15 August 2020

News Flash

सूर्याची पिल्ले!

२८ जून रोजी सकाळी मुलींनी नरसिंह रावांना डायनिंग टेबलजवळ आणून ओवाळले.

राम खांडेकर ram.k.khandekar@gmail.com

शपथविधीनंतर संसदेचे अधिवेशन बोलावण्यात आले होते. आता नरसिंह रावांची सत्त्वपरीक्षा होती ती लोकसभा अध्यक्षाच्या निवडीत! कारण एकूण ५४४ सदस्य संख्या असलेल्या लोकसभेत काँग्रेसचे फक्त २४४ सदस्यच निवडून आले होते. म्हणजे बहुमतापासून दूर असलेल्या काँग्रेस पक्षाचा उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून येणे अवघड होते. २६ जूनच्या शपथविधीनंतर संसदेचे अधिवेशन ९ जुलैला सुरू होणार होते. परंतु ‘तहान लागली की विहीर खोदायची’ हा स्वभाव नरसिंहरावांचा नव्हता. तसेच विरोधकांच्या डोक्यात यासंबंधीचा विचार येण्यापूर्वीच हालचाल करणे हे खऱ्या राजकारण्याचे लक्षण असते. काँग्रेस पक्षाचा उमेदवार लोकसभेचा अध्यक्ष होणे ही काळाची गरज होती. कारण नवीन आर्थिक धोरण आणि त्या अनुषंगाने अनेक पावले उचलावी लागणार होती. यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अध्यक्षांचे सहकार्य मिळणे गरजेचे होते.

नरसिंह रावांच्या प्रयत्नांना यश मिळण्याची खात्री वाटू लागली. याचे कारण त्यांचा स्वच्छ राजकीय प्रवास, तसेच त्यांची विद्वत्ता, दूरदृष्टी, परदेशात असलेला मान-सन्मान आणि महत्त्वाचे म्हणजे योग्यता-क्षमता. याला साथ होती कोणाशीही शत्रुत्व न करता सर्वाना बरोबर घेऊन चालण्याच्या त्यांच्या वृत्तीची! स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात अनेक वेळा संमिश्र सरकारे आली. कमी सदस्य संख्या असलेल्या पक्षाला पाठिंबा देऊन सरकार बनवण्याचे अयशस्वी प्रयोगही अनेक वेळा झाले. परंतु विरोधी पक्षाच्या सहकार्याने अस्तित्वात येऊन पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे अल्पमतातील नरसिंह रावांच्या नेतृत्वाखालील हे पहिलेच सरकार होते! मात्र खेद एकाच गोष्टीचा वाटतो, की काही प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या प्रचारी बातम्या व त्यांच्याच पक्षातील काही ‘हितचिंतकां’च्या कारस्थानांमुळे सर्वसामान्य जनता नरसिंह रावांना आजपर्यंत समजू शकली नाही.

पंतप्रधानपदाची जबाबदारी, देशापुढील असंख्य प्रश्न, नवीन आर्थिक धोरणाचा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक या विचारात असलेल्या नरसिंह रावांना आणखी एका गोष्टीचा मानसिक त्रास सुरू झाला होता. तो होता त्यांच्या अपत्यांपासून. आपले वडील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि कालांतराने पंतप्रधान होणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांचे पितृप्रेम ऊतू जाऊ लागले होते. ‘९, मोतीलाल नेहरू मार्ग’ हे त्यांचे निवासस्थान नरसिंह रावांची मुलं-मुली, सुना, जावई, नातवंडे यांनी भरगच्च झाले होते. पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी आलो आहोतच, तर २८ जूनचा नरसिंह रावांचा वाढदिवसही साजरा करून जाण्याची कल्पना त्यांनी काढली. या आठ-दहा दिवसांच्या वास्तव्यातच आपल्या भविष्यकालीन सोयीचा विचारही त्यांनी केला असावा. म्हणून सर्व जण तिथे तळ ठोकूनच राहिले. नरसिंह रावांचा संगणक कक्ष मुलांसाठी बेडरूम बनला आणि एक आणखी बेडरूम मुलांनी घेतली. त्यामुळे इतरांना झोपण्यास हॉल व माझी कार्यालयीन खोलीच तेवढी उरली. गरमीचे दिवस असल्याने अंथरुण-पांघरुणाचा प्रश्न नव्हता. सकाळी साडेसातला मी बंगल्यावर जात असे. त्यावेळी अक्षरश: काहींना उठवावे लागे. खोलीत त्यांची ये-जा होत असे. त्यामुळे कामाकडे पूर्णपणे लक्ष देणे अवघड झाले होते. नरसिंह रावांचीही तीच परिस्थिती! शपथविधीनंतर तीन-चार दिवसांनी पाहुणे हळूहळू कमी होऊ लागले; परंतु मुलं-मुली, भाऊ वगैरे जाण्याचे नावच घेईनात! नरसिंह रावांनी मला दोन-तीनदा विचारलेही, पण मी काय सांगणार? या आप्तांच्या जिव्हाळ्यामागे किती आपुलकी आहे, हे त्यांच्या लक्षात आले असावे!

