News Flash

संवाद अखंड सुरू हवाच

समाजातील स्त्रिया आज कुठल्या कुठे पोहोचल्या आहेत.

संवाद अखंड सुरू हवाच

नियतकालिकांची सुरुवात होऊन, स्त्रीमनाशी संवाद सुरू होऊन १६० वर्षे झाली. स्त्रीचा आत्मसन्मान, सामाजिक सुरक्षा आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी प्रबोधन, उद्बोधन संस्कार करणारा संवाद अखंड सुरू राहायला हवा..

स्त्री मनाशी झालेल्या संवादाचा वेध घेता घेता वर्ष कसे सरले समजलेच नाही. एकीकडे आपलाही स्त्रीमनाशी स्वतंत्र संवाद झाला. ‘सुमित्र’ वाचणाऱ्या स्त्रियांबरोबर संवाद करीत आपलाही ‘मिळून साऱ्या जणी’पर्यंत १६० वर्षांचा प्रवास झाला. काळाबरोबर प्रत्येक पिढीत विकसित होणाऱ्या स्त्रीमनाची, व्यक्तिमत्त्वाची साक्ष पटली. बदलत्या संवादाच्या लयीतून, विषयांतून आणि भाषेतूनही स्त्रीबरोबर पालटणारा बाह्य़ परिवेष, समाजवास्तव, बदलते सांस्कृतिक पर्यावरणही आपण जवळून बघितले. विचार करताना मनात येते की, किती मोठा टप्पा पार केला या प्रवासात.
स्त्रियांना सार्वजनिक जीवनात वावरता यावे, स्त्रियांचा बौद्धिक विकास व्हावा म्हणून, ‘सभेला येताना प्रत्येकाने घरातील एका स्त्रीला बरोबर आणावे’ अशी अट घालावी लागत होती. त्याच समाजातील स्त्रिया आज कुठल्या कुठे पोहोचल्या आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश, लोकसभेच्या सभापती बनल्या. स्त्रिया स्वत: लिहू आणि बोलू लागल्यावर स्त्री शिक्षण, विवाहाचे वय, स्त्रियांना शिवणकामाचा उत्तम व्यवसाय यासारख्या विषयांवर लिहिता लिहिता स्त्रिया सामाजिक रूढी, परंपरा, संकेत यांना ओलांडत जात झालेला स्त्रियांच्या लेखनाचा विकास आणि विस्तारही आपण बघितला. एकीकडे समाजाच्या मानसिक विकासाची प्रक्रियाही आपण अनुभवली. विशेषत: १९७५ नंतरच्या काळात साध्या साध्या विषयांचा, संकेतांचा झालेला कायापालटही बघता आला.
विवाह यशस्वी झाला नाही म्हणून स्त्री ‘परित्यक्त्या’ किंवा ‘टाकलेली स्त्री’ होत नाही. एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला तर तो अपघात असते. पावित्र्यभंग होते, असे समजू नये यासारख्या मानसिक प्रगल्भतेच्या उत्कर्षांपर्यंत प्रवास झाला. सांस्कृतिक पर्यावरणाच्या स्थितिगतीलाही जवळून बघता आले. आज एकविसाव्या शतकातील पंधरा वर्षे सरली आहेत. स्त्रियांना आज कर्तृत्वासाठी सर्व क्षेत्रे खुली आहेत. घरातील व मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आपणही उचलली पाहिजे. ही जाण आजच्या पिढीतील पुरुषांमध्ये विकसित झालेली दिसते. चंदा कोचर, इंद्रा नुई, अरुंधती भट्टाचार्य अशा अनेक जणी आजच्या पिढीच्या आयकॉन आहेत. मग आता काय? आता स्त्रीमनाबरोबरच्या संवादाची गरज संपली आहे का? स्त्री चळवळीच्या आघाडीवर म्हणूनच सामसूम जाणवते का? अशी शंका किंवा विचार मनात येणे शक्य आहे. परंतु..
