गेल्या सदरात आपण बघितलं की, मंगळावर सजीवांच्या अस्तित्वाबद्दल चच्रेला सुरुवात पर्सव्हिल लॉवेल यांनी केली होती, पण चच्रेचा पाया मात्र भक्कम नव्हता. इथे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की, खगोलीय छायाचित्रणाची कला अजून नवीन होती आणि अशा प्रकारची निरीक्षणे ही दुर्बणितून बघून कागदावर काढलेली चित्रे असायची. अर्थात त्यामुळे ही निरीक्षणे व्यक्तिसापेक्षही असत आणि खऱ्या-खोटय़ाची शहानिशा ही त्या व्यक्तीच्या शब्दांवर अवलंबून असे.
जेव्हा अनेक शास्त्रज्ञांनी लॉवेल किंवा इतर निरीक्षकांची निरीक्षणे पडताळून बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची या निरीक्षणांवरचा विश्वास ढासळू लागला कारण त्यांना मंगळावर जे दिसले त्याची पुष्टी होत नव्हती आणि एकूण मंगळावरच्या आपल्यापेक्षा जास्त प्रगत सजीवांच्या शोधाची आणि अभ्यासाची निरीक्षणे हळूहळू आपोआपच बंद पडू लागली.
लॉवेल यांचे मंगळावरील प्रगत सजीवांच्या संकल्पनेला जरी पूर्णविराम मिळाला असला तरी ते आपल्याला दोन गोष्टींमुळे नेहमीच लक्षात राहतील. एक म्हणजे वैज्ञानिक कथा कादंबऱ्या यांना लोकप्रिय बनवण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे आणि दुसरं म्हणजे अमेरिकेत फ्लॅगस्टाफ येथे त्यांनी जी वेधशाळा बांधली ती खगोल निरीक्षणासाठी एक उत्तम केंद्र म्हणून प्रसिद्ध झाली आणि इथूनच टॉमबॉग यांनी प्लुटोचा शोध लावला. मंगळावरील सजीवांच्या अस्तित्वाला परत एकदा चालना मिळाली ती म्हणजे ग्रहांची शास्त्रीय पद्धतीने (म्हणजे छायचित्रे किंवा रडार वापरून वगरे)  मिळालेली निरीक्षणे आणि अंतराळ मोहिमांना सुरुवात झाल्यापासून.
आपला सर्वात जवळचा वैश्विक शेजारी म्हणजे चंद्र. चंद्रावर तर आजपर्यंत सजीवांच्या अस्तित्वाच्या कुठल्याही खुणा मिळालेल्या नाहीत. त्यावर वातावरण आणि  पाणी नसल्यामुळे सजीवांच्या किंवा कमीत कमी आपल्याला माहीत असलेल्या सजीवांच्या अस्तित्वाची कुठलीही लक्षणे नाहीत. या शिवाय त्यावर तापमानातील बदलदेखील इतका जास्त असतो की (परत एकदा) आपल्याला माहीत असलेले कुठलेही सजीव वातावरणातील इतक्या मोठय़ा फरकाला सामोरे जाऊ शकत नाहीत. बुधाची कथा पण चंद्रासारखीच. सूर्याच्या अगदी जवळ असलेल्या या ग्रहावर वातावरण नाहीच आणि त्याच्या पृष्ठभागाचे तपमान पण खूप मोठय़ा फरकानं बदलतं.  शुक्र हा ग्रह कदाचित सजीवांच्या उत्क्रांतीसाठी पोषक असू शकला असता, पण त्यावर वातावरणाचे एक मोठे आच्छादन आहे. या आच्छादनामुळे शुक्रावर ग्रीन हाऊस परिणाम झाला आहे. शुक्राच्या वातावरणात शिरलेले सूर्यकिरण बाहेर पडू शकत नाहीत आणि  त्यामुळे शुक्रावर सरासरी तापमान ४७० अंश सेल्सियसपर्यंत  आहे. या तापमानात जस्त (िझक) धातू सुद्धा वितळतो. पृथ्वीचे सरासरी तापमान १४ अंश सेल्सियस आहे. या शिवाय शुक्राच्या वातावरणात ९६ टक्के कार्बन डाय ऑक्साईड आहे, तर ढग हे सल्फ्युरिक अ‍ॅसिडचे आहेत. शुक्राच्या वातावरणाचा त्याच्या पृष्ठ भागावरचा दाब पृथ्वीच्या वातावरणाच्या दाबाच्या ९० पट जास्त आहे, अशा परिस्थितीत या ग्रहावर सजीवांच्या अस्तित्वाची कल्पना करणे शक्य वाटत नाही.
