15 August 2020

News Flash

अखेरचे पर्व

इंदिराजींनी देशात आणीबाणी लागू केली. विरोधकांसाठी हा मोठा धक्काच होता.

|| राम खांडेकर

इंदिराजींनी देशात आणीबाणी लागू केली. विरोधकांसाठी हा मोठा धक्काच होता. मात्र, यशवंतरावांसारख्या निष्ठावान काँग्रेसजनांचीही त्यामुळे  कुचंबणा झाली. आणीबाणीची गरज का आहे, हे जनतेला पटवून देण्याची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागली. त्यामुळे यशवंतराव टीकेचे धनी झाले होते. परंतु त्यांची मानसिकता आणि  मनातील असंतोष कुणाच्याच लक्षात आला नव्हता..

यशवंतराव एकमेव परराष्ट्रमंत्री असावेत- ज्यांनी परदेशात असताना दिवसभराच्या घटना, चर्चा, भेटीगाठींसंबंधीचा वृत्तान्त पत्ररूपाने लिहून ठेवला असेल. ते परदेशात जाताना वेणूताई त्यांच्या सुटकेसमध्ये काही पोस्टकार्ड्स, आंतर्देशीय पत्रे व लिफाफ्यासह लेटरहेड्स ठेवत. रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभराच्या घटनांनुसार या तीनपैकी एकाची निवड यशवंतराव करीत. फारसा मजकूर नसेल तर पोस्टकार्ड, जास्त असेल तर लेटरहेडचा वापर होत असे. लिहून झाली की ही पत्रे पुन्हा सुटकेसमध्ये ठेवली जात. दिल्लीत परतल्यावर यशवंतराव कार्यालयात गेले की वेणूताई सुटकेस उघडून यशवंतरावांनी त्यांना लिहिलेली ही पत्रे काढून निवांतपणे वाचत असत. पोस्टाचे साहित्य असूनही ही पत्रे पोस्टात कधीच टाकली जात नसत. ही पत्रे अतिशय बोलकी होती. वेणूताईंनी शेवटपर्यंत ती जपून ठेवली होती.

आपल्याकडे म्हण आहे- ‘सुख जवापाडे, दु:ख पर्वताएवढे’.. यशवंतरावांच्या बाबतीत तिचा अनेकदा प्रत्यय येत असे. परराष्ट्र खात्यात यशवंतराव सुखावले असतानाच सात-आठ महिन्यांत देशच नाही, तर जगही हादरेल असे एक भीषण राजकीय वादळ आले. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात इंदिराजींच्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याचा निकाल १२ जून १९७५ रोजी इंदिराजींविरुद्ध लागून त्यांची निवड अवैध ठरवण्यात आली. गांधी घराण्याला हा जबरदस्त धक्का होता. आपल्याकडे काहीही घडले की त्यात परकीयांचा हात असावा असे सांगून सत्ताधारी मोकळे होतात. इंदिराजींनाही असाच संशय येत होता. त्यांचे तोवरचे वर्तन पाहता त्या सहजासहजी सत्ता सोडण्याची शक्यता नव्हतीच. झालेही तसेच. त्यांनी राजीनामा न देता २५ जून १९७५ रोजी राष्ट्रपती फकरुद्दीन अहमद यांच्या स्वीकृतीने देशात आणीबाणी लागू केली. विरोधकांसाठी हा मोठा धक्का होता. त्यांनी आंदोलने व जेल भरो सुरू केले. यात काँग्रेसचे काही लोकही सहभागी झाले होते.

यशवंतरावांसारख्या काँग्रेसच्या अनेक निष्ठावान सदस्यांची या प्रकरणी कुचंबणा झाली होती. मनातील वेदना मनातच ठेवून त्यांना  आणीबाणीची गरज का भासली, हे जनतेला पटवून देण्याची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागली. आणीबाणीचे कारण सांगितले जात होते- ‘देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि देशाची खराब आर्थिक स्थिती’! आणीबाणी लागू करण्यापुरतेच या स्पष्टीकरणाला महत्त्व आहे, हे न समजण्याइतकी जनता दुधखुळी नव्हती. ‘सत्तेसाठी वाट्टेल ते’ करण्याची बीजे या घटनेमुळे प्रथमच राजकारणात रुजली. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. इंदिराजींची साथ केल्यामुळे यशवंतराव टीकेचे धनी झाले होते. यशवंतरावांची मानसिकता व त्यांच्या मनातील असंतोष मात्र कुणाच्याच लक्षात आला नव्हता.

