15 December 2018

News Flash

स्वातंत्र्य संग्रामाची जीवघेणी शिक्षा

अशा परिस्थितीत यशवंतरावांचे देशप्रेम त्यांना चैन पडू देईना.

‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ ही म्हण यशवंतरावांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली. तसे पाहिले तर परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण थोडे उशिराच सुरू झाले होते. वयाच्या २० व्या वर्षी ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. याला दुसरे महत्त्वाचे कारण होते, ते म्हणजे शालेय जीवनातच त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात घेतलेली उडी. १९३० चा जानेवारी महिना स्वातंत्र्य संग्रामाच्या दृष्टीने देशभर प्रचंड धामधुमीचा ठरला. राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव या महिन्यात मांडला. पुढच्याच महिन्यात सविनय कायदेभंगाचा ठराव होऊन १२ मार्चपासून दांडी यात्रेस प्रारंभ झाला. तर दुसऱ्या बाजूला याच सुमारास अशा काही घटना घडल्या, की तरुणांचे रक्त उसळून आले. १९२८ सालात स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांचा ब्रिटिशांच्या लाठीमारात झालेला मृत्यू, १९२९ ला तरुणांचे लाडके नेते आणि बंगालचे प्रसिद्ध क्रांतिकारक जतिन दास यांनी तुरुंगात दिलेली प्राणाची आहुती, १९३१ च्या मार्चमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना देण्यात आलेली फाशी या साऱ्या घटनांनी त्यावेळी सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते.

अशा परिस्थितीत यशवंतरावांचे देशप्रेम त्यांना चैन पडू देईना. आपले भावी आयुष्य, आईची सुखस्वप्ने, घरच्यांची जबाबदारी या सर्व गोष्टी देशप्रेमापुढे गौण ठरल्या. त्यांनी प्रथम आपल्या टिळक हायस्कूलच्या आवारातील झाडावर तिरंगा फडकवून त्याची जिम्मेदारी आपल्यावर घेतली. यशवंतरावांमध्ये असलेल्या नेतृत्वगुणांची पारख करून त्यांचे १५-२० तरुण मित्र त्यांच्याबरोबर स्वातंत्र्य संग्रामात उतरले. त्यांनी संग्रामाचे नेतेपण यशवंतरावांकडे सोपवले. नेतृत्वाचा पहिला धडा यशवंतरावांनी इथेच गिरवला. त्यांनी एकजुटीने कराड महानगरपालिकेच्या इमारतीवर तिरंगा फडकवला. स्वातंत्र्य चळवळीला जनतेचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून ती दडपण्यासाठी सर्वत्र धरपकड सुरू झाली. त्यातून यशवंतरावांना शालेय जीवनातच १८ महिन्यांचा कारावास भोगावा लागला.

ते जेलमध्ये असताना एकदा त्यांची आई त्यांना भेटण्यासाठी गेली होती. सोबत असलेल्या मास्तरांनी ‘‘यशवंताने माफीनामा लिहून दिला तर त्याची ताबडतोब सुटका होईल,’’ असे सुचवले. त्यांचे हे म्हणणे ऐकताच विठाबाईंच्या डोळ्यांतील अश्रू कुठे गेले कोण जाणे. ताबडतोब त्या रागाने म्हणाल्या, ‘‘काय बोलता मास्तर, माफी मागायची? माफी मागायचे काही कारण नाही. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे.’’ अशा कणखर आईचे आपण सुपुत्र असल्याचा यशवंतरावांना अभिमान वाटणे स्वाभाविक होते.