तर, २८ जून रोजी सकाळी मुलींनी नरसिंह रावांना डायनिंग टेबलजवळ आणून ओवाळले. ओवाळणे झाल्यावर केक कापण्याच्या कार्यक्रमास सुरुवात करणार, तोच नरसिंह राव मला शोधायला इकडे-तिकडे पाहू लागले. परंतु मी दिसलो नाही म्हणून त्यांनी मला बोलावणे पाठवले. सर्वाना आश्चर्य वाटले. मी तिथे पोहोचलो. कसला कार्यक्रम आहे हेच मला कळेना, पण केक पाहून लक्षात आले. मी साहेबांना थांबवून इतर स्टाफलासुद्धा बोलावले. मला वाटते, दिल्लीत आल्यानंतर प्रथमच नरसिंह रावांना कळले असेल, की आपल्याला तीन मुले, पाच मुली व इतकी सारी नातवंडे आहेत! कारण मी १९८५ साली त्यांच्याकडे गेल्यापासून त्यांचा वाढदिवस फक्त स्टाफ सदस्यच साजरा करीत होते. पुढील वर्षी नरसिंह रावांचा वाढदिवस रेस कोर्स बंगल्यावर साजरा झाला. वाढदिवस काय, दिवाळीच म्हणा ना! नरसिंह राव खुर्चीवर बसलेले आणि एकूण एक मुलं-मुली, सुना, जावई, नातवंडांचा घेराव! मात्र असे वाढदिवस नरसिंह रावांच्या नशिबी १९९६ पर्यंत, म्हणजे पंतप्रधानपदी असेपर्यंतच आले. कालाय तस्मै नम:!

दिल्लीत आता वारंवार यावे लागणार म्हणून तिथे एक रूम बांधून द्यावी अशी सूचना मुलांनी मला केली. परंतु नरसिंह रावांनी स्पष्ट सांगितले की, ‘‘इथे रूमच काय, पण एक विटसुद्धा येता कामा नये आणि खर्चदेखील करायचा नाही. ज्यांना इथे राहायचे असेल, त्यांनी जे आहे त्यात आनंद मानावा.’’ परंतु नरसिंह राव जेव्हा पंतप्रधानांचे निवासस्थान व तेथील कार्यालय पाहण्यास ‘७, रेस कोर्स रोड’वर गेले तेव्हा मात्र पाहुण्यांमुळे कामात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी शेजारचा ‘३, रेस कोर्स रोड’ हा बंगला स्वत:साठी घेण्याचे ठरवले. उद्देश हा की- ‘७’मध्ये कार्यालय, ‘५’मध्ये पाहुणे आणि ‘३’मध्ये स्वत:! पुढे दोन महिने होऊनही तिथे अजून काम सुरूच आहे हे नरसिंह रावांना कळले, तेव्हा कामाला इतका वेळ का लागत आहे, हे पाहण्यास ते स्वत: गेले. तेथील काम आणि त्यावरील खर्च पाहून ते इतके चिडले, की त्यांच्या तोंडून निघाले, ‘‘हा बंगला घेऊन मी मूर्खपणा केला.’’ तसे पाहिले तर खर्च अवास्तव नव्हता. जो खर्च होत होता तो पूर्ण सुरक्षेच्या दृष्टीनेच. पुढील खर्च वाचवण्यासाठी नरसिंह रावांनी ताबडतोब तिथे जाण्याचा निर्णय घेतला आणि १९९१ च्या ऑगस्टमध्ये शेवटच्या आठवडय़ात त्यांनी ‘९, मोतीलाल नेहरू मार्ग’ हा बंगला सोडला. एसपीजी अर्थात विशेष सुरक्षा दल (जे तेव्हा फक्त पंतप्रधानांसाठी असायचे.) यांना कामाच्या दृष्टीने तो सोयीचा होता. तसेच कार्यालयीन कामासाठीसुद्धा छान होता.

‘७, रेस कोर्स’ हा बंगला कार्यालयासाठी होता. दोन अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र मोठय़ा खोल्या, पंतप्रधानांच्या निवासस्थान व साऊथ ब्लॉकसाठी स्वतंत्र टेलिफोन एक्सचेंज, खासगी साहाय्यक, कॉपीज् काढण्याचे मशीन आणि टेलीप्रिंटरसाठी स्वतंत्र खोली, पंतप्रधानांसाठी मोठा दिवाणखाना, अभ्यागतांसाठी दोन खोल्या, कॅबिनेट व इतर बैठकींसाठी हॉल, बेडरूम, डायनिंग हॉल, स्वयंपाकाची खोली अशा सोयींनी युक्त होता. प्रत्येक बंगल्याच्या मागे-पुढे भव्य लॉन, फुलझाडे वगैरे. सायंकाळीही सुरक्षेच्या दृष्टीने इतका प्रकाश केलेला असतो की, दिवस-रात्र यांतला फरकच ध्यानात येत नाही. येणाऱ्या-जाणाऱ्यांमुळे कार्यालयामध्ये काम होत नसल्यामुळे मी व खासगी सचिव येथूनच आमचे काम करीत असू. नरसिंह रावसुद्धा अनेकदा साऊथ ब्लॉकमध्ये जात नसत. जाणे-येणे टाळल्याने जवळपास अर्ध्या तासाची बचत होत असे.

मात्र बंगल्यांतला हा बदल पुढे नरसिंह रावांसाठी शाप, तर मुलींसाठी वरदान ठरला. त्यांच्या दोन मुली परदेशात होत्या. हैदराबादला तीन मुली होत्या. त्यापैकी एक थोडी साधी होती, तसेच तिचे पतीसुद्धा होते. दोन मुली मात्र ‘तेज’ होत्या. त्यापैकी एक तर फारच! तिने ‘डॉमिनेट’ करण्यास सुरुवात केली. तिचा पहिला बळी ठरला तो स्वयंपाकी. नरसिंह राव सत्तेवर नसताना ज्याने दोन वर्षांहून अधिक काळ त्यांची मनोभावे सेवा केली, त्याच्यावर सोन्याची साखळी चोरल्याचा आळ घेऊन नोकरीतून काढण्यात आले. त्याजागी हैदराबाद येथील स्वयंपाकी आणला गेला. उद्देश एकच – दिल्लीतील बंगल्यातील घडामोडी कळाव्यात. मला जेव्हा हे कळले तेव्हा त्याला नोकरीतून काढून टाकण्याचे आदेश कोणी दिले, याची मी चौकशी केली. तेव्हा समजले की, केवळ मुलींच्या आग्रहास्तव इच्छा नसतानाही नरसिंह रावांना त्यांच्या पूर्वीच्या खासगी सचिवाला ‘ऑफिसर ऑन स्पेशल डय़ुटी’ म्हणून नेमावे लागले होते. त्याला मी चांगलेच खडसावून विचारले, ‘‘आप क्या जानते हो उस के संबंध में? दो साल में साहब की एक चीज भी नहीं गई, वह क्या चेन चुराएगा?’’ ताबडतोब त्याला मी बोलावून साऊथ ब्लॉकमधील कार्यालयात चपराशाच्या जागेवर काम करण्यास सांगितले. हाच स्वयंपाकी नंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले तेव्हा पुन्हा स्वयंपाकी म्हणून बंगल्यावर आला होता.

