सुनील वाखरकर यांचा प्रश्न आहे, की मंगळावर गेलेल्या क्युरिऑसिटी यानाशी संपर्क कसा साधण्यात येतो?
क्युरिऑसिटीशीच नाही, तर ज्यांच्याशी आवाजाच्या माध्यमातून संपर्क साधता येत नाही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे विद्युत चुंबकीय लहरींच्या माध्यमातून संपर्क साधणे.
विद्युत चुंबकीय लहरी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकतात. या लहरींचे दोन भाग असतात, विद्युत आणि चुंबक; जे एकमेकांशी ९० अंशाच्या कोनात दोलने करतात. त्यांचा गॅमा, क्ष, अतिनील, प्रकाश, अवरक्त, मायक्रो आणि रेडियो लहरी असा वर्णपट आहे.  आपल्याला दिसणाऱ्या  प्रकाशाचा वर्णपट ४०० ते ७०० नॅनोमीटर तरंगलांबीचा असतो. (१ नॅनोमीटर म्हणजे दहाचा उणे नववा घात मीटर  – किंवा १ भागिले १० पुढे ८ शून्य इतके मीटर). या लहरीची ओळख  त्याच्या वारंवारितेवरूनही (फ्रिक्वेंसी) करण्यात येते.
या सर्व प्रकारच्या लहरींचे विज्ञान आणि गणित एकच, फक्त  त्यांच्या निरीक्षणांच्या किंवा वापरण्याच्या पद्धतीमुळे त्यांना वेगवेगळी नावे आहेत. म्हणजे अगदी प्रकाशलहरीं सारख्या या सर्व लहरी एका सरळ रेषेत प्रवास करतात आणि  काही ठराविक परिस्थितीत त्या परावíतत होऊ शकतात किंवा विखुरल्या जाऊ शकतात.
या लहरींपकी काही लहरी पृथ्वीच्या वातावरणात शोषल्या जातात किंवा त्या परावíतत होतात.   यातील गॅमा, क्ष किरण आणि अतिनील लहरी आपल्या वातावरणात शोषल्या जातात. वातावरणातले काही घटक या लहरींना भूतलापर्यंत येऊ देत नाहीत. यात मुख्य आहेत वातावरणातील बाष्प, कार्बन डाय ऑक्साइड आणि ओझोन.  रेडिओ आणि प्रकाश लहरी मात्र वातावरणातून सहज प्रवास करून आपल्यापर्यंत पोचतात. प्रकाश आणि अवरक्त (इनफ्रारेड) यांच्यामधल्या , मायक्रो आणि रेडिओ लहरींमधल्या काही लहरी भूतलापर्यंत पोचू शकतात. काही रेडिओ लहरी वातावरणात परावíतत सुद्धा होतात आणि त्यांच्या या वातावरणात परावíतत होण्याच्या गुणधर्मामुळे या लहरींच्या माध्यामातून आपण सातासमुद्रापलीकडे संपर्क साधू शकतो. या शॉर्ट वेव्हमुळे (लघुलहरींमुळे) एकेकाळी बी.बी.सी. आणि व्हॉईस ऑफ अमेरिकाचे कार्यक्रम भारतात खूप ऐकले जात होते.  पण त्यांना दूपर्यंत पाठवण्यास जास्त शक्तिशाली रेडिओ स्टेशनची गरज पडते.
पण मायक्रो लहरींची (सूक्ष्मलहरी) गोष्टच वेगळी आहे. काही मायक्रो लहरी ढगातूनही आरपार जाऊ शकतात आणि संदेश पाठवण्यासाठी किंवा घेण्यासाठी लागणाऱ्या अँटेनांचा आकार खूप लहान असू शकतो आणि विशिष्ट दिशेने जास्तीत जास्त तीव्र संदेश पाठवता येतो.  त्यामुळे या  लहरींच्या माध्यमातून अंतराळातील कृत्रिम उपग्रह आणि यानांशी संपर्क करण्यात येतो. पण जर सर्वानीच या लहरींचा उपयोग करण्याचे ठरवले तर गोंगाट वाढेल.  कल्पना करा, की जसे आपल्या रेडिओ (मध्यम लहरी) किंवा एफ एम च्या वेगवेगळ्या चॅनेल ऐवजी एकाच लहरीत सर्वानी कार्यक्रमाचे प्रसारण केले तर कुणाला काहीच नीट कळणार नाही आणि म्हणून त्यांना वेगवेगळ्या लहरी दिलेल्या असतात. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठल्या मोहिमेसाठी कुठल्या तरंगलांबीचा उपयोग करायचा हे ठरवण्यात येतं.
