अमेरिकेतील हार्वर्ड व एमआयटी या संस्थांमधील वैज्ञानिकांना अपघाताने एका वेगळ्याच द्रव्य प्रकाराचा शोध लागला असून स्टार वॉरमध्ये दाखवलेल्या धारदार प्रकाशीय शलाकांसारखे ते काम करते. संशोधकांनी काही फोटॉन्सला एकत्र बांधून काही रेणू तयार केले व ते द्रव्याची एक वेगळीच अवस्था आहेत, आतापर्यंत द्रव्याची ही अवस्था केवळ सैद्धांतिक पातळीवर मान्य करण्यात आली होती. हार्वर्डचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक मिखेल ल्युकिन व एमआयटीचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व्लादन व्युलेटिक यांनी हा शोध लावला असून त्यांना सैद्धांतिक पातळीवरील द्रव्याची ही अवस्था असू शकते व ती प्रकाशीय रूपात असू शकते हे फारसे मान्य नव्हते. फोटॉन म्हणजे प्रकाशकण हे वस्तुमानरहित कण मानले जातात. ते एकमेकांशी क्रिया करीत नाहीत. दोन लेसर किरण एकमेकांच्या दिशेने सोडले असता ते एकमेकांतून पार जातात असे या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. प्रकाशकणांच्य रूपातील रेणू हे पारंपरिक लेसरसारखे वर्तन करीत नाहीत तर वैज्ञानिक कादंबऱ्यातील प्रकाशीय धारदार तलवारीसारखे वर्तन करतात. या प्रकाशीय द्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या मूळ वस्तुमानरहित प्रकाशकणांसारखे म्हणजेच फोटॉनसारखे आहेत व ते एकमेकांशी अभिक्रिया करीत नाहीत असे ल्युकिन यांनी सांगितले. आम्ही एक विशिष्ट प्रकारचे माध्यम तयार केले असून त्यात फोटॉन म्हणजे प्रकाशकण एकमेकांशी तीव्रतेने अभिक्रिया करतील व ते वस्तुमान असल्याप्रमाणे वर्तन करून एकमेकांशी रेणूंच्या बंधाप्रमाणे जोडले जातील. ही प्रकाशीय बंधाची स्थिती सैद्धांतिक पातळीवर अनेकदा चर्चिली गेली आहे. परंतु प्रत्यक्ष ती अनुभवता आली नव्हती. त्यांची तुलना ही लेसर तलवारींशी करता येईल, असे ल्युकिन यांचे म्हणणे आहे. जेव्हा फोटॉन म्हणजे प्रकाशकण एकमेकांशी अभिक्रिया करतात तेव्हा ते एकमेकांना दूर लोटण्याचा प्रयत्न करतात, या प्रयोगात जे घडले आहे ते अगदी विज्ञान काल्पनिक चित्रपटांसारखे आहे. वस्तुमान रहित प्रकाशकण एकमेकांशी बंधित करणे हे एखाद्या बलावर आधारित नाही तर काही अतिटोकाच्या अवस्थांशी संबंधित आहे असे ल्युकिन यांचे मत आहे.
प्रकाशकणांचा रेणू
वैज्ञानिकांनी या प्रयोगात रूबिडियमचे अणू एका निर्वात पोकळीत जोराने टाकण्यास सुरुवात केली व नंतर या अणूंचे ढग लेसरच्या मदतीने केवलशून्य तापमानाच्या काही अंश वर थंड करण्याचा प्रयत्न केला. अतिशय कमकुवत लेसर लहरी वापरून त्यांनी फोटॉन म्हणजे प्रकाश कण अणूंच्या या ढगात ढकलण्याचा प्रयत्न केला. त्या थंड अणूंच्या ढगात प्रवेश केल्यावर त्या प्रकाशकणांची ऊर्जा अणूंना त्यांच्या मार्गातच उत्तेजित करती झाली व त्यामुळे फोटॉन म्हणजे प्रकाशकणांचा वेग मंदावला. प्रकाशकणांचा वेग या अणूंच्या ढगातून प्रवास करताना कमी होताच अणू एकमेकांची साथ सोडून ढगातून बाहेर पडताना प्रकाशकणांबरोबर जाऊ लागले. जेव्हा ल्युकिन व त्यांच्या सहकाऱ्यांनी असे दोन फोटॉन म्हणजे प्रकाशकण या अणूंच्या ढगात पाठवले तेव्हा त्यांना ते या ढगातून बाहेर पडताना एकमेकांबरोबर येताना दिसले व तो एक रेणू होता, हे संशोधन नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.