गेल्या शतकातील सर्वात तेजस्वी असलेला  धूमकेतू इकेया-सेकी  हा १९६५ मध्ये नोव्हेंबर महिन्यात आला होता. त्याचा पिसारा कित्येक लाख कि.मी. पसरला होता.  अशाच प्रकारचा पाहुणा येत्या नोव्हेंबर महिन्यात सूर्याला भेट देणार आहे. त्याचे नाव आहे आयसॉन धूमकेतू
आयसॉन संस्थेने शोधल्यामुळे ते नाव  या धूमकेतूला  दिले गेले. पूर्वी माहीत नसलेला धूमकेतू जो शोधतो त्याचे नाव देण्याची प्रथा आहे. c म्हणजे कॉमेट २०१२ च्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात शोधल्यामुळे त्याचे तांत्रिक नाव C2012-S1 आहे.  ह्य शतकातील आयसॉन धूमकेतू सर्वात तेजस्वी असेल अशी शक्यता वर्तवली आहे. आयसॉन नोव्हेंबर महिन्याच्याच्या सुरुवातीपासून छोटय़ा दुर्बिणीतून दिसू लागेल.२० नोव्हेंबरपासून आकाशात तो नुसत्या डोळ्यांना दिसू शकेल. २८ नोव्हेंबर रोजी तो सूर्याच्या सर्वात जवळ असेल. त्याची प्रदक्षिणा सूर्याच्या अतिशय जवळून (सन ग्रेिझग) असल्यामुळे तो नष्टही होऊ शकतो. सूर्य िबबाला प्रदक्षिणा घातल्यावर जर तो जगला वाचला तर पुन्हा २ डिसेंबरनंतर दिसू लागेल.
नोव्हेंबर महिन्यात ह्या शतकातील आयसॉन नावाच्या सर्वात मोठय़ा धूमकेतूची सूर्यभेट ही सर्वाना पर्वणी ठरणार आहे! आयसॉन धूमकेतू पुढील दोन महिने पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्वेच्या आकाशात काही दिवस नुसत्या डोळ्यांना दिसणार आहे. धूमकेतूबद्दल जनसामान्यात विलक्षण कुतूहल व भीती आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याबद्दलची अपुरी माहिती व अज्ञान. त्या निमित्ताने आज ऑन आयसॉन मोहीम राबवली जावी अशी कल्पना पुढे आली. त्या नुसार ‘महाराष्ट्र कार्यशाळा’ कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती.
आयुका व खगोल क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांनी ह्या कार्यशाळेचे पुण्यात आयोजन केले. ऑक्टोबर महिन्याच्या १ व २ तारखेला महाराष्ट्र कार्यशाळा कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळाली. ह्या कार्यशाळेत राज्यातील जवळजवळ सर्व जिल्ह्यातून ८० पेक्षा अधिक जणांनी भाग घेतला. आयुकाचे संचालक प्रा. अजित केंभावी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. धूमकेतूबद्दल माहिती असण्यासाठी प्रथम आपली सूर्यमाला कशी तयार झाली, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
सुमारे ५०० कोटी वर्षांपूर्वी झालेल्या महास्फोटानंतर बरीच ऊर्जा व अतिशय तप्त वायू बाहेर पडले. कालांतराने ते थंड होत गेले. त्यानंतर वैश्विक वारे व गुरुत्वाकर्षण ह्यांनी पुढील प्रक्रियेवर ताबा घेतला. स्फोटामुळे मोठमोठे तप्त वायूंचे महाकाय ढग अंतराळात विखुरले गेले. हळूहळू प्रत्येक ढगांमध्ये गुरुत्वाकर्षणामुळे बरेचसे वस्तुमान मध्यभागी एकवटत गेले. जसजसे आणखी वस्तुमान एकवटत गेले, तसतसे घर्षण व गुरुत्वाकर्षणाचे बलही वाढत गेले. परिणामत: गाभ्याच्या तापमानात प्रचंड वाढ  झाली. एक वेळ अशी आली, की तपमान लाखो अंशांच्या पुढे गेल्यामुळे आण्विक प्रक्रिया सुरू झाली. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे वस्तुमान गाभ्याकडे ओढले जात होते तर आण्विक शक्ती वस्तुमान बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत होते. एक वेळ अशी आली, की गुरुत्वाकर्षणाचे बल व आण्विक बल समान झाले. त्यातूनच सुमारे ४६० कोटी वर्षांपूर्वी अशाच एका  स्थिर ताऱ्याची म्हणजेच आपल्या सूर्याची निर्मिती झाली.  
