24 May 2018

News Flash

नागपूरचा वियोग

२:१ या प्रमाणात बदलीच्या याद्या तयार होऊ लागल्या. फायली बांधणे सुरू झाले.

भाषावार प्रांतरचनेमुळे मध्य प्रदेशातील दोन- तृतीयांश कर्मचारी मध्य प्रदेशात, तर एक- तृतीयांश कर्मचारी महाराष्ट्रात जाणार होते. कारण मध्य प्रदेशात १४ जिल्हे हिंदी आणि चार मराठी होते. नागपूरला फक्त कमिशनर आणि कलेक्टर ऑफिस राहणार होते. १९५६ मधील सप्टेंबर-ऑक्टोबर महिना या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना चिंतेचा, मानसिक तापाचा गेला. साहजिकच होते ते! वर्षांनुवर्षे एकत्र राहिलेली कुटुंबे यामुळे विस्कळीत होणार होती. बहुसंख्यांनी नागपूर सोडून जाण्याची कल्पना स्वप्नातही कधी केलेली नसल्यामुळे बदलीचा आदेश त्यांना मृत्युदंडाच्या शिक्षेसारखाच ठरणार होता. परिणामी आपोआपच विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात येणार होती. ती दिवाळी आली कधी आणि गेली कधी, कोणालाच कळले नाही. १४ ऑक्टोबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण दीक्षा समारंभाची साधी नोंदही घेण्याची शुद्ध कुणाला उरली नव्हती. कुणाची कर्ती मुले बाहेर जाणार होती, तर कुणाचे पती, तर कुणाची विधवा सून. बदली होऊन जाणारे सगळेच जण आपल्या कुटुंबाचे पोषणकर्ते होते. बदली झाल्यावर दोन संसार सांभाळणे बहुतेकांना शक्य नव्हते. थोडक्यात, नोकरदारांसाठी ती ‘त्सुनामी’च होती.

२:१ या प्रमाणात बदलीच्या याद्या तयार होऊ लागल्या. फायली बांधणे सुरू झाले. कर्मचाऱ्यांची निवड करताना चांगला कर्मचारीवर्ग मध्य प्रदेशात नेण्याच्या वृत्तीने जोर पकडला. माझ्या कुटुंबालासुद्धा हा ‘जोर का झटका’च होता. माझ्या भावाची बदली मध्य प्रदेशात इंदूरला झाली होती. मी हिंदी स्टेनोग्राफर असल्यामुळे माझी बदलीही मध्य प्रदेशातच होईल याची मला खात्री होती. मात्र, दैवाने इथे साथ दिली नाही. २:१ हे प्रमाण साधण्यासाठी आणि मी मराठी असल्यामुळे माझी बदली मुंबईला झाली. वयस्कर वडील, सतत आजारी असणारी आई आणि शिक्षण घेत असलेली दोन चुलत भावंडे सतत नजरेसमोर येत होती. नागपुरात नवीन नोकरीची यत्किंचितही शाश्वती नसल्यामुळे बदलीच्या ठिकाणी जाणे भाग होते. ऑक्टोबरच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवडय़ापासून नागपूर रेल्वे स्टेशनवरील हृदयद्रावक दृश्य पाहण्याचे धाडस होत नव्हते. एका व्यक्तीला पोहोचवण्यासाठी कुटुंबातील सगळीच मंडळी येत. गंभीर चेहरे.. डोळ्यांतून अविश्रांत वाहणाऱ्या गंगा-यमुना. माझ्या भावाला स्टेशनवर पोहोचवायला सर्व कुटुंबीय गेले होते. आपल्यावरही अशीच वियोगाची पाळी येणार आहे, ही कल्पना मनाला क्लेश देत होती. त्या दिवशी घरात कोणीच जेवले नाही.

