गेल्या मंगळवारी आपण इस्त्रोच्या मार्स ऑरबायटर मिशनच्या  मंगळयानाला घेऊन पीएसएलव्ही सी २५ प्रक्षेपकाने केलेले यशस्वी उड्डाण बघितले असेल. तो एक नक्कीच रोमांचकारी क्षण होता. पण हे म्हणजे घरून परीक्षा केंद्रावर जाण्यासारखे होते. परीक्षेचा पहिला पेपर १ डिसेंबर रोजी आहे. जेव्हा सध्या पृथ्वीची परिक्रमा करत असलेल्या या यानाला मंगळाच्या दिशेने वळवण्यात येईल. तेव्हा याची चर्चा आपण करूच, पण आता उल्कावर्षांवाच्या निरीक्षणाची चर्चा करूया.
असे अनेकदा दिसून येते की काही हौशी आकाश निरीक्षक मंडळी उल्कावर्षांवांच्या निरीक्षणांना वाजवीपेक्षा जास्त सोपे करून लोकांना सांगतात. त्यात एक कुठेतरी जास्तीत जास्त लोकांना आकर्षति करणे उद्देश असतो. पण शेवटी फसगत लोकांची होते. थोडक्यात गाजराची पुंगी वाजली तर वाजली.
पण तुम्हाला वाटत असेल की शास्त्रीय निरीक्षणात आपलादेखील खारीचा वाटा असावा, तर त्यासाठी उल्कावर्षांवांची निरीक्षणे फारच उत्तम. एक तर आपल्याला खूप आधीपासूनच माहीत असतं की कुठल्या तारखेला कुठला उल्कावर्षांव होणार आहे. त्यामुळे आपल्याला वेळेचे आणि इतर नियोजन व्यवस्थित करता येते. बर यासाठी काही विशेष वेगळा खर्चही तुम्हाला करायचा नसतो. दोन काय फक्त एक नीट डोळा पुरेसा आहे आणि नीट शास्त्रीय पद्धतीने केलेल्या निरीक्षणांचा उपयोग ज्या धूमकेतूच्या धुराळ्यातल्या त्या उल्का आहेत त्या धूमकेतूबद्दल माहिती मिळवण्यास उपयोग होतो.
मागे सांगितल्याप्रमाणे आकाशात कुठेतरी एखादी उल्का आपल्याला दर ४ ते ५ मिनिटांनी दिसतेच, पण उल्कावर्षांवाच्या वेळी मात्र एकाच दिशेने आपल्याला मोठय़ा प्रमाणात उल्का येताना दिसतात. पण ‘मोठय़ा’ या शब्दाला मूल्य नाही तो सापेक्ष आहे. जर असं म्हटलं की तुम्हाला एका तासात ६० उल्का दिसतील, तर तुम्हाला वाटेल की वा काय छान, आपल्याला दर मिनिटाला एक उल्का दिसणार. पण एक मिनिट म्हणजे ६० सेकंद हा काही लहान सहान कालावधी नाही.  तुम्ही हा छोटा प्रयोग करून बघा. अंधारात बसा आणि शिवाय डोळ्याला पट्टी बांधा की तुम्हाला काहीच दिसणार नाही असे आणि त्या बरोबर आपल्या मित्राला किंवा मत्रिणीला सांगा की मला बरोबर एक मिनिटानी हाक मार. तुमची २०-२५ सेकंदात चलबिचल होऊ लागेल की अजून कसा एक मिनिट झाला नाही.
उल्कावर्षांवांची निरीक्षणे घेताना तुम्हाला सतत एकाच दिशेने बघायचे असते त्यामुळे देखील कंटाळा येऊ शकतो. या शिवाय रात्री      थंडी वाजते आणि मग या सर्वाच्या बरोबर आपल्याला (अगदी अनावर) झोप पण येते. मग खऱ्या अर्थाने उल्कावर्षांवांचे निरीक्षण घेता येत नाही किंवा तुम्ही घेतलेल्या निरीक्षणांचा उपयोग होत नाही.
हे सर्व तुम्हाला मी उल्कावर्षांवांच्या निरीक्षणांपासून परावृत्त करण्यास नव्हे तर तुम्हाला चांगल्या प्रकारे निरीक्षणे घेता यावीत आणि घेतलेली निरीक्षणे तुमच्या साठी समाधानकारक असावीत म्हणून सांगत आहे. जर तुमची निरीक्षणे नीट शास्त्रीय पद्धतीने घेतलेली असतील तर त्यांचा उपयोग होतो.