१९७१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने संघटना उभी करण्यासाठी काँग्रेसकडून मिळेल त्या उमेदवार तिकिटे देण्यात आली होती. त्यात ३५२ खासदार निवडून आले होते. यापैकी अनेकांना पक्षाच्या ध्येयधोरणांशी काही घेणेदेणे नव्हते. त्यामुळे पुढे पक्षात, राजकारणात व प्रशासनात कसलाच धरबंद उरला नाही. महाराष्ट्रातही हे वारे वाहू लागले होते. १९७४ च्या सप्टेंबरमध्ये लिहिलेल्या एका पत्रात यशवंतराव म्हणतात, ‘महाराष्ट्राचे राजकारण अधिकच ताणतणावाचे झाले आहे.  मंत्रिमंडळात मतभेद, गटबाजी, परस्परांबद्दल वेडेवाकडे बोलण्याची प्रवृत्ती यामुळे मनाला यातना होतात. महाराष्ट्र काँग्रेस छिन्नविच्छिन्न बनत आहे. स्वत:ला नेते समजणारे सत्ता-स्वार्थाने झपाटले आहेत. जातीय तेढीतून महाराष्ट्राने बाहेर यावे म्हणून मी १०-१५ वर्षे सतत प्रयत्न करीत आलो आहे. पण काही धूर्त लोक या कार्याचा खेळखंडोबा करण्याची जणू काय प्रतिज्ञाच केल्यासारखे वागत आहेत. काँग्रेस पक्ष हेच मी माझे सर्व जीवन मानले. ती काँग्रेस कुठे आहे? काँग्रेसमध्ये लोकशाही राहिली आहे का? सत्ता मिळवून ती ताब्यात ठेवण्याचे यंत्र म्हणून आज काँग्रेस वापरली जात आहे.’

ही भावना केवळ यशवंतरावांचीच नव्हे, तर त्यांच्यासारख्या इतरही काही निष्ठावान काँग्रेसजनांची होती. म्हणूनच १९७०-७१ नंतर यशवंतरावांनी हळूहळू महाराष्ट्रातील राजकारणातून आपले अंग काढून घेण्यास सुरुवात केली होती. दिल्लीतही ते फारसे खूश नव्हते. त्याकाळी राजकारण व प्रशासनात निर्माण झालेले गढूळ वातावरण आज अधिकच गढुळले आहे. आणि बहुतेक सर्वच पक्षांनी ते आत्मसात केले आहे.

आजवर आणीबाणीची नकारात्मकताच फक्त जनतेसमोर आली. परंतु तिचे काही फायदेसुद्धा मी पाहिले आहेत. मुख्य म्हणजे प्रशासनात सुधारणा! सकाळी वेळेच्या पाच मिनिटे आधी १०० टक्के कर्मचारी कार्यालयात हजर असत आणि टेबल सोडून कोणीही व्हरांडय़ात भटकत नसे. अध्र्या तासाची भोजन सुट्टीही लोक केवळ २५ मिनिटे घेत. त्यामुळे कामातील दिरंगाई दूर झाली. याचे जनतेनेही मनापासून स्वागत केल्याचे त्यावेळच्या बातम्यांवरून लक्षात येईल. दिल्लीत भेसळीविरुद्धच्या धाडीमुळे नामांकित मिठाईची दुकाने बंद झाली होती. तर तुर्कमान गेटसारख्या भागात जाण्याचे कधीही धाडस न करणाऱ्यांनी तिथे जाऊन अनधिकृत बांधकामे पाडली होती. हे सर्व पाहता बरेच जण म्हणत- आणीबाणी नेहमीकरताच पाहिजे! असो.