महाकाय ढगातील उरलेले वस्तुमान व वायू ह्यांची सपाट चकती सूर्याभोवती फिरू लागली. स्थिरविद्युत बलामुळे छोटेछोटे कण एकमेकांकडे खेचले जाऊ लागले व जसजसे विश्वाचे तापमान कमी होत गेले तसे त्यांच्यात प्रथम धूलिकण, मग मोठे खडक अशी स्थित्यंतरे झाली, पुढे गुरुत्वाकर्षण वाढून आंतरग्रहांची निर्मिती झाली. बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ हे खडकाळ ग्रह आंतरग्रह म्हणून ओळखले जाऊ लागले. सूर्य व पृथ्वी ह्यातील अंतर एकक किंवा १ अँगस्ट्रॉम युनिट आहे. मंगळाच्या कक्षेबाहेरील म्हणजे ४ अँगस्ट्रॉम युनिट अंतरावरील परिस्थिती मात्र अनेपक्षितपणे बदलणारी व अस्थिर होती. त्या नंतर बरीच उत्क्रांती झाली. ग्रहांभोवती फिरणाऱ्या वायू व धूलिकणांचे चंद्र झाले व ते त्या त्या ग्रह भोवती फिरू लागले. सूर्यापासून २ अँगस्ट्रॉम युनिट  ते ४ अँगस्ट्रॉम युनिट  पट्टा आहे तिथे अशनी पट्टा तयार झाला. ह्या अशनी च्या आतील चार आंतरग्रह ग्रह व बाहेरील चार ग्रह बाह्यग्रह अशी ग्रहमाला तयार झाली. संघननच्या (कंडेन्सेशन) अभावामुळे बाह्यग्रह म्हणजे गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून हे ग्रह वायूंचे बनले.  
नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे महाकाय ढगातील उरलेले, असे काही वायू व धूलिकण जे ग्रह बनू शकले नाहीत, त्यांचा एक खूप मोठी व्याप्ती असलेला अशनींचा ‘कायपर’ (ङ४्रस्र्ी१ इी’३) नावाचा पट्टा तयार झाला.   
कायपरच्या पलीकडे तरीही काही वायू व धूलिकण शिल्लकच राहिले. सूर्यापासून अतिशय दूर असल्यामुळे व सूर्याची उष्णता पोहोचू न शकल्यामुळे तापमान ही कमी होत गेले. तेथे एका बर्फाळ पट्टय़ाची निर्मिती झाली, ज्याला ‘उर्ट’चा मेघ असे संबोधले जाऊ लागले. तो सूर्यापासून जवळजवळ ५०००० अँगस्ट्रॉम युनिट  किंवा १ प्रकाश वर्ष दूर असल्यामुळे त्याचा अभ्यास करणेही अतिशय क्लिष्ट आहे. आजपर्यंत कोणत्याही प्रकारची जरी थेट निरीक्षणे झाली नसली, तरी खगोल शास्त्रज्ञ असे मानतात, की उर्टचा मेघ हेच धूमकेतूंचे निर्मिती स्थान आहे व तेथे लाखांपेक्षा जास्त धूमकेतू वसती करून आहेत. इतक्या लांबवर असलेल्या ह्या बाह्य सीमेवर सूर्याचे गुरुत्वाकर्षण अगदीच नगण्य आहे. त्यावर आंतर अवकाशीय वाऱ्याचा (इंटरस्टेलर विंड) तसेच इतर जवळच्या ताऱ्यांच्या स्थित्यंतराच्या परिणामामुळे कधी कधी ह्या पट्टय़ातील काही बर्फाळ खडक सूर्याकडे ढकलले जातात व ते सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्याकडे येतात. अशाच कधीतरी अचानक आलेल्या पाहुण्यांना आपण धूमकेतू म्हणतो.
धूमकेतू मुख्यत्वे तीन भागांचा बनलेला असतो १. अंतर्गाभा (न्यूक्लियस)  २. बाह्य गाभा (कोमा) ३. शेपटी धूमकेतूचा अंतर्गाभा : हा खडकाळ मूलद्रव्यापासून बनलेला असतो व त्याचा व्यास साधारणत: ६० कि.मी. पेक्षा लहान असतो. गाभ्यात मुख्यत्वे सेंद्रिय संयुगे, जीवसृष्टीला पूरक अमिनो आम्ल, मिथेन तसेच अतिशय क्लिष्ट संयुगे असतात.
कोमा : हा पाणी व धूलिकणांचा बनलेला असतो. त्याची व्याप्ती खूपच मोठी असू शकते.
