गेल्या अंकात आपण धूमकेतू आयसनमुळे उल्का वर्षांव दिसू शकेल का, याची जाता जाता नोंद केली होती. उल्का म्हणजे आकाशात लख्ख चमकून गेलेली एक प्रकाशशलाका. जणू काही एखादा ताराच तुटला असा भास करून देणारी पण प्रत्यक्षात तारा कधीच तुटत नाही. ते आपल्यापासून खूप दूर आणि खूप मोठे असतात.
जेव्हा आपल्या सूर्यमालेत इकडे तिकडे फिरणारा एखादा धूलिकण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो, तेव्हा त्या कणाला पृथ्वीच्या वातावरणातील घटकांच्या गतिरोधाचा प्रतिकार करावा लागतो. या घर्षणाने जी ऊर्जा निर्माण होते ती इतकी जास्त असते की तो कण अक्षरश: पेट घेतो. यालाच आपण उल्का म्हणून ओळखतो. सहसा असा हा कण सुमारे वाटाण्याच्या आकाराचा असतो जो वातावरणात संपूर्ण जळून जातो.
साधारणपणे जेव्हा एखादा कण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो, तेव्हा तो भूतलापासून सुमारे १४० कि.मी. उंचीवर प्रज्वलित होतो आणि भूतलापासून सुमारे ५० कि.मी. उंचीवर असतानाच तो संपूर्ण जळून जातो. एका सर्वसाधारण अशा कणाची वातावरणात गती दर सेकंदाला १२ ते ७२ किलोमीटर असू शकते.
जर कण मोठय़ा आकाराचा असेल, एका लहान दगडाच्या आकाराचा, तर तो अत्यंत प्रखर होतो – तो अग्निगोल असतो. कधी कधी अशा या मोठय़ा दगडाचा स्फोटही होतो आणि एक त्याचे एकापेक्षा जास्त तुकडेपण दिसू शकतात. जर असा दगड त्याहीपेक्षा मोठा असेल तर त्याचा काही संपूर्ण न जळलेला भाग जमिनीपर्यंत ही पोचू शकतो. अशा दगडांना आपण उल्कापाषाण म्हणून ओळखतो. तर अवकाशात असताना त्यांना आपण अशनी म्हणतो.
याच वर्षी १५ फेब्रुवारी रोजी एका अशनीने पृथ्वीच्या वातावरणात प्रवास केला होता आणि मग एका मोठय़ा विस्फोटात याचे तुकडे विखुरले गेले होते. या विस्फोटात सुमारे ३०० किलो टन ऊर्जा उत्सर्जित झाली होती. विस्फोटाचा आवाज इतका जास्त होता की काही घरांच्या खिडक्यातर या आवाजामुळेच तडकल्या होत्या. या अशनीचा आकार सुमारे १५ ते १७ मीटर तर वस्तुमान १०,००० टन आखण्यात आले होते आणि नुकताच या उल्कापाषाणचा मुख्य भाग सापडला होता.
अशा या अशनींची  निर्मिती सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळी झाली असावी. त्या मुळे यांच्या अभ्यास आपल्याला सूर्यमालेच्या निर्मितीचे गूढ समजण्यास मदतगार असतो. असे हे उल्कापाषाण आपल्याला तीन प्रकारात मिळतात. एक ज्यात दगड (म्हणजे सिलिकेट) याचे प्रमाण जास्त असते. दुसऱ्या प्रकारात उल्कांमध्ये लोहचे प्रमाण जास्त असते तर तिसऱ्या प्रकारत या दोन्हींचे प्रमाण असते. असे म्हणतात, की १६२० असाच एक उल्कापाषणाचा तुकडा जालंधरमध्ये सापडला होता. त्याचे वजन १.६ किलो होतं. जहाँगीरने हा दगड एका कारागिराला आयुध बनवण्यासाठी दिला होता. त्या कारागिराच्या असं लक्षात आले, की त्यातील लोहाची घनता आयुध बनवण्यासाठी कमी होती. मग त्याने त्यात एक तृतीयांश पृथ्वीवरचे लोह मिसळले आणि त्याने त्याच्या दोन तलवारी, एक चाकू आणि एक खंजीर बनवला होता.
