15 August 2020

News Flash

गृहमंत्रीपदाचा काटेरी मुकूट

‘लालबहादूर शास्त्रीजींची प्रकृती अचानक बिघडली,’ असा निरोप मिळताच यशवंतराव घाईने शास्त्रीजींच्या खोलीत गेले..

|| राम खांडेकर

‘लालबहादूर शास्त्रीजींची प्रकृती अचानक बिघडली,’ असा निरोप मिळताच यशवंतराव घाईने शास्त्रीजींच्या खोलीत गेले.. परंतु तोवर उशीर झाला होता. रशियाच्या राजकीय दबावाखाली वाटाघाटीनंतर निघालेल्या संयुक्त पत्रकामुळे शास्त्रीजींचा असंतुष्ट झालेला आत्मा त्यांच्या शरीरातून निघून गेला होता. यशवंतरावसुद्धा राजकीय दबावातून घडलेल्या त्या घटनेने अस्वस्थ होते, कष्टी होते. सोबत आलेल्या अधिकाऱ्यांचा सल्ला डावलून, असंख्य जवानांच्या बलिदानानंतर हस्तगत केलेली भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अनेक ठाणी पाकिस्तानला परत करावी लागत होती. त्यामुळे होणाऱ्या यातनांनी यशवंतरावांचे अंत:करण होरपळून निघाले होते. त्यांना अपराध्यासारखे वाटत होते. यशवंतराव दिल्लीत परतल्यानंतर शास्त्रीजींच्या निवासस्थानी गेले. तिथले सोपस्कार पूर्ण करून आणि सगळ्या यातना बाहेर ठेवून ते घरी परतले. कौटुंबिक जीवनात यशवंतराव राजकीय सुख-दु:खांचा प्रवेश होऊ देत नसत. त्यामुळे त्यांच्या यातनांची नोंद कधीच कोणी घेतली नाही. इतिहासकारांनीही नाही. काही दिवसांनी मात्र त्यांनी आपले मन मोकळे केले होते.

शास्त्रीजींनंतर पंतप्रधानपदी कोण, याचा शोध लगेचच सुरू झाला. पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयामुळे यशवंतरावांचे अनेक सुप्त गुण जगाला दिसले होते. ते ‘युद्धमंत्री’ म्हणून गणले जाऊ लागले होते. त्यामुळे त्यांच्या नावाचा प्रथम विचार सुरू झाला होता. जनतेलाही ते पाहिजे होते. शिवाय चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन आपला त्यांना पाठिंबा असल्याचे आश्वासन दिल्याने ते पुढील तयारीलाही लागले होते. यशवंतराव अध्र्या हळकुंडाने पिवळे होणारे किंवा गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्यांपैकी नव्हते. दिल्लीतील राजकीय घडामोडींचा त्यांचा अभ्यास होता. दिल्लीतील लोकांवर विश्वास ठेवणे धोक्याचे असते याचा अनुभव त्यांनी मागील चार वर्षांत घेतला होता. नेहरूंनंतरची काँग्रेस त्यांच्या डोळ्यांसमोर उभी होती. त्यांना दोन गोष्टी स्पष्ट दिसल्या. एक तर नेहरूंनंतर जनतेतील त्यांच्याविषयीचे प्रेम यत्किंचितही कमी झाले नव्हते. दुसरे म्हणजे इंदिराजी पूर्वीपासूनच पक्षाचे काम करीत असल्यामुळे आणि पंतप्रधानांकडे कार्यकर्त्यांना फारसा वाव दिसत नसल्यामुळे इंदिराजींच्या लोकप्रियतेत भर पडत गेली होती. बहुतेक कार्यकर्ते त्यांच्या तंबूत गेले होते, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नव्हती. शिवाय उत्तर भारताचा कल इंदिराजींकडेच झुकणार हेदेखील निश्चित होते.

या सर्व गोष्टींचा सखोल विचार करून, पाठीराख्यांची इच्छा डावलून यशवंतरावांनी इंदिराजींची भेट घेतली. आपली भूमिका स्पष्ट करून यशवंतराव त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही उभ्या राहणार नसाल तर मी उभा राहीन.’’ हे वाक्य यशवंतरावांनी उच्चारताच क्षणाचाही विलंब न करता इंदिराजी म्हणाल्या, ‘‘तुम्हा सर्वाची इच्छा असेल तर मी उभी राहीन.’’ ‘‘माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा राहील,’’ असे सूतोवाच यशवंतरावांनी त्यांच्यापाशी केले. इंदिराजी मोठय़ा धूर्त होत्या. त्यांनी यशवंतरावांचे मनोगत पूर्ण ऐकले; परंतु वरील वाक्याशिवाय त्या एकही शब्द बोलल्या नाहीत किंवा आपले पत्तेही त्यांनी उघड केले नाहीत. त्यांनी अगदी मौन धारण केले होते. नेहरू-गांधी घराण्याचे हे वैशिष्टय़ असावे. कारण याचा अनुभव पुढेही अनेकदा आला.

