‘मातीशिवाय शेती’ हा लेख प्रसिद्ध झाल्यावर काही वाचकांनी त्या संबंधी अधिक माहितीची विचारणा केली आहे, तर इंजिनिअिरग महाविद्यालयातल्या एका विद्यार्थ्यांने या विषयावर प्रकल्प करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
या सर्वाचे शंकासमाधान करण्याचा प्रयत्न या लेखात करणार आहे.
एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करावयाची आहे, की मातीशिवाय शेती या संबंधात जिज्ञासा जागृत करणे हा लेखाचा उद्देश होता. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ फक्त वाचन न करता काही अगदी सोपे प्रयोग स्वत करून पाहण्याची इच्छा होईल अशी अपेक्षा आहे.
मातीशिवाय शेती करताना पाण्यामध्ये पोषकद्रव्ये कोणती व किती प्रमाणात घालावयाची याची विचारणा काहींनी केलेली आहे. वनस्पती आपले अन्न हवा, पाणी व सूर्यप्रकाश याच्या साहाय्याने स्वत तयार करतात. त्यातील प्रमुख घटक कर्ब,(कार्बन), प्राणवायू (ऑक्सिजन), व हायड्रोजन त्यांना पाण्यातून व हवेतून मिळतो. त्यामुळे ते वेगळे पुरवण्याची गरज नसते. इतर घटक द्रव्ये म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅलशियम,मॅग्नेशियम व सल्फर आवश्यकतेप्रमाणे द्यावी लागतात. त्याशिवाय बोरॉन, तांबे, लोह, जस्त,मँगेनीज इत्यादी सूक्ष्म प्रमाणात लागतात. यातील प्रत्येकाचे प्रमाण हे कुठली वनस्पती आहे, यावर अवलंबून आहे. परंतु आपल्या प्रयोगासाठी फार सोपा मार्ग उपलब्ध आहे. बाजारात गोदरेज,टाटा,एस.डी.फाइन इत्यादी अनेक कंपन्यांची खते उपलब्ध आहेत. त्यापकी कोणतेही खत पाण्यात पूर्णपणे विरघळवून वापरावे. प्रमाण एक पेलाभर पाण्यामध्ये एक चिमूटभर. याखेरीज चांगले कुजविलेले शेणखत,अथवा उत्तम प्रकारे कुजविलेली कोंबडीची विष्ठा पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून वरील प्रमाणात वापरू शकता.अर्थात फार चांगला परिणाम आपल्या प्रयोगशीलतेवर अवलंबून आहे.
मातीशिवाय शेतीमध्ये एक अतिशय उपयुक्त बाब अशी आहे, की येथे तुम्ही दिलेल्या पोषक द्रव्याखेरीज दुसरे काहीच नसल्यामुळे आपण वापरलेल्या पोषक द्रव्याचा काय परिणाम होतो हे थेट पाहता येते. येथे दुसरी कुठलीही द्रव्ये नसल्यामुळे जो काही परिणाम होणार आहे तो पूर्णपणे आपल्या नियंत्रणाखाली असतो. त्यामुळे आपण वापरलेल्या खताचा व त्याच्या प्रमाणाचा नक्की काय व कितपत उपयोग होत आहे हे प्रत्यक्ष पाहता येते. तुम्ही निरनिराळ्या वनस्पतीसाठी वेगवेगळी खते लहान मोठ्या प्रमाणात वापरून पहाच. तुमच्या अनुभवाचे आदान प्रदान केल्यास त्याचा इतरांना, शेतकऱ्यांना व शेतकी विद्यालयांना उपयोग होऊ शकतो.
या शेती मध्ये एक प्रश्न अनुत्तरित आहे. झाडाच्या मुळांना हवा आवश्यक असते. परंतु त्यासाठी वाहत्या पाण्याची व्यवस्था करणे किंवा हवेचे बुडबुडे सोडणारे यंत्र वापरणे हे त्रासाचे व खर्चाचे आहे. झाडाच्या मुळांना एकाच वेळी पाणी व हवा हे दोन्ही मिळणे गरजेचे आहे. मुळे पाण्यात राहिल्यास हवा मिळत नाही आणि हवेमध्ये असल्यास पाणी मिळणार नाही. यावर एक उपाय करून पाहता येण्यासारखा आहे. केशाकर्षण नलिका ( कॅपिलरी टय़ूब) तंत्राचा वापर करता येईल अशी शक्यता आहे. त्यासाठी स्पंज ,नारळाच्या शेंडीचा भुसा (कोकोहस्क) किंवा तत्सम पदार्थ वापरावा लागेल. भुशाचा दाब देऊन बनविलेला ठोकळा अथवा स्पंजाचा चौकोन घेऊन त्याच्या वरच्या अध्र्या भागावर काटकोनातल्या उभ्या बाजूवर एकमेकास छेदणार नाहीत अशी आरपार छिद्रे पाडवीत. ( आकृती पहा) हे चौकोन अध्रे पाण्यात राहतील व अध्रे पाण्यावर राहतील अशा प्रकारे भांडय़ात ठेवावेत. केशाकर्षण नलिकांमुळे पाणी मिळू शकेल आणि मधील छिद्रामुळे हवाही मिळू शकेल. नक्कीच प्रयोग करून पहावा. आपले अनुभव जरूर कळवावेत. रोपांची वाढ करण्यासाठी मागील लेखात दाखविल्याप्रमाणे किंवा थोडी वेगळी रचनाही करता येईल. प्लास्टिकच्या भांडय़ावर एक नायलॉनची जाळी घट्ट बसवून जाळीपर्यंत पाणी घालावे व त्यावर रोपे वाढवावी. संशोधन ही काही केवळ उच्च शिक्षितांची मक्तेदारी नाही किंवा प्रयोगशाळेच्या चार िभतीत बंदिस्त नाही.कोणीही ते करू शकते. तुम्हीही अवश्य करून पाहा.