News Flash

शिक्षणप्रेमी..

आणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नरसिंह रावांना आंध्र प्रदेशातील हनमकोंडा येथून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती.

(संग्रहित छायाचित्र)

राम खांडेकर

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधानपदी आले. कोणत्याही प्रगतीच्या आणि विकासाच्या पूर्ततेचा पाया शिक्षण, तरुण पिढी आणि महिला असतात, हे ध्यानात घेऊन त्यांनी शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा, युवा व महिला विकास ही खाती एकत्र आणून मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना केली. नरसिंह राव यांना या खात्याचे मंत्री नेमून विज्ञानाच्या युगात आवश्यक असलेले नवे शिक्षण धोरण तयार करण्याची जबाबदारी सोपवली..

१९७७ साली.. आणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नरसिंह रावांना आंध्र प्रदेशातील हनमकोंडा येथून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत प्रचारासाठी इंदिराजी जेव्हा आंध्र प्रदेश अथवा त्याच्या शेजारच्या राज्यांत जात असत तेव्हा त्यांच्या बहुतेक भाषणांचे त्या-त्या राज्यातील भाषेत भाषांतर करण्याचे काम नरसिंह रावांवर सोपवण्यात येत असे. पंडित नेहरूंच्या भाषणाचे नरसिंह रावांनी केलेले भाषांतर मूळ भाषणापेक्षाही अधिक प्रभावी ठरले होतेच आणि आता इंदिराजींच्या वेळीसुद्धा तसेच झाले. यामुळे नरसिंह रावांच्या वक्तृत्वाची, विद्वत्तेची छाप इंदिराजींवर पडली.

आणीबाणीमुळे काँग्रेस पक्षाच्या विरोधात जनतेच्या भावना असल्यामुळे पक्षाच्या अनेक नेत्यांना पराजय पत्करावा लागला, परंतु नरसिंह राव निवडून आले होते. जनता सरकारचे राज्य आल्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षाचे स्थान मिळाले. १९७८ साली नरसिंह राव एका वर्षांसाठी संसदेच्या सार्वजनिक लोकलेखा समितीचे अध्यक्ष झाले. हे पद विरोधी पक्षाला देण्याची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे.

जनता पक्षाचे सरकार औट घटकेचे ठरल्यामुळे १९८० मध्ये पुन्हा सार्वत्रिक निवडणुका घ्याव्या लागल्या. या वेळीही नरसिंह राव भरघोस मतांनी निवडून आले. त्या आधीच्या जवळपास अडीच वर्षांत इंदिराजींपुढे उभ्या ठाकलेल्या संकटांमध्ये नरसिंह रावांनी त्यांना साथ दिली होती. त्यामुळेच या वेळी इंदिराजींनी नरसिंह रावांच्या विद्वत्तेला, कर्तृत्वाला योग्य न्याय देऊन त्यांना परराष्ट्रमंत्रिपद भूषवण्याचा मान दिला. प्रथमच मंत्री झालेल्यांना अनुभवाचा अभाव असल्यामुळे साधारणत: हे पद देण्यात येत नाही, पण अपवाद असतातच ना! नरसिंह रावांनी आपल्या विद्वत्तेने, हजरजबाबी स्वभावामुळे, चाणक्य नीतीने अनेक देशांतील नेत्यांना भुरळ घातली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आपल्या कुशाग्र बुद्धीने त्यांनी परदेशात मानाचे स्थान मिळवले होतेच, पण भारताची प्रतिष्ठाही वाढवली. चीनसह अनेक देशांशी मित्रत्वाचे संबंध स्थापित करण्याचा पाया त्यांनी घातला. याचा उपयोग पंतप्रधानांना त्यांच्या परदेश दौऱ्यांत होत गेला.