आता माझी पाळी. क्लार्कपेक्षा अनुवादक जास्त असल्यामुळे मुंबईतील कार्यालयात त्यांच्यासाठी जागा शोधणे अवघड बाब होती. त्याहीपेक्षा अतिशय डोकेदुखी होती ती म्हणजे माझ्यासाठी योग्य जागेची निवड. कारण हिंदीचे महाराष्ट्राशी किती सख्य होते याची कल्पना सर्वानाच होती. दुसऱ्या राज्यातून मुंबईत येणारे जावई असल्यामुळे त्यांना काही काळ तरी सन्मानाने वागवण्याची जबाबदारी मुंबईकरांवर होती. तीन महिने होऊन गेले तरी या तिढय़ातून मार्ग निघेना. शेवटी प्रकाशन विभागात एक इंग्रजी स्टेनोग्राफरची जागा कमी करून ती हिंदी स्टेनोग्राफर म्हणून केली गेली. आणि त्या जागेवर माझी नियुक्ती होऊन फेब्रुवारीत माझी बदली मुंबईला झाली. तेव्हा माझे वय होते अवघे २२ वर्षांचे. त्यामुळे मुंबईला माझे कसे होणार, या चिंतेत आई-वडील होते. शेवटी २५ फे ब्रुवारीला तो काळा दिवस उजाडलाच. मी माझ्या तीन सहकाऱ्यांसोबत नागपूर सोडले. या ठिकाणी एका गोष्टीचा मुद्दामहून उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे नवीन राज्याचा निष्काळजीपणा! गेली तीन-चार वर्षे भाषा विभागाने केलेले भाषांतराचे काम, शब्दकोशासाठी तयार केलेली हजारो इंडेक्स कार्ड्स बेवारशासारखी टाकून त्या ऑफिसला कुलूप लावण्यात आले. नागपुरातील एकाही अधिकाऱ्याला हा किती अमूल्य ठेवा आहे याची पुसटशीदेखील कल्पना नसावी याचा खेद वाटला. कुलूप लावताना कुणीही अधिकारी आला नव्हता. मराठी राजभाषा करताना या संग्रहामुळे कितीतरी वेळ आणि पैसाच नव्हे, तर अमूल्य श्रमही वाचले असते. माणसांच्या वियोगाइतकाच हा श्रमांचा वियोग आजही मन कष्टी करतो.

गेल्या काही वर्षांपासून नागपूरकरांना मुंबईचे फारसे अप्रूप वाटत नाही. पण तो काळ असा होता की मुंबईकर नागपूरला आला की मुंबई किती स्वच्छ आहे, शेंगा खाल्ल्या तर लोक साली खिशात टाकतात, बसमध्ये रांगेत चढतात.. वगैरे वगैरे कहाण्या सांगितल्या जात. एकाने तर आपल्या लेटरहेडवर चक्क ‘मुंबई रिटर्न’ असे छापले होते! अशा मुंबईत नागपूरकरांचा प्रवेश म्हणजे सत्त्वपरीक्षाच होती!

मुंबईला पोहोचताच आधीच तिथे गेलेल्या आमच्या कार्यालयातील एका मित्राकडे उतरलो. राहण्याची जागा मुंबईच्या कबूतरखान्याची ओळख करून देत होती. कॉटनग्रीन भागात एक पहाड फोडून तिथे कामगारांसाठी प्रत्येक इमारतीत ४८ भाडेकरू राहतील अशा १४ इमारती बांधण्यात आल्या होत्या. बाहेरून मुंबईत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्या राखून ठेवण्यात आल्या होत्या. आंघोळ करून कर्मचाऱ्यांसाठी उघडण्यात आलेल्या एका खाणावळीत नाव नोंदवून जेवण केले आणि मंत्रालयात गेलो. तिथे प्रकाशन विभागातील अधिकाऱ्याला रिपोर्ट करून हिंदी सेक्शनच्या सहाय्यक संचालकांना भेटलो. त्यांनी (तेही मराठवाडय़ातून आले होते आणि कॉटन ग्रीनलाच राहत होते.) थोडीशी चौकशी करून विभागात जाण्यास सांगितले. त्या जागेत तीन विभाग होते. एक टायपिंग-स्टेनोग्राफर, दुसरा कला विभाग- ज्यात दोनच अधिकारी होते; आणि तिसरा हिंदी विभाग- यात एक सबएडिटर, दोन भाषांतरकार आणि दोन टायपिस्ट होते.

कळपात नवीन वासरू आल्यामुळे सर्वाच्या नजरा माझ्याकडेच लागल्या होत्या. मी माझा परिचय करून दिला आणि आसन ग्रहण केले. थोडय़ा वेळाने माझ्यासोबत आलेले दोन सहकारी आले आणि पुढील औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आम्ही संबंधित विभागात गेलो. तिथून घराचा ताबा मिळण्यासंबंधीचे पत्र घेतले आणि सायंकाळी ते वसाहतीच्या संबंधित कार्यालयात देऊन घराचा ताबादेखील घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे राहण्यासही गेलो. सर्वच जण एकटे असल्यामुळे ती एक प्रकारे बॅचलर वसाहतच होती! घर म्हणजे प्रवेश करताच १२ बाय १२ ची खोली आणि त्यात सहा-खणी रॅक. तीही दोन खोल्यांतील मधल्या भिंतीत. खोलीला एक खिडकी. आत १० बाय १२ मध्ये स्वयंपाकघर, शौचालय व बाथरूम. फक्त शौचालयाला दरवाजा. या जागेत आयुष्य काढायचे होते. एक मात्र खरे.. नागपूरचे आठ खोल्यांचे घर मला सतत नजरेसमोर येत होते.