वर सांगितलं होतं, की या लहरी सरळ रेषेतच प्रवास करतात. जेव्हा एखादे यान संदेश प्रसारित करणाऱ्या अँटेनाच्या दिशेत नसेल तर त्याला तो संदेश घेता येणार नाही .
हे सर्व लक्षात घेता नासाने एक डीप स्पेस नेटवर्क तयार केलं आहे. यात तीन ठिकाणे यानाशी संपर्क साधण्याकरता अँटेना स्टेशन बसवले आहेत. ही तीन स्टेशन आहेत अ‍ॅरिझोना वाळवंट, गोल्डस्टोन येथे. दुसरं स्पेनमध्ये माद्रिद आणि तिसरं ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा शहराजवळ. या तिन्ही स्टेशनमधील रेखांशात १२० अंशाचा फरक आहे. त्यामुळे कुठले तरी एक स्टेशन नेहमीच यानाच्या दिशेने असते.
पण मंगळावरील यानांशी संपर्क साधण्यासाठी इतकी योजना पुरेशी नाही.  कारण मंगळही स्वत भोवती फिरत आहे. तर, क्युरिऑसिटीचा पृथ्वीशी संपर्क साधण्याकरता अनेक सोयी केल्या आहेत.  एकतर सरळ क्युरिओसिटीशी संपर्क त्यावरील पृथ्वीच्या दिशेने बघणाऱ्या अँटेनाच्या माध्यमातून साधता येतो. दुसरं म्हणजे, मार्स रिकनसान्स आणि ओडिसी या ऑर्बायटर यांच्या माध्यमातून संपर्क साधण्यात येतो.  मंगळावरून पाठवण्यात येणारा डेटा या ऑर्बायटरच्या माध्यमातून पाठवण्यात येतो, कारण त्यांचे अँटेना मोठ्या आकारांचे आणि जास्त ऊर्जा पाठवणारे आहेत. पण हे दोन्ही पृथ्वीशी दर दिवशी फक्त सुमारे ८ मिनिटेच संपर्क करू शकतात. जेव्हा क्युरिऑसिटी मंगळावर उतरत होतं तेव्हा युरोपियन स्पेस एजन्सीच्या ‘मार्स एक्सप्रेस’ चा उपयोग करण्यात आला होता.
इतकं असूनही मंगळावरील यानांशी संपर्क साधण्याच्या प्रक्रियेत एक मुख्य अडथळा म्हणजे या दोन ग्रहांमधील अंतर. विद्युत चुंबकीय लहरींना हे अंतर कापायला सरासरी १४ मिनिटे आणि ६ सेकंद लागतात, त्या मुळे मंगळावरील यानांना काही निर्णय स्वतचे स्वत घेण्याकरता सक्षम केलेल असतं.
अर्थात मायक्रो लहरींचा (सूक्ष्मलहरी) उपयोग फक्त अंतराळात संदेश पाठवण्यासाठीच होत नाही, तर पृथ्वीवर अनेक ठिकाणी त्यांचा उपयोग होतो.  जेव्हा दूरध्वनी नवीन होते तेव्हा भारतातील सातासमुद्रापलीकडे म्हणजे प्रामुख्याने इंग्लंड आणि अमेरिकेशी संपर्क या लहरींद्वारे होत होता. पुण्याच्या सुमारे ८० किलोमीटर उत्तरेला गिरवली पर्वतावर असा अँटेना टॉवर (मनोरा) होता आणि भारतातील सर्व दूरध्वनी जोडणी इथूनच होत असे. हा टॉवर अजूनही आहे पण त्याचा वापर केव्हाच बंद झाला आहे. आज या पर्वतावर भारताची एक अत्यंत आधुनिक अशी वेधशाळा आहे.