सर्व कसं सुरळीत सुरू होतं. पुनरागमनानंतर पुन्हा पंतप्रधान झाल्यावर इंदिराजींच्या स्वभावात फार फरक पडला होता. सहकाऱ्यांना योग्य तो मान दिला जात होता. चर्चा करूनच मंत्रिमंडळात निर्णय घेतले जात होते. त्यांना मिळालेल्या जोरदार झटक्याचा कदाचित हा परिणामसुद्धा असू शकेल. देश खरोखरच प्रगतिपथावर असताना ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी देशाला दु:खाच्या खाईत लोटणारी घटना घडली. इंदिराजींच्या सुरक्षारक्षकाने त्यांच्यावर स्टेनगनने गोळ्या झाडल्या. स्टेनगन दिसायला लहान रायफल असते, पण त्यात ३० गोळ्यांचे कार्बाईन बसवलेले असते. ऑटोमॅटिक मोडवर असताना एकदा चाप ओढला, की सर्व गोळ्या क्षणार्धात बाहेर पडतात. अशा रायफलीतून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यांना ताबडतोब मोटारीतून दवाखान्यात, खरे तर औपचारिकता म्हणूनच, उपचारासाठी नेण्यात आले. ही घटना लक्षात घेऊनच यानंतर पंतप्रधानांच्या गाडय़ांच्या ताफ्यात एक डॉक्टर, एक कम्पाऊंडर असलेली आधुनिक पद्धतीची रुग्णवाहिका ठेवण्यात येऊ लागली.

एवढे असूनही त्यांना मृत घोषित केले नव्हते, कारण संविधानाच्या प्रथेप्रमाणे पंतप्रधानांची जागा क्षणभरही रिकामी राहू शकत नाही. प्रथेप्रमाणे प्रणव मुखर्जी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी तयारी करून निमंत्रणाची वाट पाहात बसले होते. परंतु राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांना राजीव गांधींनाच पंतप्रधान करायचे असल्यामुळे राजीवजी दिल्लीत येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. दिल्ली सोडून इतरत्र इंदिराजींच्या निधनाची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच लोकांना त्याबाबत कळले होते.

राजीवजींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, पण या वेळी दिल्ली दरबारात नवीन अनिष्ट प्रथेची सुरुवात झाली. आतापर्यंत पंतप्रधानांचे निधन होताच गृहमंत्री ताबडतोब शपथ घेऊन हंगामी पंतप्रधानपद सांभाळत. मात्र या वेळी गुडघ्याला बाशिंग बांधून आमंत्रणाची वाट पाहणाऱ्या इच्छुकास ताटकळत ठेवणारी ही पहिलीच घटना होती. १९८४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंतप्रधानपदासाठी झालेल्या निवडणुकीत ही व्यक्तीसुद्धा दावेदार होती. नंतर तर त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. अर्थात या कृतीचा पक्षावर फारसा परिणाम झाला नव्हता, हे खरे. परंतु काय होऊ शकते, याची झलक या घटनेने दाखवली होती. नरसिंह राव पंतप्रधान झाले तेव्हाही अशाच काही दावेदारांकडून झलकच नाही तर झळ लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

राजीवजींच्या निमित्ताने देशाला प्रथमच तरुण पिढीची प्रतिनिधी ठरावी अशी व्यक्ती पंतप्रधान म्हणून मिळाली होती. यशवंतरावांनी राजीवजींबद्दल केलेले भाकीत खरे ठरत होते. राजीवजी पायलट असल्यामुळे परदेश वाऱ्याही भरपूर झाल्या होत्या. त्यामुळे बाहेरील अनेक देशांत विज्ञानाची कास धरून झालेली प्रगती त्यांच्या डोळ्यांसमोर होती. त्यामुळे भारतानेही यात मागे राहू नये म्हणून आवश्यक यंत्रणा उभी करण्याच्या दृष्टीने राजीवजींचे प्रयत्न सुरू झाले होते. कोणत्याही प्रगतीच्या, विकासाच्या पूर्ततेचा पाया शिक्षण व तरुण पिढी, महिला असतात. म्हणून त्यांनी शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा, युवा व महिला विकास ही खाती एकत्र आणून ‘मानव संसाधन विकास मंत्रालया’ची स्थापना केली. मंत्रिमंडळातील ‘बृहस्पती’ नरसिंह राव यांना या खात्याचे मंत्री नेमून विज्ञानाच्या युगात आवश्यक असलेले नवे शिक्षण धोरण तयार करण्याची जबाबदारी दिली. आंध्र प्रदेशचे शिक्षणमंत्री राहिलेले आणि त्याही आधी सरस्वतीचे माहेरघर असलेल्या पुण्यात व पुढे नागपूर येथे राहिल्यामुळे शिक्षणक्षेत्राचा नरसिंह रावांनी जवळून अनुभव घेतला होता.

