18 February 2019

News Flash

शस्त्रसज्जता आणि पाकयुद्ध

‘तीन मूर्ती’हून (पंतप्रधानांचे निवासस्थान) यशवंतराव बंगल्यावर आले.

|| राम खांडेकर

‘तीन मूर्ती’हून (पंतप्रधानांचे निवासस्थान) यशवंतराव बंगल्यावर आले. त्यांचा चेहरा मलूल झाला होता. त्याची कारणेही तशीच होती. पंधरा दिवसीय अमेरिका दौऱ्यातील चर्चेतून डोंगर पोखरून उंदराची शेपटीसुद्धा हाती आली नव्हती. म्हणजे वेळ व श्रमही वाया गेले होते. यशवंतरावांसाठी एक-एक दिवस महत्त्वाचा होता. नेहरूंच्या निधनामुळे त्यांना जबरदस्त धक्का बसला होता. महत्त्वाचे म्हणजे नवीन पंतप्रधानांच्या विचारांशी आपले विचार कितपत जुळतील? तसेच तिन्ही सेनादले आधुनिक शस्त्रसामुग्रीने सुसज्ज करण्यासाठी आपण करीत असलेल्या प्रयत्नांना नव्या नेतृत्वाची कितपत साथ मिळेल? कोणत्याही माणसाच्या कारकीर्दीत ‘बॉस’ला महत्त्वाचे स्थान असते. नवीन पंतप्रधानांच्या निवडीबद्दल लगेचच प्रारंभिक चर्चा सुरू झाली होती. यशवंतरावांनी मात्र बंगल्यावर येऊन स्वस्थ राहण्याचे ठरवले होते.

दुसऱ्या दिवशी नेहरूंच्या अंत्ययात्रेस सुरुवात होण्यापूर्वी बऱ्याच आधी यशवंतराव ‘तीन मूर्ती’ला पोहोचले होते. अन्य नेते यशवंतरावांची वाट पाहत होते. माणूस किती स्वार्थी असतो नाही? आपला नेता गेल्याच्या दु:खापेक्षाही त्यांना पुढील पंतप्रधानांबद्दल अधिक काळजी! नेहरूंचे पार्थिव अजून घरीच होते. नेहरूंची अंत्ययात्रा ‘तीन मूर्ती’हून निघाल्यानंतर यशवंतराव बंगल्यावर परत आले. कारण अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोहोचण्यास दीड-दोन तास तरी लागणार होते. बेडरूममध्ये बसून ते घडल्या गोष्टींवर विचार करत होते. मी यशवंतरावांसोबत जिथे पं. नेहरूंवर अंत्यसंस्कार होणार होते त्या ठिकाणी गेलो होतो. पार्थिव येईपर्यंत तिथेदेखील हीच चर्चा सुरू होती. आपण इथे कशासाठी आलो आहोत याचे भान कुणालाच नव्हते.

रात्री पुन्हा या चर्चेला ऊत आला. हंगामी पंतप्रधानांचा शपथविधी झाल्यामुळे नवीन पंतप्रधानांच्या निवडीची घाई नव्हती; परंतु वेळ वाया घालवण्यातही अर्थ नव्हता. पंतप्रधानांसाठी दोन-तीन नावांचाच विचार व्हायचा होता. मला वाटते, इंदिराजींची या पदासाठी उत्सुकता दिसली नसल्याने त्यांना विचारणा झाली नसावी, किंवा त्यांचा सल्लाही घेतला गेला नसावा. फार विचारविमर्श न करता नेहरूंच्या तालमीत तयार झालेले आणि सर्व गोष्टींचा अनुभव असलेले लालबहादूर शास्त्री यांचे नाव पंतप्रधानपदासाठी निश्चित करण्यात आले. ९ जून १९६४ रोजी त्यांचा शपथविधी झाला. दिल्लीतील राजकारणाच्या दृष्टीने एक गोष्ट इथे स्पष्ट करावीशी वाटते, ती म्हणजे लालबहादूर शास्त्री यांना प्रतिस्पर्धी नसल्यामुळे त्यांच्यामागे कुठले राजकीय शुक्लकाष्ठ नव्हते. त्यामुळे शास्त्रीजी आपले काम निर्धास्तपणे करू शकत होते.

परंतु यशवंतरावांच्या मनात जी भीती होती ती अनेकदा खरी ठरली होती. यशवंतरावांसारख्या मराठी गडय़ाची विचारसरणी आणि शांतताप्रिय शास्त्रीजींची विचारसरणी यांत फार फरक होता. यशवंतराव संरक्षणमंत्री झाल्यापासून त्यांच्यावर अनेक प्रकारे टीका होत होती. अगदी उघडपणे म्हटले जात होते, की यशवंतराव या पदासाठी योग्य नाहीत. यशवंतराव ही सगळी टीका सहन करीत होते. परंतु या टीकेस प्रत्युत्तर देऊन ते वाद वाढवू इच्छित नव्हते. संरक्षण खात्यातील बारकावे, तंत्र जाणून घेण्यासाठी त्यांनी सर्व दृष्टीने अभ्यास सुरू केला होता. दिल्ली दरबाराचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे- इथे तुम्हाला अनेक ‘सल्लागार’ मिळतात! अर्थात त्यांना संबंधित विषयाचे सखोल ज्ञान असते असे नाही; परंतु यमुनेच्या पाण्याचा हासुद्धा एक गुण आहे. तथापि यशवंतराव दिल्लीच्या वातावरणात आता बरेच मुरले होते. ‘रात्र वैऱ्याची आहे, तेव्हा जागे राहा’ ही वृत्ती यशवंतरावांनी बाणवली होती. ते नेहमीच सावध राहत. विरोधकांचे डावपेच ओळखून ते त्यांना त्याच भाषेत उत्तर देत असत.

यशवंतरावांनी रात्रंदिवस केलेल्या प्रयत्नांना यश मिळू लागले होते. त्यातून बंगलोरच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स कारखान्यात तयार झालेले ‘एचएफ-२४ मरुत’ हे अत्यंत प्रभावी बॉम्बफेकी विमान भारतीय हवाई दलाला मिळाले होते. चीनच्या आक्रमणाचा धोका अजून टळला नव्हता. शिवाय अमेरिकेकडून मिळणारी पॅटन टँकसारखी आधुनिक यंत्रसामुग्री आणि चीनकडून पुरविण्यात येणाऱ्या नवीन बनावटीच्या शस्त्रास्त्रांमुळे पाकिस्तानच्या कुरापती सतत वाढत चालल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर भारताला मिळतील तिथून शस्त्रास्त्रे विकत घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. अमेरिकेने आपल्या तोंडाला पाने पुसली होती. नेहरूंच्या अंत्ययात्रेला रशियाचे तत्कालीन उपपंतप्रधान अ‍ॅलेक्सी कोसीजिन आले असताना त्यांनी यशवंतरावांना रशिया भेटीची आठवण करून दिली. रशियाने भारताला सदैवच मदत केली होती. ‘मिग- २१’च्या भारतातील उत्पादनासाठी रशियाने बरेच साहाय्य केले होते. त्यामुळे रशिया भेटीस विलंब करण्यात शहाणपणा नाही, हे लक्षात घेऊन यशवंतरावांनी १५ दिवसांचा रशिया दौरा निश्चित केला. यावेळी प्रथमच वेणूताई त्यांच्यासोबत होत्या.

नाविक दलात अत्याधुनिक पाणबुडय़ा असणे हे राष्ट्राच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे मानले जाते. परंतु प्रतिष्ठेपेक्षाही भारताला संरक्षणसज्जतेसाठी पाणबुडय़ांची अधिक गरज होती. त्याबाबतीत अमेरिकेने आपल्याला नकार दिला असला तरी रशिया पाणबुडय़ा देण्यास तयार होता. कोणी का देईना, तातडीने नौदलाची गरज पूर्ण करणे हे यशवंतरावांचे ध्येय होते. कुठल्याही वाटाघाटीसाठी परराष्ट्र दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधानांना भेटून चर्चा करण्याची पद्धत आहे. यशवंतरावांनी शास्त्रीजींशी याबद्दल चर्चा केली असता रशियाशी व्यवहार करण्याबाबत त्यांच्या मनाची तयारी नव्हती असे त्यांना आढळले. हा व्यवहार करताना वचनबद्ध राहू नये, असा सल्ला शास्त्रीजींनी दिला. यशवंतरावांना त्यांच्या या विचाराचे आश्चर्य तर वाटलेच, पण धक्काही बसला. कारण ही वेळ विचार करण्यात घालवण्याची नव्हती, तर ताबडतोबीने निर्णय घेण्याची होती.

रशियाने यशवंतरावांचे मनापासून स्वागत केले. रशियातील अनेक शस्त्रास्त्रांचे कारखाने व तिथली प्रेक्षणीय स्थळे त्यांना दाखवण्यात आली. भारताला पाणबुडय़ांसहित जे हवे ते देण्याची तयारी रशियाने दर्शविली. यशवंतरावांच्या अमेरिका भेटीच्या अगदी विरुद्ध अशी ही भेट ठरली. विशेष म्हणजे यशवंतरावांना अमेरिकाभेटीत त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना भेटता आले नव्हते. मात्र, रशियाचे पंतप्रधान निकिता सर्गेई क्रुश्चेव्ह यांच्याशी दीर्घ चर्चा करण्याची संधी त्यांना मिळाली. यशवंतरावांचा स्वभाव, बोलण्याची पद्धत पाहून क्रुश्चेव्ह इतके भारावून गेले, की भारताच्या संरक्षणविषयक गरजांसंबंधी तर त्यांनी चर्चा केलीच; शिवाय जागतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या प्रश्नासंबंधीही मन मोकळे केले. या चर्चेतून यशवंतरावांच्या लक्षात आले की चीनचे आक्रमण क्रुश्चेव्ह यांना पटले नव्हते. एवढेच नाही, तर त्यांनी अधिकाऱ्यांच्या अटी बाजूला ठेवून कमी व्याजात कर्ज देण्याची तयारीही दर्शविली. शेवटी हळूच एक गोष्ट सांगितली, की या चर्चेचा कुठे उल्लेख करू नका! देणाऱ्याचे हात हजार असूनही पंतप्रधान शास्त्रीजींच्या सल्ल्याप्रमाणे यशवंतरावांना वचनबद्ध होता आले नाही याची त्यांना खंत वाटत होती.

यशवंतरावांनी ब्रिटनला जाऊन नाविक दलासाठी सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न करावा असे शास्त्रीजींना वाटत होते. त्याप्रमाणे १९६४ च्या अखेरीस यशवंतरावांनी ब्रिटनला जाऊन अनेकांशी प्रदीर्घ चर्चा केली. शेवटी ही भेटही अमेरिका भेटीचीच पुनरावृत्ती ठरली. फरक एवढाच होता, की इंग्रजांच्या स्वभावाप्रमाणे कधीच पूर्तता न होणारे आश्वासन मात्र मिळाले! माणसाच्या वा राष्ट्राच्या जीवनात आजचा दिवस उद्या येत नाही. आजचे काम आजच करायचे असते. पंतप्रधानांच्या चुकीच्या धारणेमुळे तब्बल चार-पाच महिन्यांचा कालावधी वाया गेला होता. यावेळी यशवंतरावांना नेहरूंची तीव्रतेने आठवण होत होती.