१९३० पासून १९४०-४१ पर्यंत  देशभरातील स्वातंत्र्य चळवळीची झळ ब्रिटिशांना पोहोचत होतीच; मात्र १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाने ब्रिटिशांची झोपच उडविली. मी तेव्हा मराठी तिसऱ्या इयत्तेत होतो. या संग्रामाची मी पाहिलेली दृश्ये आजही मनावर कोरलेली आहेत. शाळा-महाविद्यालयांतील असंख्य तरुण मुले आपल्या भावी आयुष्याची, जिवाची पर्वा न करता या संग्रामात सक्रियपणे उतरली होती. रोज तरुणांचे तीन-चार मोर्चे निघत.. जे कुठल्याही नेत्याशिवाय असत. हे आज कुणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. शाळा-महाविद्यालये ओस पडली होती. मोर्चा आला की आम्ही मुले वर्गाबाहेर येऊन ‘वंदे मातरम्’ घोषणा देत असू. आम्ही फारच लहान असल्यामुळे नंतर शाळेची दारे बंद ठेवण्यात येऊ लागली. कधी कधी तर शाळांना सुट्टीही देत असत. या तरुणांमध्ये आजच्यासारखा ‘आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ हा स्वार्थी नारा नव्हता, तर चळवळीत जो- तो स्वत:हून पुढाकार घेण्याच्या प्रयत्नांत असे. त्यांचे लक्ष्य केवळ सरकारी वाहने, सरकारी कार्यालये आणि इंग्रज असत. या आंदोलनांत कधी लाठीमार, तर अधूनमधून गोळीबार होऊन अनेक तरुणांचे बलिदान होत असे. आजच्या तरुणांना सांगावेसे वाटते, की त्यांचे हे बलिदान देशभक्तीचे प्रतीक असे. त्यांच्या आई-वडिलांचेही आश्चर्य वाटे. आपली तरुण मुले देशासाठी मृत्यूलाही सामोरी जात आहेत हे प्रत्यक्षात दिसत असूनही त्यांनी मुलांना कधी घरात डांबून ठेवल्याचे मी तरी ऐकले नाही. त्यांची मने किती उदात्त, उन्नत असतील! अशा अनेक तरुण हुतात्म्यांची आज सरकारदरबारीही नोंद नसेल.

त्यांच्यावर लाठीमार, गोळीबार करणारे पोलीस भारतीयच होते. परंतु हे करणं त्यांच्या सरकारी डय़ुटीचा भाग होता. कॉंग्रेसचे नेते वसंतराव साठे यांनी एकदा सहज बोलताना मला सांगितलं की, तेसुद्धा एकदा अशा एका मोर्चात सामील होऊन सिव्हिल लाइन्समधील सरकारी कार्यालयावर तिरंगा फडकवण्यासाठी हातात झेंडा घेऊन गेले होते. तिथे पोलीस बंदोबस्त होता. पण आंदोलनकर्ते संख्येने बरेच होते. वसंतराव तेव्हा कॉलेजमध्ये होते. तरणेबांड. दिसायला सुंदर. डय़ुटीवरील एका पोलीस इन्स्पेक्टरने त्यांचा उत्साह आणि तरुण वय लक्षात घेऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि बाजूला नेलं. तो वसंतरावांना वडीलकीच्या नात्यानं म्हणाला, ‘‘तुझं देशप्रेम, उत्साह कौतुकास्पद आहे. परंतु इथे काही क्षणातच लाठीमार वा गोळीबार होण्याची शक्यता आहे. आणि तू तर झेंडा घेऊन पुढे आहेस. माझं ऐक. हा उत्साह असाच टिकवण्यासाठी या बाजूने निघून जा. नाहक बळी जाऊ नकोस.’’ वसंतरावांना त्याचं ऐकण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. सांगण्याचा उद्देश इतकाच, की देशाला स्वातंत्र्य मिळालं ते अशा तरुणांच्या बलिदानाने.. त्यांच्या आई-वडिलांच्या अश्रूंच्या सिंचनाने. परंतु आज दुर्दैवाने असं दिसतं, की आजच्या पिढीला या स्वातंत्र्याचे, स्वातंत्र्यदिनाचे काहीच महत्त्व वाटत नाही. आपण आज स्वातंत्र्यदिन साजरा करतो तो ‘पिकनिक डे’ म्हणून!