२५ सप्टेंबर १९८५ रोजी पदभार स्वीकारल्यावर नरसिंह रावांनी नव्या शिक्षण धोरणाची (न्यू एज्युकेशन पॉलिसी) रूपरेषा आखण्यास सुरुवात केली. एका गोष्टीचा खास उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे नरसिंह रावांचा दिल्लीत वातानुकूलित कार्यालयात बसून धोरणे आखणाऱ्या सरकारी यंत्रणेवर फारसा विश्वास नव्हता. कारण ज्यांनी ही धोरणे राबवायची असतात त्यांच्याशी यांचा कधीच संपर्क नसतो. त्यामुळे धोरण राबवण्यातील अडचणींची कल्पना त्यांना येत नाही. सरकारी कार्यपद्धती अशी असते, की धोरण आखताना त्यातील उणिवा, अडचणी याबाबत कधीही उल्लेख केलेला नसतो. कारण यासाठी पटणारी कारणे द्यावी लागतात. मात्र त्यासाठी डोकेफोड करण्याची सरकारी कर्मचाऱ्यांची तयारी नसते. हे देशाचे दुर्दैव असावे. असो. नरसिंह राव जमिनीवरचे कार्यकर्ते होते. आंध्र प्रदेशात ते शिक्षणमंत्री असताना अनेकदा एकटे जीप घेऊन खेडय़ापाडय़ांत जात असत. म्हणूनच योजनेचे प्रारूप तयार होईपर्यंत सरकारी अधिकाऱ्यांना विचारणा न करताच त्यांनी शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांशी, कुलगुरूंशी चर्चा सुरू केली. दौऱ्यांचासुद्धा यासाठी ते उपयोग करीत. मध्येच शाळा सोडणाऱ्यांची संख्या जाणून घेण्यासाठी त्यांनी खासगी व्यक्तींचे सहकार्य घेतले होते. नवीन धोरण आखताना काय करावे लागेल, याची टिप्पणी त्यांच्याच शब्दात- ‘एलिमेंटरी एज्युकेशन, एन्रोलमेंट, ड्राप आऊट पर्सेटेज, डिस्पेरिटी इन रुरल अ‍ॅण्ड अर्बन एरिया, फॅसिलिटी इन रुरल एरिया, रिलेव्हन्स ऑफ एज्युकेशन, रोल ऑफ टीचर, अटेन्शन, अकाऊंटॅबिलिटी, नंबर ऑफ बुक्स, टीचर्स ट्रेनिंग, मॉडेल स्कूल्स, कॅरेक्टर बिल्डिंग, नथिंग राँग विथ १९६८ पॉलिसी, व्हाट इज न्यू?, थ्री लँग्वेज फाम्र्युला.’ माध्यमिक शिक्षणासंबंधी विचार करताना ते लिहितात, ‘व्हाट इज दी ऑब्जेक्टिव्ह? व्हाट इज दी कंटेन्ट? लेव्हल ऑफ अ‍ॅटॅचमेंट? रिलेव्हन्स, बेसिक एज्युकेशन, व्होकेशनॅलायझेशन, अफ्टर क्लास एट्थ?, विल देअर बी जॉब्ज?, पीपल्स इन्व्हॉल्व्हमेंट..’ अशा अनेक विचारणीय गोष्टी. याशिवाय महिलांना शिक्षण, खेळांची प्रगती, तरुणांना योग्य मार्गदर्शन आदी अनेक गोष्टींचा उल्लेख करून त्यांनी ही योजना प्रारूप स्वरूपात कागदावर आणली होती.

