‘स्त्री’ मासिकाच्या परंपरेला समयोचित जाणिवेतून पुढे नेण्याचे कार्य विद्या बाळ यांनी ‘मिळून साऱ्या जणी’च्या माध्यमातून केले. काळाच्या दृष्टीने एक टप्पा असा येतो की, पुढची दिशा घेण्यासाठी स्वत:शीच संवाद करण्याची गरज असते. नेमक्या याच संवेदनशील टप्प्यावर संवादासाठी ‘मिळून..’ च्या माध्यमातून नवा हात पुढे आला.

महिला वर्षांला चौदा वर्षे पूर्ण होत होती. १९७५ ते १९८५ चे ‘महिला दशक’ संपून दोन वर्षे झाली होती. ‘स्त्री-मुक्तीच्या’ विचारांची पहिली जोरकस लाट ओसरत होती. पहिल्या विचारधारेला पुढे नेणारा अधिक प्रगल्भ विचार हवा होता. स्त्रीचे आत्मभान जागविण्यासाठी, स्त्री-पुरुष समानतेचा कालसंगत अन्वय लावण्यासाठी, नवीन पुढे येणाऱ्या पिढीच्या विचारांवर संस्कार करीत, सामंजस्याचा सेतू बांधणाऱ्या ‘संवादाची गरज’ होती.

काहीशी पोकळी निर्माण होण्याच्या या टप्प्यावर एक सजग, प्रगल्भ, संवादासाठी उत्सुक असणारे व्यक्तिमत्त्व स्त्रियांच्या मासिकांच्या विश्वात बरीच वर्षे काम करीत होते. स्त्री चळवळीत काम करण्याचा अनुभवही होताच. स्वत:ची दृष्टी, संपादकीय भूमिका होती. असे जाणते व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्येष्ठ संपादक विद्या बाळ. ‘स्त्री’ मासिकाच्या व्यावहारिक बदलांच्या काळात विद्या बाळ यांनी स्वत:ला मुक्त करून घेतले. परंतु स्त्रीविषयक कार्य आणि संपादन यांच्याबरोबर त्यांचे अस्तित्वच बांधलेले होते. स्त्रीवादी विचारांचे नवे वळण आणि संवादाची गरज, याविषयी त्यांना नेमके भान होते. स्त्री-पुरुष समानता, स्त्रीचा आत्मसन्मान या संकल्पना समाजाकडून, विशेषत: पुरुषांकडून समजुतीने स्वीकारल्या गेल्याखेरीज प्रत्यक्षात येणार नाहीत. त्यासाठी पुरुषमनाशीसुद्धा संवाद त्यांना हवा होताच. स्त्रीचा सन्मान राखणारे, परस्पर सामंजस्यावर उभे राहणारे निकोप वैवाहिक-जीवन, सुसंवादी कुटुंब आणि पर्यायाने निर्माण होणारा सांस्कृतिक जीवनाचा पोत विद्या बाळ यांच्या मनामध्ये, नजरेसमोर होता. काळाची चाहूल, आत्मप्रेरणा, अनुभवातून आलेली कामे करीत राहण्याची ऊर्जा, यांतून विद्या बाळ यांनी ऑगस्ट १९८९ पासून ‘मिळून साऱ्या जणी’ मासिकाचे संपादन- प्रकाशन करण्यास सुरुवात केली. मासिकाचे उपशीर्षक सूचक होते. ‘स्वत:शी नव्यानं संवाद सुरू करणारं मासिक’. काळाच्या दृष्टीने एक टप्पा असा येतो की, पुढची दिशा घेण्यासाठी स्वत:शीच संवाद करण्याची गरज असते. पुनर्विचार हवा असतो. नेमक्या याच संवेदनशील टप्प्यावर ‘संवादा’साठी नवा हात पुढे आला.