मला आठवतो तो पहिला स्वातंत्र्यदिन. सर्व भारतीय या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. फाळणीमुळे लोकांमध्ये थोडीशी उदासी आली होती तरीही देशभर स्वातंत्र्याचा जल्लोष होत होता. उत्तर भारतातील काही भाग सोडला तर सर्वत्र लोकांमध्ये उत्साहाचे वारे संचारले होते. १३, १४, १५ आणि १६ ऑगस्ट या चार दिवसांत नागपुरात रात्र कशी ती जाणवलीच नाही. रात्रीही दिवसासारखीच सर्वत्र वर्दळ असे. १४ तारखेला रात्री भव्य सार्वजनिक कार्यक्रम साजरा झाला. बरोबर रात्री बारा वाजता नागपुरातील सहा कापड गिरण्यांतील भोंगे वाजण्यास सुरुवात झाली. नागपूर हे रेल्वेचे मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे इथल्या लोकोशेडमधील २०-२५ इंजिनांनी एकदम शिट्टय़ा वाजवण्यास सुरुवात केली. जवळपास दहा मिनिटे कुणाला एकमेकांचे बोलणे ऐकू येत नव्हते, इतका हा आवाजाचा कल्लोळ होता. सरकारी कार्यालये असलेल्या भागात ब्रिटिशांचा युनियन जॅक उतरवून त्याच्या जागी आपला तिरंगा फडकताना पाहून डोळ्यांचे पारणे फिटत होते. तो काळ असा होता, की शाळेत पटांगणे नव्हती, झेंडा लावण्यासाठी खांब नव्हते. परंतु बहुतेकांच्या हातात तिरंगे होते. खरं सांगू, स्वातंत्र्य म्हणजे काय, हे तेव्हा फारसे कोणालाच कळले नव्हते! लोकांना फक्त एवढेच माहीत होते, की इंग्रज आपल्या झेंडय़ासह भारतातून निश्चितपणे आता जाणार आहेत. भारतीय इतिहासातील तो सुवर्णदिवस होता. शाळा, कार्यालये जवळपास सात-आठ दिवस बंद होती. तो जोश, तो जल्लोष मी प्रत्यक्ष याचि देही पाहिला. ‘आपलं राज्य, आपलं सरकार’ हेच शब्द सर्वाच्या ओठी होते. ज्यांच्या घरातील कुणी व्यक्ती स्वातंत्र्य चळवळीत हुतात्मा झाली होती अशी असंख्य कुटुंबेही या आनंदोत्सवात सहभागी झाली होती. त्यांच्या आनंदाला तर उधाणच आले होते. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या बलिदानाचे अखेर सार्थक झाले होते. सगळे जण आता स्वतंत्र भारताचे नागरिक झाले होते.

आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखतो आहोत. अनेक ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या बलिदानाचे हे फळ आहे. परंतु आपण त्यांचे एक दिवसही स्मरण करत नाही, ही शोकांतिका आहे. अनेकांची स्मारके उभारली गेली आहेत. मात्र, देशासाठी बलिदान करणाऱ्या असंख्य अज्ञात तरुणांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक तरी स्मारक असल्याचे अद्याप दिसत नाही. प्रजासत्ताकदिनी कोटय़वधी रुपये खर्च करून दिल्लीत सोहळा साजरा केला जातो. राजपथावर होणारा हा सोहळा किती लोक टेलिव्हिजनवर आवर्जून पाहतात? पाच टक्केही नाही. एवढेच नाही तर प्रजासत्ताकदिन सोहळ्याच्या समारोपाचा २९ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता विजय चौकात होणारा ‘बिटिंग दि रिट्रीट’ हा तिन्ही सैन्यांचा सामूहिक बँडचा डोळ्यांचे पारणे फेडणारा कार्यक्रमही होतो. परंतु त्याची तर बहुसंख्यांना कल्पनादेखील नाही. स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज किती लोक फडकवतात? बहुतेक कुणीच नाही. काही वर्षांपूर्वी सुरू झालेली ‘दिवाळी पहाट’ दिवसेंदिवस बाळसे धरते आहे. मात्र, आजवर एकालाही स्वातंत्र्यसूर्य उगवून सात दशके उलटली तरी ‘स्वातंत्र्यदिन पहाट’ वा ‘प्रजासत्ताकदिन पहाट’ साजरी करण्याचे मनात येत नाही. दिल्लीला गेल्यापासून आजपर्यंत मी या दोन्ही दिवशी पहाटे आठवणीने राष्ट्रीय ध्वज लावून त्याला वंदन करतो.

तर.. अधूनमधून जेलच्या वाऱ्या करीत १९३८ साली यशवंतराव बी. ए. झाले. नंतर देशकार्याला वाहून घेण्याचा त्यांनी निश्चय केला. परंतु कुटुंबातील वडीलधाऱ्यांनी त्यांना कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव करून दिल्यामुळे त्यांनी १९४० साली एल.एल. बी.ची पदवी घेऊन वकिली सुरू केली. याबद्दल एकदा ते गमतीने सांगत होते, की कराडच्या आजूबाजूचे पक्षकार सायंकाळी कराडला येऊन त्यांच्याकडे उतरत. मुक्काम करीत. जेवण करून दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबरच टांग्यात बसून कोर्टात जात. मात्र, मागे बसलेले यशवंतराव टांग्यातून उतरेपर्यंत ही पक्षकार मंडळी खाली उतरून दुसऱ्या वकिलाकडे निघून जात. यशवंतराव मात्र त्यांना शोधत बसत!

