17 December 2017

News Flash

जिज्ञासा : सूर्यावरील बदलांचा पृथ्वीवर प्रभाव

मागे आपण ३१ डिसेंबर रोजी सूर्याच्या पृष्ठभागावर उफाळलेल्या ज्वाळेची चर्चा केली होती. काहीच तासात

अरविंद परांजपे | Updated: January 29, 2013 12:01 PM

मागे आपण ३१ डिसेंबर रोजी सूर्याच्या पृष्ठभागावर उफाळलेल्या ज्वाळेची चर्चा केली होती. काहीच तासात या ज्वाळेने पृथ्वीच्या व्यासाच्या वीस पट उंची गाठली होती. पण या ज्वाळेमुळे पृथ्वीला कुठलाही धोका नव्हता हे नमूद केले होते. त्याच बरोबर आपण हे बघितले होते, की या स्फोटांचे वर्गीकरण करण्यात आले आहे आणि या वर्गातील स्फोट हे पृथ्वीवर जिथे विद्युत चुंबकीय क्षेत्र आहे किंवा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या विद्युत रचनेला नुकसान पोचवू शकतात.  
हे सूर्यावर क्वचित होणारे बदल आणि त्यांचा परिणाम पण फार काळ नसतो. पण सूर्यावर असे काही बदल घडतात का, की ज्यामुळे त्याचे दूरगामी परिणाम पृथ्वीवर होऊ शकतात. आपल्याला असे अनेक तारे माहिती आहेत, की जे काही दिवसाच्या कालावधीत आपली प्रखरता मोठय़ा प्रमाणात बदलतात किंवा त्यांच्या आकारात कमी-जास्त बदल होतो. यांच्या तुलनेत बघितले तर सूर्य अत्यंत स्थिर असा तारा आहे. याच्या ११ वर्षांच्या कालावधीत त्याच्या आकारात सुमारे ०.१  टक्का इतका जास्तीत जास्त बदल होतो. पण सूर्यावर होणारे काही किंचित बदल आपल्या पृथ्वीच्या वातावरणात बदल घडवू शकतात असे मत काही शास्त्रज्ञांनी मांडले आहे. हे बदल अत्यंत जटील प्रकारे होत असतात आणि ते समजण्यासाठी सूर्याच्या सखोल अभ्यासाची गरज आहे.
उदा. कॉस्मिक किरणे (वैश्विक किरणे) आणि जास्त ऊर्जा असलेले कण पृथ्वीच्या वातावरणातील ओझोनची मात्रा कमी करू शकतात. पण पुढे जाण्यापूर्वी आपण पृथ्वीच्या वातावरणाची थोडी माहिती घेऊ या. पृथ्वीवरील वातावरणाचे त्यांच्या गुणधर्मानुसार काही भाग करण्यात आले आहेत. या वातावरणाची कल्पना तुम्ही कांद्याच्या सालीसारखी करू शकता. फक्त या सालींची जाडी वेगवेगळी असते.
पृथ्वीच्या वातवरणाचा पहिला भाग म्हणजे ट्रोपोस्फियर. ध्रुवीय प्रदेशात याची उंची पृथ्वीच्या पृष्ठभागा पासून ते सुमारे ९ कि.मी. असते तर विषुववृत्तावर ही सुमारे १४ कि.मी असते. आपल्या वातावरणातील जवळजवळ सर्व घडामोडी – ढग, पाऊस वगरे याच भागात घडतात. ट्रोपोस्फियरला ऊर्जा प्रामुख्याने पृथ्वीवरून मिळते. सूर्याची किरणे पृथ्वीच्या पृष्ठभागाला तापवतात आणि मग हीच ऊर्जा ट्रोपोस्फियरला तापवते. त्यामुळे पृष्ठभागावरून वर जाता जाता तपमानात घट होत जाते.
