ओबामा आणि रॉजर विकर यांना पाठविलेल्या पत्रातील प्राणघातक रिसिनमुळे ते श्वासातून फुफ्फुसात जाण्याची शक्यता वर्तविली जाते. हाताला काही जखम असेल तर त्या जखमेतूनसुद्धा रिसिन सरळ रक्तात मिसळू शकते आणि विषबाधा होऊ शकते. रिसिन ही रंगहीन पावडर असून ती पाण्यात विरघळते. म्हणून अशी विषारी पावडर हात स्वच्छ धुतले तरी निघून जाते. एखाद्या कर्मचाऱ्याने ते पाकिट फोडले आणि रिसिन त्याच्या श्वासावाटे फुफ्फुसात गेल्यास रोग्यात विविध लक्षणे दिसतात.
बोस्टन शहरात मॅरेथॉनच्या वेळी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर प्राणघातक रिसिन द्रव्याचा वापर करून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि सिनेटर रॉजर विकर यांना विषारी पत्रे पाठविल्याची धक्कादायक घटना घडली. ही पत्रे मेल हॅडलिंग सुविधेतच अडकल्याने ती वेगळी करण्यात आली. या पाकिटाच्या प्राथमिक प्रयोगशाळा तपासणीत त्यात प्राणघातक रिसिन असल्याचे सिद्ध झाले. या पूर्वी २००४ साली अमेरिकेतील सिनेटच्या कार्यालयात पांढरी पूड मिळाली होती. ती तपासणीत रिसिन असल्याचे उघड झाले होते. त्यावेळी सुदैवाने जीवितहानी झाली नाही. २००३ मध्ये लंडनमधील बुडग्रीन भागात रिसिन निर्मितीचा छोटा कारखाना पोलिसांना सापडला होता. त्यावेळी इंग्लंडसह साऱ्या जगाला धक्का बसला. अशा दहशतवाद्याच्या छुप्या हमल्याची शक्यता ओळखून त्या विरुद्ध करावयाच्या उपायांची तयारी अमेरिका आणि इंग्लंडसारख्या प्रगत देशात आहे.
एरंडीच्या बियांतील तेल काढल्यानंतर चोथ्यात रिसिन हे विषद्रव्य आढळते. ते विष प्रथिन (टॉक्स अल्बुमिन) असून निसर्गत:च ते बियांच्या टरफलात असते. विष विज्ञानात रिसिनचे वर्गीकरण क्षोभकारक विष (इरिटंट) म्हणून केले आहे. रिसिन हे अमिनो आम्लाच्या दोन साखळ्यांनी
(अ आणि ब) मिळून बनलेले प्रथिन आहे. यातील अ साखळीची विषक्तता ब साखळीच्या अनुपस्थित नगण्य असते.
मानवी शरीरातील रिसिनमुळे होणारी विषबाधा इन्डो आणि तुसुरीगी या शास्त्रज्ञांनी अभ्यासली आहे. रिसिनची अ साखळी मानवी रक्तातील ग्लायकोसाईडसी बंध निर्माण करून रिबोझोमला जखडून ठेवते. तेव्हा ब साखळी रिबोझोमला पूर्णत: निष्क्रिय करून प्रथिन निर्मितीचे कामच थांबवते. अशा प्रकारच्या विषबाधेत रिसिन इंजेक्शनद्वारे शिरेत सोडल्यास रक्ताबरोबर ते सर्व शरीरभर पोहोचू शकते. अशा विषबाधेत रिसिनची मृत्यूकारी मात्रा (फटल डोस) फारच कमी असते. १९७८ साली बल्गेरियाचा बंडखोर पत्रकार जॉर्जी मार्कोव्ह याची लंडनमध्ये हत्या झाली होती. मार्कोव्ह बससाठी उभा होता त्यावेळी त्याच्या उजव्या मांडीवर काही तरी टोचले गेले. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा एका माणसाने छत्री पाडली होती. त्यानंतर काही तासातच मार्कोव्हला बरे वाटेनासे झाले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात भरती केले. त्याचा रक्तदाब खाली आला होता. तसेच त्याच्या रक्तातील श्वेतपेशींची संख्या खूप वाढली होती. तिसऱ्या दिवशी तो मरण पावला. त्याचा तपास ब्रिटिश मिनीस्टरी ऑफ डिफेन्सच्या विष विभागाकडे सोपविण्यात आला. त्यांना मार्कोव्हच्या शवविच्छेदनात एक गुटिका (पिलेट) मिळाली. त्यातूनच त्याच्या शरीरात रिसिन पोचविले होते. त्याच्या शवविच्छेदनातील जैविक नमुन्यात कोणतेच विष मिळाले नाही. एकंदर त्याला झालेल्या विषबाधेच्या लक्षणावरून त्याला रिसिन दिले गेले