नरसिंह रावांच्या स्वभावाचा एक पैलू म्हणजे कोणतीही गोष्ट अमलात आणायची असेल, तर ती किती शक्य वा अशक्य आहे, याचा ते खोलवर जाऊन विचार करत आणि मगच निर्णय घेत. नवीन शिक्षण धोरणाचे प्रारूप तयार करण्यासाठी त्यांना जवळपास पाच महिन्यांचा कालावधी लागला होता. कोणत्याही परिस्थितीत फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात नवीन शिक्षण धोरणावर सहमती मिळवण्यासाठी मार्चपर्यंत ते प्रारूप तयार व्हायला हवे होते. त्यांनी विरोधी पक्षातील बुद्धिजीवी, विद्वान सदस्यांशीसुद्धा चर्चा केली. अहोरात्र विचार करून त्यांनी ते आपल्या संगणकावर स्वत: टंकीत केले. मार्च, १९८६ मध्ये गुढीपाडव्याला मराठी व तेलुगू भाषी (त्यांचासुद्धा हा नववर्ष दिन असतो) पत्रकारांना व काही प्रतिष्ठित लोकांना रात्री जेवण्यास बोलावले होते. मनमोकळे बोलणे सुरू असताना नरसिंह राव सात-आठ मिनिटांनी उठून बंगल्यात जात. सर्वाना याचे कोडेच पडले होते. शेवटी विचारणा झालीच, तेव्हा नरसिंह राव म्हणाले, ‘‘नवीन शिक्षण धोरणाचे प्रारूप माझ्या संगणकावर आहे. त्याची मुद्रित प्रत घेतो आहे.’’ त्या काळी अतिशय लहान प्रिंटर असायचे आणि एक पान मुद्रित होण्यास बराच वेळ लागायचा. बहुतेक सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला. त्या वेळी लहान संगणक तर फारसे कुठे दिसत नव्हते आणि इथे मंत्री स्वत: संगणकावर टंकन करून मुद्रित प्रत घेतायत हे पाहून सर्वाना आश्चर्य वाटले. खरोखरच राज्यकर्त्यांसह बहुतेक अनेक जण याबाबत अनभिज्ञ होते. माहितीसाठी सांगावेसे वाटते की, त्या काळी आपल्याकडे इंटरनेटशी जोडले जाण्यास १५-२० मिनिटांचा कमीत कमी अवधी लागत असे. नरसिंह राव म्हणायचे, ‘‘इतर देशांत कनेक्शन मिळण्यास दोन मिनिटेही लागत नाहीत, पण आपल्या इथे वाट पाहात बसावे लागते.’’ नरसिंह रावांचे संगणकासंबंधीचे ज्ञान, अभ्यास या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्यांपेक्षाही जास्त होते.

नवीन शिक्षण धोरणामध्ये प्रत्येक जिल्ह्य़ात ग्रामीण भागात एक ‘नवोदय विद्यालय’ उघडण्याची योजना होती. त्यात ग्रामीण भागातून ७५ टक्के, तर शहरी भागातून २५ टक्के मुले फक्त गुणवत्तेवर निवडले जाणार होते. या शाळांसाठी सरकारी अधिकाऱ्यांनी जे संगणक निवडून ऑर्डर देण्याचे ठरवले होते, ते पाहून नरसिंह रावांना आश्चर्यच वाटले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवड केलेले संगणक घेऊन बोलावले आणि याच संगणकांची निवड का केली, याचा खुलासा विचारला. आपले ज्ञान मंत्र्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे, या तोऱ्यात नरसिंह रावांना त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. सर्व ऐकल्यानंतर नरसिंह रावांनी त्या अधिकाऱ्यांची अशी खरडपट्टी काढली, की ते कधी विसरू शकले नसतील! ते संगणक चांगले असले तरी ग्रामीण भागात वापरासाठी किती निरुपयोगी आहेत, हे त्यांनी पटवून दिले.

एकदा विखे-पाटील यांच्या निमंत्रणावरून एका कार्यक्रमासाठी नरसिंह राव प्रवरानगर (अहमदनगर) येथे गेले. इतर कार्यक्रमांसोबत त्यांच्याच एका महाविद्यालयातील संगणक विभागाचेही उद्घाटन नरसिंह रावांनी केले. समारंभानंतर त्यांना संगणक कक्ष व व्यवस्थित मांडून ठेवलेली पुस्तके दाखवली गेली. त्या वेळी नरसिंह रावांनी विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरे तेथील शिक्षक देऊ शकले नव्हते. नरसिंह रावांनी टेबलावरची दोन-तीन पुस्तके उचलून त्यांना अभ्यास करण्यास सुचवले. शेवटी विखे-पाटील म्हणाले की, ‘‘मी तुम्हाला उगीचच बोलावले!’’

एकदा एका सांस्कृतिक संस्थेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी नरसिंह राव प्रतिनिधी मंडळासह मॉरिशसला गेले होते. मुंबई-मॉरिशस या पाच तासांच्या प्रवासाचे विमान कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर, तर परतीचे कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी होते. पूर्वी परराष्ट्र मंत्रालयाचा एक अलिखित नियमच होता, की केंद्रीय मंत्र्याने परदेश दौऱ्यात आपल्याला फुरसत आहे असे दाखवायचे नसते. दिल्लीत प्रत्येक देशातील दूतावासाचा एक वार्षिक दिवस असतो आणि परराष्ट्रमंत्री वा तत्सम मंत्री भारताचे प्रतिनिधित्व करतात. त्या वेळी राजशिष्टाचार अधिकारी त्या मंत्र्याला किती वाजता पोहोचायचे व किती मिनिटांनी निघायचे, हे अगोदरच सांगतो व तिथे त्याचा पाठपुरावा करतो. आता तर ही पद्धत सर्व जणच विसरलेले दिसतात. कार्यक्रमाच्या दिवशीच पोहोचायचे म्हणून नरसिंह राव रात्री मद्रासला गेले आणि दुसऱ्या दिवशी सिंगापूर मार्गे मॉरिशसला गेले. सिंगापूरला विमान बदलायचे असल्यामुळे साडेतीन तासांचा अवधी होता. उतरल्यानंतर नरसिंह राव तेथील आपल्या राजदूतांसमवेत एका मोठय़ा मॉलमधील संगणक विक्री करणाऱ्या दुकानात गेले.

