेकर कधी फोन करणार नाहीत. पण त्यांची खात्री पटेना.’ राज्यपाल स्वत: नंतर माझ्याशी बोलले व त्यांनी खात्री करून घेतली, की मी त्यांना फोन केला नव्हता.

माझ्या नावाने फोन कोणत्या कामासाठी केला गेला होता, माहीत आहे? राज्यपालांकडे एका खुन्याची ‘मर्सी पिटिशन’ विचारार्थ गेली होती. त्यावर त्यांना सहानुभूतीपूर्वक विचार करण्यास फोनवर सुचवले गेले होते. हे सगळं पाहिल्यावर  ‘मेरा नाम जोकर’मधील गाण्याची आठवण झाली : ‘ए भाय, जरा देख के चलो, आगे ही नहीं पिछे भी, दाये भी नहीं बाये भी, उपर ही नहीं, नीचे भी..’ या जगात माणसाने चाणाक्षपणेच वावरले पाहिजे. मी पाच वर्षे पंतप्रधानांकडे राहून निष्कलंक राहिलो, ते यामुळेच.

सत्तेवर आल्यानंतर पक्षीय लक्ष्मणरेषा ओलांडून सर्वाना सोबत घेऊन सहकार्याने राज्यकारभार करण्याची नरसिंह रावांची वृत्ती असल्याने त्यावेळी चार राज्यांत भाजपचे, बंगालमध्ये कम्युनिस्टांचे, तामिळनाडूमध्ये जयललितांचे, ९३-९४ मध्ये उत्तर प्रदेशात मायावतींचे सरकार असूनही केंद्र व राज्यांचे संबंध सलोख्याचे राहिले होते. या पाच वर्षांच्या काळात केंद्र सरकारविरुद्ध कोणीही तक्रार केली नाही. एकदा पंतप्रधान राजस्थानातील दुर्गम भागात सार्वजनिक वितरण प्रणालीच्या उद्घाटनासाठी गेले होते. तेथील भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यासंबंधी केंद्र व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसह बैठक सुरू असताना पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना म्हणाले, ‘मीही मुख्यमंत्री होतो. भारत सरकारकडून कसे पैसे मागावे लागतात व मग प्रत्यक्षात किती मिळतात याची मला कल्पना आहे. तुम्ही तसे न करता तुम्हाला खरंच किती पैशाची गरज आहे, हे आताच अधिकाऱ्यांशी चर्चा करून मला सांगा. केंद्रातले अधिकारी माझ्यासोबत आहेत. विचारविनिमय करून निश्चित आकडा सांगा, मी दिल्लीला जाण्यापूर्वी ती रक्कम मंजूर करतो.’

१९९३ मध्ये दिल्लीत भाजपचे सरकार निवडून आले. दिल्लीचे मुख्यमंत्री मदनलाल खुराणा सदिच्छा भेटीसाठी पंतप्रधानांना भेटायला आले होते. नरसिंह राव त्यांना म्हणाले, ‘तुम्ही भाजपचे व मी काँग्रेसचा आहे हे आता विसरा. जनतेने आपल्याला निवडून दिले आहे. त्यामुळे आपण जनतेची कामे करायची आहेत. तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्ही मला येऊन भेटा.’ नंतर मला बोलावून त्यांनी सांगितले, ‘हे जेव्हा वेळ मागतील तेव्हा त्यांना वेळ द्यायची. मला वेळ नसेल तर फोनवर बोलणे करून द्यायचे.’

नरसिंह रावांना आपल्या सहकाऱ्यांबद्दल ते कसेही वागले तरी जिव्हाळा व आपुलकी वाटे. एकदा ममता बॅनर्जी रुग्णालयात दाखल असताना त्यांना भेटण्यासाठी राव गेले होते. ममता बॅनर्जीचा उतावळा स्वभाव रावांना माहीत होता. त्यांनी ममता बॅनर्जीना अधिकारवाणीने सांगितले की, पूर्ण बरे झाल्याशिवाय येथून जायचे नाही. डॉक्टरांनाही त्यांनी तशा सूचना दिल्या होत्या.

