प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या बातमीदाराचा फोन आला. तो म्हणाला, ‘मला फक्त यशवंतरावांशीच बोलायचे आहे. एक अतिशय महत्त्वाची, तितकीच मजेशीर बातमी आहे.ध्यानीमनी नसलेली ती बातमी होती. दिल्लीत पोहोचल्यानंतर ज्या नाटय़मय घटना एकामागून एक ऐकावयास मिळत होत्या, त्याचा हा उच्चांक बिंदू होता. बातमी होती- चीनने युद्धबंदी जाहीर केल्याची. तीही एकतर्फी!

मोरारजी देसाई यांच्या निवासस्थानी रात्री विश्रांतीसाठी आलेल्या यशवंतरावांना बिजू पटनाईक यांचा फोन आला. पटनाईक संरक्षणमंत्रिपदासाठी उत्सुक होते. फोनवर पटनाईकांनी सांगितले, ‘‘मला तातडीने चिनी आक्रमण व संरक्षणसिद्धता यासंबंधी बोलायचे आहे. मी ताबडतोब येतो.’’ त्यांना इतकी घाई झाली होती की यशवंतरावांच्या होकार-नकाराचीसुद्धा त्यांनी वाट पाहिली नाही. पटनाईक यांच्या भेटीमुळे चिंता थोडीफार कमी होण्यास मदत होईल अशी यशवंतरावांना आशा होती. वाळवंटातील प्रवासात थेंबभर जरी पाणी दिसले तरी कसा आनंद होतो, तसाच यशवंतरावांना झाला. यशवंतराव तयार होऊन बैठकीच्या खोलीत येतात तोच पटनाईक आले. यशवंतरावांना दिल्लीच्या राजकारणातील आतल्या गाठीच्या राजकारणी पुरुषाचा पहिला धक्कादायक कटू अनुभव त्यांच्या भेटीतून आला. आता अशा लोकांच्या सहवासातच आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे का, या विचाराने आतापर्यंतच्या त्यांच्या चिंतेत आणखी एकाची भर पडली. पटनाईकांनी अर्धा-पाऊण तास संरक्षण खाते आणि चिनी आक्रमण याबाबत यशवंतरावांच्या मनात भीती उत्पन्न होईल अशी माहिती वरकरणी गंभीरतेचा आव आणून तिखट-मीठ लावून सांगितली. यशवंतरावांना कदाचित लहानपणीच्या बागूलबुवाची आठवण झाली असेल! पटनाईक शेवटी म्हणाले, ‘‘तुम्ही दिल्लीला इतक्या लांबवर कशाला आलात?’’ या प्रश्नाने यशवंतराव अक्षरश: चक्रावून गेले.

Yavatmal Washim lok sabha seat, Bhavana Gawali, Rajshree Patil, Campaign for Mahayuti, bhavana gawali with Rajshree Patil, bhavana gawali Campaign, shivsena, lok sabha 2024, election 2024, mahayuti, yavatmal news, washim news, bhavan gawali news, marathi news,
दिल्लीवारी हुकलेल्या भावना गवळी म्हणतात, राजश्री पाटील यांना दिल्लीत पाठवा….
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
swati mahadik
स्वाती महाडिक यांच्या जिद्दीला बढतीचे बळ !
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

ते इथेच थांबले असते तर ठीक होते; पण पटनाईक मुरलेले दिल्लीकर होते. ते पुढे म्हणाले, ‘‘चीनचे सैन्य झपाटय़ाने पुढे सरकत आहे. अन् कदाचित मुंबईलाही धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी तुम्ही मुंबईत असले पाहिजे.’’ यशवंतरावांचा अजून शपथविधीही व्हायचा असल्यामुळे यशवंतराव मुंबईचे नाव ऐकताच आल्या वाटेने परत जातील अशी त्यांची खात्री असावी. म्हणूनच त्यांनी यशवंतरावांना रात्रीच गाठले होते. मात्र, यशवंतराव दिल्लीत नवे असले तरी कच्चे राजकारणी नव्हते. राजकारणात धोबीपछाड देण्यात तेही पारंगत होते. आणि वेळ आलीच तर त्याचा उपयोगसुद्धा ते करीत. बोलण्यातून पटनाईकांचा स्वार्थ यशवंतरावांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. यशवंतराव मराठी गडी! त्यांनी पटनाईक यांना जशास तसे, ठोशास ठोसा असे उत्तर देऊन त्यांची बोळवण केली. यशवंतराव म्हणाले, ‘‘कोणत्याही परिस्थितीत मी संरक्षणमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारण्याचा निर्धार केला आहे. आणीबाणीच्या वेळी राष्ट्राकरता जेवढे जास्तीत जास्त करता येईल तेवढे करण्याचा माझा निर्णय पक्का झाला आहे. चक्रव्यूहात मी प्रवेश केला आहे आणि ते भेदण्याचे सामथ्र्य माझ्यात आहे.’’ मध्यरात्र होऊन गेली होती. ही चपराक सहन करतच पटनाईक मुकाटय़ाने घरी परतले.

विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊनही, स्वार्थाची गोष्ट निघालीच आहे म्हणून थोडेसे विषयांतर करून ‘दिल्लीकरां’ची पुसटशी कल्पना देतो. एकदा माझ्या शेजाऱ्याने काही कागदपत्रे साक्षांकनासाठी माझ्याकडे पाठवली होती. मी मूळ कागदपत्रे मागितल्याने त्याने नंतर ती पाठवली. त्यात सर्वात खाली एक कोरा कागद होता, तो मी परत केला. तो कागद घेऊन त्यांची मुलगी परत आली व म्हणाली, ‘‘पापा कह रहे हैं कि आप अटेस्टेड कर दो. बाद में ऑफिस जाकर वे फोटोकॉपी कर लेंगे.’’ त्यांच्या धाडसाचे कौतुक करत मी नकार देऊन तो परत केला. वाचकहो, महाराष्ट्रातील एक तरी माणूस असे स्वप्नातही धाडस करू शकतो का? दुसरे उदाहरण.. माझं पोट खूप दुखत असे म्हणून यशवंतरावांकडे येणाऱ्या प्रसिद्ध सरकारी डॉक्टरांच्या सल्ल्याने मी एक्स-रे काढला. त्यात अल्सरचे निदान होताच त्या तज्ज्ञ डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या व दर आठवडय़ाला रक्त तपासण्यास बोलावले. ‘डिफेन्स’चा दवाखाना कार्यालयाच्या मागेच असल्यामुळे तेथील डॉक्टरांकडून त्या गोळ्या मी मागवत होतो. एकदा त्याने मला खोदून विचारले, की या गोळ्या कशासाठी घेता? त्यांना सर्व कागदपत्रे, एक्स-रे दाखवले. त्यांचा चिंताग्रस्त चेहरा पाहून काहीतरी काळेबेरे असल्याचा मला संशय आला व मी दुसऱ्या डॉक्टरला त्या गोळ्या दाखवल्या. रात्री साडेअकरा वाजता मला त्यांचा फोन आला, की ‘‘या गोळ्या ताबडतोब बंद करा. या कॅन्सरसाठी आहेत.’’ गोळ्यांचे नाव होते- ‘प्युरिनिथॉल’! आज ५० वर्षे होऊन गेली तरी मी ही गोष्ट विसरलेलो नाही. खोलात शिरल्यावर मला सांगण्यात आले, की हा एक प्रयोग होता आणि तो यशस्वी झाला असता तर वर्षांतून एकदा प्रकाशित होणाऱ्या जर्नलमध्ये हे डॉक्टर त्याविषयीचा शोधनिबंध प्रकाशित करणार होते. साधी माणुसकीही नसल्याचे हे उदाहरण. यशवंतरावांना हे जेव्हा समजले तेव्हा त्यांना धक्काच बसला.

दिल्लीत प्रत्येक गटाची- जाती, धर्म, पेशा वगैरे- विचारसरणी, संस्कार निराळे आहेत. दिल्ली कागदोपत्री जरी भारताची राजधानी असली तरी तेथील वातावरण, दैनंदिन जीवन, नीती-अनीती, संस्कार पाहून दिल्ली हे एक स्वतंत्र राष्ट्रच असल्याची शंका येते. हे सर्व अनुभवताना कधी कधी मनात विचार येत असे, की भारताची राजधानी दक्षिणेत नेली तरच ‘अच्छे दिन’ येण्याची आशा आहे. इथे कोणतीही संस्कृती नाही किंवा कोणत्याही राज्याची संस्कृती सहजासहजी इथे पाहायला मिळत नाही. इथे फक्त एकच ध्येय : केवळ स्वार्थ आणि पैसा. आणि त्यासाठी वाट्टेल ते- अगदी नीती, संस्कार आणि विवेकाला पूर्णपणे तिलांजली देऊन काम करण्याची इथली मानसिकता! यशवंतराव, नरसिंह राव यांच्यासारख्या सुशील, सुसंस्कृत, संस्कारी व्यक्तींनी बरीच वर्षे दिल्लीत सत्तेत राहून कशी काय काढली असतील, याचा विचार वाचकांनीच करावा. दिल्लीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे इथे अगदी लहान-मोठय़ा, तसेच स्वस्तातील स्वस्त ते महागडय़ा वस्तूंपर्यंत सर्व गोष्टी ‘दुरूस्त’ होतात. त्यांचे भाग- बनावट का असेना- मिळतातच. नागपूरला आल्यानंतर मला मात्र तिथल्या अनेक वस्तू फेकून द्याव्या लागल्या होत्या. असो.

