‘खूप दूरच्या अनोळखी आणि निर्जन भूप्रदेशात तुम्ही  प्रवास करताय. घरच्या आठवणींनी तुम्हाला उदास झाल्यासारखं वाटतंय. अशावेळी पाण्यात थोडासा साबणाचा फेस करा, त्यात थोडी बंदुकीची दारू मिसळा आणि एका घोटात हे मिश्रण पिऊन टाका.’ हा सल्ला फ्रान्सिस गाल्टननं त्याच्या ‘द आर्ट ऑफ ट्रॅव्हल’ नावाच्या नवे भूप्रदेश पादाक्रांत करताना येणाऱ्या अडचणींवर मात  कशी करावी, या विषयीच्या प्रकरणात दिला आहे. या द्रवानं घसा खवखवेल, पण पोट मात्र नक्की साफ होईल आणि चित्तवृत्ती प्रफुल्लित होतील, असंही पुढं म्हटलंय.
पायांना छाले आले, चपला- बूट चावले, त्यावरही उपाय आहे.  पायमोज्यात साबणाचा फेस करा, बुटामध्ये कच्चं अंडं फोडून ओता. पायाला आराम मिळेल. बुटाचं कापड मऊ पडेल आणि प्रवास सुखाचा होईल. उवा, पिसवांवरही अक्सीर इलाज आहे. अर्धा औंस पारा (सुमारे १०० ग्रॅमला थोडा कमी) चहाची वापरलेली पत्ती आणि अंडी यांचं  मिश्रण करून त्याच्या गोळ्यांची माळ गळ्यात घाला. गांधीलमाशी, मधमाशी असं काही चावलं तर पाईपमधला तंबाखूचा चुरा खरडून काढा आणि तो चावलेल्या जागी लावा. स्कव्‍‌र्हीचा त्रास झाला तर लिंबाचा रस, संत्र्याची सालंही उपयोगी पडतात. हिरडय़ांवर ही चोळली की दात पडत नाहीत. हे व असे अनेक सल्ले असलेले गाल्टनचं पुस्तक हातोहात खपलं. त्याच्या वर्षभरात पाच आवृत्त्या निघाल्या. प्रवाशांना येणाऱ्या असंख्य संकटांवर त्यात उपाय सांगितलेले होते. शिवाय होडीपासून पडावापर्यंत पाण्यावर तरंगणारी वेगवेगळी प्रवासी जलयानं कशी बांधावी, झोपडी कशी उभारावी, तंबू कसा उभारावा, गळ न वापरता मासे कसे धरावे, स्थानिकांशी कसे वागावे (हसतमुख राहून बोलणे), पावसात कपडे कोरडे कसे राखावे (त्यांची घडी करून त्यांच्यावर बसावे) अशीही माहिती होती.
घोडा हा प्राणी प्रवासात फार उपयुक्त असतो. वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी त्याचा नेहमीच उपयोग होऊ शकतो. वाऱ्यात घोडय़ाच्या आडोशाचा फायदा घेऊन पाईपही पेटवता येतो. त्याला नदीत ढकलल्यास तो पोहतोसुद्धा. असा सल्ला जगप्रवाशांना देणाऱ्या गाल्टनला १८५५ मध्ये क्रिमियन युद्धाच्या वेळी ब्रिटिश वॉर ऑफिसने सल्लागार म्हणून नेमले. युद्धातील कठीण परिस्थितीत बारीकसारीक गोष्टींचा कसा उपयोग होऊ शकतो, हे तो सैनिकांना त्याच्या व्याख्यानातून सांगत असे. मात्र त्याच्या व्याख्यानाला फारसे सैनिक उपस्थित राहात नसत. लष्करी अधिकारी गाल्टनचं वर्णन करताना स्क्रू ढिला असल्याची ते खूण करीत. असा हा फ्रान्सिस गाल्टन खरंतर विद्वान होता. पण अतिउत्साहामुळे लोकांना तो खुळा वाटत असे. मानवी बोटांच्या ठशात सारखेपणा नसतो, कुणाही दोन व्यक्तींच्या बोटांचे ठसे एकसारखे असत नाहीत, हे त्यानं जगापुढे आणलं. या  बोटाच्या ठशाचं वर्गीकरण करायची त्याची पद्धत आजही वापरात आहे. त्याच पद्धतीचा वापर करून गुन्हेगार शोधले जात आहेत, त्यानं काही मानसशास्त्रीय चाचण्या निर्माण केल्या. वर्ड असोसिएशन टेस्टबरोबर आनुवंशिकतेबद्दल त्यात जे विचार मांडले,  त्यामुळे त्या शास्त्रशाखेकडे बघण्याचा शास्त्रज्ञांचा दृष्टिकोनच बदलला.
त्याचा जन्म क्वेकर पंथीय घराण्यात झाला. त्याच्या घराण्यात विज्ञानासंबंधी परंपरागत प्रेम होते. त्याच्या आजोबांनी- सॅम्युएल गाल्टननी बंदुका निर्मितीच्या व्यवसायात भरपूर पैसा कमावला होता. त्यामुळे शांतताप्रेमी समजल्या जाणाऱ्या क्वेकर पंथीयांचा त्यांनी रोष ओढवून घेतला होता. या पैशातून बर्मिगहॅम येथे गाल्टन बँक सुरू करण्यात आली. गाल्टनच्या वडिलांची आई चार्ल्स डार्विनच्या घराण्यातली होती.