यानंतर मुलींची-जावयांची वर्दळ सतत वाढत गेली आणि नंतर नंतर तर मलाच आश्चर्य वाटू लागले, की आपला संसार सोडून मुली दिल्लीत महिना-महिना कशा राहतात? हे विषयांतर यासाठी की, मुली व जावयांचे दिल्लीतील सतत वास्तव्य नरसिंह रावांसाठी डोकेदुखी ठरली होती. एकदा एका मुलीने पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्र्यांना भेटीसाठी बंगल्यावर बोलावले. त्यांनी नरसिंह रावांना याबाबत विचारले असता नरसिंह रावांनी स्पष्ट सांगितले की, ‘‘तुम्ही त्यांचे नोकर नाहीत. काही जाण्याची गरज नाही व पुढेही जाऊ नका.’’

परंतु शेवटी पंतप्रधानांच्या कन्याच ना त्या! त्यामुळे इतर मंत्री त्यांना मान देत, त्यांची कामे करण्यात धन्यता मानत होते. नरसिंह रावांची अडचण अशी की, या लोकांना कसे सांगणार? दुसरे म्हणजे, आंध्रमधून मुलींच्या आग्रहास्तव नियुक्त अधिकाऱ्याचीसुद्धा यांना मदत होत होती. यानिमित्ताने त्यानेदेखील आपल्या मुलांचे चांगलेच भले करून घेतले. सर्व गोष्टी नरसिंह रावांच्या कानापर्यंत जात होत्या. पंतप्रधानपदाच्या जबाबदारीबरोबरच हीसुद्धा त्यांच्यासाठी एक डोकेदुखी होती, की यांच्या कर्तृत्वामुळे (?) ते स्वत: पुढे अडचणीत न येवोत. नरसिंह राव मात्र मुलींना फारसा भाव देत नसत. त्यांचा विश्वास फक्त एका मुलावर होता आणि तोसुद्धा सदैव त्यांच्याबरोबर राहिला. एक गोष्ट मात्र खरी, की नियमाने मुलींना मिळालेल्या एसपीजी संरक्षणाचा पूर्ण फायदा मुली-जावयांनी घेतला आणि केदारनाथपासून सर्व देश पालथा घातला!

आम्ही एकदा एका आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी ब्राझीलला गेलो होतो. परदेश प्रवासात नेहमीच येणारी नरसिंह रावांची एक मुलगी ‘फर्स्ट लेडी’ म्हणून सोबत होती. अमेरिकेत राहणारी एक मुलगी सहकुटुंब तिथे आली होती. नरसिंह राव पूर्ण शाकाहारी असल्यामुळे त्यांचा स्वयंपाकी व त्या देशात मिळत नसलेले खाद्यपदार्थ, भाज्या वगैरे भारतीय दुतावासाच्या साहाय्याने घेऊन जात असू. ज्या हॉटेलमध्ये पंतप्रधानांसह सर्वजण उतरत, तेथील स्वयंपाकघरातील एक भाग स्वयंपाक करण्यासाठी मिळत असे. परंतु यावेळी शक्य न झाल्यामुळे एका बेडरूममध्ये सर्व व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे तिथे गॅसऐवजी हॉट केस देण्यात आली होती. याच्यावर अन्न शिजण्यास वेळ लागतो. स्टाफ सदस्यसुद्धा तिथेच जेवत असत.

