18 September 2020

News Flash

कुशल प्रशासक

दिल्लीत गेल्यावरही यशवंतरावांचं संगीतावरील प्रेम कमी झालं नव्हतं.

 

पत्रांची उत्तरे ४८ तासांत दिली गेलीच पाहिजेत असा यशवंतरावांचा दंडक होता. त्यांच्याकडे जाणारी प्रत्येक फाईल व्यक्तिगत सचिवांकडूनच गेली पाहिजे अशी प्रथा होती. एकदा हे सचिव सुट्टीवर असल्याने एकही फाईल यशवंतरावांकडे गेली नाही. दोन दिवस फाईल्स न आल्याने त्यांनी चौकशी केली असता त्यांना कारण कळले. ते रागावून म्हणाले, ‘मी सचिवांच्या भरवशावर काम करतो का? ताबडतोब फाईल्स मागवून घ्या.

यशवंतरावांचे अंतरंग आपण जितके चाचपत जाऊ तितकी त्यांच्यातल्या सुप्त गुणांची शिदोरी सापडत जाते. कलेची आवड तर त्यांना होतीच, पण त्यांची संगीताची आवडदेखील वाखाणण्याजोगी होती. तसं पाहिलं तर यशवंतरावांचा मुख्यमंत्रीपदावर पोहोचेपर्यंत संगीताशी फारसा संबंध आल्याचं दिसत नाही. दिल्लीला गेल्यानंतर एकदा न राहवून हा प्रश्न मी यशवंतरावांना बोलण्याच्या ओघात एकदा केला होता. आपल्याला संगीताचं वेड केव्हा व कसे लागलं, हे त्यांनाही कळलं नाही. ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या ‘सह्य़ाद्री’ या निवासस्थानी गणपतीच्या दहा दिवसांत रोज रात्री संगीताचा कार्यक्रम असे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी कार्यक्रम करायची संधी मिळतेय म्हणून नाही, तर यानिमित्तानं यशवंतरावांसमोर कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली म्हणून गायक कलावंत धन्यता मानत असत. संगीत मैफलीसाठी साधारणत: भारतीय बैठकीची व्यवस्था केलेली असे. आणि यशवंतराव पहिल्या रांगेत कलाकारासमोर बसून संगीताचा आनंद घेत. त्यांना भरभरून दाद देत. आपण एखाद्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला गेलो की लक्षात येते : ७० टक्के लोकांना आपण अमुक एका ठिकाणी गायकाला का दाद दिली, हेच माहीत नसते. काही जण सांगतात.. कानाला गोड वाटलं म्हणून! मात्र, मुंबईत मला या संगीत मैफलींचा आनंद घेता आला नाही. कारण रात्री उशिरा  घरी जाण्यासाठी मला वाहन मिळत नसे. एक गोष्ट मात्र खरी, की यशवंतराव नाटकांना जसे वारंवार जात, तसे संगीताच्या कार्यक्रमांना फारसे जात नसत.

दिल्लीत गेल्यावरही यशवंतरावांचं संगीतावरील प्रेम कमी झालं नव्हतं. वर्षांतून कमीत कमी दोन-तीन संगीताचे कार्यक्रम तरी त्यांच्या बंगल्यावर निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत होत असत. यशवंतरावांची बसण्याची जागासुद्धा ठरलेली असे. एकदा दिल्लीत कमानी ऑडिटोरियममध्ये संगीत महोत्सव होता. त्यात किशोरी आमोणकर यांचं गायन होतं. आयोजकांनी आग्रहाचं निमंत्रणही दिलं होतं. कार्यक्रम सुरू होण्याआधी ३०-४० मिनिटं त्या कार्यक्रमाबद्दल स्मरण करण्याबाबत यशवंतरावांनी सूचना दिली होती. संसदेचं अधिवेशन त्यावेळी सुरू होतं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या खात्याशी संबंधित विषयावर एक महत्त्वाची चर्चा होणार होती. ठरल्याप्रमाणे आयोजकांकडून स्मरणादाखल फोन आला आणि यशवंतरावांची चलबिचल सुरू झाली. कार्यक्रमाला जाण्याची त्यांना तीव्र इच्छा होतीच; पण तितकंच महत्त्व दुसऱ्या दिवशीच्या संसदेतील कामकाजालाही असल्यामुळे ती कागदपत्रं पाहणंदेखील अत्यावश्यक आणि महत्त्वाचं होतं. त्याकरता बराच वेळ द्यावा लागणार होता. त्यांची ती बेचैनी पाहून वेणूताईंनी सुचवलं, की आपण थोडा वेळ कार्यक्रमाला जाऊ या. हा पर्याय त्यांना एकदम पटला आणि आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो. ठरल्याप्रमाणे जवळपास पाऊण तासानं पहिला राग संपला आणि आम्ही उठून परत जाण्यासाठी गाडीपर्यंत आलो. वेणूताई गाडीत बसल्यावर यशवंतराव गाडीत बसणार तोच त्यांच्या डोक्यात काय आलं कोण जाणे. ते मला म्हणाले, ‘बाईसाहेबांना घरी घेऊन जा आणि गाडी पाठवून द्या. मी नंतर येईन..’ असं म्हणून ते कार्यक्रमाला जाऊन बसले. रात्री दीड-दोनच्या सुमारास ते परत आले आणि पहाटे चार-साडेचापर्यंत दुसऱ्या दिवशीच्या संसदेतील आपल्या खात्याशी संबंधित विषयावर काम करत बसले. दुसऱ्या दिवशी ते नेहमीप्रमाणेच वेळेवर उठले. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही थकवा जाणवत नव्हता, तर उलट आनंद आणि प्रसन्नता दिसत होती. कारण आदल्या दिवशी गाण्याची मेजवानी मिळाली होती ना!

यशवंतराव इतरांप्रमाणे कलाकारांचाही मान राखत असत. हिराबाई बडोदेकर यांना भारत सरकारकडून आर्थिक अनुदान मिळत असे. पण त्यासाठी दरवर्षी त्यांना अर्ज करावा लागत असे. यशवंतरावांना हे समजलं तेव्हा त्यांनी संबंधित मंत्र्यांना पत्र लिहून कळवलं की, हिराबाई बडोदेकर यांच्यासारख्या श्रेष्ठ कलाकारांना दरवर्षी अर्ज करावयास सांगणे हा एक प्रकारे त्यांचा अवमान करण्यासारखेच आहे. सबब ही प्रथा बंद करता आली तर त्यांचा मान राखता येईल. बालगंधर्व अतिशय आजारी असताना त्यांच्यासाठी परदेशातून काही औषधं मागवायची होती. यशवंतरावांच्या कानावर ही गोष्ट येताच त्यांनी ताबडतोब ती मागविण्याची व्यवस्था केली. ती औषधं आलीही. परंतु दुर्दैव असं की, ती येण्यापूर्वीच त्यांची जीवनज्योत मालवली होती.

यशवंतरावांची दिनचर्या सकाळी ६.३० वा. सुरू होत असे. प्रातर्विधी आटोपल्यावर चहा पिता पिता ते प्रमुख इंग्रजी-मराठी वर्तमानपत्रं चाळत आणि त्यातील अग्रलेख, पुस्तक परीक्षणं तसंच सद्य:परिस्थितीवरील लेख आवर्जून वाचत. त्यानंतर १०-१५ मिनिटं चिंतन-मनन करीत. नंतर आंघोळ वगैरे करून नऊला तयार होत. साडेनऊला ब्रेकफास्ट करून, देवाला आणि आईला नमस्कार करून नंतर त्यांना भेटायला आलेल्या जनताजनार्दनाच्या तक्रारी-गाऱ्हाणी ऐकत. त्यात कोणी महत्त्वाचे कार्यकर्ते, व्यक्ती असतील तर त्यांना बाजूच्या खोलीत बसवून त्यांच्याशी चर्चा करीत. काही महत्त्वाचे असेल तर त्या व्यक्तीस गाडीत सोबत घेत आणि मंत्रालयात जाईपर्यंत त्यांच्याशी चर्चा करीत. प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करण्याखेरीज त्यांना गत्यंतर नव्हतं. साडेदहापर्यंत ते ऑफिसला पोहोचत. साडेदहा ते दीड- भेटीगाठी. दीडनंतर बंगल्यावर जाऊन जेवणखाण करून परत चारला ऑफिसमध्ये. यावेळी साधारणत: बैठकी, मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांशी भेटीगाठी, चर्चा होत. साडेसहा-सातला ऑफिसमधील काम संपवून परत बंगल्यावर. बंगल्यावर साधारण दीड तास विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वेळ राखीव ठेवलेला असे. थोडक्यात, अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि धोरणे या वेळातच ठरत. नऊ वाजता रात्रीचे जेवण. जेवणाचा हा अर्धा तास यशवंतराव कुटुंबातील सर्वासोबत गप्पागोष्टी करत घालवत. दिवसाच्या २४ तासांतील हा अर्धा तासच केवळ कुटुंबासाठी- यावरून मुख्यमंत्र्यांची जबाबदारी काय व किती असते याची कल्पना यावी. साडेनऊच्या सुमारास झोपण्यापूर्वी पत्नी वेणूताईंसोबत घरगुती संवाद/ चर्चा. यावेळी वेणूताई कुटुंब आणि संसारातील घडामोडी सांगून यशवंतरावांचा काही गोष्टींबाबत सल्ला घेत. यशवंतरावही हातचे न राखता दिवसभरातील घटनांबद्दल वेणूताईंना सांगत. दहा वाजता वेणूताई झोपण्यासाठी जात आणि मग यशवंतराव दिवसभरात आलेल्या फाइल्समध्ये डोकं खुपसत. पत्रांची उत्तरे ४८ तासांत दिली गेलीच पाहिजेत असा त्यांचा दंडक होता. तसंच कोणतीही फाईल दुसऱ्या दिवशी योग्य शेऱ्यासह विभागात परत गेलीच पाहिजे असा प्रयत्न असे. यशवंतरावांकडे जाणारा प्रत्येक कागद/ फाईल व्यक्तिगत सचिवांकडूनच गेली पाहिजे अशी प्रथा होती. दिल्लीत असताना एकदा हे सचिव चार-पाच दिवस सुट्टीवर असल्याने एकही फाईल यशवंतरावांकडे गेली नाही. दोन दिवस फाईल्स न आल्यामुळे त्या का येत नाहीत याची त्यांनी चौकशी केली असता त्याचे कारण त्यांना कळले. ते रागावून म्हणाले, मी व्यक्तिगत सचिवांच्या भरवशावर काम करतो का? ताबडतोब फाईल्स मागवून घ्या. रात्री दहाला ऑफिस उघडून फाईल्स आणण्यात आल्या. यास अपवाद फक्त दौऱ्यावर असतानाच होई. शेवटचा सरकारी कागद वा फाईल हातावेगळी होईपर्यंत कोणी कामात व्यत्यय आणलेला त्यांना खपत नसे.

या ठिकाणी दोन गोष्टींचा विशेष उल्लेख करावा लागेल. कार्यक्षमता म्हणजे हातातलं काम झटपट निकालात काढणं नव्हे. त्या कामाशी ज्या माणसाचा संबंध असेल त्यांना आपलं म्हणणं ऐकून घेतलं गेलं आणि आपल्याला न्याय मिळाला असं समाधान मिळणं यात खरी कार्यक्षमता असते. राज्यातील लोकांना जास्तीत जास्त विशुद्ध, कार्यक्षम व नि:पक्षपाती कारभार देण्याच्या प्रयत्नात कोणत्याही प्रकारे कसूर होणार नाही, यादृष्टीने यशवंतरावांकडे जाणारा प्रत्येक कागद/ फाईल पाहिली जात असे. त्यांच्या या तत्त्वामुळे फाईल्स पाहण्यासाठी त्यांना बराच वेळ द्यावा लागत असे. प्रत्येक फाईल पहिल्या नोटिंगसह ते पाहत. शेवटी निजी सचिव वा संयुक्त सचिवांचा शेरा पाहत. डिक्टेशनसाठी मी त्यांच्याकडे गेलो असता थोडीशी सवड आहे म्हणून फाईल्स पाहत असलेले यशवंतराव मी प्रत्यक्ष पाहिले आहेत. नरसिंह रावांकडे अर्जदाराच्या फाईल्स परीक्षणासाठी येत तेव्हा मला हा अनुभव उपयोगी पडला. याचं एक उदाहरण सांगतो.

ते संरक्षण मंत्रालयात असताना पुण्यातील दोन अधिकाऱ्यांना काही कारणास्तव निलंबित करून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यातील एका कनिष्ठ अधिकाऱ्यावर एफआयआरसुद्धा दाखल करण्यात आला होता. विभागीय चौकशीत दोघेही निर्दोष सुटले. पण कनिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध एफआयआर दाखल केलेला असल्यामुळे ते प्रकरण कोर्टात गेले होते. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्याची पुन्हा नियुक्तीही झाली. कनिष्ठ अधिकारी कोर्टातही निर्दोष सुटला. पण त्याची नेमणूक न करता पुन्हा विभागीय चौकशी करण्याचे ठरले. नव्या चौकशी अधिकाऱ्याकडून न्याय मिळण्याची आशा नसल्यामुळे त्या कनिष्ठ अधिकाऱ्याने दुसऱ्याची नेमणूक करण्याची विनंती केली. ती मान्य न करता चौकशी झालीच. त्यातही तो निर्दोष ठरला. तरीही त्याला पुन्हा नियुक्त करण्यात आले नाही. त्या अधिकाऱ्याने सहा-सात संसद सदस्यांकडून निवेदनही पाठवले. त्यांना संरक्षण मंत्र्यांतर्फे गुळमुळीत उत्तरं देण्यात आली. वरवर ती फाईल पाहिली तर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यात तथ्य वाटे. पण मी जेव्हा मूळ नोटिंग पाहिले तर सेक्शन अधिकाऱ्याने आपल्या नोटिंगमध्ये त्याला न्याय दिला होता आणि नियुक्तीची शिफारसही केली होती. नंतर मात्र या गोष्टीला कलाटणी मिळाली. ही बाब मी संरक्षण मंत्र्यांच्या नजरेस आणून दिली आणि त्याला न्याय दिला गेला.

