यशवंतरावांना एका परिचित व्यक्तीने रयत शिक्षण संस्थेतील एका कर्तृत्ववान तरुण शिक्षकाची ओळख करून दिली. विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन नागरी-ग्रामीण भागांत सर्वासाठी शिक्षणाची पाणपोई सुरू करण्याच्या ध्येयाने तो या क्षेत्रात आला होता. परंतु या उदात्त ध्येयाखेरीज या तरुणापाशी दुसरं काहीच नव्हतं. या तरुणासोबतच्या पाच-दहा मिनिटांच्या चर्चेतही यशवंतरावांना त्याच्या दृढनिश्चयाची, सचोटीची आणि कर्तृत्वाची खात्री पटली आणि हा तरुण शिक्षक शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य करू शकेल असा विश्वासही त्यांना वाटला. त्यांनी त्याला शिक्षणसंस्था काढण्यासाठी पुण्यात कोथरूड येथे सरकारी जागा दिली. संस्था सुरू होऊन दिवसेंदिवस प्रगती करीत असतानाच हा तरुण एसटी महामंडळाचा संचालकही झाला. ‘गाव तिथे एसटी’ हे स्वप्न उराशी बाळगून त्याने कामास सुरुवात केली. स्वत: एसटीने प्रवास करून तो गावोगावी हिंडला आणि आपल्या या स्वप्नाचीही पूर्तता त्याने केली. त्याचवेळी आपल्या शिक्षणसंस्थेसाठी त्याने निधीही गोळा केला. या निधीचा वापर करून या शिक्षणसंस्थेने अल्पावधीत नेत्रदीपक प्रगती केली. राज्य आणि देशातच नव्हे, तर परदेशातही शिक्षणसंस्था स्थापन करून हा तरुण महाराष्ट्रातील एक आघाडीचा शिक्षणसम्राट झाला. मात्र तरीही तो गरिबीचे दिवस आणि माणुसकी काही विसरला नाही. यशवंतरावांशी अगदी शेवटपर्यंत त्याचा संपर्क होता. त्यांना अनेकदा तो काही ना काही कार्यक्रमानिमित्त आपल्या संस्थेत बोलावीत असे. हा तरुण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे डॉ. पतंगराव कदम होत. त्यांनी स्थापन केलेली शिक्षणसंस्था म्हणजे ‘भारती विद्यापीठ’! जिथे आज शिक्षणाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. शेकडो एकरांत त्यांच्या संस्थेचा कार्यपसारा आहे. गरीब विद्यार्थ्यांना इथे अप्रत्यक्षरीत्या मदत केली जाते. मुंबईपासून दिल्लीपर्यंत आज शिक्षण क्षेत्रात डॉ. पतंगरावांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्र या ध्येयवादी नेत्याला नुकताच मुकला. इथे हे सविस्तरपणे लिहिण्याचे कारण हे की, डॉ. पतंगराव कदम यांच्या उदाहरणातून माणसांची योग्य ती पारख करण्याच्या यशवंतरावांमधील उपजत गुणाचा परिचय व्हावा. याची आणखीही काही उदाहरणे देता येतील.

त्यावेळचे राज्यपाल गिरीजाशंकर बाजपेयी यांच्याबद्दल यशवंतरावांनी लिहिले होते :

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
teacher built a democratic gudhi for Public awareness and to increase voter turnout
शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा

‘दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मध्यवर्ती कमिटीच्या बैठकीत त्यांचे (गिरीजाशंकर बाजपेयी) भाषाप्रभुत्व तसेच कठीण, गैरसोयीचे प्रश्न टाळताना कुशलतेने वापरलेली विनोदबुद्धी, प्रश्नांचा अगोदर विचार करून, मनाशी निर्णय करून ठेवण्याची हुशारी पाहून ‘मनुष्य मोठा अर्क आहे!’ असा विचार मनात येऊन गेला.’

१९५२ साली अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीच्या निमित्ताने यशवंतरावांची ढेबरभाईंशी (यू. एन. ढेबर, तत्कालीन सौराष्ट्र प्रांताचे मुख्यमंत्री) ओळख झाली. त्यांचे व्यक्तिचित्र रेखाटताना यशवंतरावांनी लिहिले होते : ‘अत्यंत विनयशील व मृदू स्वभावाचे असे हे गृहस्थ आहेत. आपला मुद्दा सहजासहजी न सोडण्याइतके कणखरही दिसले. त्यांच्यात मनुष्यस्वभावाची पारख करण्याची धूर्तता असली पाहिजे. परंतु हा गुण कोणाच्या लक्षात येऊ नये याची ते काळजी घेत असतात की काय असे वाटण्याइतके शब्द मोजून-तोलून धीमेपणाने बोलणारे गृहस्थ वाटले.’

