गेल्या अंकात आपण बघितले की, एडमंड हॅली यांनी आपल्या मित्राचे, आयझ्ॉक न्यूटनचे गणित वापरून हे सांगितले की धूमकेतू पण इतर ग्रहांसारखे सूर्याची परिक्रमा करतात आणि एका धूमकेतूबद्दल त्यांनी हेही भाकित केले की, तो ७६ वर्षांनी म्हणजे सन १७५८ साली परत सूर्याची फेरी मारून जाईल. ग्रह हे सूर्याभोवती परिक्रमा करतात हे मानायला अनेक शास्त्रज्ञदेखील तयार नव्हते. पृथ्वी केंद्रित विश्वाच्या कल्पनेच्या समर्थकांनी हॅलेची अशी म्हणून खिल्ली उडवली की, आपले भाकित खोटे ठरले हे बघायला तो जिवंत नसेल कारण त्या वेळी हॅले ४९ वर्षांचा होता आणि १७५८ साली तो १०२ वर्षांचा असता.
पण तो धूमकेतू दिसला होता. या धूमकेतूचा सर्व प्रथम शोध घेण्यात यश मिळाले जर्मन हौशी आकाशनिरीक्षक जॉन पॅलिट्झ यांना. त्याला २५ डिसेंबर १७५८ रोजी हा धूमकेतू दिसला होता. हा एक मोठा विजय होता सूर्यकेंद्रित विश्वाचा.  विश्व हे यापेक्षा फार अफाट आहे याचा शोध लागायला अजून एका शतकापेक्षा जास्त कळाचा अवधी होता. हा शोध पृथ्वीकेंद्रित विश्वाच्या कल्पनेच्या शवपेटिकेला शेवटचा खिळा ठरला. हे सिद्ध झालं होतं की ग्रह सूर्याभोवती फिरतात आणि धूमकेतूसुद्धा.
नवीन धूमकेतूंचा शोध त्याचबरोबर जुन्या धूमकेतूंची कक्षा निर्धारित करून यातले नेमके नवीन कुठले आणि परत परत सूर्याची फेरी मारून गेलेले कुठले याचा अनेक शास्त्रज्ञ अभ्यास करत होते, तर अनेक इतर दुर्बणिीतून नवीन धूमकेतूंचा शोध घेत होते. जी व्यक्ती त्या धूमकेतूचा शोध लावेल त्या व्यक्तीचे नाव धूमकेतूला देण्यात येते. फक्त एडमंड हॅलेने ज्या धूमकेतूवर संशोधन करून शोध लावला त्याला मात्र त्याच्या सन्मानार्थ हॅलेचा धूमकेतू म्हणून ओळखण्यात येतं आणि त्याचा क्रमांक ही 1P/Halley  असाच आहे.
केप्लरचे सिद्धांत आणि त्याला न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताची जोड या दोन्हीमुळे ग्रहांच्या कक्षेचे गणित सोडवणे (जटिल असले तरी) आता अचूक झाले होते, पण धूमकेतूंच्या बाबतीत मात्र अडचणी येत होत्या. कितीही प्रयत्न केले तरी एखादा धूमकेतू सूर्याच्या सर्वात जवळच्या िबदूवरून नेमका कुठल्या तारखेला जाईल याचं गणित मात्र सुटतं नव्हतं. कितीही प्रयत्न केले तरी ३-४ दिवसांची चूक होतच होती आणि मग यावर शास्त्रज्ञांना नवीन तोडगा सुचला. त्यांच्या लक्षात येऊ लागलं की, धूमकेतूंची शेपूट म्हणजे त्यातून निघणारे फवारे आहेत आणी फवाऱ्यामुळे धूमकेतूच्या प्रवासात किंचित बदल होऊ शकतो आणि तो होतोही.
