येथील शाळांच्या चार मुलांनी आतापर्यंत अज्ञात असलेले दोन लघुग्रह शोधून काढले आहेत. पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय खगोल संस्थेने त्यांच्या लघुग्रह पुस्तिकेत या मुलांनी शोधलेल्या लघुग्रहांची नोंद केली आहे. चिन्मय विद्यालयाचे नववीतील दोन विद्यार्थी आर्यन मिश्रा व कीर्ती वर्धन तसेच बालभारती पब्लिक स्कूलचे अकरावीचे विद्यार्थी अक्षत शर्मा व क्षितिज जिंदाल यांनी पृथ्वीनिकटचे हे लघुग्रह शोधले आहेत. इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलॅबोरेशन व भारतातील स्पेस या दोन संस्थांनी विद्यार्थ्यांना लघुग्रह शोधण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यामुळे त्यांना हे लघुग्रह शोधणे शक्य झाले आहे. लघुग्रहाच्या शोधावर शिक्कामोर्तब होणे आवश्यक असते. लघुग्रह हे पृथ्वीजवळचे दगडासारखे घटक असतात. ते ‘नीअर अर्थ ऑब्जेक्ट’ या नावाने खगोलशास्त्रात ओळखले जातात. वेगवेगळ्या ग्रहांच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे काही वेळा ते पृथ्वी किंवा जवळच्या ग्रहाच्या कक्षेच्या दिशेने ढकलले जातात. या लघुग्रहांचे निरीक्षण करण्याचे कारण म्हणजे त्यांच्या आघातामुळे पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो. आर्यन मिश्रा व कीर्ती वर्धन यांनी शोधलेल्या लघुग्रहाला २०१४००३७२ तर अक्षत शर्मा व क्षितिज जिंदाल यांनी शोधलेल्या लघुग्रहाला २०१४ ओयू ६ असे नाव देण्यात आले आहे. हा अतिशय आनंददायी अनुभव होता व सॉफ्टवेअरच्या मदतीने आम्ही हा शोध लावला, असे अक्षत शर्मा याने सांगितले. आर्यन मिश्रा याने सांगितले, की आम्ही जो शोध लावला तो सगळ्यांनी पाहिला. आम्ही असा काही शोध लावू शकू असे वाटले नव्हते. धूमकेतू शोधायला आणखी आनंद वाटेल तसेच लघुग्रहांविषयी वाचायला आवडेल, असे त्याने सांगितले. आर्यन व मी लघुग्रह शोधला त्यामुळे आपण खूप आनंदित झालो व आपले स्वप्न साकार झाले आहे.
गेल्या वर्षी शौर्य चंबियाल व गौरव पाटी या अ‍ॅमिटी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी २०१३ एलएस २८ हा लघुग्रह मुख्य पट्टय़ात शोधून काढला होता. ‘स्पेस’ या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित वर्मा यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांच्या संशोधनाला मिळालेली ही पावती आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना जागतिक मंच उपलब्ध झाला आहे. पहिल्यांदा २०१० पासून मुलांनी लघुग्रह शोधण्याची पद्धत सुरू झाली आहे ती गेली पाच वर्षे चालू आहे.

कसे शोधतात लघुग्रह..
मुलांना आकाशाच्या २४ इंच बाय ३४ इंच दुर्बिणीने काढलेल्या आकाशाच्या प्रतिमा उपलब्ध करून दिल्या जातात असे अमेरिकेतील अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल रीसर्च इन्स्टिटय़ूटने म्हटले आहे. विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने डाऊनलोड केलेल्या माहितीची छाननी करून नंतर लघुग्रहांचा शोध लावला जातो. ही निरीक्षणे नासाच्या नीअर अर्थ ऑब्जेक्ट प्रकल्पाला तसेच जेट प्रॉपलशन लॅबोरेटरीला पाठवली जातात. या प्रकल्पात ५०० मुलांना लघुग्रह शोधण्याची संधी मिळते. आतापर्यंत एक धूमकेतू, ९६ प्राथमिक शोध व १८ हंगामी शोध अशी कामगिरी असून ट्रोजन हा अत्यंत दुर्मीळ लघुग्रह २०११ मध्ये सापडला आहे.