यशवंतराव ६ जानेवारी १९६६ रोजी लालबहादूर शास्त्री यांच्यासोबत ताश्कंदला गेले असताना तिथे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयुब खान आणि परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुत्तो यांच्याशी त्यांची भेट झाली होती. त्यांच्यासंबंधी यशवंतरावांनी लिहिले होते : ‘प्रेसिडेंट अयुब व भुत्तो या दोन्ही व्यक्तींना मी प्रथमच भेटलो. प्रेसिडेंट अयुबला व्यक्तिमत्त्व आहे. उंचपुरा पठाण. चेहऱ्यावर नाटकी हास्य भरपूर. बोलणेही अघळपघळ आणि गोड. पण माणूस किती प्रामाणिक आहे याबाबत विचार करावा लागेल. भुत्तो बोलण्या-वागण्यात करेक्ट होते. आपले म्हणणे त्यांनी स्पष्ट व आडपडदा न ठेवता मांडले.’

थोडय़ा वेळाच्या भेटीतही माणसाची अचूक पारख करणे हे निष्णात जोहरीचेच काम. माझी निवड कशी झाली याचे उत्तरही यात शोधावे लागेल. यशवंतरावांनी आपल्या खासगी सचिवांची निवडही अगदी अचूक केली होती. या त्यांच्या सुप्त गुणाचा उपयोग ते परराष्ट्रमंत्री असताना खूप झाला. परराष्ट्रमंत्रीपदाच्या कार्यकाळातही त्यांनी अशी टिपणे करून ठेवली होती. भेटणाऱ्या व्यक्तींच्या स्वभावाचे ताबडतोब चित्रण करून ठेवणारे यशवंतराव हे एकमेव नेते होते असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांची दूरदृष्टी सर्वसामान्यांच्या जीवनाच्या प्रत्येक अंगाकडे पोहोचली होती. सत्ता मूठभर लोकांच्या हाती न राहता तत्कालीन विकसनशील महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचाही त्यात सहभाग असला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. त्यातूनच त्यांनी जिल्हा परिषदा निर्माण करून सत्तेचे व्यावहारिक स्वरूपात विकेंद्रीकरण करण्याचे पहिले खंबीर पाऊल उचलले आणि संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल असा एक पायंडा त्यांनी पाडला. यशवंतरावांचे सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे जाणे हे शून्यातून विश्व निर्माण करण्यासारखेच होते. काही माणसे जन्मत:च मोठी असतात, तर काही माणसांवर मोठेपण लादले जाते. तसेच काही माणसे आपल्या अंगच्या कर्तबगारीने मोठी होतात. यशवंतराव हे यातल्या तिसऱ्या वर्गात मोडणारे होते. केवळ एका वर्षांच्या कारकीर्दीतच त्यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंकडून ‘कर्तबगार मुख्यमंत्री’ म्हणून प्रशस्तीपत्र मिळविले. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष ढेबर त्यावेळी म्हणाले होते की, यशवंतराव यांनी आपल्या कुशल नेतृत्वामुळे नवे मुंबई राज्य कसे चालेल, ही आमची चिंता दूर केली.

यशवंतरावांच्या अंतरंगातील इतक्या गोष्टी आणि सुप्त गुण पाहिल्या/ अनुभवल्यानंतर कुणालाही साहजिकच वाटेल, की आता त्यांच्यातील गुणांची पोतडी रिकामी होत आली असेल. परंतु त्यांचे अंतरंग ही जणू जादूचीच पोतडी होती. आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टी या त्यांच्या राजकीय जीवनाशी संबंधित होत्या. त्या तशाच घडत राहिल्या तर आपले जीवन रूक्ष होईल याची त्यांना कल्पना होती. याकरता त्यांच्या अंतरंगातील साहित्य, संस्कृती आणि कलास्वादाचे दालन मला इथे उघडून दाखवावे लागत आहे. यशवंतराव हे स्वत: प्रगाढ व्यासंगी होते. संस्कृती, वाङ्मय, कला यांत त्यांना मनापासून रस होता. त्याचा त्यांचा अभ्यासही होता. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाची ही अंगेही विकसित होण्याकडे त्यांनी आवर्जून लक्ष दिले. त्यातून त्यांचा व्यापक दृष्टिकोन आणि सखोलता याची प्रचीती येते. नाटय़कलेला प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी १९५९ साली ८४ हजार रुपये खर्चाची (त्यावेळचे!) एक योजना तयार केली. तीद्वारे वृद्ध, अपंग कलाकारांना मानधन देण्यास त्यांनी सुरुवात केली.