१९५० च्या सालात जर्मन शास्त्रज्ञ ल्यूडविग बायरमनच्या असं लक्षात आलं की, धूमकेतूंची कक्षा कशीही असो त्याची शेपूट मात्र बरोबर सूर्याच्या विरुद्ध दिशेलाच असते. यावरून त्याने निष्कर्ष काढला की, सूर्यातून कदाचित प्रकाशाबरोबर काही कण बाहेर फेकले जात असावेत. जे धूमकेतूंच्या शेपटीतील वस्तुमान विरुद्ध दिशेला फेकण्यास कारणीभूत ठरत असावेत. नंतर सूर्यातून निघणाऱ्या या कणांना सौरवायू किंवा सौरवात असे नाव देण्यात आले. तसेच धूमकेतूंच्या शेपटीचे दोन प्रकार असू शकतात. एक धुलीकणांची शेपूट असते. ती काही वेळा वक्र दिसू शकते तर दुसरी शेपूट. हे कण धन आणि ऋण विद्युतभारित असतात. या विद्युतभारित कणांच्या शेपटीला मात्र सौरवायू हमखास सूर्याच्या दिशेने वळवते.
याच सुमारास ऊर्ट यांनी धूमकेतूंच्या स्रोताबद्दल एक सिद्धांत मांडला. ते अनेक धूमकेतूच्या कक्षांचा अभ्यास करत होते. त्यांना असं आढळून आलं की या धूमकेतूंची कक्षा एकाच पातळीत नसते. हे धूमकेतू आकाशातून कुठल्याही दिशेने येऊ शकतात, पण ते एका ठराविक अंतरावरूनच येत असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी एक परिकल्पना केली की सूर्याच्या भोवती सुमारे ५० हजार खगोलीय एकक या अंतरावर एक गोलाकार कोश आहे जिथे त्यांचा साठा आहे. हे धूमकेतू या भागातून येतात. आता या कोशाला  ऊर्ट मेघ  म्हणता येतं. (एक खगोलीय एकक म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील सरासरी अंतर आणि ५० हजार खगोल एकक म्हणजे सुमारे एक प्रकाशवर्ष). अर्थात सर्वच धूमकेतू या ऊर्ट ढगातूनच येतात असे नाही. काही धूमकेतू कदाचित दोन ताऱ्यांची परिक्रमाही करत असावेत. काही अशा धूमकेतूंना गुरू (किंवा शनी) आपल्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने त्यांची कक्षा बदलून त्यांना सूर्याभोवती लहान कक्षेत तरी जखडत आले आहेत तर काहींना त्याने भिरकावूनसुद्धा लावलं असेल.
गेल्या अंकात आपण बघितलं होतं की, धूमकेतू जेव्हा सूर्याच्या जवळ येतो तेव्हा त्याचे तापमान वाढू लागतं, पण संप्लवन या क्रियेमुळे त्यातील गोठलेल्या अवस्थेतील पाणी आणि इतर सहसा द्रवरूपातील पदार्थाचे रूपांतर सरळ वायुरूपात होते. तापमान जास्त झाल्याने आणि हे वायू एक फव्वर यासारखे वेगाने बाहेर पडतात. याचा परिणाम असा की धूमकेतूमधील दगड आणि धूलीकणांचे बारीक कण धूमकेतूच्या मुख्य गाभ्यापासून वेगळे होतात. हे वेगळे झालेले कण अगदी त्या धूमकेतूच्याच कक्षेत नाही पण साधारण तशाच कक्षेत सूर्याची परिक्रमा करतात.
धूमकेतूचा हा धुराळा काही पुढे तर काही त्याच्या मागून फिरत असतो आणि जर या धूमकेतूची कक्षा पृथ्वीच्या कक्षेला छेदत असेल तर जेव्हा पृथ्वी या छेदिबदू वर येते तेव्हा पृथ्वीवर या कणांचा मारा होऊन आपल्याला आकाशात उल्का वर्षांव दिसतो आणि आयसन धूमकेतूमुळे आपल्याला असा उल्कावर्षांव दिसण्याची शक्यता आहे. तर पुढच्या अंकात आपण हा धूमकेतू कुठे दिसेल आणि त्याच्या निरिक्षणासंबंधी चर्चा करूया.                    
paranjpye.arvind@gmail.com