प्रकाशन विभागात इंग्रजी, मराठी, हिंदी आणि गुजराती असे चार विभाग सरकारतर्फे प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक ‘लोकराज्य’चे काम पाहत. सर्व बातम्या इंग्रजीत तयार होऊन त्या भाषांतरासाठी या विभागांत जात. भाषेनुसार कोणत्या बातम्यांना प्राधान्य द्यायचे, हे सहाय्यक संचालक ठरवीत. भाषांतर झाले की ते नीट तपासून त्याचे स्टेन्सिल्स टाईप होत आणि प्रती संबंधित प्रेसला जात. यातील निवडक बातम्या, मंत्र्यांची भाषणे, सरकारी योजनांची माहिती ‘लोकराज्य’मध्ये प्रकाशित करण्यात येत असे. एक गोष्ट इच्छा नसूनही मान्य करावीच लागेल, की मुंबईकरांपुढे नागपूरकर बावळट वाटत असत. एवढेच नव्हे, तर सर्वच बाबतींत आपण मागासलेले आहोत असे ते समजत. मुंबईकरांचा पहिला झटका मला एका टायपिस्टनी दिला. त्याचे अर्धे काम तो मला देत असे आणि स्वत: बाहेर भटकत असे. नंतर कळले की सकाळी सातपासून रात्री दहापर्यंत त्याचे अनेक उद्योग आहेत. उपसंपादक त्रिपाठी उत्तर प्रदेशचे होते. पण त्यांच्यासारखा सज्जन माणूस आजपर्यंत मी पाहिलेला नाही. त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांचे-माझे घरोब्याचे संबंध राहिले. कारण मुंबईत त्यांनी माझे पालकत्व पत्करून वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन तर केलेच; शिवाय मुंबईतील अनेक भागही मला त्यांनी दाखवले. अतिशय विद्वान, विचारवंत, पण खर्चीक गृहस्थ होते ते. महाराष्ट्राला गौरव वाटावा असे त्यांनी केलेले काम म्हणजे मंत्र्यांसाठीच्या मुंबई-नागपूर येथील बंगल्यांची नावे बदलून त्यांना ‘सह्य़ाद्री’, ‘वर्षां’, ‘रामगिरी’सारखी नावे देण्याची कल्पना त्यांची होती. सकाळी कार्यालयात आले की तासाभराने ते बाहेर पडत आणि वर्तमानपत्रांच्या कार्यालयात जाऊन बसत. रोज त्यांचे एक तरी पत्र ‘टू दी एडिटर’ असेच. दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास ते परत येत आणि दिवसभराचे काम तास-दीड तासात आटोपून ठीक साडेपाच वाजता ‘डेज वर्क फिनिश’ म्हणून सर्वजण ऑफिस सोडत. माझा टायपिंगचा स्पीड पाहून तेही थक्क झाले. त्यांना जेव्हा कळले, की टायपिस्ट मला आपले कामही देतो, तेव्हा त्यांनी मला स्पष्टपणे बजावले की, तू माझ्याशिवाय कुणाचेही काम करायचे नाही. माझ्या स्पीडमुळे आणि हिंदीवरील प्रभुत्वामुळे ते सरळ मला डिक्टेट करीत. त्यामुळे तासभरात सात-आठ स्टेन्सिल्सचा मजकूर सहज तयार होत असे. डिक्टेशनचा तर प्रश्नच नव्हता. दीड वर्षांच्या कालावधीत केवळ तीन वेळाच सहाय्यक संचालकांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे हिंदी प्रारूप मला डिक्टेट केले होते. थोडक्यात, महाराष्ट्र सरकार कमी काम करूनही मला पगार मात्र पूर्ण देत होते!

राम खांडेकर

ram.k.khandekar@gmail.com

First Published on January 21, 2018 3:26 am

Web Title: ram khandekar share the unforgettable experience in loksatta part 3
  1. No Comments.