पृथ्वीवरील विविधता विलक्षण आहे. पृथ्वीवरील निसर्गचक्र आणि त्यामधील अनेक प्रकारचे घटक, त्यांचे उपयोग, त्यांची निर्मिती, विविध घटकांची एकमेकांशी संयोग पावण्याची शक्ती केवळ चक्रावून टाकणारी आहे. मानवाची अत्युच्च बुद्धिमत्ता, संशोधक वृत्ती आणि चिकाटी याच्या आधारावर ‘निसर्गातील आश्चर्ये’ उलगडली जात आहेत.
पृथ्वीच्या परिसरातील मूलद्रव्ये म्हणजेच मूलघटक (एलीमेंट्स) संख्येने किती आहेत, त्यांचे गुणधर्म, उपयोग आणि एकमेकाशी निश्चित प्रमाणात एकत्रित होण्याची शक्ती याकडे शास्त्रज्ञांचे लक्ष साधारणत: दोन शतकांपूर्वी वेधले गेले. उत्सुकतेपोटी त्यांचा अभ्यास, ुव निरीक्षणास सुरुवात झाली आणि त्यातूनच रसायनशास्त्र (केमिस्ट्री) या अथांग शास्त्राचा जन्म झाला. मूलद्रव्यांची प्राथमिक स्थिती आणि त्याची होणारी स्थित्यंतरे मूलद्रव्ये एकमेकांशी प्रमाणबद्ध पद्धतीने एकत्रित होऊन निर्माण होणारी नवीन संयुगे याची व्याप्ती महाप्रचंड आहे. नवनवीन गुणधर्माचे, कायमस्वरूपी बदल यामुळे त्या शास्त्रज्ञांना ‘किमयागार’ (अलकेमिस्ट) असे संबोधले जाऊ लागले.
अनेक संशोधक या प्रकारच्या मूलद्रव्यांचा अभ्यास करू लागले. मूलद्रव्यांची संख्या वेगाने वाढू लागली आणि त्यांचे उपयोग, मानवी जीवनात, निसर्गचक्रात त्यांचा सहभाग याची कल्पना स्पष्ट होऊ लागली. या असंख्य मूलद्रव्यांचे शिस्तबद्ध पद्धतीने वर्गीकरण करण्यास सुरुवात झाली. दिमित्री मेंडिलिव्ह या रशियन रसायनशास्त्रज्ञाने, सेंट पिटसबर्ग विद्यापीठात संशोधन करताना मूलद्रव्यांचे अचूक वर्गीकरण तक्ता (अ‍ॅटॉमिक टेबल) शोधून काढला. रसायनशास्त्रात अतिप्रचंड क्रांती झाली.
रसायनशास्त्राचा इतिहास अतिपुरातन आहे. पाचव्या शतकात ग्रीक तत्त्ववेत्ता ‘इंपेडेक्लिस’ याने वायू, अग्नी, पाणी व पृथ्वी अशा घटकांच्या एकत्रिकरणाने सजीवांची निर्मिती होते, असा विचार सर्वप्रथम मांडला. त्या विचारात ‘अ‍ॅरिस्टॉटल’ या तत्त्ववेत्त्याने पृथ्वीबाह्य़ घटकाची (सेलेस्टिअल ऑब्जेक्ट) भर घातली आणि रसायनशास्त्राचा विस्तार होऊ लागला. ‘अ‍ॅंतोनिओ लव्हाझिए’ या फ्रेंच संशोधकाने एकूण तेहतीस मूलद्रव्यांची वर्गवारी करून वर्गीकरण तक्तयाचा पाया रोवला. १७९५ च्या सुमारास इंग्लंडच्या जॉन डाल्टन याने प्रत्येक मूलद्रव्यात अतिसूक्ष्म कण (अ‍ॅटम्स) असतात व त्यापासून निश्चित स्वरूपाचा घटक निर्माण होतो, हे तत्त्व मांडले.
१८१७ मध्ये जोहान वोल्फगाँग नावाच्या जर्मन संशोधकाने समान गुणधर्माच्या अणूंचे छोटे ग्रुप असतात व ते एकत्रितपणे अभ्यासता येतात, असे तत्त्व सिद्ध केले. अणू कल्पना संशोधकांच्या मनात रुजली आणि त्याच्या आधारावर मूलद्रव्यांचा शोध झपाटय़ाने होऊ लागला. १८३४ मध्ये सैबेरियातील तोबोलस्क खेडय़ात दिमित्रीचा जन्म झाला. बालवयापासून त्याला रसायनांमध्ये भरपूर आवड होती. माध्यमिक शाळेत असताना त्याच्या मनात विविध घटकांचे गुणधर्म घोळत होते. १८५४ मध्ये दिमित्री सेंट पिटसेबर्गला पोहोचला. त्याला विद्यापीठात प्रवेश मिळाला नाही. परंतु, वैयक्तिक संशोधन करून त्याने अणुभार, अणुवजन, भौतिक व रासायनिक गुणधर्म यांच्यावर आधारित मूलद्रव्यांचे वर्गीकरण मानसिक तक्तयावर साकारण्यास सुरुवात केली. शास्त्रज्ञांच्या बैठकीत त्यासंदर्भात निरीक्षणे सादर करून प्रचंड खळबळ उडून दिली.