तर.. बिजू पटनाईक गेल्यानंतर सकाळ होण्यास फार वेळ उरला नव्हता तरी यशवंतरावांनी गादीला पाठ टेकवली. थोडय़ा वेळाने फोन वाजला. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या बातमीदाराचा फोन होता. तो म्हणाला, ‘‘मला फक्त यशवंतरावांशीच बोलायचे आहे. एक अतिशय महत्त्वाची, तितकीच मजेशीर बातमी आहे.’’ यशवंतरावांना साहजिकच वाटले, की आजच्या परिस्थितीत नवीन संरक्षणमंत्र्यांचा मुहूर्त साधून चीनने आणखी जोरात मुसंडी मारली असेल. मात्र, ध्यानीमनी नसलेली ती बातमी होती. दिल्लीत पोहोचल्यानंतर ज्या नाटय़मय घटना एकामागून एक ऐकायला मिळत होत्या, त्याचा हा उच्चांक बिंदू होता. बातमी होती- ‘चीनने युद्धबंदी जाहीर केली आहे. तीही एकतर्फी’! बाहेर पहाटेच्या सुखद वातावरणाची चाहूल लागत होती आणि इकडे यशवंतरावांच्या दिल्लीतील जीवनाची आनंदाची पहिली पहाट उगवली होती. बातमीची खात्री पटल्यानंतर यशवंतरावांनी फोन केला तो वेणूताईंना! त्याच तर खऱ्या सुख-दु:खाच्या साथीदार होत्या त्यांच्या. दिल्लीत आल्यापासून त्यांचे वेणूताईंशी बोलणे झाले नव्हते.

यशवंतरावांनी आतापर्यंत नि:स्वार्थ बुद्धीने केलेल्या कर्माचे हे फळ होते. आश्चर्य म्हणजे ही बातमी नेहरूंना, शास्त्रीजींना रात्र उलटून गेल्यावर दुसऱ्या दिवशी कळली. तो दिवस होता- २१ नोव्हेंबर १९६२.. यशवंतरावांच्या संरक्षणमंत्री म्हणून शपथविधीचा. त्या दिवशी महाराष्ट्रातील बहुतेक वर्तमानपत्रांतील पहिल्या पानावर शीर्षक होते- ‘हिमालयाच्या रक्षणास सह्य़ाद्री धावला’! महाराष्ट्रातून सह्य़ाद्री गेल्यानंतर पुढे काय, याचा विचार कोणीच केला नव्हता का?

खरं तर हा शपथविधी अतिशय गंभीर वातावरणात होण्याची शक्यता होती. त्यामुळे अतिशय साधेपणाने आणि मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत तो पार पडेल असे वाटले होते. परंतु चीनच्या या घोषणेने वातावरणात आमूलाग्र बदल झाला होता. आनंदोत्सव नसला तरी सर्वाचे चेहरे बरेच खुलले होते. उपस्थितीसुद्धा बरी होती. शपथविधी संपताच राष्ट्रपतींनाही राहवले नाही. त्यांनी यशवंतरावांना जवळ घेऊन त्यांचे खास अभिनंदन केले. शपथविधी सोहळा आटोपून यशवंतराव साऊथ ब्लॉकमधील संरक्षण मंत्रालयातील आपल्या कार्यालयात आले. दिल्लीत एक प्रथा आहे : नवीन मंत्री आले की बहुतेक सर्व जण येऊन त्यांचे स्वागत करतात. (गेल्या काही वर्षांपासून या प्रथेला विद्रूप स्वरूप येऊ लागले आहे.) स्वागताचा कार्यक्रम शक्य तितक्या लवकर आटोपून यशवंतरावांनी मुख्य कामास सुरुवात केली. सचिवांपासून सेनाध्यक्षांपर्यंत सर्वाचा परिचय करून घेतला.

द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर जे सोपस्कार करण्यात आले होते, जवळपास तसेच इथेसुद्धा करण्याची गरज यशवंतरावांना जाणवली. मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांमधील मरगळ झटकून त्यांच्यात कामाबद्दलची आस्था निर्माण करावी लागणार होती. तसेच सीमेवरील जवान व अधिकाऱ्यांच्या मनातील सरकारबद्दलचा तिरस्कार निपटून काढून आपुलकी, जिव्हाळा निर्माण करण्याची नितांत आवश्यकता होती. कान व डोळे यांत एका वितेचे अंतर असते असे आपण नेहमी म्हणतो. म्हणून ऐकीव गोष्टींपेक्षा काय घडले हे तेथील अधिकाऱ्यांच्या, जवानांच्याच तोंडून प्रत्यक्ष जाणून घेतल्याशिवाय एक पाऊलही पुढे जाणे शक्य वा योग्य नाही याची कल्पना यशवंतरावांना आली. इतरांच्या आणि यशवंतरावांच्या विचारांतील हाच तर फरक आहे!