त्यावेळचे काँग्रेस अध्यक्ष कामराज यांचीसुद्धा इंदिराजी पंतप्रधान व्हाव्यात अशीच इच्छा होती. त्यादृष्टीने त्यांनी तयारीदेखील केली होती. यात त्यांचा स्वार्थ होता. कामराजांचा होरा होता, की इंदिराजी आपल्या सांगण्यानुसार वागतील. परंतु थोडय़ाच दिवसांत त्यांचा भ्रमनिरास झाला. कामराजांचा हा दुसरा पराभव! त्याआधी पक्षातील ज्येष्ठ (वयस्कर) सत्ताधीशांना पक्षकार्यासाठी सत्तेतून बाहेर काढायचे अशी योजना त्यांनी मांडली होती. ‘कामराज योजना’ म्हणून ती प्रसिद्ध आहे. त्यात नेहरूंचाही समावेश होता! मात्र, नेहरूंनी राष्ट्रपतींचे साहाय्य घेऊन कामराजांच्या तोंडाला पाने पुसली होती. असो. मोरारजी देसाई काहीही झाले तरी यावेळी आपण पंतप्रधान व्हायचेच असा निश्चय करून बसले होते. पाठिंबा देणाऱ्यांचे न ऐकता इंदिराजींची भेट घेतल्यामुळे यशवंतरावांवरील पुढील अनेक संकटे टळली होती, हे मात्र खरं!

इंदिराजी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर यशवंतरावांनी पुन्हा आपल्या कामास चालना दिली. मध्यंतरी बराच काळ वाया गेला होता. परंतु नियतीची इच्छा वेगळीच होती. यशवंतरावांना चक्रव्यूहात ढकलल्याविना नियतीला चैनच पडत नसावी. १९६६ सालच्या अनेक घटना आणीबाणीची परिस्थिती निर्माण व्हावी अशाच होत्या. देशाला हादरून सोडेल अशी अनेक अंतर्गत गंभीर प्रश्नांची मालिकाच सुरू झाली होती. एका निकडीच्या शस्त्रक्रियेसाठी यशवंतराव मुंबईत आले होते. इंदिराजींनी फोन करून त्यांना गृहमंत्रीपद स्वीकारावे लागणार आहे याची कल्पना दिली. विश्रांतीसाठी मुंबईत असताना यशवंतराव १९६७ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीचीही तयारी करीत होते. त्यावेळी रेल्वेमंत्री असलेल्या स. का. पाटील यांनाही गृहमंत्रीपद हवे होते. त्यामुळे त्यांनी इंदिराजींच्या या निर्णयाला तीव्र विरोध सुरू केला. तसे पाहिले तर पाटील हे काँग्रेसमधील मोठे प्रस्थ होते. त्यांना दुखवणे इंदिराजींना परवडणारे नव्हते. गृहमंत्रीपद हे मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे पद समजले जाई. कारण सर्वाच्या नाडय़ा या खात्याच्या हाती असत. काही वर्षांनंतर इंदिराजींनी आपल्या स्वभावाला साजेसे वर्तन करून क्रमांक दोनचे पदच आपोआप नाहीसे व्हावे यासाठी मंत्रिमंडळाची यादी इंग्रजी आकारविल्हेनुसार तयार करण्याची पद्धत सुरू केली. किती सहज तोडगा काढला होता! यह दिल्ली है! कल क्या होगा कौन जाने? इथे एकापेक्षा एक कूटनीतिज्ञांचे वंशज सदैव आढळतात!

७ नोव्हेंबर १९६६ रोजी दिल्लीत लोकसभा भवनासमोर गोवधबंदीच्या मागणीसाठी साधूंची तीव्र निदर्शने झाली. यामुळे सबंध देश हादरून गेला. त्यात गरजेमुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांच्यावर सर्व बाजूने इतकी गंभीर टीका झाली, की या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी संसदीय काँग्रेस पक्षाच्या बैठकीच्या वेळी नंदा यांना राजीनामा देण्याशिवाय गत्यंतर नव्हते. स्वाभाविकपणेच इंदिराजींनी यावेळी मौन पाळले.  आश्चर्य म्हणजे इंदिराजींनी नंदा यांचा राजीनामा ताबडतोब स्वीकारून त्यांना पदमुक्त केले. एवढेच नाही, तर कोणाच्याही विरोधाची पर्वा न करता, तसेच भविष्यातील संभाव्य उपद्रवाची चिंता न करता त्यांनी यशवंतरावांची गृहमंत्रीपदी नियुक्ती केली. १४ नोव्हेंबर १९६६ रोजी या पदाची सूत्रे यशवंतरावांनी हाती घेतली.