तर, दुपारी दोन वाजता सर्वाची जेवणे झाल्यावर स्वयंपाकी मला विचारून खासगी सचिवांबरोबर बाजारात गेला आणि सर्व जण सहा वाजेच्या सुमारास परतले. थोडय़ा वेळाने चपराशांच्या मदतीने त्याने स्वयंपाकाची तयारी सुरू केली. साडेसातच्या सुमारास बाहेर देशात राहणाऱ्या मुलीचा नोकर मुलांसाठी जेवण मागण्यास आला. स्वयंपाक्याने त्याला सांगितले, ‘‘अजून सुरुवात केली नाही, तास-दीड तास लागेल.’’ हा निरोप ऐकल्यानंतर जावई तणतण करीत आले व स्वयंपाक्याला वाटेल ते बोलून गेले. त्याला इतका राग आला, की त्याने स्वयंपाकच न करण्याचे ठरवून तो बसून राहिला. मला हे कळले तेव्हा मी तिथे जाऊन कशीतरी त्याची समजूत काढली. समजूत काढताना जावयाचा-मुलीचासुद्धा उल्लेख आला असावा. ही गोष्ट दुर्दैवाने तिथे असलेल्या त्यांच्या चपराशाने ऐकून त्यांना जाऊन सांगितली असावी.

रात्री साडेदहाला दिल्लीहून आलेली मुलगी ऑफिशियल डिनर घेऊन परतल्यानंतर या मुलीने रडत रडत सर्व हकीगत तिखट-मीठ लावून तिला सांगितली. नरसिंह रावसुद्धा तिथेच होते. थोडय़ा वेळाने चपराशी माझ्या बेडरूममध्ये आला व मुलीने मला बोलावल्याचे सांगितले. मी स्पष्ट सांगितले, की यावेळी कोणाच्याही बेडरूममध्ये जाणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आमचे प्रस्थान होते. मी तयार होऊन नरसिंह रावांकडे गेलो, तेव्हा मुलींच्या डोळ्यांतील अश्रू थांबलेले नसावे असे दिसले. त्यांनी आपल्या भाषेत नरसिंह रावांना ‘खांडेकर आले आहेत’ असे दोन-तीनदा सांगितले. परंतु नरसिंह रावांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले.

दुसरी घटना अशी की, पंतप्रधानपद गेल्यानंतर नरसिंह राव पूर्वीच्या- म्हणजे ‘९, मोतीलाल नेहरू मार्गा’वर राहण्यास आले, तेव्हा तेथे चपराशांना राहण्यासाठी असलेल्या खोल्यांपैकी दोन खोल्या मी स्टोअर रूमसाठी घेतल्या होत्या. नरसिंह रावांना मिळालेली उपरणे, शाली, शेले आदी सर्व भेटवस्तू या ठिकाणी ठेवल्या होत्या. तसेच इतर पुस्तके, कागदपत्रेही होती. नरसिंह राव वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात जाणार म्हणून त्यांची मुलगी दिल्लीला आली. नरसिंह राव जाण्यापूर्वी पूर्ण तपासणी करण्यासाठी ‘एम्स’मध्ये दाखल होते. कोणत्यातरी खासगी सचिवाने त्या मुलीला सांगितले की, खांडेकर येथील सामान घेऊन जातात. त्या मुलीने हे ऐकून कुलुपांवर सही केलेला कागद चिकटवला आणि निरोप ठेवला की- ‘माझ्या परवानगीशिवाय कोणीही खोली उघडायची नाही.’ जेवण करून मी बंगल्यावर गेल्यानंतर ही गोष्ट माझ्या नजरेस आणण्यात आली. कसलाही विचार न करता मी सरळ चार महिन्यांची सुट्टी व नंतर नोकरीचा राजीनामा नरसिंह रावांच्या नावे लिहून घरी निघून गेलो. खासगी सचिव मंडळींना ही अपेक्षा नसावी!