यावर सुमारे ४ कि.मी. जाडीचा ट्रोपोपॉझचा थर असतो. यावरचा भाग म्हणजे स्ट्रॅटोस्फियर. याची उंची सुमारे ५० कि.मी.पर्यंत जाते. त्यावर मेसोस्फियर याची उंची ८० ते ९० किं.मी.पर्यंत असते. याच भागात आपल्याला उल्का दिसतात. त्यावर आहे थर्मोस्फियर – याची उंची ३५० ते ८०० कि.मी. असते. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सुमारे ३२० ते ३८० कि.मी. वरून पृथ्वीची प्रदक्षिणा करत आहे.
स्ट्रॅटोस्फियर आणि मेसोस्फियर यांच्यामध्ये एक पातळसा थर आहे ओझोनचा थर हा पण आपल्या साठी खूप महत्त्वाचा आहे. ओझोन हा ऑक्सिजन किंवा प्राणवायूचा संयुग आहे. हा ऑक्सिजनच्या ३ अणूंपासून बनलेला आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे पृथ्वीवरील सजीवसृष्टीसाठी घातक आहेत. ओझनवर सूर्यकिरणाच्या प्रभावामुळे त्याचे विघटन होते पण त्यामुळे ही किरणे आपल्यापर्यंत पोचू शकत नाहीत आणि अशा प्रकारे या अतिनील किरणांपासून आपला बचाव होतो. तसेच ओझोनच्या विघटनामुळे स्ट्रॅटोफ्सियर चे तापमान पण वाढते.
आता जर ओझोन नसेल, तर स्ट्रॅटोस्फियर ते तापमान वाढणार नाही. त्याचा परिणाम म्हणजे ध्रुवीय आणि उष्ण कटिबंध क्षेत्र यांच्यातील तापमानात फरक जास्त होऊ लागेल आणि त्या मुळे एक अस्थिरता तयार होऊ लागेल व वादळी वातावरणाची शक्यता वाढेल. सूर्यावरील घटनांमुळे पृथ्वीवरील ओझोनवर नेमका कसा प्रभाव पडतो याचा अभ्यास करणे खूप अवघडपण आहे. कारण मानवाने या ओझोनचे प्रमाण कमी करण्यात हातभार लावला आहे.
सूर्याशी निगडित असलेल्या अनेक प्रभावांचा अभ्यास करता सूर्यावरील बदलांचा पृथ्वीवर परिणाम नक्कीच होत असणार असे दिसून येते.याचे एक उदाहरण म्हणजे १७ आणि १८ व्या शतकात एक अशी स्थिती आली होती, की सुमारे ७० वर्षे सूर्यावर सौरडागांची संख्या फार कमी होती. त्या वेळी एक प्रकारचे लघु हिमयुग आले होते. युरोप आणि उत्तर अमेरिकेत सरासरीपेक्षा तापमान खूप खाली गेले होते आणि हे सूर्यातून येणाऱ्या अतीनील किरणांच्या उत्सर्जनात घट झाल्यामुळे तर नसेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या सूर्यावरील सौरडागांची संख्या जास्त असली, तरी ज्या प्रमाणात आपल्याला सौरडाग दिसायला पाहिजेत तेवढे दिसत नाहीयेत. खरेतर गेल्या ५० वर्षांतील हे प्रमाण सर्वात कमी आहे. सूर्यावरील बदलांचा प्रभाव पृथ्वीवर कसा होत असेल हे आज तरी शास्त्रज्ञ नक्की सांगण्यात असर्मथता व्यक्त करत असले, तरी त्यांना नक्की वाटते की असा परिणाम होत असणार – गरज आहे ती आणखी अभ्यासाची आणि आकडे मिळवण्याची.
विज्ञान पानासाठी लेख पाठवण्याचा पत्ता- निवासी संपादक, लोकसत्ता एक्सप्रेस हाऊस प्लॉट नं. १२०५/२/६ शिरोळे रस्ता, शिवाजीनगर पुणे-४ अथवा  rajendra.yeolekar@expressindia.com

First Published on January 29, 2013 12:01 pm

Web Title: changes in sun will effects on earth