वास्तव तसे नाही. खूप मोठय़ा खळाळानंतर प्रवाहाला काहीसा उतार येतो, तसा काहीसा स्त्री चळवळीच्या संदर्भात जाणवत आहे. स्त्रीच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटावा अशी परिस्थिती एकीकडे असताना दुसरीकडे स्त्रीच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत आहे. विसंवादाची दरी प्रगतीचा आनंद गढूळ करीत आहे. २६ जानेवारी २०१५ च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात भारतीय लष्काराच्या तीनही विभागांतील महिलांच्या तुकडय़ांनी संचलनात भाग घेतला. बराक ओबामा यांना राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर देताना प्रथमच एका स्त्रीने-पूजा ठाकूर यांनी नेतृत्व केले. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असेच दृश्य होते. स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा निग्रह, आत्मविश्वास, त्यांची सक्षमता, त्यांच्या अस्तित्वाचे मोल सिद्ध करीत होती. परंतु त्याच वेळी मनात आणखी एक सूर उमटत होता. या स्त्रिया सक्षम भारतीय स्त्रीच्या प्रतिनिधी आहेत. त्यांच्या अस्तित्वाला जे मोल आहे तेच मोल घराघरात नांदणाऱ्या, समाजात सर्व स्तरांवर वावरणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आहे का? त्या स्त्रीची सुरक्षा, तिचे अस्तित्व, स्त्रीत्वही तितकेच महत्त्वाचे आहे. शिखराकडे जाताना पायाखाली काय धुमसते आहे, काय तुडवले जात आहे, हे बघणे, समाजात निर्भय वातावरण निर्माण करणेही गरजेचच आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यासारख्या निव्वळ घोषणांनी काही होत नाही.
आपण प्रजासत्ताक दिनाचा सोहळा बघताना आनंदित होत होतो. त्याच दिवशी एका गावात एका अंगणवाडीसेविकेची नग्न धिंड काढली गेली. जानेवारी २०१५ रोजी मुंबईला दिवा स्टेशनवर लोकल वाहतुकीत तांत्रिक अडचणींनी गोंधळ झाला. तेव्हा गर्दीचा फायदा घेऊन एका तरुणीला मालगाडीत नेऊन सामूहिक बलात्काराचा प्रयत्न झाला. पुरुषाच्या कृत्याचा सूड घेण्यासाठी त्याच्या बायकोवर सामूहिक बलात्कार केला जातो. कुठे तर बापच प्रत्यक्ष आपल्या मुलीवर बलात्कार करतो. या ताज्या घटना आम्हाला काय सांगतात. आज समाज एका संक्रमण काळातून जात आहे. भौतिक बदल वेगाने होत आहेत. जीवन गतिमान आणि स्पर्धेचे आहे. पैसा येत आहे, परंतु जगण्याचे संकेत बदलत आहेत. संकुचित कुटुंबे, स्वत:च्या अवकाशाच्या, स्पेसच्या कल्पना, त्यामुळे कौटुंबिक जीवनातही ताण निर्माण होत आहे. चंगळवाद, उपभोगवादी वृत्तीतूनच विषवल्लीची पेरणी होत आहे. काही वर्षांपूर्वी हुंडय़ाचे प्रश्न त्यातून स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाचे प्रश्न होते. परंतु स्त्रियांच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न आजच्या इतका भयावह नव्हता. फक्त ‘स्त्री’ आणि ‘स्त्री’ म्हणूनच स्त्रियांच्या दृश्य माध्यमांतून, जाहिरातींतून उपयोग होत नव्हता. फार काय ‘ट्वेंटी-२०’च्या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये ‘चिअर गर्ल्स’चा होणारा उपयोग आम्हांला काय सांगतो? व्हॉट्सअ‍ॅप, मोबाइल इत्यादींचा दुरुपयोग स्त्रियांना त्रास देण्यासाठी होत आहेच. ‘आहे मनोहर परी गमते उदास’ अशी विषण्णता निर्माण करणाऱ्या आजच्या काळात फक्त कायदा नको आहे. कठोर कारवाईचा धाक नको आहे. तर पुन्हा एकदा प्रबोधन करणारा, संस्कार करीत जीवनाचे गांभीर्य जाणवून देणारा, मन घडविणारा संवाद हवा आहे. सर्व समाजासाठी, पुरुष आणि स्त्री, दोघांसाठी. डॉ. विलास साळुंखे म्हणतात त्याप्रमाणे ‘स्त्रीवादी पुरुष’ संकल्पनेचा विकास व विस्तार हवा आहे. त्याचबरोबर आजच्या पिढीतील पुढे येणाऱ्या स्त्रीचेही मानसिक प्रबोधन हवे आहे. दोन पिढय़ांमध्ये कालसंगत सुसंवादाची आज गरज आहे.
