इजिप्तमधील पिरॅमिड हे एक आश्चर्य मानले जाते. त्यांची निर्मिती आतमध्ये दगडविटांचे तुकडे व बाजूने विटा रचून करण्यात आली असावी, असा नवा सिद्धांत ब्रिटिश अभियंता पीटर जेम्स यांनी मांडला आहे. विशेष म्हणजे त्यांनी वीस वर्षे पिरॅमिड्सचा अभ्यास केला आहे. जेम्स हे साऊथ वेल्समधील सिन्टेक इंटरनॅशनल येथे अभियंता म्हणून काम करतात. त्यांनी पिरॅमिडच्या निर्मितीविषयी आतापर्यंत स्थापत्य वैज्ञानिकांनी मांडलेल्या सर्व सिद्धांतांना धक्का दिला आहे. सध्या असे मानले जाते की, पिरॅमिड हे उतरणीचे मोठे तुकडे वापरून तयार करण्यात आले असावेत. जेम्स यांच्या मते असे उतरणीचे तुकडे एक चतुर्थाश मीटर इतक्या लांबीचे बनवणे शक्य नाही त्यामुळे त्यांच्या मदतीने एक योग्य कोन तयार करून विटा इतक्या उंच नेल्या असण्याची शक्यता नाही. मीरर ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, पिरॅमिडनिर्मितीच्या सध्याच्या सिद्धांतानुसार दगडाचे २० लाख ठोकळे रचण्यासाठी एवढय़ा मोठय़ा उतरणीवरून (रॅम्प) तीन मिनिटांत वर नेणे हे अशक्य आहे, कारण इतक्या वेगाने ते नेले नसते तर असे पिरॅमिड तेवढय़ा काळात बनलेच नसते. जर तसे असते तर हे रॅम्पस आपल्याला दिसले असते, पण ते अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. जेम्स यांनी स्टेप पिरॅमिड व रेड पिरॅमिड या ४६०० वर्षे जुन्या दफन कक्षांची मजबुती वाढवण्यासाठी मदत केली होती. इजिप्तमधील स्टेप पिरॅमिडमध्ये त्यांना असे दिसून आले होते की, दगड हे हजारो वर्षे जुन्या पामच्या झाडांच्या खोडांनी धरून ठेवलेले आहेत, पण त्यांचे वजन काही टनांच्या घरात आहे. जेम्स यांच्या मते पिरॅमिड हे लहान, सहज हाताळता येण्यासारख्या तुकडय़ांच्या जोडणीतून तयार केले असावेत व बाहेरून आत अशी त्यांची निर्मिती झाली नाही तर आतून बाहेर त्यांची बांधणी करण्यात आली असे त्यांनी सांगितले.