पृथ्वीचे अंतरंग आणि बाह्य़रंग यामध्ये विलक्षण विविधता आणि सौंदर्य सामावलेले आहे. उपग्रह, अंतराळ याने, रॉकेट्स, हबलसारख्या कार्यक्षम दुर्बिणी, इन्फ्रारेड किरणांचा वापर करून कार्यरत असणारे कॅमेरे इत्यादी अत्याधुनिक तंत्रज्ञानामार्फत अथांग पसरलेल्या अंतराळाची माहिती बऱ्याच प्रमाणांत उपलब्ध झालेली आहे. काही संशोधकांनी, तंत्रज्ञांनी आपली संशोधक वृत्ती पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती मिळविण्यासाठी कार्यरत केलेली आहे.
पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती संकलित करण्यामध्ये खूप मोठी अडचण निर्माण होते व ती म्हणजे जबरदस्त अंतर्गत तापमान. साधारणत: पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पन्नास-साठ किमी आत पोहोचल्यास तापमान २०० ते ३०० अंश सेल्सिअस इतके असते. त्यापेक्षा खोलवर गेल्यास तापमान वाढत जाते. अंतर्गत भागांत ऑक्सिजन पुरवठा खूप कमी, आजूबाजूचे कठीण जड मातीचे थर कोसळणे, अंधारा प्रदेश आणि कुंद वातावरण यामुळे पृथ्वीच्या अंतरंगाचे संशोधन, करणे अतिशय कठीण जाते. या कारणास्तव सोने, चांदी, हिरे, लोखंड, कोळसा यांसारख्या उपयुक्त घटकांना खाणीतून ‘वर’ काढण्यासाठी प्रचंड खर्च येतो. भरपूर कष्ट करावे लागतात.
पृथ्वीच्या गर्भात मोठय़ा प्रमाणांत रेडिओअक्टिव्ह (उत्सर्जन करणारे किरण) स्वरूपाची खनिजे आहेत. अति उष्णतेमुळे त्या मूलद्रव्यांमध्ये सातत्याने विघटन होत असते. विघटनांमुळे प्रचंड ऊर्जा बाहेर टाकली जाते. या कारणास्तव पृथ्वीचे अंतरंग गेल्या अनेक शतकांपासून गरमागरम झालेले आहे. आणि त्यामुळे द्रवरूप स्वरूप (लाव्हा) आणि वायुरूप अवस्था कायम राखली जात आहे. या कारणास्तव चार-पाच किमी पेक्षा जास्त खोलवर खाणींमध्ये उत्खननही करता येत नाही. वेगवेगळी यंत्रणा वापरून संशोधनही करणे अशक्य ठरते.
अमेरिका या राष्ट्राचा जन्म सुमारे चारशे वर्षांपूर्वी झाला. युरोपांतील काही देशांमधून धडाडीचे आक्रमक, संशोधक वृत्तीचे लोक नशीब उघडण्यासांठी अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यांवर उतरले. मूळच्या अप्रगत, असंघटित, रेड इंडियन्स, आदिवासीयांचा पराभव करण्यासाठी बाहेरून आलेल्यांनी एकत्रितपणे लढा दिला. अमेरिका या नवीन देशाचे रूपांतर आधुनिक राष्ट्रांत होण्यासाठी, तेथील लोकांमधील संशोधकवृत्ती, चिकाटी, मेहनत कष्टकरी प्रवृत्ती कारणीभूत ठरली. माणसाच्या संदर्भातील कोणतेही क्षेत्र घेतल्यास त्यात संशोधनाची कमाल मर्यादा गाठली.