१९७७ साली आणीबाणी संपून सार्वत्रिक निवडणुका झाल्या. जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने जनता पक्ष अस्तित्वात येऊन त्यांची सत्ता स्थापित झाली. नेहमीप्रमाणेच पहिलाच प्रश्न उपस्थित झाला : आता पंतप्रधान कोण होणार? सर्वानुमते जगजीवन राम यांचे नाव निश्चित झाले होते. त्यांच्या बंगल्यावर आनंदोत्सवही सुरू झाला. सर्व तयारी झाली. मात्र, ऐनवेळी एका मोठय़ा पक्षाने पलटी खाऊन मोरारजी देसाई यांना पंतप्रधान केले. भाई, यह दिल्ली है! लालबहादूर शास्त्रीजींनंतर यशवंतरावांनी घेतलेली भूमिका किती योग्य होती, याचे हे उत्तर होय. जनतेला या सरकारकडून खूप आशा-अपेक्षा होत्या. मोरारजींसारखे कुशल प्रशासक पंतप्रधानपदी आले होते. मी त्या काळात वाणिज्य मंत्री मोहन धारिया यांच्याकडे होतो. त्याच इमारतीत उद्योग खातेही होते. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे तर दूरच; वर्षभरातच या सरकारला घरघर लागली. सरकार शेवटचा श्वास केव्हा घेईल, याची शाश्वती उरली नव्हती.

इंदिराजींच्या गैरहजेरीत यशवंतराव विरोधी पक्षनेते झाले होते. ज्या दिवशी इंदिराजींचे सरकार जाऊन मोरारजींचे सरकार आले त्या दिवशी यशवंतराव जबाबदारीतून मुक्त झाल्याचा आनंद लुटत होते. सायंकाळी ५.३० ची वेळ. मला म्हणाले, ‘‘ड्रायव्हरला गाडी काढावयास सांगा. सूरजकुंडला जाऊ.’’ सूरजकुंड हे दिल्लीपासून सुमारे २० कि. मी.वर असलेले पर्यटनस्थळ आहे, असे मी फक्त ऐकून होतो. तिथे एक छोटासा गोलाकार तलाव असून सभोवताली १५-२० पायऱ्या आहेत. सुदैवाने गाडीचा चालक जुना असल्यामुळे त्याला ते ठिकाण माहीत होते. गाडीतून उतरल्यावर यशवंतराव एकदम उत्साही वाटत होते. त्यांच्या हातात स्टिक होती. ते जवळपास अध्र्या तासाहून अधिक वेळ तलावाच्या बाजूच्या पायऱ्या चढत-उतरत होते. त्यांनी तलावाला पूर्ण फेरी मारली. मी मात्र खरोखर थकलो होतो. यशवंतरावांचा हा उत्साह पाहण्याचे भाग्य केवळ आणि केवळ मलाच मिळाले. ६५ वर्षांच्या यशवंतरावांचा तो उत्साह पंचविशीतील तरुणालाही लाजवेल असा होता. अंधार पडू लागल्यावर आम्ही परत फिरलो. मोटारीत सुहास्यवदनाने यशवंतराव शांत बसले होते. सत्ता गेल्यावर आनंद मानणारे यशवंतराव सत्तेसाठी भुकेले होते असे म्हणणे कितपत उचित? वेणूताईंना मी घडला प्रकार सांगितला तेव्हा त्यांचाही विश्वास बसेना.

केवळ दोन वर्षांच्या कालावधीतच जनता सरकारमधील वाढता असंतोष पाहून काँग्रेसजनांना सत्तेची पुन्हा आस लागली. यशवंतरावांनी अविश्वास प्रस्ताव आणावा म्हणून त्यांनी दबावतंत्र योजण्यास सुरुवात केली. सुज्ञ यशवंतरावांचे म्हणणे होते, की हे सरकार आपणहून गडगडण्यातच काँग्रेसला जास्त फायदा आहे. पण ऐकतो कोण? दुसरी गोष्ट म्हणजे जनता सरकारने काँग्रेसच्या धोरणांचाच पाठपुरावा केला होता. त्यामुळे टीका करणार तरी कशावर? शेवटी अविश्वास प्रस्ताव आणला गेला व तो मंजूरही झाला. या काळात काँग्रेसजनांनी चतुराईने यशवंतरावांच्या मनाविरुद्ध इंदिराजींना दूर ठेवले होते. सरकारने इंदिराजींना त्रास देण्यात वेळ खर्च केला खरा; पण हे करताना योजनाबद्धता नसल्याने मुरब्बी राजकारणी असलेल्या इंदिराजींना त्याचा उलट फायदाच झाला. इंदिराजीची लोकप्रियता वाढत गेली.

अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यावर प्रथेप्रमाणे राष्ट्रपतींनी यशवंतरावांना सरकार बनवण्यासाठी आमंत्रित केले. राष्ट्रपती भवनात जाण्यापूर्वी काँग्रेस कार्यकारिणीचे बरेच सदस्य यशवंतरावांच्या बंगल्यावर जमले होते. काँग्रेसची सदस्यसंख्या पाहता सरकार बनवणे अशक्य आहे, असाच त्यातील बहुतेकांचा सूर होता. हाच विचार घेऊन यशवंतराव राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांना भेटले. यशवंतरावांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर काळाची गरज लक्षात घेऊन राष्ट्रपतींनी दुसऱ्या पक्षांची मदत घेऊन प्रयत्न करण्यास सुचवून तसे पत्रही दिले. इतकेच नव्हे, तर आवश्यकता असल्यास वेळ वाढवून देण्याची तयारीही दर्शवली. तिथून ते परतल्यावर चर्चेचा वृत्तान्त सांगितल्यावरही काँग्रेस सदस्यांचा तोच सूर! तेव्हा यशवंतरावांनी चिडून ते पत्र सदस्यांकडे फिरकावून त्यांनाच उत्तर पाठविण्यास सांगितले. यामागे केवळ यशवंतरावांना पंतप्रधानपद मिळू नये, हीच भावना असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतु यामुळे पक्षाचे किती नुकसान होत आहे याची काँग्रेसजनांना पर्वा नसावी. केवळ कॉंग्रेस सदस्यांच्या आग्रहाखातर चौधरी चरणसिंह यांच्या अतिशय कमी संख्याबळ असलेल्या पक्षाच्या सरकारला पाठिंबाच नव्हे, तर त्यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय यशवंतरावांना घ्यावा लागला. जनता सरकारच्या आततायीपणाचा इंदिराजींनी पूर्ण फायदा घेऊन जनतेची पुन्हा सहानुभूती मिळवली. विश्वास प्रस्तावाच्या दिवशी सकाळीच इंदिराजींच्या हितचिंतकांनी पाठिंबा काढून घेण्याचे ठरवले आणि पंतप्रधान चरणसिंह यांना संसदेत न जाता राष्ट्रपती भवनात जाऊन राजीनामा द्यावा लागला. मात्र, हे भाकीत यशवंतरावांनी पूर्वीच केले होते.

यानंतर मृत्यूपर्यंतचा यशवंतरावांचा काळ कष्टदायी ठरला. पुन्हा काँग्रेस दुभंगली. पण यशवंतराव इंदिराजींसोबत गेले नाहीत. पुन्हा निवडणुका होऊन इंदिराजी तब्बल ३५१ सदस्यांसह निवडून येऊन पंतप्रधानपदी आसनस्थ झाल्या. यावेळीही १९७१ चीच पुनरावृत्ती होऊन मागेल त्याला तिकीट देण्यात आले. काही वर्षांतच यशवंतरावांचा उजवा हात असलेले सचिव डोंगरे यांचा मृत्यू झाला. दिल्लीच्या रिवाजानुसार सत्ता नसलेल्यांच्या नशिबी एकांतवास येतो.यशवंतराव सत्तेत असताना हक्काने केव्हाही भेटायला येणाऱ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली.