मुलगा आता पोटापाण्यासाठी काम करण्यात रस घेऊ लागला आहे हे पाहून २ जून १९४२ रोजी यशवंतरावांचा विवाह स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेल्या तरुणाशीच लग्न करण्याचा निर्धार केलेल्या वेणूताईंशी करून देण्यात आला. पण यशवंतराव-वेणूताईंच्या संसाराला दोन महिने होतात तोच ऑगस्टमध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनाची घोषणा झाली. यशवंतरावांचे तरुण रक्त देशप्रेमाने सळसळत होतेच. सातारा जिल्ह्य़ातील भूमिगत चळवळीचे नेतृत्व, संचालन आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. सातारा जिल्ह्य़ात या आंदोलनाने अधिकच उग्र रूप धारण केले होते. तिथे समांतर सरकार स्थापन झाले होते. ते ‘पत्री सरकार’ म्हणून प्रसिद्ध झाले होते. याचा मला माहीत असलेला अर्थ असा की, इंग्रज दिसला रे दिसला की त्याच्या पायात नाल ठोकायची. याचा परिणाम इतर जिल्ह्य़ांतील स्वातंत्र्य चळवळीवरही होत असल्यामुळे काही झाले तरी यशवंतरावांना पकडायचेच असा निर्धार इंग्रजांनी केला होता.

रातोरात यशवंतरावांचे पथक पश्चिम महाराष्ट्रात कुठेतरी निघून जाई. अगदी पुण्या-मुंबईपर्यंतही. नेत्यांच्या भेटीगाठी होत होत्या. अधूनमधून कोणाच्या तरी हस्ते खुशालीचा निरोप घरी पाठवला जात असे. माणसाचा ‘वीक पॉइंट’ त्याचे कुटुंब असते म्हणून यशवंतरावांचा ठावठिकाणा समजण्यासाठी इतर कुटुंबीयांसह वेणूताईंनाही अटक करण्यात आली. इतकेच नाही तर त्यांचा अमानुष छळही सुरू करण्यात आला. परंतु तरी वेणूताईंनी तोंडातून ब्रसुद्धा काढला नाही. वेणूताईंचा पहिला संक्रांतीचा सण तुरुंगात भाकरी खाऊन साजरा झाला याची खंत सर्व कुटुंबीयांना होती. अंगाची हळदही न निघालेल्या त्या तरुण मुलीला हा छळ सहन न होऊन त्या आजारी पडू लागल्या. आजार इतका बळावला की शेवटी १९४३ ला यशवंतराव त्यांना पाहण्यासाठी आले असता इंग्रजांनी त्यांना अटक केली. पुढे १९४५ मध्ये इतरांसमवेत त्यांची सुटका झाली.

त्यानंतर मिरज येथे योग्य ते औषधोपचार घेऊन दीर्घ आजारातून वेणूताई दवाखान्यातून बाहेर पडल्या. घरी निघण्यापूर्वी त्यांची पूर्ण तपासणी करून त्या एकटय़ा असताना डॉक्टरांनी त्यांना पथ्य सांगितले. ते ऐकून वेणूताईंचा चेहरा एकदम उतरला. पण काहीच घडलं नाही असं दाखवत त्या यशवंतरावांना म्हणाल्या, ‘‘आपण आज खूप दूर फिरायला जाऊ.’’ यशवंतराव एकसारखे त्यांना विचारत होते, ‘‘डॉक्टर काय म्हणाले?’’ त्या हसत म्हणाल्या, ‘‘चला, एका ठिकाणी बसल्यावर सांगते.’’ त्यांनी थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गोष्टी करून डॉक्टर काय म्हणाले ते यशवंतरावांना सांगितले. ती शिक्षा जन्मठेप वा मृत्युदंडापेक्षाही भयंकर होती. त्यांना स्वत:ला सांभाळणे अवघड झाले होते. आणि ते साहजिकच होते. आतापर्यंतच्या यातना काहीच नव्हत्या असे त्यांना वाटले. डॉक्टरांनी सांगितले होते की, ‘‘आता तुम्हाला मुलं होणार नाहीत.’’ नियती किती कठोर असते नाही? १५-२० मिनिटांनी वेणूताई यशवंतरावांना म्हणाल्या, ‘‘माझं एक ऐकाल का? तुम्ही दुसरे लग्न करा.’’ आपलं दु:ख गिळून यशवंतराव त्यांना म्हणाले, ‘‘यापुढे असला सल्ला पुन्हा म्हणून द्यायचा नाही. त्याचा उच्चारही करायचा नाही.’’

त्यानंतर आयुष्याच्या शेवटापर्यंत उभयतांच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यात आपल्याला अपत्य नसल्याची खंत कधीच दिसली नाही.

– राम खांडेकर

ram.k.khandekar@gmail.com

First Published on March 11, 2018 1:23 am

Web Title: yashwantrao chavan and indian independence movement