विशेष करून जमीन, जमिनीच्या आत लपलेली खनिजे, अंतर्गत असलेले पाण्याचे प्रवाह, जमिनीची सुपीकता अभ्यासून केलेली वेगवेगळ्या प्रकारची शेती यावर अमेरिकन संशोधकांनी विलक्षण आघाडी प्रस्थापित केली. उत्तर अमेरिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यांवरील मेक्सिको देश आकाराने विस्तृत आहे. तेथील भूमिगत खनिजे आणि पसरलेले भव्य वाळवंट संशोधकांना आकर्षित  करून घेत असे. मध्य मेक्सिकोतील चिहुहुआ नावाचे वाळवंट संशोधकांचे केंद्रस्थान बनले. वाळवंटीय भागांत लोखंड, सोने, चांदी यांचा साठा भरपूर आहे हे निश्चित झाल्यावर उत्खननाच्या मोहिमा सुरू झाल्या.
उत्तर मेक्सिकोत ‘नाईका’ नावाच्या गावाच्या पलीकडे पर्वतरांगा आहेत. नाईकाच्या जवळपासचा प्रदेश वाळवंटाचा आहे. या प्रदेशांतील लोखंडाचे उत्खनन करताना काही ठिकाणी अतीशुभ्र आकाराने मोठय़ा अशा स्फटिकांच्या (क्रिस्टल्स) खाणींची माहिती संशोधकांना लागली. तेथील स्फटिकांची लांबी सरासरी चार ते पाच फूट होती. ते स्फटीक एकमेकांवर अशा प्रकारे रचले गेले होते की मोठा चक्रव्यूव्ह निर्माण झालेला होता. तेथील तापमान साधारणत: ५५ ते ६० अंश सेल्सिअस, वारा अजिबात नाही, ऑक्सिजनचे हवेत प्रमाण अत्यल्प यामुळे तेथे फार काळ टिकणे केवळ अशक्य होते. काही संशोधक, खाण कामगार त्या स्फटिकांच्या साम्राज्यात शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असताना प्राणघातक अवस्थेत सापडले. जीव धोक्यात घालून तेथे उत्खनन करण्यास कोणीही धजावत नव्हते.
अनेक वर्षे त्या खाणींच्या भागात भूत किंवा काही विलक्षण विध्वंसक शक्ती वावरत आहे असा समज असल्याने कोणीही उत्खननाचा विचार करीत नव्हते. २००७ मध्ये त्या स्फटीक खाणींकडे पाओलो फोर्टी नावाच्या इटालीअन संशोधकांचे लक्ष वेधले गेले. उत्तर इटालीतील बोलोग्ना शहरांतील विद्यापीठातून पाओलोने ‘स्पिलीओलॉजिस्ट’ विषयांत डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेली आहे. स्पिलीओलॉजिस्ट म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या गुहांचे शास्त्र. पाओलोच्या मते नाईका प्रदेशांतील स्फटीक गुहा केवळ अद्वितीय आहेत.
त्याने त्या प्रकारच्या गुहांमध्ये संशोधन करण्याची रीतसर परवानगी मेक्सिको सरकारकडे मागितली. त्या गुहांमध्ये प्रवेश करणे म्हणजेच मृत्यूला कवटाळणे आहे याची प्रत्येकाला कल्पना होती. अशा प्राणघातक परिसरात संशोधनाला परवानगी देणे म्हणजे आत्महत्येचा प्रकार आहे. अशा स्वरूपाचा कायदेशीर मुद्दा उपस्थित झाल्याने पाओलो आणि त्याच्या तुकडीच्या संशोधकांकडून हमीपत्र घेण्यात आले आणि अखेरीला २००९ च्या मार्च महिन्यात त्याला संशोधनाला, उत्खननाला परवानगी मिळाली.
पाओलोच्या साथीदारांनी ऑक्सिजन सिलींडर्सचा वापर करून उष्णतारोधक युनिफॉर्म वापरून गुहांच्या काही भागात प्रवेश केला. प्राथमिक माहिती मिळवून, छायाचित्रण करून संशोधनाची, उत्खननाची दिशा ठरविणे आवश्यक होते. त्यानुसार आतील बाजूस ओंडक्यासारखे अस्ताव्यस्त पसरलेले, एकमेकांत गुंतलेले सेलेनाईट घटकांपासून तयार झालेले असंख्य स्फटीक असल्याचे निश्चित झाले.