अर्थात इथे इतक्या कमी शब्दात उल्का निरीक्षणे कशी करायचे हे सांगता येणार नाही. एखादी जाणकार किंवा अनुभवी व्यक्तीबरोबर उल्कावर्षांवाची निरीक्षणे घेण्यास गेलात तर तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे शिकता येईल. पण जेव्हा भारतात कुठलाही गट अशी निरीक्षणे घेत नव्हता आणि कुणालाही अनुभव नव्हता तेव्हा आम्ही इंटरनॅशनल मिटियोर ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवरून त्यांनी दिलेल्या निरीक्षण पद्धतीचे आमच्या गटात काही महिने मोठय़ाने वाचन केले. न कळलेल्या बाबी आणि मनात येतील त्या प्रत्येक शंकेचे निरसन करून घेतले आणि हे तुम्ही पण करू शकता. या शिवाय आता तुम्हाला मार्गदर्शन करणारी बरीच मंडळीही भेटतील.पण हे करत असताना तुम्ही उल्कावर्षांवाचा आनंद आणि अनुभव घेऊच शकता.
उल्का निरीक्षणांच्या संदर्भात काही महत्त्वाच्या तयारी करायच्या गोष्ठी म्हणजे सर्व प्रथम निरीक्षणापूर्वी तुमची चांगली झोप झालेली असायला पाहिजे. कारण ही निरीक्षणे तुम्ही एकाच जागी बसून घेत असता. तसेच तुम्ही थंडी वाजू नये म्हणून गरम कपडे किंवा चादरही घेतलेली असते. पण अशात पेंग येणं अगदीच साहजिक आहे. तसेच जागे राहण्यासाठी आपण चहा किंवा कॉफी घेतो. इथे ते वर्ज आहे. त्या ऐवजी कोमट दूध आणि त्यात हवंतर थोडं कोको घातलेलं फार उपयोगी असतं.  
दरवर्षी सातत्याने एका पाठोपाठ अनेक उल्का दाखवणारा वर्षांव हा मिथुन तारका समूहातून येताना दिसतो. या वर्षी म्हणजे २०१३ साली याच्या उल्कांची तीव्रता भारतीय वेळेप्रमाणे १४ डिसेंबर रोजी दिवसा ११.१५ वा. सर्वात जास्त असेल. पण हा जवळ जवळ २४ तास चालणारा वर्षांव असल्यामुळे १३ ता. किंवा १४ ता. च्या रात्री यास बघण्याचा प्रयत्न अवश्य करावा.
जसे दिवसा आपल्याला तारे दिसत नाहीत किंवा चंद्रप्रकाशामुळे मंद तारे दिसत नाहीत तसेच प्रखर चंद्रप्रकाशात आपल्याला मंद उल्का दिसत नाहीत. या वर्षी पौर्णिमा १७ डिसेंबर रोजी आहे. त्यामुळे त्या आधी तीन-चार दिवस आकाशात बऱ्यापकी चंद्रप्रकाश असणार. तेव्हा १४ डिसेंबरच्या पहाटे (म्हणजे १३ च्या रात्री) चंद्रास्त झाल्यानंतर हा वर्षांव बघण्याची संधी मिळू शकते. जर तुम्ही थोडं शहराबाहेर जाऊ शकलात तर फारच उत्तम. तुम्हाला जर या वर्षी असे मिथून तारकासमूहातील उल्कावर्षांवाचे निरीक्षण करायचे असल्यास  http://skywatch.in/  या संकेतस्थळावर माहिती मिळेल. यावर अजून मराठीतून माहिती नाही, पण त्याचे काम चालू आहे. नुकतीच मुंबईत खगोलशास्त्रज्ञ आणि हौशी खगोलअभ्यासकांची एक परिषद झाली होती. त्यात अशा इतर प्रकारची शास्त्रीय निरीक्षणे घेण्यास हौशी खगोलअभ्यासकांना जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्याचे आणि शक्यतो हवी ती मदत करण्याची तयारी शास्त्रज्ञांनी आणि अनुभवी हौशी खगोलअभ्यासकांनी दाखवली.