पृथ्वीवरील जंगले, पर्वतरांगा, नद्यांची खोरी, सागर किनारे, वाळवंट, बर्फाळ प्रदेश या प्रमुख विभागांमधील जीवसृष्टीतील विविधता केवळ अफाट आहे. अशा जीवसृष्टीत वनस्पती व प्राणी हे दोन प्रमुख जीवप्रकार असतात. त्या जीवप्रकारांमधील उपप्रकार आणि त्यांच्यात संकरण होऊन निर्माण झालेले नवनवीन गुणधर्माचे सजीव याचे संशोधन अव्याहतपणे सुरू असते. अशा विविधतापूर्ण जैवविविधतेमध्ये नवनव्याने भर पडत असते आणि पृथ्वीवरील विस्मयकारक घटनांचा उलगडा होत राहतो.
दक्षिण अमेरिका खंडातील अ‍ॅमेझॉन नदी म्हणजे पृथ्वीवरील जैवविविधतेचे एक संग्रहालयच आहे. हजारो किलोमीटर्स उत्तर पूर्व दिशेनी वाहात जाणाऱ्या अ‍ॅमेझॉनने लक्षावधी चौ. किमीचा प्रदेश व्यापलेला आहे. विषुववृत्तीय प्रदेश असल्याने पावसाचे, उन्हाचे प्रमाण जबरदस्त आहे. या दोन प्रमुख कारणांमुळेच अ‍ॅमेझॉनच्या परिसरातील जैवविविधता संशोधकांना सततचे आव्हान ठरले आहे.
अ‍ॅमेझॉनच्या परिसरात अनेक ठिकाणी टेपूइस हा भौगोलिक प्रकार आढळतो. दाट जंगलांच्या सपाट प्रदेशातून पाच-सात हजार फूट उंचीचे प्रशस्त परिसराचे टेबललँड (सपाट प्रदेश) मधूनच वर उंचावलेले असतात. सर्व बाजूंनी कातळ, सरळ उभे असे ताशीव कडे असतात. सँडस्टोनने बनलेल्या या कातळांच्या माथ्यावर दाट जंगले असतात. आजूबाजूच्या प्रदेशातून कातळांमधील वेगवेगळे आडवे पट्टे स्पष्टपणे ओळखता येतात.
उत्तुंग कडय़ांच्या सभोवताली मैलो न मैल दाट जंगले असतात. उत्तुंग कडय़ांना वरती सपाट भाग असतो. नेहमीप्रमाणे टोकदार सुळके नसतात. अशा प्रकारच्या ‘टिपूइस’ प्रदेशातील वनस्पती आणि प्राणीसृष्टीवर आणि त्यांच्यात घडलेल्या उत्क्रांतीवर टेक्सस विद्यापीठातील प्राध्यापिका पॅट्रिशिआ सालेरनो आणि डॉ. जोस मॅकडोरमिंट यांच्या तुकडीने प्रचंड संशोधन केलेले आहे.
त्या वैशिष्टय़पूर्ण प्रदेशात आढळणारे सरडे आणि झाडांवरील बेडूक यांच्या संदर्भात मोठय़ा प्रमाणात नवीन माहिती उजेडात आलेली आहे. अर्थातच त्या प्रदेशात आढळणारे सरडे, बेडूक पृथ्वीवर इतरत्र कोठेही आढळून येत नाहीत.
अशा ट्री फ्रॉग्ज आणि सरडय़ांच्या उपप्रकारात गेल्या एक लक्ष वर्षांच्या कालखंडात उत्क्रांती घडत गेली असे त्यांच्या संशोधनानुसार सिद्ध झाले आहे. तळाच्या भागातील दाट जंगलात वास्तव्य करणारे बेडूक, सरडे शेकडो मीटर्सचे उभे कडे चढून वरच्या सपाट प्रदेशात कसे पोहचले असतील, कशाप्रकारे स्थिरावले असतील आणि त्यांच्यात उत्क्रांती घडते ते त्या प्रदेशात कायम झाले. या टप्प्याला त्यांच्या संशोधनात खूपच प्रयास करावे लागले.
त्या कडय़ांच्या काही भागात गवत आणि झिरपणारे पाणी जंगलांच्या प्रदेशात भरपूर पाऊस आणि वातावरणातील आद्र्रता या घटकांचा उपयोग होऊन ते सजीव वपर्यंत पोहचले असावेत असा संशोधकांचा कयास आहे. जीवाश्मांच्या आणि उपलब्ध झालेल्या डीएनएचा आधार घेऊन ते सजीव साधारणत: सात लक्ष वर्षांपूर्वी तेथे पोहचले असावेत. आश्चर्य म्हणजे त्या प्रदेशात वरच्या सपाट टेबललँड, बाजूच्या सुळक्यांच्या वेगवेगळ्या उंचीवर चार वेगळ्या प्रजातीचे वृक्ष बेडूक (ट्री फ्रॉग्ज) आढळून आलेले आहेत. या बदलांवर मात्र त्या संशोधकांना समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. तसेच त्या प्रदेशात वेगवेगळ्या अंतरावरील टेबललँडवरही विविधता असणारे सरडे, बेडूक आढळल्याने संशोधकांना संशोधन करण्यास वेगळी दिशा प्राप्त झालेली आहे. टिपूइस म्हणजे आकाशातील तरंगणारी बेटे आहेत. अशा स्वरूपात त्यांची ओळख भूगोल अभ्यासकांना आहे. टिपूइसच्या प्रदेशात मानव आणि भक्षक पक्ष्यांचा वावर नसल्याने त्या प्राण्यांना अभयदान मिळाले असावे असेही संशोधकांचे मत झालेले आहे. जेथे मानव, इतर सरपटणारे प्राणी, वेली यांसारखे जीव सरपटत वर चढू शकत नाहीत तेथे ठराविक वृक्ष बेडूक, सरडे यांनी मात केली आहे. याचेही संशोधकांना आश्चर्य वाटते. दाट जंगलांच्या विस्तृत प्रदेशामुळे टिपूइसपर्यंत पर्यटकही पोहचू शकत नाहीत.