लोकशाहीतील एक महत्त्वाचा स्तंभ म्हणजे प्रसार माध्यमे. पण गेली काही वर्षे प्रसार माध्यमांकडेही लोक साशंकतेने पाहू लागले आहेत. दिल्लीतले राज्यकर्ते पत्रकारांना आपल्या पे रोलवर ठेवतात. अर्थात यालाही अपवाद असतात. एका केंद्रीय मंत्र्यांच्या पे रोलवर जवळपास १५० लोक असल्याचे मी ऐकले होते. त्यांचा उपयोग माहिती पुरवणे व त्यांना हवी तशी बातमी छापून आणणे हा असतो. काही पत्रकार विवेकबुद्धी न ठेवता, खरे-खोटे जाणून न घेता बातम्या देत असतात. मी पंतप्रधानांकडे आल्यानंतर तीनएक महिन्यांनी नागपूरच्या एका प्रसिद्ध मराठी वर्तमानपत्रात पहिल्या पानावर चौकटीत दिल्लीच्या वार्ताहराने दिलेली बातमी छापून आली होती. त्यात माझे आणि पूर्वीच्या पंतप्रधानांचे खासगी सचिव आर. के. धवन (मी आर. के. खांडेकर) यांच्यातील साम्य दाखवले होते. माझ्या दाराशी पूर्वीच्या पंतप्रधानांच्या खासगी सचिवांप्रमाणे उद्योगपतींच्या गाडय़ा सकाळपासून उभ्या असतात. तसेच माझा भाऊ- जो मुंबईत रिझव्‍‌र्ह बँकेत मोठय़ा पदावर आहे- त्याच्याकडेही उद्योगपतींची रांग लागते, अशी बातमी छापून आली होती. खरं तर मी सकाळी सव्वासातलाच घर सोडत होतो. तसेच मी राहत असलेल्या बाबू कॉलनीत एकच गाडी मोठय़ा मुश्किलीने उभी राहत होती. दुसरं- माझा भाऊ त्यावेळी गुवाहाटी येथे बदलीवर गेला होता. संपादकांच्या कानावर ही गोष्ट घातल्यावर त्यांनी त्या वार्ताहराला काढून टाकले होते.

काही पत्रकार बातमी देताना विपर्यास करतात. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात. पंतप्रधान महाराष्ट्रात गेले की साहित्यिक, कलावंतांना भेटत असत. एकदा त्यांनी पुण्यात मुक्काम करायचा असल्यामुळे ज्योत्स्ना भोळे व पु. ल. देशपांडे यांना भेटण्याचे ठरवले व तसा निरोपसुद्धा दिला गेला. त्यावेळी पुलंना  कार्यक्रमासाठी मुंबईस जायचे होते. त्यामुळे सुनीताबाईंनी तसे नरसिंह रावांना कळवले. दुसऱ्या दिवशी पुण्याच्या एका प्रमुख वर्तमानपत्रात पहिल्या पानावर बातमी छापून आली- ‘पुलंनी पंतप्रधानांची भेट नाकारली!’ ती बातमी वाचून पुलं व सुनीताबाईंना खूप यातना झाल्या. त्यांनी दोन पानी पत्र लिहून नरसिंह रावांना आपल्या यातना कळवल्या होत्या.  त्याचबरोबर ही बातमी वाचून रावांना झालेल्या त्रासाबद्दल क्षमा मागितली होती. त्यावर नरसिंह रावांनी उत्तर पाठवले.. ‘मीही या वणव्यात गेली अनेक वर्षे वावरतो आहे. मला त्याची सवय झाली आहे. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी पुढील भेटीत तुम्हाला नक्की भेटायला येईन.’ पण तो योग आला नाही.