यशवंतराव स्वत: नाटकाचे उत्तम दर्दी होतेर्. सर्वसामान्यजन त्याकाळी वर्तमानपत्रांतून सिनेमाच्या जाहिराती प्रामुख्याने बघत असत. पण यशवंतराव मात्र नाटकांच्या जाहिराती पाहत असत. आठ-पंधरा दिवसांत एखादे नाटक पाहिले नाही तर ते बेचैन होत. नाटक पाहणे हा त्यांचा विरंगुळा होता. नाटक पाहण्याची त्यांची एक पद्धत होती. पहिले तत्त्व हे, की नाटक असो वा गाणे.. पडदा उघडण्यापूर्वी आपण प्रेक्षागृहात आसनस्थ झालेच पाहिजे. तसेच कार्यक्रम संपून पडदा पडल्यानंतरच आपण जागेवरून उठायचे. कार्यक्रमास सुरुवात झाल्यानंतर तिथे पोहोचणे वा कार्यक्रम सुरू असताना मधूनच उठून जाणे, याला ते कलाकारांचा अपमान समजत असत. कार्यक्रमात पहिल्या रांगेपेक्षा दुसरी वा तिसरी रांग ते अधिक पसंत करीत; जेणेकरून रंगमंचावरील पात्रं डोळ्यांच्या सरळ रेषेत येत. तिसरी गोष्ट- बसल्याबरोबर ते एक पाय दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवत आणि डोक्यावरची टोपी मांडीवर ठेवत आणि सवयीनुसार एक हात ते हनुवटीवर ठेवत असत. नाटकातील सुख-दु:ख वा विनोदी प्रसंगांना ते मनमोकळी दाद देत असत. पुलंचं ‘बटाटय़ाची चाळ’ हे नाटक मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात त्यांनी चार-पाच वेळा तरी पाहिले असावे. पहिल्यांदा पाहताना त्यातील विनोदाला त्यांनी जसा प्रतिसाद दिला होता, अगदी तसाच किंवा त्यापेक्षाही जास्त प्रतिसाद शेवटच्या वेळीही दिलेला मी पाहिला आहे. मध्यंतरात ते रंगपटात जाऊन कलाकारांसोबत चहा पीत पीत मनसोक्त गप्पा करीत. कलाकारही या सच्च्या रसिकाबरोबरच्या गप्पांत मन:पूर्वक भाग घेत. त्याची आठवण म्हणून बऱ्याचदा यशवंतरावांसोबत फोटोही काढून घेत. अनेकदा मुंबई-पुण्यातला यशवंतरावांचा एखादा कार्यक्रम हा तिथल्या एखाद्या नाटकाच्या प्रयोगाशीही जुळवून घेतलेला असे.

दिल्लीत त्याकाळी वर्षभरात साधारणत: तीन-चार मराठी नाटके येत. ती पाहता यावीत म्हणून खूपच पूर्वनियोजित कार्यक्रम असेल तरच ते दिल्लीबाहेर पडत, नाहीतर त्या कार्यक्रमात थोडासा बदल करीत. नाटक पाहण्यापूर्वी त्या नाटकाचे पुस्तक ते कधीही विकत घेत नसत. परंतु ते जर छापले गेले असेल तर नंतर ते विकत घेत आणि स्वत: वेणूताईंसमोर त्याचे वाचन करीत. ते परराष्ट्रमंत्री असताना परदेश दौरा ठरला की तेथील राजदूताकडे तिथल्या नाटकांबाबत ते चौकशी करीत. एक दिवस जास्त थांबायची वेळ आली तरीही ते थांबून तिथले नाटक पाहत असत. थोडक्यात- नाटककार, रंगमंचावरील कलाकार आणि यशवंतरावांत आपुलकीचे एक नाते तयार झाले होते.

तमाशा ही महाराष्ट्राला लाभलेली पारंपरिक देण आणि संस्कृती असूनही त्याकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन मात्र निराळा असे. याचा प्रत्यय व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ या चित्रपटातही येतो. ही कला जोपासायला तर हवीच; त्याचबरोबर ती सर्वसामान्यांनीही स्वीकारली तर तिला चांगले दिवस येतील, हा विचार डोळ्यासमोर ठेवून यशवंतरावांनी या कलेला राज्यमान्यता मिळवून दिली. एवढेच नव्हे तर मुंबईत अनेकदा तमाशा महोत्सवही आयोजित करण्यात येत. तमाशाच्या काही प्रयोगांना उत्तेजनपर अनुदानही देण्यात येत असे. धोबीतलाव येथे (मुंबई महापालिका इमारतीजवळ) महाराष्ट्र सरकारच्या खुल्या रंगमंचावर ‘रंगभवन’ला होणाऱ्या या तमाशा महोत्सवांना बरेच सुशिक्षित स्त्री-पुरुष येत, या कलेचा आस्वाद व आनंद घेत.

तमाशाबरोबरच महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक वारसा असलेल्या पोवाडय़ालाही सरकारी मान्यता देण्यात आली होती. लुप्त होत चाललेल्या या कलेला पुनर्जीवित करण्याचे कार्य यशवंतरावांनी केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात आपल्याकडे एक प्रथाच पडली आहे, की मंत्रीमहोदय आल्यास त्या कार्यक्रमाला काहीशी प्रतिष्ठा मिळते. यशवंतरावांना याची कल्पना असल्याने पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले की ते एखाद्या पोवाडय़ाच्या कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावत असत. मुंबईत शाहीर साबळे यांच्या पोवाडय़ाच्या कार्यक्रमांना ते गेल्याचे मला चांगलेच स्मरते. त्यांचा ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा पोवाडा यशवंतरावांना तोंडपाठ होता. अशा प्रकारे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या रूक्ष जीवनात कलेची झालर शोभा आणत होती.. त्यात रंग भरत होती.

 – राम खांडेकर

ram.k.khandekar@gmail.com