कुठल्याही निरभ्र रात्री आपल्याला आकाशात दर ४ ते ५ मिनिटांनी एखादी उल्का तरी दिसतेच. पण त्याची दिशा निश्चितनसते.  पण वर्षांतून काही दिवस असेही असतात, की ज्या दिवसात आपल्याला एकच दिशेने खूप उल्का येताना दिसतात. अशा वेळी यांना आपण उल्का वर्षांव म्हणतो.
उत्तर अमेरिकेच्या पूर्वी भागातील लोक १३ नोव्हेंबर १८३३ रोजी एका अभूतपूर्व घटनेचे साक्षीदार ठरले होते. त्या दिवशी पहाट होण्यापूर्वी आकाश अनेक उल्कांनी उजळून निघाले होते. तेव्हा डेनिसन ऑल्मस्टेड नावाच्या व्यक्तीने या घटनेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याला असे लक्षात आले, की त्या वेळी रात्री एका तासातच एक लाख पन्नास हजार उल्का दिसल्या होत्या आणि या उल्का सिंह तारका समूहातून येताना दिसत होत्या. अशाच प्रकारची निरीक्षणे इतर भागातून पण घेण्यात आली होती. अनेक लोकांची निरीक्षणे आणि अनुभवावरून ऑल्मस्टेडने अंदाज बांधला , की या उल्का एका ढगातून येत आहेत. पण त्याला या ढगाचे नेमके स्वरूप सांगता आले नव्हते. नंतर अशाच प्रकारचा मोठा उल्का वर्षांव दर ३३ वर्षांनी सुमारे १३ नोव्हेंबरच्या सुमारास दिसतो याची नोंद होऊ लागली. त्याच बरोबर हेही लक्षात आले की असा उल्कावर्षांव जेव्हा ‘टेम्पल टटल’ नावाचा धूमकेतू सूर्याजवळून जातो, त्या सुमारास होतो.
यावरून धूमकेतूंचा आणि उल्का वर्षांवांचा काही तरी संबंध आहे हेही जाणवू लागले.  मागे सांगितल्याप्रमाणे जर एखादा धूमकेतू सूर्याजवळून जातो, तेव्हा त्याच्या शेपटीतले अवशेष एका धुराळ्यासारखा धूमकेतूच्या पुढे किंवा मागून सूर्याची परिक्रमा करतात. या कणांची कक्षा अगदीच त्या धूमकेतूसारखी नसते. तर ते अवषेश एका मोठय़ा भागातून प्रवास करत असतात. आता जर समजा या धूमकेतूच्या कक्षेचा एक भाग पृथ्वीच्या कक्षेला छेदत असला, तर जेव्हा पृथ्वी या छेद िबदूच्या जवळून जाते, तेव्हा आपल्याला एकच िबदूवरून या उल्का येताना दिसतात. ज्या तारका समूहात हा िबदू असतो त्या उल्का वर्षांवाला त्या तारका समूहाच्या नावाने ओळखतात. नोव्हेंबर महिन्यातील उल्का वर्षांवाला सिंह तारका समूहातील उल्का वर्षांव म्हणून ओळखण्यात येतो. आज आपल्याला अनेक उल्का वर्षांवाची माहिती आहेत, त्यातील उल्का वर्षांव असे आहेत, की आपल्याला दर मिनिटाला एक उल्का तरी आकाशातून पृथ्वीकडे झेपावत असते अनेक हौशी आकाश निरीक्षक अशा उल्का वर्षांवाचा अभ्यास करतात. म्हणजे ते दर तासाला किती उल्का दिसल्या, त्यांची प्रखरता किती होती याची नोंद ठेवतात. अशा नोंदींचा उपयोग त्या धूमकेतूबद्दल आणखी माहिती मिळण्यास उपयोगी ठरते. पुढच्या अंकात आपण यांच्या निरीक्षणांबद्दल चर्चा करू या.