तीन देशांच्या भेटींमध्ये यशवंतरावांना जी वागणूक मिळाली, पोकळ आश्वासने मिळाली त्यामुळे परराष्ट्रनीतीचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता त्यांना वाटू लागली. अमेरिका व चीनचा कल पाकिस्तानकडे असल्यामुळे रशियाशी चांगले संबंध ठेवणे गरजेचे झाले होते. मुख्य म्हणजे रशियाही प्रत्येक वेळी भारताच्या मदतीला धावून आला होता. इथे एक बाब ध्यानात घ्यावी लागेल, की प्रत्येक देश आपले हितसंबंध लक्षात घेऊनच परराष्ट्रनीती ठरवीत असतो. रशियाशी संबंध ठेवण्याचा यशवंतरावांचा निर्णय दूरदृष्टीचा होता. या अनुभवानंतर स्वबळावर संरक्षण यंत्रणा उभी करण्याच्या प्रयत्नांना अधिक गती देण्याशिवाय गत्यंतर नव्हते. केवळ दोन वर्षांच्या कालावधीत संरक्षण मंत्रालय व लष्कराच्या चेहऱ्यामोहऱ्यात यशवंतरावांनी एवढे आमूलाग्र बदल केले होते, की भारत शत्रूशी दोन हात करण्याइतपत सक्षम बनला होताच; शिवाय ‘यशस्वी भव’ची खात्रीही झाली होती.

१९६५ साल उजाडले. चीनची चिथावणी आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा यामुळे सीमेवर पाकिस्तानची घुसखोरी वाढत होती. त्यामुळे भारत-पाक संबंध बिघडत चालले होते. पुढे तर पाकिस्तानने कच्छ वगैरे भागांत हल्लेही सुरू केले. पाकच्या या हालचालींतून पाकिस्तान सर्वशक्तिनिशी आक्रमण करण्यास सज्ज झाल्याचा इशारादेखील मिळाला होता. मात्र, शास्त्रीजी मूळात थंड प्रवृत्तीचे! पाकिस्तान आपला गळा दाबण्याच्या तयारीत असतानाही ते सन्माननीय तडजोड काढण्याच्या प्रयत्नांत होते. यशवंतरावांना त्यांच्या या शांत वृत्तीचे आश्चर्य वाटत होते. अखेरीस पाकिस्तानने कच्छवर मोठय़ा लष्करी ताकदीसह आक्रमण करून प्रत्यक्ष युद्ध छेडले. परिणामी भारतालाही युद्ध करण्यावाचून पर्याय नव्हता. पाकिस्तानला युद्धाची इतकी खुमखुमी होती, की जिथे जिथे भारतावर हल्ला करता येईल तिथे तिथे त्यांनी हल्ल्याचे प्रयत्न केले. त्यासाठी पॅटन टँकचा सर्रास वापर केला. मग मात्र भारतीय सैन्य संरक्षण मंत्री आणि लष्करी आदेशानुसार बॉम्बवर्षांव करत १५ ऑगस्टला पाकिस्तानच्या हद्दीत शिरले आणि नंतर ते पाकचा एकेक प्रदेश पादाक्रांत करत गेले. एक-एक ठाणे काबीज करीत पाकिस्तानचा बराच भाग भारतीय लष्कराने आपल्या ताब्यात घेतला. यात लष्करी टेहळणीच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणेही होती. त्यामुळे पाकिस्तानला माघार घेण्याशिवाय आणि पराभव मान्य करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. भारतीय सैन्याचा हा विजय म्हणजे यशवंतरावांचे टीकाकारांची तोंडे बंद करणारे प्रत्युत्तरच होते. या युद्धात यशवंतरावांच्या अंगच्या सुप्त गुणांचे, त्यांच्या कर्तृत्वाचे आणि कार्यकुशलतेचे दर्शन देशालाच नव्हे, तर जगालाही घडले होते.