स्त्री-पुरुष दोघांना आवाहन करणारे, शहरी स्त्रीबरोबर ग्रामीण स्त्रीला हाक देणारे, वैचारिकतेबरोबर ललित वाङ्मयाला सोबत घेणाऱ्या मासिकाने त्यांच्या मनात आकार घेतला होता. आपली भूमिका त्यांनी नेमकी स्पष्ट केली. ‘‘या मासिकाचा भर स्त्री वाचकांवर आहेच. तरीपण सर्वच स्त्री-पुरुषांना स्वत:शी नव्याने संवाद सुरू करायला या मासिकाची निश्चित मदत होईल. ‘साऱ्या जणी’ ही शब्दयोजना जाणीवपूर्वक आहे. शिक्षण, पैसा, जात-धर्म अशा निरनिराळ्या स्तरांवर स्त्रिया जगताना, वावराताना दिसल्या तरी त्यांच्या मूलभूत प्रश्नांची जात एकच आहे. हे समजून घेण्यासाठी त्यांच्यात अनुभवांची देवाणघेवाण व्हायला हवी. या देवघेवीतून समान सूत्र सापडणार आहे. हे बोलण्यासाठी, हे सांगण्यासाठी आम्हांला एक जागा हवी आहे. ‘मिळून साऱ्या जणी’मध्ये मनातले, घरातले, दारातले, कामकाजाच्या वेळातले असे जे जे काही स्त्रियांना बोलावेसे वाटेल त्यासाठी एक जागा निर्माण करायची.’’
प्रसन्नतेचा शिडकावा असणारे ‘मिळून साऱ्या जणी’ मासिक ऑगस्ट १९८९ पासून संवादासाठी वाचकांच्या भेटीला येऊ लागले. प्रसन्नतेचा शिडकावा पंचवीस वर्षे कायम आहे. त्यामुळेच संवादात कुठेच काटेकोरपणा, बोचरी तार्किकता नाही. स्त्री-जीवन, स्त्री-प्रश्नांविषयीच्या लेखांना नियमित प्रसिद्धी होतीच. जोडीने स्थानिक परिषदांपासून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमधील वृत्तांत वाचकांपर्यंत पोहोचविला जाई. ‘मेक्सिको ते बीजिंग : स्वयंसिद्धतेची खडतर पाऊलवाट’, ‘बीजिंगची कृती रूपरेखा वास्तवात आणताना’ डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विवेचक लेख जागतिक स्तरावरील विचारांचे भान देतात. ‘ब्रायटनची आंतरराष्ट्रीय परिषदेच्या वृत्तांतातून स्त्रियांवरील अत्याचाराचे जागतिक स्तरावरचे अस्वस्थ करणारे वास्तव विद्या बाळ स्पष्ट करतात.
‘स्त्री संघटनांच्या आत्मकहाण्या’, ‘दिलासा जागोजागचा’ या सदरांची योजना स्त्री संघटनांचे कार्य वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठीच होती. स्त्री-मुक्तीची चळवळ दीर्घकाळच्या सांस्कृतिक बंधनातून मोकळे होत आपल्या हक्काच्या मागणीसाठी केलेली मानवमुक्तीची धडपड आहे. या मानवमुक्तीच्या चळवळीचा वेध घेणारी डॉ. यशवंत सुमंत यांची लेखमाला ‘स्त्री-मुक्तीकडून मानवमुक्तीकडे’, पाश्चात्त्य देशांत स्त्री-मुक्तीच्या तीन लाटा कशा निर्माण झाल्या, जगभर कशा पसरल्या, एकोणिसाव्या शतकात आपल्या देशात कोणते प्रयत्न झाले. याचा आलेख स्पष्ट करते.
पाश्चात्त्य स्त्रीवादी लेखिकांच्या साहित्याचा परिचय डॉ. विद्युत भागवत करून देत होत्याच; परंतु त्याचबरोबर महाराष्ट्रात समाजसुधारकांनी केलेल्या कार्याला पुन्हा उजाळा देण्यास संपादक विसरत नाहीत. ‘समाजसुधारकांची साहसे’ ही डॉ. अरुणा ढेरे यांची लेखमाला संवादी स्वरूपात प्रसिद्ध झाली. स्त्री चळवळीविषयक लेखांची पेरणी होतीच. ‘स्त्री-जीवन’, स्त्री-प्रश्न, ‘स्त्री चळवळ’ या विषयाला विविध रूपात वाचकांसमोर ठेवीत संपादकांनी विषयाला व्यापकता दिली. साचेबंद रूप येऊ न देता.
सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत कसदार साहित्याचा हातभारही महत्त्वाचा ठरणार या विचारानेच विद्या बाळ यांनी ललित साहित्याचा समावेश करून घेतला होता. त्यातही भाषांतरित साहित्यातून समकालीन भारतीय स्त्री-साहित्याचा परिचय देण्याची धडपड होती. हैदराबादच्या अन्वेषी केंद्राने तेरा भारतीय भाषांमधील निवडक स्त्री-कथांचे दोन खंड प्रसिद्ध केले. Women writing in India त्यातील महत्त्वाच्या कथा भाषांतरित करून प्रसिद्ध केल्या. प्रतिमा यांची ‘दुलई’, रझिया सज्जाद झहीर ‘नीच’, राजलक्ष्मी देवी ‘मांजर’, आशापूर्णा देवींची ‘जे होतं तेच’, तसेच आसामी लेखिका राधाबहन भट्ट यांच्या ‘कुमाऊंची कन्या माना’ या कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध केला. निर्मला दास गुप्ता यांची ‘उमजलेली गोष्ट’ कादंबरीसुद्धा निवडली होतीच; परंतु भारतीय साहित्यातील भाषांतरित कविता जास्त परिणामकारक ठरल्या. भारतीय स्त्री-मनाची संवेदनशीलताच कवितांतून व्यक्त होते. ‘ते ऋ षी आहेत म्हणून’ या ए. जयप्रदा यांच्या कवितेतील ‘साडीची एक एक घडी फेडली जात असताना द्रौपदीच्या मनाला किती यातना झाल्या असतील, याविषयी काही नाहीये महाभारतात’, या ओळी
हिरा बनसोडे यांच्या ‘फिर्याद’ कवितेची आठवण करून देतात. प्रवासिनी महाकुंड ‘मोक्ष’ कवितेत म्हणतात, ‘मोक्षप्राप्तीसाठी कुठं गंगेला की गयेला?.. ‘या जन्मी झाले आहे स्त्री, पुढील जन्मी होऊन नदी’. प्रवासिनी महाकुंड यांची चिंतनशीलता अरुणा ढेरे यांच्याशी नाते जुळवणारी वाटते.
समयोचित प्रगल्भ संवादाच्या दृष्टीने सातत्याने केलेला आणखी एक संवाद सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. स्त्रीचे आत्मभान, स्त्री-पुरुष समानता, सामंजस्यातून आकाराला येणारे सहजीवन सामाजिक दृष्टीने, व्यक्तिगत दृष्टीनेही महत्त्वाचे असल्याने या संदर्भातील विषयाला संपादकांनी मध्यवर्ती स्थान दिले. वैचारिक आदानप्रदानाच्या दृष्टीने कधी वाचकांचे अनुभवकथन, कधी चर्चा, कधी मुलाखती, कधी प्रश्नावलीच्या आधारे सर्वेक्षण, दिवाळी अंकातून परिसंवाद इत्यादी स्वरूपात प्रश्न सतत कौशल्याने चर्चेत ठेवला. ‘आम्ही दोघेही संसार करतो’, ‘विवाह एक वर्तुळाकार प्रवास’, ‘लग्न : काही प्रश्न, काही उत्तर’, ‘सकस सहजीवनाच्या शोधात’, ‘लग्न कोंदण की कुंपण?’ इत्यादी विषयांवर सतत चर्चा चालू ठेवताना प्रौढ पिढी आणि तरुण पिढीतील स्त्री-पुरुषांना संपादकांनी लिहिते केले. प्रौढांच्या प्रगल्भ विचारांप्रमाणेच आजच्या पिढीतसुद्धा पारंपरिक नात्याच्या पलीकडे भावनिक नाते कसे निर्माण होत आहे, यांचेही प्रतिबिंब बघायला मिळतेच. आज ‘विवाहविना सहजीवन’, ‘लिव्ह इन रिलेशन’ ही नवीन संकल्पना आपल्या समाजात उतरत आहे. या संकल्पनेला कायदेशीर आधार देण्याचा विचार होत आहे. विषयाचे गांभीर्य ओळखून संपादकांनी ‘विवाहाविना सहजीवन’ या विषयावरसुद्धा वाचकांच्या प्रतिक्रिया मागविल्या. जोडीला स्त्री-पुरुष नात्याचा विविध दिशांनी वेध घेणारे ‘आदिम आणि अनंत सृजनासाठी’, ‘नर-मादी ते स्त्री-पुरुष’, ‘विज्ञान आणि स्त्री’ इत्यादी विषयांवर विचारप्रवर्तक परिसंवाद आयोजित केले. ‘आदिम आणि अनंत सृजनासाठी’ या परिसंवादातील