दिल्लीत एका बडय़ा इंग्रजी वर्तमानपत्राचा फोटोग्राफर होता. त्याची फोटोग्राफी खोडसाळपणाची असे. राष्ट्रपती भवनात दुसऱ्या देशातील प्रमुखांच्या आगमनानिमित्त समारंभ होत असे तेव्हा हा फोटोग्राफर गार्ड ऑफ ऑनरसाठी घोडेस्वार उभे असताना हा घोडय़ांसह मागून फोटो घेत असे. पंतप्रधानांना भेटण्यास अनेकदा शिष्टमंडळे येत. तेव्हा ही मंडळी स्थानापन्न झाल्यावर फोटोग्राफर्सना आत नेण्यात येई. त्यावेळी पंतप्रधानांच्या रिकाम्या खुर्चीचा फोटो घेऊन तो फोटोग्राफर दुसऱ्या दिवशी ‘Waiting for PM’ म्हणून तो छापत असे.

अशा वातावरणातील नोकरी असल्यामुळे माझ्या पत्नीला नेहमी धास्ती वाटत असे. त्यातून ती शंकाखोर झाली होती. पंतप्रधानांबरोबर राज्यांच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री व राज्यपालांकडून पंतप्रधानांना व मी त्यांच्या अतिशय जवळचा म्हणून मला गिफ्ट मिळत असत. परदेश दौऱ्यांत माझा समावेश प्रतिनिधी मंडळात असे. अनेकदा तिथेही गिफ्ट मिळत. ते गिफ्ट माझेच आहे याची खात्री झाल्याशिवाय पत्नी ते उघडत नसे. एखादे वेळी कोणाकडून ते दिले गेले, याचे लेबल नसेल तर तिची खात्री पटवून देताना मला नाकी नऊ येत. मोहात पडून मी नरसिंह रावांचे गिफ्ट तर घरी आणले नाही ना, अशी तिला शंका येई. या संशयग्रस्ततेचा परिणाम होऊन ती आजारी पडली. तिला दवाखान्यात दाखल करावे लागले. पंधरा दिवसांच्या औषधोपचारांनंतर ती बरी होऊन घरी परतत असताना डॉक्टरांनी मला एकांतात सल्ला दिला, की यांना इथल्या वातावरणापासून काही दिवसांसाठी बाहेर घेऊन जाणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी पंतप्रधानांनासुद्धा हे सांगितले व त्यांनीसुद्धा मला हे सुचवले. त्यानुसार आम्ही १०-१२ दिवसांसाठी खिशाला परवडेल अशा ठिकाणी हवापालटासाठी जाऊन आलो. अशा वातावरणात सरळ स्वभावाच्या मराठी माणसास दिल्लीत चाकरी करणे किती अवघड असेल याची वाचकांना कल्पना यावी.

पंतप्रधानांना आणखी एक काम करावे लागते, ते म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यास जाण्याची प्रथा. ती योग्य आहे यात दुमत नाही. एकदा पंतप्रधान श्रद्धांजली वाहून १०-१५ मिनिटांनी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेले असता मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांनी जवळपास १५ मागण्यांचे निवेदनच त्यांच्या हाती दिले. त्यात एका मुलाला आमदारकी आणि एकाला मंत्रीपद अशा मागण्या होत्या. खरं तर हे निवेदन त्यांना नंतरही देता आले असते.

नरसिंह राव पंतप्रधान झाल्यानंतर जवळपास दोन वर्षे दोन-तीन आठवडय़ांनी सोनियाजींची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी व कामे जाणून घेत असत. परंतु नंतर त्या अधिकारवाणीने अवघड कामे सांगू लागल्याने रावांनी त्यांच्याकडे जाणे सोडले. पण शेवटपर्यंत ते त्यांना योग्य तो मान देत. त्यांनी कधीही त्यांच्याबद्दल अपशब्द काढले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच वेळी नरसिंह रावांचे सहकारी नव्या नेतृत्वाच्या उदयासाठी प्रयत्नशील होते. रावांना सळो की पळो अशी परिस्थिती निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. पण ते एक गोष्ट विसरले होते, की ते जर बारा गावचे पाणी प्यायले असतील, तर राव बारा देशांचे पाणी प्यायले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधाला राव धैर्याने तोंड देत होते.

मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत दरवेळी पाच-सहा मंत्री गैरहजर असत. मंत्रिमंडळ बैठकीइतके दुसरे महत्त्वाचे काम असूच शकत नाही. चौकशी केली असता समजले की बहुतेक मंत्री परदेश दौऱ्यावर आहेत. नरसिंह राव विनोदाने म्हणाले, ‘पुढील मंत्रिमंडळाची बैठक परदेशात ठेवू; जेणेकरून सर्व मंत्री हजर राहतील.’ महत्त्वाच्या बैठकीच्या वेळी नेमके गृहमंत्री दौऱ्यावर असत. यावर नरसिंह राव एकदा चिडून म्हणाले, सर्व मंत्र्यांची कामे मीच करतो. मंत्र्यांच्या बेजबाबदारपणाला ते कंटाळले होते. खरं तर मंत्र्यांच्या कामात पूर्ण सहकार्य केले जात होते. रेल्वे अपघात, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मंत्र्यांना विमान वा हेलिकॉप्टर हवे असेल तर पूर्वी नोट पाठवून पंतप्रधानांची परवानगी घ्यावी लागे. ती पद्धत बंद करून संबंधित मंत्र्यांचा फोन आला की मीच परवानगी देत असे व त्यांच्या वेळेची बचत करत असे. त्याबद्दलची लिखित स्वरूपातील औपचारिकता नंतर पूर्ण करत असू.

मी अनेक नवीन प्रथा सुरू केल्या. पूर्वी १५ ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावर भाषण देण्यासाठी जात असताना राजघाट, नेहरू आणि इंदिराजींच्या समाधीचे दर्शन घेऊन जात. मी लालबहादूर शास्त्रींच्या (जी वाटेतच होती.) समाधीचेसुद्धा दर्शन घेऊन जाण्याची प्रथा पाडली. २६ जानेवारीला पंतप्रधान इंडिया गेटवर माजी सैनिकांना श्रद्धांजली वाहून सलामी मंचाकडे जात. मी ‘तीन मूर्ती’ ते विमानतळाच्या रस्त्यावर राष्ट्रपती भवनजवळ असलेल्या हुतात्म्यांच्या स्मारकाला श्रद्धांजली वाहून नंतर इंडिया गेटकडे जाण्याची प्रथा सुरू केली. पंतप्रधानांनी या बदलांबाबत कधी माझ्याकडे विचारणा केली नाही.

१९९२ हे वर्ष माझ्यासाठी सदैव आठवणीचे राहील. जगाच्या विपरीत अशी ती घटना घडली होती. लोक विवाह समारंभ हवेत वा कधी पाण्यातही करतात, पण कोणाची निवृत्ती विमानात झाल्याचे तुम्ही कधी ऐकले नसेल. ३ सप्टेंबर १९३४ चा माझा जन्म असल्यामुळे ५८ वर्षांनी- म्हणजे ३० सप्टेंबर १९९२ ला माझा निवृत्तीचा दिवस होता. त्या दिवशी पंतप्रधानांसमवेत मी पॅरिसहून दिल्लीला येण्यास रात्री नऊला निघालो होतो. १२ वाजण्यापूर्वी एअर होस्टेसने टेबलावर सजवून एक केक आणला. तो कशासाठी, हे मला समजेना. एवढय़ात पंतप्रधानही आले व मला त्यांनी तो केक कापण्यास सांगितले. माझ्या नकळत हे सर्व घडल्यामुळे मला आश्चर्याचा धक्काच बसला. पंतप्रधानांनी जवळ घेऊन सर्वासमक्ष माझे अभिनंदन केले. असा अनोखा निवृत्तीचा सोहळा विमानात आनंदात पार पाडला. खासगी सचिव रामू दामोदरन यांची ही योजना होती. किती आपुलकी अन् जिव्हाळा!