यशवंतरावांचा मुक्काम मोरारजी देसाईंकडे होता. त्यांच्याच बंगल्यातून त्यांनी कामकाज सुरू केले होते. मात्र, असे दुसऱ्याच्या घरी राहून कामकाजाची रूपरेखा आखणे आणि त्यानुसार कार्यवाही करणे त्यांना शक्य होत नव्हते. म्हणून रिकाम्या असलेल्या कोणत्याही बंगल्यात राहावयास जायची त्यांनी तयारी ठेवली आणि चार-पाच दिवसांतच ते ‘१८, अकबर रोड’ या लहानशा बंगल्यात राहावयास गेले. इंग्रजांच्या बांधकामाचे वैशिष्टय़ हे, की बंगला लहान-मोठा असला तरी त्यात शयनकक्ष कमीत कमी तीन तरी असत. आवार (आजूबाजूची जागा) एक एकर तरी असे. ‘बोले तैसा चाले’ या उक्तीनुसार यशवंतरावांनी लडाख व नेफा या युद्धभूमीस भेट दिली आणि जवानांसोबत वेळ घालवून त्यांच्या हालअपेष्टा स्वत: पाहिल्या. त्यांनी जे अनुभवले, प्रत्यक्ष पाहिले ते इतके भयंकर होते, की तिथला प्रत्येक क्षण यशवंतरावांना यातना देत होता. यशवंतरावांनी जवानांसोबत मनमोकळ्या गप्पा केल्या. जेवण घेतले. यशवंतरावांच्या आस्थेमुळे संरक्षणमंत्री व मंत्रालयासंबंधी जवानांमध्ये आपुलकी निर्माण होण्यास सुरुवात झाली.

यशवंतरावांनी राजस्थान आणि कडाक्याची थंडी असूनही काश्मीर सरहद्दीलाही भेट दिली. यशवंतराव सूर्योदय होताच दौऱ्यावर निघत ते थेट रात्री परत येत. सबंध उत्तर भारतात त्यावेळी कडाक्याची थंडी असे. आम्ही रात्री झोपताना रजई तर घेत असूच, पण खोलीचे थोडेसे दार उघडून हिटरही लावत होतो. मुंबईची सवय असलेले यशवंतराव सकाळीच बाहेर पडून थंडी कशी सहन करत असतील, देव जाणे! त्यांना कर्तव्याने पछाडले होते.

यशवंतराव मंत्रिपदाचे आपले वस्त्र दिल्लीतच ठेवून जात असल्याने ते आपल्यातलेच एक आहेत असे जवानांना वाटू लागले. त्यांच्या ममतेच्या, आपुलकीच्या वागण्याने जवानांना बोलते केले. बहुतेक सीमांवर बोलण्याच्या ओघात अतिशय महत्त्वाची आणि आतापर्यंत कोणीच दखल न घेतलेली अशी माहिती यशवंतरावांना कळत होती. ती म्हणजे- युद्ध सुरू होण्याच्या आधीपासूनच काही घटनांमुळे लष्करी अधिकारी आणि जवान यांच्यातील आत्मविश्वासाला तडा गेलेला होता. त्यांच्यात निराशा पसरली होती. प्रत्येक वेळी आपला अवमान होत असल्याची भावना सर्व थरांत निर्माण झाली होती. दिल्लीतील बैठकीत जनरलपासून सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करतानाही हाच अनुभव येत होता. ही भावना लोकशाहीसाठी घातक ठरण्याची शक्यता होती. या भावनांचा स्फोट होण्यापूर्वीच परिस्थिती आटोक्यात आणण्याची गरज होती. या कामाला प्राधान्य देणे गरजेचे होते. ही गोष्ट कोणाजवळही न बोलणे हिताचे असे ठरवून यशवंतरावांनी स्वत:च ‘यशवंत नीती’ने परिस्थिती आटोक्यात आणली. मात्र, याची नोंद त्यांनी आपल्या डायरीत करून ठेवली. किती दूरदृष्टी! किती आत्मविश्वास! मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांचा जसा गौरव झाला तसाच तो संरक्षणमंत्री म्हणूनही होत राहिला, याचे हेच गुपित होते.

ram.k.khandekar@gmail.com