मिलिंद बोकील यांचा ‘स्त्री जन्म म्हणूनी न व्हावे उदास’ हा लेख प्रागैतिहासिक काळापासून आजपर्यंत स्त्री-जीवनातील स्थित्यंतरच उलगडून दाखवतो. हा लेख प्रत्येकाने एकदाच नाही अनेकदा वाचावा असा आहे. स्त्री-पुरुष नाते, वैवाहिक जीवन इत्यादींना या सर्व परिसंवादांनी विविध आयाम देत प्रगल्भतेवर नेले. विषयाचे गांभीर्य, व्यापकता आणि त्याची सार्वत्रिकता यांचे सखोल भान देण्याचा संपादकांचा प्रयत्न, हा ‘मिळून..’च्या कामगिरीतील सर्वात महत्त्वाच्या संवादाचा गाभा आहे. म्हणूनच ‘स्त्री-मुक्ती : समज-गैरसमज’ -सतीश तराणेकर, ‘होय, मी स्त्रीवादीच आहे!’ -शशी देशपांडे, ‘स्त्रीवादी पुरुष : संकल्पना आणि वास्तव’ -डॉ. विलास साळुंखे यांचे लेखही ‘मिळून..’मधून प्रसिद्ध झाले.
‘‘पुरुषांची तयारी झाल्याखेरीज स्त्रीवादाला यश येणे शक्य नाही. हे होण्यासाठी पुरुषांपुढे काही तरी ठोस आदर्श ठेवला जाणे आवश्यक आहे. असा आदर्श म्हणजे ‘स्त्रीवादी पुरुष’ ही संकल्पना असावी, असे सुचवावेसे वाटते’’, हे डॉ. साळुंखे यांचे विचार म्हणजे संपादकांनी सातत्याने केलेल्या ‘नांगरणी-पेरणी’नंतर आलेले अपेक्षित पीकच आहे.
राजस्थानातील ‘साथिन’च्या कार्यकर्त्यां भंवरीदेवी यांच्यावर बलात्कार झाला. अन्यायाविरुद्ध भंवरीदेवींनी चिवटपणे लढा दिला. तेव्हा विद्या बाळ यांनी ‘भंवरीदेवींना पाठिंबा देणारे १००० सह्य़ांचे पत्रक ‘नारी समता मंच’च्या वतीने तयार करून पाठवले. ‘मिळून..’च्या वाचकांनीही पाठिंबा देणारे कार्ड पाठवावे म्हणून आवाहन केले. इतकेच नव्हे तर ‘मिळून साऱ्या जणी’ मासिकाच्या ७ व्या वर्धापनदिनी भंवरीदेवींना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले.
विधवा असूनही कुंकू लावण्यास सुरुवात करणाऱ्या शालिनी जमखिंडीकर यांचे छायाचित्र १९३३ मध्ये माई वरेरकर यांनी ‘महिला’ मासिकाच्या मुखपृष्ठावर छापले होते. सामाजिक दृष्टीने माई वरेरकरांच्या निर्णयाला जे महत्त्व आहे, तेच महत्त्व विद्या बाळ यांनी भंवरीदेवींना ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून निमंत्रित करण्याला आहे.
‘स्त्री’ मासिकाच्या परंपरेला समयोचित जाणिवेतून पुढे नेण्याचे कार्य विद्या बाळ यांनी ‘मिळून..’च्या माध्यामातून केले. ‘मिळून..’ २५ वर्षे पूर्ण करीत असताना डॉ. गीताली वि. म.च्या रूपाने संवाद असाच चालू ठेवायला नवीन पिढी पुढे आली आहे. नवीन घोषवाक्याला घेरून.. ‘स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वत:शी आणि परस्परांशी संवाद साधावा यासाठी..’
dr.swatikarve@gmail.com