 

वर्षभराने सर्व विकासकामेच काय, पण उद्योगधंद्यांनीसुद्धा बाळसे धरून प्रगती सुरू केली होती. असंख्य अडचणींना तोंड देत २८ महिन्यांत नरसिंह रावांनी ‘न भूतो, न भविष्यति’ अशी प्रगती करून दाखवली. आर्थिक क्रांतीच्या ध्येयाकडे थोडेही दुर्लक्ष होऊ दिले नाही. कारण त्यांना सर्वाचे पूर्णपणे सहकार्य मिळाले होते. उद्योगपतींनी सर्व सवलतींचा फायदा घेऊन आपल्या मेहनतीने विकसित देशांची बरोबरी करण्याची तयारी सुरू केली होती. आपला पैसा भारतात आता सुरक्षित तर राहीलच, पण वर दोन पैसेही मिळतील अशी खात्री झाल्याने परदेशी भांडवलदारांचे आगमन होऊ लागले होते. या २८ महिन्यांचा लेखाजोखा नरसिंह रावांनी मांडला आहे तो असा-

१९९१ साली : १) दिवाळखोरी, २) मुद्रास्फिती (इन्फ्लेशन)- १६.७ टक्के, ३) परदेशी चलन- २००० कोटी, ४) सोने गहाण, ५) पंजाब व काश्मीरमधीले दहशतवाद.

१९९३ : परदेशी चलन- २१,००० कोटी, २) मुद्रास्फिती- ६ ते ७ टक्के, ३) गहाण टाकलेले सोने परत, ४) विदेशी गंतवणूक- १०,००० कोटी, ५) ६२,००० कोटींच्या योजना हाती घेण्यात आल्या, ६) ग्रामीण विकासासाठी तीस हजार कोटी. सर्व वस्तूंच्या किमती नियंत्रणात. एवढेच नव्हे तर सणावारालासुद्धा त्या मुबलक प्रमाणात उपलब्ध. पंजाब आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया कमी होऊन, तिथे निवडणुका घेऊन लोकप्रतिनिधींचे सरकार स्थापन. नरसिंह राव यांच्या सत्तेच्या पाच वर्षांच्या कार्यकालात या सगळ्याची प्रसिद्धी कोणत्याही वर्तमानपत्रांत पान-पानभर जाहिराती देऊन त्यांनी कधीच केली नाही. किंवा रेडिओ व टीव्हीवर आपल्या या कर्तृत्वाचे डिंडिम सतत जाहिरातींच्या रूपात त्यांनी कधीच बडवले नाहीत.

भारतात जादूच्या कांडीप्रमाणे झालेली ही प्रगती पाहून बहुतेक सर्व देशांतील प्रमुखांना आश्चर्य वाटले. नरसिंह रावांचे नाव ते आदराने घेऊ लागले. विकसनशील देशांचे पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष नरसिंह राव त्यांच्या देशात जात तेव्हा प्रोटोकॉल बाजूला सारून विमानतळापासून त्यांच्यासोबत असत. २४ मार्च १९९४ ला  अमेरिकन अध्यक्षांनी न राहवून रावांना पुढील पत्र लिहिले.. ‘‘I have been particularly impressed by the courageous way you have persued economic reforms. In our meeting in Washington, I would like to hear from you about those reform efforts.’’ असा गौरव अमेरिकेच्या अध्यक्षांकडून कोणा पंतप्रधानांचा कधी झाला असेल का? भारताचाच हा गौरव नाही का?

हे सर्व करताना पंतप्रधान नरसिंह रावांनी सर्वसामान्यांच्या खिशात कुठेही हात घातला नव्हता. म्हणूनच सर्वसामान्य जनतेला या सर्व प्रगतीची जाणीव झाली नसावी.

ram.k.khandekar@gmail.com