१८६९ च्या फेब्रुवारी महिन्यात त्याची प्रचंड मानसिक उलघाल होऊ लागली. सुमारे ९० प्रकारची मूलद्रव्ये स्वतंत्ररीतीने मला अंतज्र्ञानाने दिसत आहेत, ती मूलद्रव्ये विविध प्रकारच्या आकारात वावरतात, त्यांना एकत्रित, शिस्तबद्ध रीतीने ठेवता येईल का, असे विचार तो मांडू लागला. बुनसेन आणि गुस्ताव्ह किरचॉफ या जर्मन संशोधकांना ते विचार पटले. परंतु, मेंडेलिफ हा भ्रमिष्ट झाला आहे, असा इतरांचा समज झाला. १८६९ च्या दुसऱ्या आठवडय़ात मेंडेलिफने सातत्याने तीन दिवस प्रयोगशाळेत मुक्काम केला. विश्रांती न घेता एकेका कागदावर मूलद्रव्याचे नाव, त्याचा अणुभार इ. माहिती नोंदविली. या मूलद्रव्यांना एकाच सारिणीमध्ये कसे बसवावे, त्या तुकडय़ांचे एकत्रिकरण (पझल) कसे करावे, या विचारात तो निद्राधीन झाला. त्याला स्वप्न पडले आणि ते तरंगणारे कागदाचे कपटे पद्धतशीरपणे एकत्रित होऊन तुकडय़ांतून एक चित्र (कलाकृती) पूर्ण होत आहे, असा भास झाला. तो दिवस होता १७ फेब्रुवारी १८६९. त्याने चार तासात त्या मूलद्रव्यांना शिस्तीने सारिणीत बसविले आणि रसायनशास्त्रातील एका महान शोधाची नोंद झाली.
त्याने हायड्रोजन अणूपासून सुरुवात केली आणि सिल्व्हर (चांदी) अणूपर्यंत सत्तेचाळीस मूलद्रव्यांचा तक्ता तयार केला. अजूनही अज्ञात असलेल्या भविष्यातील संशोधनानुसार या सारिणीत भर पडणार आहे, त्यांच्यासाठी तक्तयात मोकळ्या जागा सोडल्या आहेत, असा विश्वास प्रकट केला. मेंडेलिफच्या शोधाने जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका येथील रसायनशास्त्र संशोधकांना जबरदस्त उत्साह प्राप्त झाला आणि रसायनशास्त्राची प्रगती तुफानी वेगात साकारली.
सर्वसामान्यांना ज्ञात असलेल्या काही मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडेलिफने अचूकपणे सादर केले. हायड्रोजनचा अणू अत्यंत ज्वालाग्रही आहे. हेलिअम हवेपेक्षा हलका असून, त्यातून वीजप्रवाह जाऊ शकतो. लिथिअम हा सर्वात वजनाने हलका धातू असून, त्याचा उपयोग घडय़ाळे, रेडिओमध्ये करता येतो. कार्बन हा असंख्य जैविक संयुगांचा पाया असून, त्यापासून पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ- हिरा (डायमंड) निर्माण होतो. नायट्रोजनचे हवेत ७८ टक्के प्रमाण असून, तो रंगहीन वायू असून, कमी तापमानाला त्याचे द्रवात रूपांतर होते. ऑक्सिजन (प्राणवायू) सजीवांच्या श्वसनाला अत्यावश्यक असतो. ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास काही सेकंदात सजीवाचे प्राण कायमचे थांबतात. फॉस्फरस एकदम पेट घेतो, म्हणून त्याचा उपयोग काडय़ापेटीत केला जातो. कॅलशियम पांढऱ्या रंगाचा घन स्वरूपाचा धातू असून, तो सहजपणे ऑक्सिजन, कार्बन यांच्याशी संयोग पावतो. पोटॅशियम अत्यंत ठिसूळ धातू असून, शरीरातील चेतासंदेशांचे वहन करण्यास महत्त्वाचे ठरतात. निऑन हा क्रियाशून्य वायू असून, त्यातून विद्युतभार गेल्यास अतिशय चकाकतो म्हणून त्याचा उपयोग जाहिरातींमध्ये करतात.
लोह हा पृथ्वीच्या बाह्य़ कवचातील महत्त्वाचा घटक असून, त्यापासून अनेक औद्योगिक उत्पादने, वस्तू तयार केली जातात. तांबे धातूला ठोकठोकून वेगवेगळे कायमस्वरूपी आकार तयार करता येतात आणि नित्य वापरातील भांडय़ांची निर्मिती केली जाते. निकेल धातूपासून नाणी तयार करता येतात. कारण त्याला गंज चढत नाही. आयोडीन हा नेहमीच्या तापमानाला घन स्वरूपात असतो, पण तापमानात थोडी वाढ झाल्यास जांभळ्या रंगाचा वायू तयार होतो. मेंदूची योग्य वाढ होण्यास बालपणी आयोडीनची अत्यावश्यकता असते. चांदीला कधीही जंतूंचा संसर्ग होत नाही म्हणून त्यापासून तयार केलेले दागिने खूप काळ टिकतात. सोने (गोल्ड) पासून नाजूक तारा, पातळ पत्रे करून मौल्यवान दागिने तयार करता येतात. घन, द्रव, वायू अवस्थेमधील अणूंची अचूक माहिती हा या तक्तयातील सर्वात महत्त्वपूर्ण गुणधर्म मानला जातो.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा