अफाट अंतराळातील गूढ उकलण्यासाठी, मानव अंतराळ प्रवास करू लागला आहे, त्याने चंद्रावर पाऊलही ठेवला आहे. हा अंतराळ प्रवास किती धोक्याचा असतो व जराशी चूकसुद्धा जीवितहानी होण्यास कशी कारणीभूत ठरते याच्या घटना नजिकच्या भूतकाळात आपण अनुभवल्या आहेत. अमेरिकेतील ‘नासा’  ही संस्था तर, येत्या २० वर्षांत मंगळावर माणूस पाठविण्याचे मनसुबे रचित आहे. इ. स. २०२१ साली एका लघुग्रहावर तर २०३५ ला मंगळावर मानवी यान पाठविण्याच्या तयारीत ते आहेत. गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ‘रोव्हर क्युरिऑसिटी’ या मानवरहित यानाने मंगळावर भटकंती करून, तिथल्या खडक-मातीचे काही नमुने गोळा केले आहेत. सद्या ते तिथल्या खडकाचे नमुने गोळा करण्यात गुंतले आहेत. पाच महिन्यांपूर्वी मंगळावर उतरलेले, हे आण्विक ऊर्जेवर कार्यरत असलेले मानवरहित यान दोन वर्षांच्या कामगिरीवर असून ते तिथल्या जीवसृष्टीस पोषक वातावरणाचा शोध घेत आहे. मंगळावरील मानवी स्वारीचे ते एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
परंतु मंगळावर केवळ जाण्या-येण्याचा काळ हाच मुळी तीन वर्षांचा असेल. या काळात अंतराळवीरांची रोगप्रतिबंधकशक्ती कमकुवत होऊ शकते. याच काळात शरीराला घातक ठरणाऱ्या सॅल्मोनेला, ई. कोलाय, स्टॅपायलोकोकस यासारख्या अपायकारक जीवाणूंची होणारी वाढ ही अंतराळवीरांसाठी धोकादायक ठरू शकते. हे जीवाणू अंतरिक्ष प्रवासात अधिक जोमाने वाढतात असे फ्रान्समधल्या नॅन्सी युनिव्हर्सिटीतील संशोधकांना आढळले आहे. या जीवाणूमुळे अन्नप्रदूषण होऊ शकते. त्यांच्या वसाहती
यानात फोफावू शकतात. त्यातून विविध रोगांची लागण होऊ शकते.
सौर वादळामुळे नि ताऱ्यांच्या स्फोटांमुळे उत्सर्जित होणाऱ्या वैश्विक प्रारणांनी अंतराळ व्यापलेले असते. पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्र, आपल्याला या प्रारणांपासून सुरक्षित ठेवते, पण एकदा अंतराळवीरांनी अवकाशात झेप घेतली की ते या वैश्विक प्रारणांत न्हाऊन निघतात. जरी या प्रारणांची पातळी कमी असली तरी त्यांचा दीर्घकाळ संपर्क जीविताला हानी पोहचवू शकतो.
गेली २५ वर्षे ‘नासा’ ने विविध संशोधन प्रकल्पातून दीर्घ अंतराळप्रवासाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम पडताळून पाहण्यासाठी प्रयत्न जारी ठेवले आहेत. वैश्विक प्रारणांमुळे नेत्रदोष, हृदरोग अस्थिव्याधी, कर्करोग उद्भवतात हे केव्हाच सिद्ध झाले होते आणि आता, त्यात भर म्हणून की काय, रोचेस्टर युनिव्हर्सिटीतील मेडिकल सेंटरचे एक शास्त्रज्ञ
डॉ. केरी ओ’बनियन व त्यांच्या चमूला असे आढळले की, वैश्विक प्रारणांमुळे माणसामध्ये अल्झायमरचा (स्मृतीभ्रंश) प्रादुर्भाव होऊ शकतो. ही शारीरिक त्रुटी मज्जासंस्थेशी निगडित असून, माणसाची स्मृती कुरतडून, तिचा विध्वंस करण्याची क्षमता त्यात असते. या संशोधकांनी अंतराळातून प्रचंड गतीने मार्गक्रमण करणाऱ्या कणांचा वापर करून प्राण्यांवर प्रयोग करून बघितले. साधारणपणे, अशा प्रकारची प्रारणे अंतरिक्षात अंतराळवीरावर आदळू शकतात. तेव्हा, ही प्रारणे मेंदूमध्ये बीटा अमायलोईड नावाच्या प्रथिनाच्या निर्मितीला कारणीभूत ठरतात व या प्रथिनांची थर अल्झायमर या रोगाचा प्रादुर्भाव करतात.
कॅनेडियन स्पेस एजन्सीमधील एक अंतराळवीर क्रिस हॅडफिल्ड यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (स्पेस स्टेशन)  अंतराळातील वैश्विक प्रारणांची मोजमाप केले.  ज्या अतिऊर्जाधारी न्यूट्रॉन कणांच्या संपर्कात अंतराळवीर येतात, ती प्रारणे मुख्यत: जैविक हानीला कारणीभूत ठरतात. कारण ही न्यूट्रॉन प्रारणे स्पेस स्टेशनच्या आसपास वावरणाऱ्या एकूण वैश्विक प्रारणांच्या ३० टक्के असल्याचे आढळले आहे. क्ष-किरणे ही शिशासारख्या धातूच्या आवरणांनी अडविता येतात, पण न्यूट्रॉन प्रारणे धातूंच्या कवचांनादेखील दाद देत नाही व त्यामुळे सरळ मानवी शरीरातील मांसल भाग भेदत असतात. वंशाचे सातत्य राखणाऱ्या डी.एन.ए. रेणूंना ते कुरतडून टाकतात. डोळे अधू करून दृष्टिदोष निर्माण करतात. अस्थिमज्जांना भेदून कर्करोगांची शक्यता वाढवितात. या वैश्विक प्रारणांच्या सततच्या संपर्कामुळे माणसांमध्ये रक्तवाहिन्यातील आतल्या भागात मेदाचे थर जमा होणे, गाठींची वाढ होणे यासारख्या व्याधी निर्माण होऊ शकतात. विशेष म्हणजे ही प्रारणे एखाद्या खडकावर आपटली तर त्यांच्या केंद्रकांत बदल घडून येतो. त्यातून निर्माण होणारे प्रारणीय कण मूळ प्रारणांपेक्षा जास्त धोकादायक असू शकतात.
त्यासाठीच तर रोव्हर क्युरिऑसिटी यानातून मिळालेल्या दगड-मातीचा कसून अभ्यास करून, पृथ्वीवर मंगळाप्रमाणे कवच तयार केले जाणार आहे. त्यावर, या प्रारणांच्या परिणामांचा अभ्यास झाला की पुढची मोहीम आखली जाणार आहे. तसेच, आत्तापर्यंत अंतराळ विहार करून आलेल्या अंतराळवीरांच्या आरोग्याची माहिती गोळा करून त्यांच्या प्रकृतीतील चढउतार व विविध संशोधनातून निघणारे निष्कर्ष यांच्यातील साम्य व फारकत तपासली जात आहे.