तिथे त्यांनी जवळपास अडीच तास खर्च करून १५-२० फ्लॉपीच्या कॉपीज् आणि संगणकाचे काही सामान खरेदी केले. मी दर १५-२० मिनिटांनी मॉलमध्ये फिरून परत यायचो, तर यांची बैठक तिथेच! सर्व सामान घेऊन आम्ही हॉटेलमध्ये गेलो. नरसिंह रावांनी मला मोठेपणाने प्रतिनिधी मंडळाबरोबर फिरून येण्यास सुचवले होते. देवाने मला काय बुद्धी दिली कोण जाणे, मी न जाता राजशिष्टाचार अधिकाऱ्याला माझी एक सूटकेस काढून देण्यास सुचवले होते. ते सर्व सामान मी सूटकेसमध्ये व फ्लॉपीसारखे नाजूक सामान व्यवस्थित हातातील ब्रिफकेसमध्ये ठेवले होते. सांगायला हरकत नाही, मीसुद्धा एक व्हीसीआर अगोदरच सांगून ठेवलेला घेतला होता. पहिला परदेश दौरा व मुलाची इच्छा! त्या वेळी भारतात त्याची किंमत चाळीस-पन्नास हजार होती, तिथे केवळ पाच हजार! नरसिंह रावांनी सर्व वस्तू नीट ठेवल्याची व राजदूतांना पैसे दिल्याची माझ्याकडून खात्री करून घेतली.

मॉरिशसला गेल्यानंतर थोडी फुरसत मिळाली तेव्हा नरसिंह रावांनी मला बोलावून जोरका धक्का धीरेसे दिला. कॉपी केलेल्या फ्लॉपीज् इतर देशांत किती किमतीत करून देतात, तसेच कोणत्या फ्लॉपीज्ची कॉपी सिंगापूर सोडून इतर देशांत होत नाही, हे सर्व त्यांनी मला नीट समजावून सांगितले. मी लहान संगणकच पाहिलेले नसल्यामुळे मान डोलावण्यापलीकडे काही करू शकलो नव्हतो. वाचकहो, नरसिंह रावांचा हा अभ्यास १९८६-८७ सालचा.. म्हणजे देशात संगणक येण्यास सुरुवात झाली होती तेव्हाचा! देशाला असा विद्वान, सर्वज्ञानी शिक्षणमंत्री मिळाला आणि सखोल अभ्यास करून नवीन शिक्षण धोरण अमलात आणले गेले हे देशाचे भाग्यच नाही का?

एवढे करून नरसिंह राव थांबले नाहीत, तर दर सहा महिन्यांनी त्यांच्या मतदारसंघातील नवोदय विद्यालयात जाऊन आढावा घेत होते. यशस्वी होण्यासाठी धोरणे वा योजना कशा आखाव्यात, याची प्रेरणा नरसिंह रावांच्या कार्यप्रणालीतून राज्यकर्ते का घेत नाहीत? दिल्ली दरबारच्या दस्तुराप्रमाणे याला फळं लागण्यापूर्वीच दोन-अडीच वर्षांतच नरसिंह रावांना नवीन खात्याचा पदभार सांभाळावा लागला. नरसिंह रावांचा माझ्यावर पूर्ण विश्वास असल्यामुळे मी मानव संसाधन मंत्रालयाचा जनतेसाठी पूर्ण उपयोग करून घेतला होता, हे मात्र खरे!

ram.k.khandekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 12:30 am

Web Title: narasimha rao established hrd ministry
Next Stories
1 स्थितप्रज्ञ नरसिंह राव
2 विद्वान व अभ्यासू नेते
3 बृहस्पती
Just Now!
X