चार वर्षे संरक्षण खाते यशस्वीरीत्या सांभाळलेल्या यशवंतरावांविषयी खात्यातील सर्वानाच आपुलकी व जिव्हाळा निर्माण झाला होता. संरक्षण खात्यातील सहकाऱ्यांशी ताटातूट होणार म्हणून यशवंतरावांचे मन वियोग व दु:खाच्या भावनेने भरून गेले होते. संरक्षण खात्यातील कामगिरीने चार वर्षांतच यशवंतरावांच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिमेत मोलाची भर टाकली होती, हे ते विसरू शकत नव्हते. जड अंत:करणाने त्यांनी सर्वाचा निरोप घेतला.

देशासमोरील गंभीर प्रश्न जणू यशवंतरावांची वाटच पाहत असावेत. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने तेव्हाच उग्ररूप धारण केले होते. यशवंतरावांनी गृहमंत्रीपद स्वीकारल्यावर चारच दिवसांनी अखिल भारतीय विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा नेण्याचे ठरवले. हे आंदोलन यशस्वी झाले असते तर त्याचे पडसाद देशभर उमटले असते. रात्रीचा दिवस करून यशवंतरावांनी एक योजना आखली. तिच्या साहाय्याने त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्लीत येऊच दिले नाही. परंतु विद्यार्थ्यांमधील असंतोष दूर करून ही युवाशक्ती देशकार्यार्थ लावण्यासाठी यशवंतरावांनी माणुसकीच्या नात्याने दडपशाही न करता ही योजना राबवली होती.

याचवेळी उत्तर भारतात तेव्हा शक्तिशाली असलेल्या जनसंघाचा निवडणुकीच्या दृष्टीने गोवधबंदीचा प्रश्न चेतवत ठेवण्याचा उद्देश असल्याचे यशवंतरावांच्या ध्यानात आले. त्यासाठी धर्ममरतडांनी व जनसंघातील काही पुढाऱ्यांनी शंकराचार्याना दिल्लीत उपोषणासाठी बसवले. यशवंतरावांची प्रत्येक चाल ‘नहेलेपर दहेला’ अशीच असे. शंकराचार्याच्या बाबतीतही तेच घडले. कोणालाही कानोकान खबर लागणार नाही अशा रीतीने एका रात्री शंकराचार्याना अटक करून विमानाने रातोरात त्यांना पाँडेचरी आणि नंतर तिथून त्यांच्या आश्रमात सोडले गेले. जनसंघाला धक्का बसेल अशीच ही योजना होती! परंतु याहीपेक्षा आणखी एका गंभीर प्रश्नाला यशवंतरावांना लवकरच तोंड द्यावे लागले.

एक दिवस दिल्लीतील पोलिसांनी आपल्या मागण्यांसाठी अचानक काम बंद करून  यशवंतरावांच्या बंगल्यावर धडक मोर्चा नेला. त्यांना अडवण्यासाठी कोणीच नसल्यामुळे काहीजण बंगल्यात शिरून अर्वाच्य भाषेत घोषणा देऊ लागले. काही जण तर थेट दिवाणखान्यापर्यंत पोहोचले. यशवंतराव आणि वेणूताई बेडरूममध्ये होते. त्यांना आतून कडी लावून घेण्यास सुचवून बंगल्यातील आम्ही सहा-सात जण बेडरूमच्या दाराजवळ कडे करून उभे राहिलो. सुदैवाने यशवंतरावांचा बॉडीगार्ड संपात सहभागी नसल्यामुळे त्याच्याजवळ रिव्हॉल्वर होते. हात जोडून त्याने मोर्चेकऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितले. त्या १०-१५ मिनिटांत आम्ही घामाने ओलेचिंब झालो होतो. त्यावेळच्या आमच्या मन:स्थितीचे वर्णन करताना आजही अंगावर शहारे येतात. कारण कोणाच्याही जीवाला धोका होईल अशी ती परिस्थिती होती. यशवंतराव-वेणूताई ही घटना कधीच विसरू शकले नाहीत. परंतु याची वाच्यता त्यांनी कधीच कुठे केली नाही. या पोलीस मोर्चेकऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एकमेव उपाय होता, तो म्हणजे लष्करास पाचारण करणे! लष्कराला ताबडतोब पाचारण करण्यात आले आणि त्यांनी बंगल्याचा ताबा घेतला. एकदा सेनेच्या ताब्यात बंगला गेला की त्यांची शिस्त आलीच! त्यांनी बंगल्यातील आंदोलनकारी पोलिसांना तर बाहेर काढलेच; त्याचबरोबर बंगल्यावरील पोलीस अधिकाऱ्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला.