शेपटी : सर्वाना आकर्षति करणारा भाग म्हणजे धूमकेतूची शेपटी. ही शेपटी बाष्प, वायू व धूलिकणांची असते. खरे तर जेव्हा धूमकेतू सूर्यापासून ५ अँगस्ट्रॉम युनिट अंतरापेक्षा दूर असतो, तेव्हा त्याची शेपटी हा त्याच्या कोम्याचाच एक भाग असतो. पण तो जसजसा सूर्याजवळ येतो तसतसा त्याचा पृष्ठभाग उष्णतेने प्रसारण पावतो व त्याचे आयनीकरण होण्यास सुरुवात होते. सौर वाऱ्यामुळे त्यातील वायू व धूलिकण विरुद्ध दिशेला फेकले जातात व आकाशात शेपटीच्या रूपात अतिशय विलोभनीय दृश्य दिसते. धूमकेतू जसजसा सूर्याच्या अधिक जवळ येतो, तसतसा त्याचा शेपटाचा पिसारा अधिकाधिक फुलू लागतो. त्याच्या शेपटाची लांबी कित्येक लाख किलोमीटर असू शकते. पण जर धूमकेतू सूर्याच्या जास्तच जवळून गेला, तर काही वेळा चुंबकीय लहरीमुळे शेपटी तुटल्याच्या घटना घडू शकतात. २००७ मध्ये धूमकेतू एन्के बाबतीत असेच घडले होते. बऱ्याचदा सौर वाऱ्याचा दाब धूमकेतूच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा जास्त असल्यामुळे धूलिकण अवकाशात फेकले जातात व असा पट्टा सूर्याभोवती एका ठरावीक कक्षेत फिरू लागतो. पृथ्वी जेव्हा अशा पट्टय़ातून जाते, तेव्हा ते धूलिकण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे अत्यंत  खेचले जातात. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश झाल्यावर वातावरणाशी झालेल्या घर्षणामुळे आपल्याला आकाशात देदीप्यमान उल्का दिसतात. ज्याला ‘तारा’ तुटला असे चुकीचे संबोधले जाते. काही वेळा धूलिकणांची संख्या खूपच जास्त असते, तेव्हा एक प्रकारचा वर्षांव होतो, त्याला उल्का वर्षांव म्हणतात. असाच एक ‘जेमिनिड्स’ नावाचा प्रसिद्ध उल्का वर्षांव मिथुन राशीतून दरवर्षी १३-१४ डिसेंबरला होतो.
धूमकेतूंच्या परिभ्रमणाच्या तीन कक्षा आहेत. १. दीर्घकालीन २. प्रदीर्घकालीन ३. परत न येणारे.दीर्घकालीन धूमकेतूंच्या परिभ्रमणाचा काळ दोनशे वर्षांपेक्षा कमी असतो. उदा. ७६ वर्षांनी येणारा हॅले चा प्रसिद्ध धूमकेतू.
दीर्घकालीन धूमकेतूंच्या परिभ्रमणाचा काळ २०० वर्षांपेक्षा जास्त असतो तर काहींचा १०००० ते १०००००० वर्षांपेक्षा जास्त असतो इतका ही असू शकतो. उदा. ९२६०० वर्षांनी येणारा मॅकनॉट धूमकेतू.  गेल्या काही शतकांच्या धूमकेतूंच्या परिभ्रमणाच्या अभ्यासावरून असे लक्षात आले की काही धूमकेतू परत कधीच येऊ शकत नाही. काहींना सूर्याने गिळंकृत केल्याने नाश होतो. शुमाकर-लेव्ही नावाच्या धूमकेतूला गुरूने आपल्या गुरुत्वाकर्षणाने स्वत: कडे खेचल्यामुळे शुमाकर-लेव्हीचा नाश झाला.  धूमकेतू आयसॉन
Comet ISON (International Space Observation Network) or C2012-S1 :
धूमकेतूंच्या तेजस्वीतेचे अनुमान करणे अतिशय अवघड असते. सुरुवातीच्या निरीक्षणांवरून असे वाटले होते, की तो चंद्राइतका तेजस्वी असेल, परंतु आता आलेल्या माहितीनुसार, तो शुक्र ग्रहाइतकाच तेजस्वी असेल असा अंदाज आहे. पौर्णिमेच्या चंद्राची तेजस्विता – १५ असते. त्या तुलनेत धूमकेतू इकेया-सेकी ह्या धूमकेतूची तेजस्विता -१० होती, तर आयसॉनची तेजस्विता शुक्रा  इतकी -४ च्या आसपास असेल. तर चला वाट पाहू या आयसॉनची