हा अपमान सहन न होऊन माझा रक्तदाब खरोखरच एकदम वाढला होता. दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे जावे लागले होते आणि विश्रांतीचा सल्ला मिळाला होता. नरसिंह रावांना अर्ज मिळताच त्यांनी मला बोलावणे पाठवले. मी निरोप दिला- ‘मला बरं नाही म्हणून येणे शक्य होणार नाही.’ दोन दिवस मी न गेल्यामुळे त्यांनी परत निरोप पाठवला की, ‘‘खांडेकरांना सांगा, त्यांना शक्य नसेल तर मी उद्या जाण्यापूर्वी येऊन जाईन.’’ हा त्यांचा मोठेपणा झाला. माझ्या दृष्टीने हे योग्य नव्हते. नाइलाजाने मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याकडे गेलो. सुदैवाने ती मुलगीसुद्धा तिथे होती. नरसिंह रावांनी विचारले, ‘‘हे काय आहे?’’ मी म्हणालो, ‘‘माझ्या निष्ठेबद्दल, इमानदारीबद्दल जिथे शंका घेतली जाते, अविश्वासाने पाहिले जाते तिथे नोकरी करणे मला कधीही शक्य नाही. हा अपमान माझ्या सहनशीलतेच्या बाहेर आहे. आपण तर स्वप्नातही अशी शंका घेतली नाही. आता मला जाऊ द्या.’’ मग मी जे घडले ते सांगितले. ते म्हणाले, ‘‘मी नाही का अनेक आरोप सहन करीत आलो आहे?’’ मी त्यांना सांगितले की, ‘‘त्यात आणि यात फार फरक आहे. मीसुद्धा अनेक आरोप सहन केलेत हे आपण जाणताच. इथे तुमची मुलगीच संशय घेते आहे.’’ यानंतर जवळपास दहा-पंधरा मिनिटे त्या मुलीचा नरसिंह रावांनी असा समाचार घेतला, की तिला देवच आठवले. डोळ्यांतून गंगा-यमुना वाहू लागल्या, त्या आटेनात. नरसिंह राव मला म्हणाले, ‘‘सर्व विसरा व उद्यापासून बंगल्यावर जा. मी अधूनमधून टेलीफोन करीन.’’ आपल्या विश्वासू कर्मचाऱ्यांचा मान राखण्यासाठी पोटच्या मुलीचीही पर्वा न करणारे मंत्री आज आढळतील का? शोधून बघा!

एकदा तर त्यांच्या मुलांनी टेलीफोन ऑपरेटर्सवर उद्धटपणे वागल्याची तक्रार खासगी सचिवांकडे केली होती. खासगी सचिव आयएफएस अधिकारी होते, शिवाय तापट वृत्तीचेही! त्यांनी काही विचार न करता दूरसंचार मंत्र्यांच्या खासगी सचिवांना सर्व टेलीफोन ऑपरेटर्स बदलण्याबाबत सूचना दिल्या. आजारपणामुळे मी कार्यालयात नव्हतो. दुसऱ्या दिवशी कार्यालयात (बंगल्यावरच्या) गेल्यावर थोडय़ा वेळाने खासगी सचिवांनी बोलावले. प्रकृतीची विचारपूस झाल्यावर ते म्हणाले, ‘‘कल मैने सात व्यक्तीयों को शहीद किया.’’ मी म्हणालो, ‘‘क्या साहाब, प्रधानमंत्रीजी के स्वीय सचिव होते हुए केवल सात व्यक्ती? वो तो ७००, ७००० होने चाहिए!’’ एवढे बोलणे झाल्यानंतर मी उठलो, तर ते म्हणाले, ‘‘बसा, पण कुणाला शहीद केले हे तुम्ही विचारले नाही?’’ मी म्हणालो, ‘‘शहीद करने के बाद क्या पुछना!’’ मग त्यांनी सर्व सांगून चौकशी करून यात लक्ष घालण्यास सांगितले. मी त्यांना स्पष्ट सांगितले, ‘‘वर्षांनुवर्षे पंतप्रधानांच्या निवासस्थानी काम करणारे टेलीफोन ऑपरेटर्स उद्धटासारखे वागूच शकत नाही.’’

सकाळची शिफ्ट संपल्यानंतर दोन ऑपरेटर्सना मी बोलावले. आणि..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2018 12:03 am

Web Title: ram khandekar article on pv narasimha rao
Next Stories
1 कठीण समय येता..
2 उदारीकरणाचे प्रणेते
3 अस्वस्थ पर्व
Just Now!
X