मंगळ ग्रहाची गोष्ट मात्र थोडी वेगळीच निघाली. असे नव्हे की मंगळाची पृष्ठभूमी सजीवांच्या उत्क्रांतीसाठी पोषक आहे असे आणखी निरीक्षणातून सिद्ध झाले.  खरं तर या उलट मंगळाच्या निरीक्षणातून आपल्याला तिथे जाऊन सहज वस्ती करणं शक्य नाही हेच समोर येत होतं. मंगळाचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या फक्त अर्धा आहे आणि पृष्ठ भागावर गुरुत्वीय बल पृथ्वीच्या पृष्ठ भागाच्या गुरुत्वीय बलाच्या ३८ टक्केच आहे. मंगळावर वातावरण पण खूप विरळ आहे आणि त्यात ७५ टक्के कार्बन डाय ऑक्साईड आहे आणि हे विरळ वातावरण सूर्यापासून येणाऱ्या हानीकारक विकिरणांपासून आपला बचाव करू शकणार नाही. मंगळावर कमाल तापमान २० अंश तर किमान उणे १४० सेल्सियस असते.
पण त्याचबरोबर काही बाबी पृथ्वीसारख्या पण आहेत.  मंगळ सूर्याची एक परिक्रमा १.८८ वर्षांनी (पृथ्वीच्या ६८६.९८ दिवसांनी) पूर्ण करतो आणि याचा अक्ष याच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या पातळीला २३.५९ अंशाने कललेला आहे. पृथ्वीचा अक्ष साडेतेवीस अंशाने कललेला आहे, तर मंगळाच्या सूर्याच्या एका परिक्रमेत एकदा याचा उत्तर ध्रुव तर एकदा दक्षिण ध्रुव सूर्याच्या दिशेने कललेला असतो. त्यामुळे याच्या पृष्ठ भागावर ऋतू होतात.
खरं तर मंगळावरील ध्रुवीय भागावर बर्फाचे आच्छादन आणि मंगळावरील ऋतूंमधील बदलांचे निरीक्षण पर्सव्हिल लॉवेल यांनी केले होते आणि मंगळावरील बदलत्या ऋतूंच्या निरीक्षणांना कदाचित कॅनॉल म्हणून तिथल्या प्रगत सजीवांची कल्पना केली होती.
याच्या ध्रुवीय भागावर आपल्याला बर्फाचा साठा दिसतो. म्हणजे कधी काळी इथे पाणी असलं पाहिजे जे काही कारणामुळे उडून गेले. जर या ग्रहावर पाण्याचा साठा होता तर असेही शक्य आहे कधी काळी इथे सजीवांचे अस्तित्व, अगदी सूक्ष्म जीवांच्या स्वरूपाचे का असेना,  होते ही शक्यता नाकारत येत नाही. मंगळावर सूक्ष्मजीवांच्या शोधाचे आपले कुतूहल किंवा कधी काळी तिथे वस्ती करता येईल यापुरते मर्यादित आहे असे मात्र म्हणता येणार नाही. पृथ्वीवर सजीवांच्या उत्क्रांतीच्या खुणा वेगवेगळ्या कारणांमुळे पुसट झाल्या आहेत आणि अशी शक्यता आहे की या खुणा मंगळावर अजूनही असतील आणि त्या आपल्याला सापडल्या तर विश्वात सजीवांच्या निर्मितीचे कोडे सोडवण्याच्या दिशेने ते एक पाऊल असेल.
विज्ञान पानासाठी लेख पाठवण्याचा पत्ता- निवासी संपादक, लोकसत्ता एक्सप्रेस हाऊस प्लॉट नं. १२०५/२/६ शिरोळे रस्ता, शिवाजीनगर पुणे-४ अथवा  rajendra.yeolekar@expressindia.com