‘नारी संमता मंच’ने २००८ मध्ये ‘पुरुष संवाद केंद्र’ सुरू केले. त्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सचिन कुंडलकर यांनी अतिशय महत्त्वाचे विचार व्यक्त केले. ‘‘सगळ्यात चिंतेची गोष्ट ही आहे की, सगळा धोकादायक व आमूलाग्र बदल जीवनशैलीत घडत असताना त्यामुळे नुकसान होणाऱ्या मुलामुलींना त्याची जाणीव नाही. आपल्याला कोणताही एक ध्रुवीय समाज नको आहे. पुरुषप्रधान काय किंवा स्त्रीप्रधान समाज काय, दोन्ही आजारी अवस्था आहेत. आपलं वय, जातपात, लिंग, आर्थिक स्तर विसरून तयार केलेली मोकळी नातीच आपला समाज बांधून ठेवतील.’’ दुर्दैवाने लग्न संस्था दिवसेंदिवस आदिम व ग्राम्य होत चालली आहे. तिच्यातून उद्भवणारे प्रश्न या ‘संवाद केंद्रा’च्या माध्यमातून खुलेपणाने व शांततेने सोडवले जातील असा विश्वास वाटतो. गेल्या महिन्यात पत्नी व सासरच्या मंडळींच्या मानसिक त्रासामुळे दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना वाचनात आल्या. त्या घटना सचिन कुंडलकरांनी व्यक्त केलेल्या विचारांतील गंभीरता अधिकच जाणवून देतात. मागील वर्षी राष्ट्रपतींनी, नवीन सरकारने जाहीर केलेले स्त्रियांच्या संदर्भातील ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण, मुंबई पोलिसांनी स्त्रियांसाठी सुरू केलेल्या अनेक नवीन हेल्पलाइन्स (१० जानेवारी २०१५, चतुरंग पुरवणीत याविषयी सविस्तर लेख प्रसिद्ध केला.), कायद्यांमध्ये होणारे बदल, इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या उपाय योजना म्हणून स्वागतार्ह आहेत. परंतु त्यामुळे मुळातले प्रश्न निपटत नाहीत.
एक गोष्ट खरी आहे की, सर्वच प्रश्न संपले आहेत. स्त्रियांना आता कोणताच त्रास नाही. अशी परिस्थिती येणे अवघड आहे. बदलता काळ नवे प्रश्न आणतोच. यंदा महिला वर्षांला ४० वर्षे झाली. महिला वर्ष, महिला दशक, महिला सक्षमी वर्ष, सारे सारे पार पडल्यानंतरही स्त्रियांना समाजात निर्भयपणे वावरता येईल असे सामाजिक वातावरण, सांस्कृतिक पर्यावरण मिळत नसेल तर पुन्हा ‘गहूभर’ मागे आलो आहोत, असेच म्हणावे लागेल.
आजपर्यंतची परंपरा व वाटचाल बघता हे अवघड नाही. ज्ञानदान आणि वैचारिक उद्बोधन या प्रारंभीच्या टप्प्यापासून ‘संवादात’ खंड पडलेला नाही. प्रत्येक पिढीने काळाची गरज ओळखून ‘संवादात’ सातत्य राखले. त्यातून १६० वर्षांचा इतिहास उभा राहिला. त्यामुळे मनात निराशा नाही. प्रबोधन, जागृती करणाऱ्या संवादाची लय सापडेल. संवाद होत समाजाचे पोषण होईल. आजचा अस्वस्थ करणारा ठणका कमी होईल, असा आशावाद मनात निश्चित अंकुरत आहे.

(सदर समाप्त)
dr.swatikarve@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 1:11 am

Web Title: marathi magazines
टॅग : Reading
Next Stories
1 समयोचित प्रगल्भ संवाद
2 स्त्री जागराचा नवा अध्याय
3 ‘एक नजर : समकालीन जीवनावर’
Just Now!
X