१६ फेब्रुवारी १८२२ ला फ्रान्सिस गाल्टनचा जन्म झाला. तो शेंडेफळ होता. त्याच्या आई-वडिलांचं हे सातवं अपत्य. त्याच्या अवतीभोवती दूरदर्शी, सूक्ष्मदर्शी यंत्रं, अनेक प्रकारची भिंगं आणि शास्त्रीय उपकरणं असत.  सोळाव्या वर्षी फ्रान्सिसने डॉक्टर व्हायचं ठरवलं. वैद्यकाचा अभ्यास करताना त्या काळात अस्तित्वात असलेल्या औषधांची यादी त्याच्या हातात पडली. या फार्माकोपोइयात ज्या औषधांची वर्णनं होती त्या सर्व औषधांचे त्यानं स्वत:वर प्रयोग करून पाहायचं ठरवलं. ‘ए’ या वर्णमालेच्या पहिल्या अक्षरापासून सुरुवात करून तो ‘सी’ या अक्षरापर्यंत पोहोचला. तोपर्यंत त्या औषधांनी त्याला फारसा त्रास दिलेला नव्हता.
वैद्यकात पदवी मिळवायला आलेल्या गाल्टननं पदवी मिळवली ती गणितात. ट्रिनिटी कॉलेज केंब्रिजची ही पदवी मिळवताना गाल्टननं इतका कसून अभ्यास केला होता की, त्यांच्या मते त्यामुळे त्याचा मेंदू मुरगळला गेला होता. आपल्या  मेंदूला वारं लागावं म्हणून त्यानं एक खास हॅट बनवली होती. या हॅटला झडपा बसवलेली छिद्रं होती. त्या झडपा उघडण्या- मिटण्यासाठी हॅटला एक रबरी नळी जोडण्यात आली होती. या रबरी नळीच्या दुसऱ्या टोकाला एक रबरी चेंडू होता. तो गाल्टनच्या कोटाच्या खिशात असे. मेंदू गरम होतोय असं वाटलं की गाल्टन तो चेंडू दाबून हॅटच्या झडपा उघडत असे आणि त्याच्या डोक्याला वारं लागेल अशी व्यवस्था करीत असे.
वडिलांच्या मृत्यूनंतर गाल्टनच्या वाटय़ाला भरपूर संपत्ती आली. तेव्हा आयुष्य चांगल्या कामाकरिता खर्च करावं, असं त्याने ठरवलं. त्यामुळे कोंदट इंग्लंड सोडून तो सिरिया, इजिप्त आणि सुदानच्या प्रवासाला गेला. व्हिक्टोरिया राणीच्या काळातल्या इतर थोडय़ा प्रवाशांप्रमाणेच तोही एक महान भूगोल संशोधक होता. कष्टप्रद जीवन आणि हालअपेष्टा त्याच्या खिजगणतीतही नसत. संकटाचंही त्याला वावडं नव्हतं. त्याच्या वागण्यामुळे आफ्रिकी आदिवासींना त्याचा धाक वाटत असे. हॉटेंटॉट जमातीचे काही आदिवासी मिशनऱ्यांना ठार मारतात, असं त्याच्या कानावर आलं. तेव्हा एका धिप्पाड बैलावर बसून गाल्टन त्या आदिवासींच्या वस्तीत शिरला आणि त्या जमातीच्या प्रमुखाच्या गवती झोपडीमध्ये शिरला. त्या बैलाची  शिंगं धरलेला हा राक्षस पाहताच तो प्रमुख खूप घाबरला आणि त्यानं कुठल्याही गोऱ्या माणसाला आणि धर्मप्रसारकाला इथून पुढे त्रास देणार नाही, असं कबूल केलं.
ओव्हांबो जमातीच्या एका प्रमुखानं एकदा गाल्टनला त्याच्या त्या गावातल्या मुक्कामापुरती एक तात्पुरती बायको नजर केली. गाल्टननं ही भेट नाकारली. त्याचं कारण त्या तरुणीला लोण्याच्या साहाय्यानं तांबडय़ा मातीत- रेड ओक- रंगविण्यात आलं होतं, तर गाल्टनचा एकुलता एक सूट स्वच्छ पांढऱ्या रंगाचा होता.हॉटेंटोट स्त्रियांचे नितंब फारच मोठे असतात. मानवशास्त्रीय भाषेत या प्रकारास स्टिअ‍ॅटो पायगी असं म्हटलं जातं. या प्रकारचा अभ्यास करायची गाल्टनची इच्छा होती. पण त्या स्त्रियांच्या शरीराची मापं जवळ जाऊन घेणं त्याला अडचणीचं वाटत होतं. मिशनरी याबाबत तरी दुभाषाचं काम करायला तयार नव्हता. एक दिवस त्यानं नदीकाठी एका झाडाखाली अशी स्त्री बघितली. तिची भाषा येत नव्हती. तेव्हा आता काय करायचं हा प्रश्न त्याच्या फिरलेल्या मेंदूनं तत्काळ सोडवला. त्यानं सर्वेक्षणाची यंत्रं बाहेर काढली. सेक्स्टंटचा वापर करून त्या स्त्रीच्या शरीराचे विविध कोन मोजले. मग त्रिकोणमिती वापरून तिची शारीरिक मापं निश्चित केली आणि रॉयल सोसायटीसमोर हॉटेंटोट स्त्रीचे शरीरसौष्ठव या विषयावर शोधनिबंध सादर केला.

Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
israel iran war history
Iran-Israel War: एकेकाळी मित्र असणारे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू कसे झाले?
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
what is the right way to wash and store grapes
द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…