जवळपास ४६ वर्षांच्या माझ्या सरकारी कार्यपद्धतीतील अनुभवानंतर एक गोपनीय गोष्ट सांगावीशी वाटते. सरकारी कार्यालयात जर तुम्हाला कोणतेही काम करून घ्यायचे असेल तर अंडर सेक्रेटरीपर्यंतच्या व्यक्तींनाच भेटा. आवेदकांचे हित-अहित करणे त्यांच्याच हातात असते. वरच्या अधिकाऱ्याकडे गेलात तर त्याने तुम्हाला नियम दाखवलाच समजा. त्यामुळे देशभरातील दिल्लीत असलेले असंख्य लायझनिंग ऑफिसर्स लहान-मोठय़ा कामासाठी याच मार्गाचा अवलंब करताना दिसतात. १९९१ पर्यंत लायसन्स प्रणाली असताना रिसेप्शन ऑफिसरच्या कृपेने ते अंडर सेक्रेटरीच्या वरच्या अधिकाऱ्यांच्या नावे पास घेऊन प्रवेश करीत. या उपकाराची फेड म्हणून त्या अधिकाऱ्याची महिन्यातील चार-पाच जेवणाची बिले कंपनीमार्फत देण्यात येत असत. फक्त मोठय़ा योजनांकरिता सचिव वा मंत्र्यांपर्यंत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जात. या कार्यपद्धतीमुळे योग्य व्यक्तीवर अन्याय झाल्याची आणि अपराध्याला सोडून दिल्याची अनेक प्रकरणे सरकारदरबारी घडत असतात. मंत्र्यांचा व्यक्तिगत सचिव असून मीही यातून सुटलो नाही. मी जवळपास नऊ खात्यांत फिरलो. मी डेप्युटेशनवर असल्यामुळे काही वेळा माझा पगार ठरवण्यापूर्वी मूळ खात्याला विचारणा करण्यात येत असे. एकदा परराष्ट्र मंत्रालयातून वाणिज्य मंत्रालयात गेल्यानंतर माझ्या मूळ पगारात वाढ झाली होती आणि त्याचे आदेश नंतर उशिरा आले होते. परराष्ट्र मंत्रालयात पगार निश्चित झाल्याशिवाय नव्या खात्यातील पगार ठरणार नव्हता. तेव्हा तेथील अंडर सेक्रेटरीने (जो मराठी होता!) कोणत्या तरी नियमाचा आधार घेऊन माझा पगार ८८० रुपयांवरून ६६० रुपयांवर आणला. अनेकदा भेटी घेऊनही ‘हे संयुक्त सचिवाच्या आदेशाने झाले, मी काही करू शकत नाही,’ असे मला सांगितले जात असे. तो अधिकारी तिथून गेल्यानंतर मात्र योग्य त्या नियमाच्या आधारे पुन्हा योग्य रीतीने माझी पूर्वीच्याच पगारावर नेमणूक करण्यात आली. माझी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख होती म्हणून हे शक्य झाले. त्या खात्याचा तो प्रशासकीय अंडर सेक्रेटरी असल्यामुळे सर्वाचे सव्‍‌र्हिस बुक्स, (ज्यात नियुक्तीपासूनचा रेकॉर्ड असतो) त्याच्याच पाशी असे. त्याने आपल्या सव्‍‌र्हिस बुकमध्ये जन्मतारखेवर शाईचा डाग पाडून ती १९३२ ऐवजी १९३४ करून निवृत्तीनंतरही तो सेवेत कायम होता. एका अधिकाऱ्याच्या हे लक्षात आल्यावर त्याने आरडाओरड केली. त्यामुळे त्याला अक्षरश: तोंड काळे करावे लागले. सुदैवाने हा अंडर सेक्रेटरी मराठी होता आणि त्याचा जॉइंट सेक्रेटरीही मराठी होता. त्यामुळे हे प्रकरण दाबून टाकण्यात आले होते.

यशवंतरावांसारखे सरकारी कामांना इतका वेळ देणारे फारच थोडे मंत्री असतात. बहुतेक जण निजी सचिवाने फाईल समोर ठेवली की सही करून ती परत करतात. तर काहींना मंत्र्यांच्या मागे सहीसाठी फाईल्स घेऊन फिरावे लागते. यशवंतराव कुशल प्रशासक होते असे म्हणतात ते यामुळेच!

ram.k.khandekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 1:12 am

Web Title: ram khandekar article on yashwantrao chavan
Next Stories
1 रत्नपारखी
2 वरी चांगला, अंतरी गोड!
3 द्रष्टे नेतृत्व
Just Now!
X