असावे असा तर्क डॉ. गॉल यांनी काढला. त्यापूर्वी डॉ. गॉल यांनी प्रयोगशाळेत प्राण्यावर रिसिनच्या विषप्रयोगाच्या नोंदी घेतल्या होत्या. त्यांनी नोंद केलेली प्राण्यातील लक्षणे मार्कोव्हच्या लक्षणाशी जुळत होती. मार्कोव्हवर केलेली विषप्रयोगाची पद्धत अनोखी होती. अशा प्रकारात अल्पमात्रेतील (२००-४०० मायक्रोग्राम) रिसिन मृत्यू ओढावते. समजा रिसिनचा शरीरात प्रवेश मुखावाटे झाला तर त्याची मृत्यूकारी मात्रेबरोबर मृत्यूकाल (फटल पिरीयड) वाढतो. एखाद्या विषाचा मुखावटे प्रवेश म्हणजे तेथील जिभेसारखे रक्षक त्याचा प्रवेश नाकारतात. तरीही ते अन्नावाटे नकळत जठरात गेले तर तेथे उलटीवाटे बाहेर टाकले जाते. अमेरिकेतील शास्त्रज्ञ हेन्सले आणि कार्लसन यांच्या लेखात २००५ साली अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या नियतकालिकातील एक संदर्भ दिला आहे. त्यात अन्नपाण्यातून रिसिनची विषबाधा झाल्यास रोग्यात प्रथम मळमळ, उलटी, पोटात कळा, अतिसार अशी लक्षणे नमूद केली आहेत. डॉ. पारिख यांच्या  मेडिकल ज्युरिसप्रूडन्स आणि टॉक्सीकॉलॉजी या पुस्तकात रिसिनची सरासरी घातक मात्रा (लेथल डोस) ६ मि.ग्रॅ. प्रति कि.ग्रॅ. (सुमारे दहा एरंडीच्या बिया) आणि मारक काल अनिश्चित असल्याचे नमूद केले आहे.
ओबामा आणि रॉजर विकर यांना पाठविलेल्या पत्रातील प्राणघातक रिसिनमुळे ते श्वासातून फुफ्फुसात जाण्याची शक्यता वर्तविली जाते. हाताला काही जखम असेल तर त्या जखमेतूनसुद्धा रिसिन सरळ रक्तात मिसळू शकते आणि विषबाधा होऊ शकते. रिसिन ही रंगहीन पावडर असून ती पाण्यात विरघळते. म्हणून अशी विषारी पावडर हात स्वच्छ धुतले तरी निघून जाते. एखाद्या कर्मचाऱ्याने ते पाकिट फोडले आणि रिसिन त्याच्या श्वासावाटे फुफ्फुसात गेल्यास रोग्यात विविध लक्षणे दिसतात. जसे ताप, खोकला, मळमळ आणि छाती भरल्यासारखी वाटते. त्याला घाम येतो. त्याच्या फुफ्फुसात पाणी (पलमोनरी ओडेमा) साठते. त्याला श्वास घेण्यास खूप त्रास होतो. एखादे वेळी त्याची कातडी निळसर पडते. म्हणून अशा रोग्यास प्रथम रुग्णालयात दाखल करून त्याला प्राणवायू द्यावा. त्याला सलाईन द्यावे. त्याबरोबरच त्याला कोळश्याची पूड दिल्यास उलटीवाटे रिसिन बाहेर पडेल. अशाप्रकारे उपचार करावेत असे निर्देश सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने दिले आहेत. कारण रिसिन विषबाधेला उतारा (अँटिडोट) नाही. त्याबाबत अमेरिका आणि ब्रिटनमध्ये संशोधन चालू असून त्याच्या मानवावरील चाचण्या बाकी आहेत.
वरील घटनेनंतर अमेरिकेत ऑक्टोबर २००१ साली अँथ्रॅक्स या जीवाणूच्या हल्ल्याची आठवण होणे साहजिक आहे. त्यावेळी टपाल हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नाकावाटेच अँथ्रेक्सचे जीवाणू गेले होते. ते फुफ्फुसात जाऊन विष बाहेर टाकतात. त्यामुळे रोग्याचा उपचारापूर्वीच मृत्यू होतो. रिसिन किंवा अँथ्रेक्ससारखी अस्त्रे ही अत्यंत धोकादायक असून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अमेरिकेत
अशा घटनेच्या पाश्र्वभूमीवर डाक सॉर्टिग युनिट, महत्त्वाच्या व्यक्तींचे पत्रव्यवहार हुंग्या यंत्राद्वारे (स्नीफिंग युनिट) तपासली जातात. अमेरिकी गुप्तचर संघटना अत्याधुनिक यंत्रणेद्वारे दहशतवादाचा बिमोड करू पाहात असून तेथील नागरिक आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी उच्चत्तम प्राधान्य
देत आहे.
डॉ. बी. डी. माळी