त्यातल्या त्यात वरच्या थरांमधील स्फटिकांवर हातोडय़ांचे घाव घालून तुकडे पाडण्यात आले. तुकडय़ांचे पृथक्करण केल्यानंतर त्यामध्ये जिप्सम आणि अल्प प्रमाणांत कार्बन मूल्यद्रव्यांचा समावेश असल्याचे निश्चित झाले. ग्रीक संस्कृ तीनुसार जिप्सम मूलद्रव्याला ‘चांद्रदेवतेचे रूप’ असे ग्रीक भाषेतील नाव सिलीन आहे. त्यावरून सेलेनाईट असे नामकरण निश्चित करण्यात आले. ते स्फटिक साधारणत: दहा चौ. कि.मीच्या प्रदेशांत पसरले असून जमिनीपासून पाचशे ते आठशे मिटर्स खोलवर अस्ताव्यस्तपणे पसरलेले आहेत. अशी माहिती निश्चित करण्यात आली. सरासरीने साधारणत: आठ ते दहा फूट लांबी आणि सात-आठशे किलोग्रॅम वजन असणारे स्फटीक एकमेकांत घट्ट चिकटलेले होते. ते स्फटीक कापून, फोडून वेगळे करणे आणि पद्धतशीरपणे जमिनीवर आणणे अत्यंत जिकिरीचे, जोखमीचे आणि विविध यांत्रिकतेचा वापर करून साध्य करण्याचे कार्य होते.
इटालीअन आणि मेक्सिकन सरकारकडे स्फटिकांच्या उत्खननाचा आराखडा सादर करण्यात आला २०११ मध्ये. याला प्रचंड यंत्रसामुग्री आणि खर्चाची मंजुरी अत्यावश्यक होती. खाणीतील कामगारांना प्रचंड उष्णता, ऑक्सिजन पुरवठा करणारे सिलींडर्स, हेल्मेट्स आणि अंतराळवीरांसारखा पोशाख यावर प्रत्येकी अडीच लक्ष रुपये खर्च येणार होता. उत्खननांसाठी अत्यावश्यक असणारी सामुग्री, वाहतूक व्यवस्था यावर कोटय़वधी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले.संशोधनानुसार त्या स्फटिक गुहेने एकूण पाच चौ. किमीचा प्रदेश व्यापला होता. साधारणत: पंचवीस लक्ष वर्षांपूर्वी त्या गुहेची निर्मिती झालेली असावी. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे वेगवेगळे खडक तयार होताना त्यामध्ये पोकळ्या राहिल्या असाव्यात. त्या पोकळ्यांमध्ये उष्ण पाण्याचा प्रवेश झाला. कालांतराने उष्ण पाण्याचे तापमान कमी होत गेले. त्यावेळी त्यात कॅल्शिअम, सल्फेट अणूकणांचा संचय झाला. पृथ्वीच्या अंतर्गत दाब, साधारणत: ६० अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान यामुळे त्या स्फटिकांना वेगवेगळा आकार प्राप्त झाला. आणि त्यांच्यात पारदर्शकता निर्माण झाली असावी. अत्यंत कुशलतेने त्या गुहेतील वेगवेगळ्या भागांतील, विविध आकाराचे, लांबी, रुंदीचे स्फटिक वर्षभरात जमिनीवर आणण्यात आले. मेक्सिकोच्या राजधानीत त्यांचे एक उत्कृष्ट, विलोभनीय संग्रहालयही उभारण्यात आले आहे. पृथ्वीच्या अंतर्गत प्रदेशांतील अत्यंत विस्मयकारक स्फटीक गुहा म्हणून त्याची नोंद झालेली आहे. त्या स्फटिकांचा ठेवा तसाच कायम रहावा म्हणून इ. स. २०१२ पासून तेथील उत्खनन थांबविण्यात आलेले आहे.