दुसऱ्या दिवशी कार्यालयात जाण्यापूर्वी यशवंतरावांनी बाहेर पोलिसांची भेट घेऊन कोणाच्याही चिथावणीस बळी न पडता कामावर जाण्यास सुचविले. ‘कालची घटना मी विसरलो असून तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही,’ असे आश्वासन त्यांनी दिले. दुपारी कार्यालयातून परत आल्यावर पुन्हा हीच गोष्ट त्यांनी पोलिसांना समजावून सांगितली. मात्र, पोलिसांची तिथून हटण्याची तयारी नाही, हे पाहून लष्करी अधिकाऱ्यांनी एक योजना आखून सायंकाळी आंदोलनकर्त्यांना काही कळायच्या आतच अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली. पुढे आठ-दहा दिवसांनी सगळे काही सुरळीत  झाले. यशवंतरावांच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या घटनेची नोंद मात्र कुठेच नाही.

विद्यार्थी, साधू, शंकराचार्य, पोलीस यांचे प्रश्न हाताळत असतानाच अचानक पंजाबमध्ये संत फत्तेसिंग यांनी १७ डिसेंबर १९६६ रोजी उपोषण सुरू करून २७ डिसेंबरला आत्मार्पण करण्याची धमकी दिली. २६ डिसेंबरला त्यांच्या साथीदारांची दुपारी चार वाजता आंघोळ वगैरे करून अग्निकुंडात आत्मार्पण करण्याची तयारी झालेली असताना यशवंतरावांच्या सल्ल्यानुसार लोकसभेचे तत्कालीन सभापती सरदार हुकमसिंग तिथे पोहोचले आणि वाटाघाटी सुरू झाल्या. काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी यशवंतरावांशी विचारविनिमय केला. ‘काहीही आश्वासन न देता वाटाघाटी करा,’ असे यशवंतरावांनी सांगितले असताना पीटीआयची बातमी आली की, ‘संत फत्तेसिंग यांच्या मागण्या मान्य झाल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले.’ दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतरावांच्या भेटीला आले. त्यांनी यशवंतरावांना सांगितले की, ‘‘तुमचे म्हणणे मी नीटपणे ऐकले. पण त्यांना दुसरेच सांगितले.. खोटे सांगितले.’’ ‘‘तुम्ही हे कशासाठी केलेत?,’’ असे यशवंतरावांनी विचारताच ते उत्तरले, ‘‘मला जी शिक्षा द्यायची ती द्या, पण मी हे सर्व पंजाबच्या हितासाठी केले.’’ हीच तर खरी दिल्ली आहे!

१९६७ च्या फेब्रुवारीतील सार्वत्रिक निवडणुकीने देशाचे चित्रच पालटून गेले होते. हिंदुत्वाच्या पुनरुज्जीवनाच्या घोषणेने जनसंघाने अनेक प्रदेशांत आपली शक्ती वाढवली होती, तर काही ठिकाणी प्रादेशिक पक्ष सरस ठरले होते. काँग्रेसचे बरेच रथी-महारथी या निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे काँग्रेसचे पानिपत झाल्यासारखेच होते. लोकसभेत कॉंग्रेसला अवघे १३ सदस्यांचे बहुमत होते. नऊ राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे सत्तेवर आली होती. इंदिराजींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात आली. प्राप्त परिस्थितीला तोंड देण्यासाठी यशवंतरावांशिवाय दुसरी समर्थ व्यक्ती नव्हती. त्यामुळे यशवंतरावांनाच गृहखाते देण्यात आले. इतिहासकारांनी नोंद घ्यावी अशी नवी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. गृहखात्यासमोर अनेक नवे प्रश्न निर्माण झाले होते. महत्त्वाचे म्हणजे केंद्र-राज्य संबंध! राष्ट्राच्या स्थैर्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्ये यांच्यात सहकार्याची भावना राहिली पाहिजे.. मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो, ही भावना यशवंतरावांची व पंतप्रधानांचीही होती. थोडक्यात, ‘हम करे सो कायदा’ ही काँग्रेसी नीती इथून पुढे जमीनदोस्त झाली होती. तिने पुन्हा कधीच डोके वर काढले नाही. पुढचा काळ यशवंतरावांसाठी अग्निपरीक्षेचा ठरणार होता.

ram.k.khandekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2018 4:47 am

Web Title: loksatta lokrang marathi articles 32
Next Stories
1 शस्त्रसज्जता आणि पाकयुद्ध
2 यशवंतराव-नेहरू दृढ नाते
3 यशवंतरावांकडचे सण
Just Now!
X