या विजनवासाच्या काळात यशवंतराव सकाळी थोडेसे उशिराच उठत. वर्तमानपत्रे वाचून झाली की साडेदहाच्या सुमारास तीन-चार पुस्तके घेऊन दिवाणखान्यात येऊन वाचत बसत. आणि कोणी भेटीस येते का, याची प्रतीक्षा करत. दुपारी एक वाजता जेवण करून थोडी झोप घेत. सायंकाळी पाचनंतर पुन्हा दिवाणखाना किंवा वेणूताईंच्या आग्रहाखातर त्यांच्याबरोबर बाजारहाट करण्यास जात. अर्थात ते गाडीतच बसून राहात. महाराष्ट्रातील खासदारही त्यांच्याकडे फारसे येत नसत. महाराष्ट्रातले लोक मात्र येऊन भेटत असत. अधूनमधून चर्चेसाठी बोलावले तर किंवा यशवंतरावांना वाटले तर ते इंदिराजींकडे जात. व्यक्तिगत संबंध व राजकारण हे नेहमी वेगळे असते. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर इंदिराजींनी राजीव गांधींकडे पक्षाचे काम सोपवले. तेव्हा राजीवजींना राजकारण व प्रशासनाचे धडे देण्यासाठी त्यांनी यशवंतरावांना विनंती केली होती. एवढेच नाही, तर गाडीतून उतरल्यानंतर ते सरळ राजीवजींच्या खोलीत जातील अशी व्यवस्था केली होती.

इंदिरा काँग्रेसमधून बाहेर पडल्याने सोबतच्या कार्यकर्त्यांची कुचंबणा होते आहे, तसेच सत्तेत असतानाही आपण या जिवाभावाच्या मित्रांसाठी काही करू शकलो नाही याची खंत वाटून, टीकाकारांची पर्वा न करता यशवंतरावांनी इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आपल्या सहकाऱ्यांना मुख्य राजकीय प्रवाहात आणून सोडले. यशवंतरावांनी जिवाला जीव देणाऱ्या सहकाऱ्यांना इतरांसारखी मलईची पदे दिली नव्हती, हे वास्तव होते. वेणूताई असेपर्यंत मी कार्यालय सुटल्यावर साडेसातच्या सुमारास यशवंतरावांकडे डिक्टेशन व त्यांच्या इतर कामांसाठी जात असे. रात्री साडेनऊ-दहापर्यंत पत्रं टंकित करून त्यांची सही घेऊन मग घरी जात असे. वेणूताई गेल्यानंतर मात्र मी सकाळी साडेआठला कमीत कमी आठवडय़ातून दोनदा तरी डिक्टेशनला त्यांच्याकडे जात असे. नंतर यशवंतरावांबरोबर नाश्ता करून कार्यालयात जात असे. मी तिथे येतो हे कोणाच्या नजरेस पडू नये याची यशवंतराव, वेणूताई व मी काळजी घेत असू. कारण दिल्लीत चुगलखोरांची कमी नव्हती. १९९१ पर्यंत मी कार्यालयात जाणे-येणे सायकलवरच करत असल्यामुळे उशीर झाला तर वेणूताई टॅक्सीने जावयास सांगत. पण दुसऱ्या दिवशी सायकलनेच कार्यालयात जावे लागणार असल्यामुळे ते शक्य नव्हते.

१९८३ हे वर्ष यशवंतरावांना दु:खाच्या खाईत लोटणारे ठरले. या वर्षांत त्यांचा डॉक्टर असलेला तरुण पुतण्या अपघातात गेला. तर एक जून रोजी वेणूताईंचे निधन झाले. त्या दिवसापासून यशवंतरावांचे आयुष्य केवळ शोक करण्यातच गेले. पत्नीवियोगाचे दु:ख सहन न होऊन सतत अश्रू ढाळणारा पती मी तरी दुसरा पाहिला नाही. जीवलगासाठीचे हे अश्रू म्हणजे कृतज्ञतेच्या जाणिवेचे आविष्करणच असते.

ram.k.khandekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2018 4:45 am

Web Title: yashwantrao chavan indira gandhi
Next Stories
1 अर्थमंत्री ते परराष्ट्र मंत्री
2 यशवंतराव-वेणूताई एक अद्वैत
3 राष्ट्रपती निवडणुकीतले नाटय़
Just Now!
X