१९५६ पासूनच्या यशवंतरावांच्या दिल्लीतील तपश्चर्येस शेवटी फळ आले होते. महाराष्ट्राला त्यांचा सार्थ अभिमान वाटत होता. यानिमित्ताने ‘ब्लॅकआऊट’चा अनुभव दिल्लीकरांनी घेतला. युद्ध संपेपर्यंत दुकाने व घरांतील प्रकाशाचा एक कवडसाही बाहेर दिसणार नाही याची काळजी घ्यावी लागे. दारे-खिडक्यांना पडदे व कागद लावण्यात आले होते. मुले गटागटाने रात्रभर फिरत होती. प्रकाश दिसला की ते त्या ठिकाणी जाऊन दिवे बंद करायला सांगत. रस्त्यांवर पूर्ण काळोख असे. मोटारी पार्किंग लाइट व मोठय़ा दिव्यांचा वरचा भाग काळा करून चालवल्या जात. सायकलला मागे लाल परावर्तक का लावतात, हे यावेळी समजले. सायरन वाजला की घरात सुरक्षित जागी जाऊन उभे राहावे लागे. पुढे लोकांना या सगळ्याचा कंटाळा येऊ लागला. यशवंतराव रोज सात-साडेसातपर्यंत कार्यालयात तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांसोबत चर्चा करीत. शास्त्रीजींचा स्वभाव लक्षात आल्याने यशवंतरावांनी अनेक धाडसी निर्णय आधीच घेऊन नंतर ते त्यांना सांगितले. कार्यालयातून बंगल्यावर येताना रात्रभरात काय घडण्याची शक्यता आहे याची ते मला कल्पना देत. एक दिवस ते म्हणाले, ‘आज दिल्ली पाहून घ्या. उद्या ती कशी असेल, माहीत नाही.’ कारण भारतीय विमानांनी तोवर लाहोपर्यंत मजल मारली होती!

युद्धसमाप्तीनंतरही यशवंतरावांनी अनेक सीमाभागांचा दौरा केला. आधुनिक शस्त्रास्त्रांनी सेनादले सुसज्ज करण्याच्या प्रयत्नांत आणि गतीमध्ये बिलकूल खंड पडू दिला नाही. दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून तेव्हा रशियाच्या पंतप्रधानपदी असलेल्या कोसीजिन यांनी ४ जानेवारी १९६६ रोजी शास्त्रीजी आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयुब खान यांना ताश्कंदला बोलावले. यशवंतराव आणि काही अधिकारीही शास्त्रीजींसोबत ताश्कंदला गेले होते. तिथे गेलेल्या एका पत्रकाराने सांगितले की, भारताच्या लष्करप्रमुखांनी स्पष्टपणे बजावले होते- की काही ठाणी भारताने सोडणे भारताच्या हिताच्या, सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. सर्वानाच ते पटले होते. म्हणूनच तर ती पाकिस्तानला परत हवी होती. त्यामुळे शेवटपर्यंत यशवंतराव व शास्त्रीजी या मताशी ठाम होते. चार-पाच दिवस चर्चा होऊनही काहीच निष्पन्न न होता दोन्ही पंतप्रधान मायदेशी परतणार, हे लक्षात आल्यावर कोसीजिन यांनी राजकीय खेळी केली. कारण आपल्या मध्यस्थीला यश न येणे हे रशियासाठी अपमानास्पद होते. त्यामुळे आपल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या मताशी सहमत असूनही नाइलाजास्तव भारताला माघार घ्यावी लागली. कालाय तस्मै नम:! शेवटच्या दिवशी अनेक बाबी नमूद केलेल्या पत्रकावर सह्य़ा झाल्या. देशात याविषयी काय प्रतिक्रिया उमटेल, याच विचारांत शास्त्रीजी होते. १० जानेवारीच्या रात्री शास्त्रीजींनी पाहुण्यांसोबत भोजन केले. चार-पाच दिवसांचा विलक्षण ताण आता कमी झाल्यामुळे त्यांना आता बरेच हलके वाटत होते. दुसऱ्या दिवशी भारतात परतायचे होते. आता आपल्याला शांतपणे झोप लागेल म्हणून ते झोपले. आणि..

ram.k.khandekar@gmail.com

First Published on July 8, 2018 5:59 am

Web Title: loksatta lokrang marathi articles 17